हायकू

१.
श्रावणसरी 
पडल्या धरेवरी
विश्व निवांत..
.
२.
हिरवे रान
परमेश्वरी दान
किती अनोखे..
.
३.
बीज भुईत
पाऊसही घाईत
वन आनंदी..
.
४.
मनी काहूर 
भलती हुरहूर 
त्याचा होकार ..
.
५.
अंत पाहतो 
डोळ्यांतून वाहतो 
पूर प्रेमाचा ..
.
६.
तो बरसला 
निसर्गही हसला 
खुषीत विश्व ..
.

बागेत जीवनाच्या फुलले असंख्य काटे .. [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
------------------------------------------------------
बागेत जीवनाच्या फुलले असंख्य काटे 
आता मला फुलांचे कौतुक मुळी न वाटे ..

पिज्झा नि बर्गराचे सारेच गान गाती 
मी नेहमी भुकेला खाण्या दही धपाटे ..

पडक्या स्थितीतल्या त्या वाड्यास पाहताना 
स्मरणात बालपण ये डोळ्यात अश्रु दाटे ..

अभियान साजरे ते करण्यात दंग नेते 
फोटोत दाखवाया हातातले खराटे..

सन्मार्ग का धरावा सत्यास त्या स्मरूनी 
सत्यास नेमके जर फुटतात नित्य फाटे ..

ज्ञानात का न पडते त्यांच्या कधीच भर हो 
भरतात पुस्तकांची साठून धुळ कपाटे ..
.

जीवनगीत

चालायचे जीवनात 
असेच ठेच खात खात

कधी फुलात कंटकात 
जीवनगीत असेच गात

कधी मिट्ट काळोखात 
कधी लख्ख प्रकाशात

हिरव्यागारशा बहरात 
रखरखीत माळरानात

कधी मस्त सुगंधात 
कधी त्रस्त कचऱ्यात

आवडत्या सहवासात 
नावडत्या जमावात

छान कधी एकांतात 
भेसूर कधी आकांतात

गर्द सावलीत वनात 
रणरणत्या भर उन्हात

किलबिलत्या पाखरात 
घुबडांच्या चित्कारात

सळसळत्या चैतन्यात 
भळभळत्या वेदनात

नीतीच्या कुंपणात 
नियमांच्या वावरात

पुढेपुढेच नित्य जात 
जीवनगीत गात गात ..!
.

सांगण्या मी जात नाही वेदना माझी कुणाला --[गझल]

वृत्त- व्योमगंगा 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगागा 
मात्रा- २८  
-------------------------------------------------------
सांगण्या मी जात नाही वेदना माझी कुणाला
आपल्या दु:खास जो तो फार उत्सुक सांगण्याला..

जीवनी ना जाहले जे भांडणाने साध्य काही 
साह्य करण्या मौन आले साध्य माझे साधण्याला..

भूक होती चूल होती भाकरी पण खायलाही 
पाहवेना तेच छप्पर झोपडीचे पावसाला..

छिद्र माझ्या काळजाला हा सुगावा लागता का      
धाव घेती भेटण्याला मीठ संगे चोळण्याला..   

लागले आहेच याला वेड म्हणती एकमेका 
जात माझी "माणसा"ची सांगतो जेव्हा जगाला..

राहिली ना खास खात्री माणसाच्या सद्गुणांची 
तोच नक्की साप मरतो चावतो जो माणसाला..

वाटली ना शक्य आधी पूर्तता का मागणीची    
थक्क झालो सांगता तू फक्त गजरा माळण्याला..
.

खरा मित्र

एखाद्याला पैसे मागितले की. . . . . 
" कशासाठी ?
कुणासाठी ?
परत कधी ? 
काय काम ? " 
- अशा तऱ्हेचे 
उलटतपासणीचे प्रश्न 
विचारले गेले की, 
समजायचे
हा "नातेवाईक" आहे !

आणि -

एखाद्याला पैसे मागितले की ,
इतर प्रश्न न विचारता, 
"आणखी पाहिजेत का ? ",
असे विचारून,
लगेच पैसे मिळाले की, 
समजायचे
हा "खरा मित्र" आहे !
.

विदूषक

हास्यमुखवटा
ठेवला काढून 
खास त्याने 
जेव्हा 
आपल्या चेहऱ्यावरचा -

भाव वेदनेचा 
घेतला जाणून 
आरशाने 
तेव्हा
झाकल्या चेहऱ्यावरचा.. !
.

तडजोड

मान्य आहे मला 
संसार एक तडजोड असणार -

तू चुकलीस की
मी माफ करत राहणार -

माझ्या चुका तू 
कायम पदरात घेणार -

असे कुठवर ग  
आपल्या दोघात चालणार -

जशास तसे वागणे
कधीच नाही का जमणार ?
.

अजब गजब

रागारागात 
गेलीस 
निघून दूर -

ठरवले..

यापुढे 
आठवायचे नाहीच 
तुला-

पण,

होऊन बसलय 
किती आता 
ग अवघड -

विसरायचे होते 
मी तुला..

हेच नेमके 
का आठवत नाही 
वेळेवर मला .. !
.

तीन हायकू -

1.

कोण रडले 
नभ गडगडले 
अंकुरले बी ..
.

2.

वाट पाहता 
श्रावण बरसला 
मोर नाचला ..
.

3.

गवत छान 
हसला मनी कसा    
हैराण ससा ..
.

गर्दीत लागलेले - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा  गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
------------------------------------------------------
गर्दीत लागलेले धक्के चुकून माझे 
विसरून तीच गेली ध्यानी अजून माझे ..
.
या कोरड्या करांनी केले कितीक ओले 
तेव्हाच काम झाले त्यांच्याकडून माझे ..
.
का वाचता तुम्ही या कोऱ्याच चेहऱ्याला -
काळीज अनुभवांनी भरले लिहून माझे ..
.
खड्ड्यास पाहुनीही देतो न दोष कोणा  
त्यानेच आज पडते पाउल जपून माझे ..
.
गेलास तू तसा का बघता न आज मजला 
आले सख्या किती रे डोळे भरून माझे ..
.
प्रेमात गुंतलो मी तुझिया कसे ग सांगू 
ते पाठ शब्द सारे गेले थकून माझे ..
.
होतो जिवंत तेव्हा टाळून जात होते  
खांद्यावरी निघाले शव हे सजून माझे ..
.
होता भणंग कोणी भूखंड आज त्याचे 
नेता बघून गेले डोळे दिपून माझे ..
.