चार चारोळ्या

१.

स्तुतीसुमनांचा वर्षाव ऐकत 
मृतात्मा विस्मित जाहला होता -
एक शब्दही कुणी चांगला 
जिवंतपणी न बोलला होता..
.

२.

किलबिल करती अक्षरपक्षी 
खिडकीत मनाच्या बसून-
हायकू दोनोळ्या चारोळ्या 
भुर्रकन जाती उडून ..
.

३.

आठवणीचा मोर नाचतो 
थुई थुई ग मनात -
जंगलात जणु मोर नाहतो 
चिंब चिंब पावसात..
.

४.

प्रत्यक्ष न भेटलीस तरी 
रहात नाही काही अडून - 
तुझीच येते समोर प्रतिमा 
घेता डोळे बंद मी करून..
.

कविता.. माझी सखी

या कुशीवरून त्या कुशीवर 
लोळत पडतो मी रात्रभर ..

निद्रादेवी प्रसन्न होत नाही 
झोप काही लवकर येत नाही ..

काय करावे समजत नाही 
सखीशिवाय करमत नाही ..

आठवण सखीची येत असते 
उचक्यांनी बेजार करत राहते ..

दिवसभर का सखी भेटत नसते 
रात्री का अशी छळत ती असते ..

अखेर झोप होते अनावर 
सखीही येते बसून स्वप्नावर ..

सुखसंवाद सखीशी घडतो 
काहीबाही मीही बडबडतो ..

घडत राहते काही अघटित 
सखी अन मी असतो मिठीत ..

मस्त मजेत असा मी असतो 
बहुधा बायकोला न बघवतो ..

गदागदा ती मला हलवते 
सखी मिठीतून अलगद पळते ..

एक धागा सुखाचा क्षणात तुटतो 
दिवसभर शंभर दु:खांत अडकतो .. !
.

कुण्या एकाची जीवनगाथा

कुणी पसरली होती माझे स्वागत करण्या फुले 
त्यातही एखादा कोणी काटे पसरत मनी डुले -

अवघड होता रस्ता चालायाचा मजला पुढे 
निंदा मत्सर कौतुकसुमने स्तुतीत बोल खडे -

हिम्मत नव्हती हारायाची धाडस होते अंगी 
जगण्याचा हव्यास होता रंगुनी विविध रंगी -

ऊन कधी खडतर तर शीतल कधी लहर तनावर 
ओरखडा उमटू नव्हता द्यायचा टणक मनावर -

हसता हसता रडायचे अन हसायचे रडताना मजला 
अभिनय वेळप्रसंग पाहुनी करायचा होता मजला -

भीती होती आपल्यांची पण पाठी थाप परक्यांची 
मलाच पुढती सरकत जाऊन संधी गाठायाची -

सरशी कधी तर पराजयातुन असायचे आनंदी 
खडतर जीवन होते तरीही बनायचे स्वच्छंदी -

डावपेच अन गनिमी कावे आत्मसात मी केले  
आडवे आले जरी कुणी ते स्वत: नेस्तनाबुत झाले -

ललाटरेषा आखली होती आधीच त्या विधात्याने
पुसून नवीन आखणे होते मलाच स्वकर्तृत्वाने -

प्रयत्नांती परमेश्वर असतोच म्हणे तो पाठीशी 
मिळवत गेलो यश मी प्रयत्ने पूर्वपुण्य गाठीशी ..
.