भावना-वेदना-

अक्षरांची बांधणी
शब्दांच्या पायऱ्या
विचारांचे काठ 
ओळींचे जिने..

कडव्यांच्या मजल्यावर 
बनत जाते
ठिकठिकाणी
कवितेचे घर..

कवितेच्या घरात
लुटुपुटूची माणसे
पटल्या तर भावना
नाहीतर फक्त वेदना..
.

मुखी नाम ते एकच येते -मुखी नाम ते एकच येते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..

डोळ्यांपुढती असतो दत्त
डोळे मिटले तरीही दत्त
ध्यानिमनी ते रूप विहरते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..

औदुंबरछायेखाली ते
मनही डोलते तनही डोलते
अनुभूती का अद्भुत येते  -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..

नाही थारा कुविचारांना
मनी  ठेवितो सुविचारांना
रूप पाठीशी उभे ठाकते  -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..

दत्त नाही जर जीवनात तो
अर्थ काय संसारी उरतो 
नाम समाधानातच स्फुरते
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..

.

कविता

कागद हळूच समोर घेतो
लेखणी अलगद बोटी धरतो ..


तुझ्यावर कविता लिहायची
मनात उत्साहाने ठरवतो ..


काय लिहावी, कशी लिहावी-
विचार मनात चालू असतो ..


कागदाकडे नजर टाकता
एकदम चक्रावून जातो ..


तुझेच प्रतिबिंब समोर येते
गाली खुदकन मीच हसतो ..


समोर साक्षात कविता असता
वेगळी कसली कविता करतो !

.

वेळीच घातलेला एक टाका -


" मी
सिग्रेट/ बिडी/ तंबाखू/ गुटखा/ दारू व्यसन करणार
माझा आनंद मी लुटणार
मी माझा पैसा खर्च करणार
त्यात तुमचे काय जाणार
मला फुकटचा सल्ला तुम्ही कोण देणार
मला माझे हित कळत नाही काय ? "

......... असे म्हणणारे बरेच व्यसनी "शहाणे" आहेत.

तुमच्या पैशाने तुम्ही व्यसन खुश्शाल करा हो-
आम्ही अडवत नाहीच.

पण-
तुम्ही कर्काने / क्षयाने पोखरले गेलेले,
जेव्हा "कालांतराने" कळते -
तेव्हाच - दुर्दैवाने ,
आपल्या "त्या क्षणैक" आनंदाची,
"लाखमोलाची किंमत" समजणार !

पैसा तर तुमचाच व्यसनात जाणार आहे आणि -
स्वत:चे तुमचेच आयुष्य बरबाद होणार आहे ,
पण-
- उरलेल्या रक्ताच्या सख्ख्या नात्यांनी,

 चिमुकल्यानी कुणाकडे पहावे हो ?
तुमच्या व्यसनी पापाची सजा घरातल्या इतरांना का ?

"वेळ गेल्या"नंतर सावध होण्यापेक्षा,
कुठल्याही व्यसनातून
"वेळीच" सावध झालेले बरे, नाही का !

आपल्या बरोबरच, घराचेही हित जपा ..

सखे -


१)     हा खेळ पावसाचा 


गल्लीच्या पल्याड तुझं घर सखे, 
तिकडे पाऊस ये जा करतो -
आमच्या गल्लीत ढगांना पाठवून
'टुकटुक माकड' म्हणत पळतो ..
.

.


२)     निर्धन श्रीमंत
खिसा कापता पाकीट गेले
नोटा सगळ्या गायब झाल्या -
फोटो खिशात शाबूत तुझा
आठवणी मोलाच्या उरल्या ..
.
.

 
३)     दूत

वारा असतो उत्सुक सखे,
तुझ्या माझ्या भेटीसाठी -
तू असतेस दूर तरी
वर्दी गजऱ्याची माझ्यासाठी ..
.
.

 
४)     अती सर्वत्र

हुरळून सांगत सुटलो जगाला
सखे, तुझी नि माझी ओळख झाली -
जो तो उत्तर देई मजला
गोष्ट कधीच ही जगजाहीर झाली . .
.
.

    
५)     आशावादी

दिवसभर वाट पाहिली सखे,
का बरे आली नाहीस तू -
आता झोपण्याचा प्रयत्न करतो
वाटते.. स्वप्नात भेटशील तू . .
.
.

  
६)  गोड जखमा

केसांना झटकत होतीस सखे,
मान वेळावत सकाळी न्हायल्यावर -
तुझ्या प्रत्येक झटक्यासरशी
घाव बसत होता आरपार हृदयावर ..
.
.

    
७)     चाचपणी
तुझ्या माझ्या प्रेमात सखे,
बंधन तुझ्या पापणीचे -
मी दिसता वा नसता समोर
नाटक सुरू चाचपणीचे . .
.
.

    
८)     बोलकी अबोली
सुगंध कुणाला मोगऱ्याचा
सुवास कुणाला जाईजुईचा -
शोभतो तुझ्या केसात सखे,
बोलका गजरा अबोलीचा . .
.


.

जो तो जगी भुकेला

नेता खुर्चीचा
मंत्री खात्याचा
पक्ष सत्तेचा
बेकार रोजगारीचा
कामगार बोनसचा
नोकरदार भत्त्याचा
व्यापारी भाववाढीचा
भिकारी पैशाचा
भक्त दर्शनाचा 
बिल्डर डोंगराचा
वकील अशिलाचा
विक्रेता गि-हाइकाचा ..

कुणीतरी कुणाचा
कुणीतरी कशाचा

आहेच भुकेला ..
 
देवही नाही सुटला
तोही म्हणे जगी
भावाचा भुकेला ..

.

फेसबुकाच्या रस्त्यावर

 सकाळी सकाळी उठून
"फेसबुका"च्या रस्त्यावर
घेऊन बसलो आहे
"स्टेटस"चा वाडगा . .


मनात आले तर
एखादा नसलेला "फ्रेंड"
नुसते पाहून जातो . .


एखादा असलेला फ्रेंड
"लाईक" टाकून जातो . .


एखादा फ्रेंड दयेने
"कॉमेंट" टाकून जातो . .


हळूच एखादा फ्रेंड
संधी साधून बेष्ट
"कॉपीपेष्ट" करून जातो . .


इकडे तिकडे बघत
दुसरा फ्रेंड हक्काने
त्याचीच भिंत समजून
"ट्याग" करून पळतो . .


नित्यनेमाने काही फ्रेंड्स
"कॉमेंट"च्या नोटेसह
"लाईक"चे नाणे टाकतात . .


रात्री वाडग्याकडे बघत
कधी नुसता हळहळत
कधी हसत हसत ..


दुसऱ्या दिवशीसाठी
वाडगा पुसत मी झोपी जातो !

.

चार चारोळ्या

  सहभागी  -
 
हसणे झाले खूप सारे
चला रडून पाहू जरा -
ओंजळीतल्या फुलातले
काटे टोचुन घेऊ जरा . .
.
 


  मनमोर -

डोक्यावर मी छत्री धरली
तू दिसलीस अचानक समोर -
आठवणींचाही पाऊस बरसला
नाचू लागला बेभान मनमोर ..
.  गुंता -

माझे डोळे खिळले बटेवर
केसाची बट तुझ्या गालावर -
किती कसा केसात गुंतलो
गुंताच गुंता सखे, आयुष्यभर ..
.
 


  पत्ते -

कधी कधी तू नसताना
आठवण अनावर होते सखे -
तुझ्या आठवणींचे पत्ते
पिसत बसतो एकटाच सखे . .
 

.

आभासी फेसबुक

छ्या ! ही बायको पण ना ....
नको तेव्हा बरोब्बर शालजोडीतला हाणतेच टोमणा !
एक संधी सोडत नाही !

आताच पुटपुटत गेली मुद्दाम समोरून -
"मी आयुष्यभर समोर आहे तर,
कध्धी मेलं 'वा' 'छान' म्हणाला नाहीत !
त्या मेल्या फेसबुकावर मात्र ....."

कस समजावयाच हो तिला....?

या "आभासी" जगात वावरायचे म्हणजे,

कुठल्याही
कसल्याही
कुणाच्याही फोटोला -

"वॉव .."
"हौ स्वीट .."
"वेरी क्यूट.."
"बुट्टीफूल.."
"नाईस हं ..."

 ....असलं काहीतरी खोटखोट लिहिल्याशिवाय,
तरणोपायच नसतो !!!
.


तीन चारोळ्या -

'जित्याची खोड -'
कुणाला मदत करायची तर
हात पुढे होत नाहीत चटकन,
कुणाच्या नावाने मोडायला मात्र
बोट कडकड वाजतात पटकन ..
.

'मौनाचे हत्यार -'
कुणी वाराने जखमी करते
कुणी शब्दाने जखमी करते -
जगावेगळी तिची रीत पण  
मौनाने ती जखमी करते !
.

'तोड जोड -'
क्षण एकच पुरे 
दुरावा निर्माण करायला -
आयुष्यही अपुरे 
जोड सांधून ठेवायला ..

.

पाच चारोळ्या -

     १)  दोनच शब्द -

" दोन शब्द तरी बोल "
अखेर तिला विनंती केली -
"अच्छा, टाटा" बोलून
चक्क ती निघून गेली ..
.


     २)  शिक्षा -

लागले शब्द भांडायला
जेव्हा मनातल्या मनात -
केली शिक्षा त्या शब्दांना
टाकले बांधून काव्यात ..
.


     ३)  जंगी स्वागत -

महापालिके करतो कौतुक
गजरातून मी टाळयांच्या -
पायघड्या घातल्यास तू
खड्ड्यांतून ग चिखलाच्या ..
.     ४)  एकरूप -

लेखणी माझ्या भावनांशी
इतकी झाली एकरूप -
मी विचार करण्याआधीच
लिहू लागते ती आपोआप ..
.


 
     ५)  खात्री -

पृथ्वी सूर्याभोवती फिरते का
याबद्दल मी साशंक आहे -
पण नवरा बायकोभोवती फिरतो
याबद्दल मी नि:शंक आहे ..
 

.

चार चारोळ्या

१)   द्विधा -

अस्थिर मनाचा तराजू
दोलायमान कुरकुरतो -
देव आहे/नाही विचारातच
देवाची प्रार्थना करतो ..
.
 
२)  लळा -

आयुष्यात लावला दुःखाने लळा
सवय मलाही होऊन गेली -
सहन होत नाही आता
चाहूल सुखाची जरा लागलेली ..
.
 
३)  गरज सरो -

जो तो हात जोडून
प्रार्थना करतो देवापुढे -
देवाकडून सुख मिळताच
पाठ फिरवतो देवाकडे . .
.
 
४)  सवतीची लेकरे -

एखादा गाव उपाशी
एखादा गाव तुपाशी -
अजब खेळ पावसाचा
धरतीच्या लेकरांशी . .
 
 

निघालो माघारी पांडुरंगा आता -


निघालो माघारी पांडुरंगा आता 
कळसाचे दर्शन टेकविला माथा

सार्थक तेच माझ्या पायपिटीचे
समजून घेईन नशिबात वारीचे

कष्टदारिद्र्याचा देवा घेतला मी वसा
तहानभूक विसरून चालवायचा असा

नाही मंत्री मी रे नाही अधिकारी
पायी चालणे दिंडीत धरूनिया वारी

पूर्वजन्माचे असेल पांडुरंगा पाप
तुझ्या दर्शनासाठी भोगणे हा ताप

दृष्टी आहे जोवरी ध्यास मनी तोवरी
पुन्हापुन्हा विठ्ठला घडवावी ही वारी . . 

.

मनी विठ्ठलाचे स्मरण करोनी

मनी विठ्ठलाचे स्मरण करोनी  
चंद्रभागेमध्ये स्नान करावे ..

'पांडुरंग' 'विठ्ठल' नित्य जपोनी 
तल्लीनतेने विठूला भजावे ..

वारकऱ्यासंगे पायी चालोनी    
वारीत हाती ध्वजासी धरावे ..

वारीमधे सारे उच्चनीच विसरोनी
देवळात जातीभेद दूर हरावे ..

वीणा चिपळ्यासी हाती धरोनी
टाळ मृदंगांचे नाद करावे .. 

अभंग नि ओव्या मुखात गावोनी
समाधान शांतीस मनात भरावे ..

'ज्ञानोबा तुकाराम' आदरे म्हणोनी
भजन कीर्तन आनंदे करावे ..

'विठ्ठल' 'विठ्ठल' 'रामकृष्णहारी'नी
अवघे जीवन व्यापुनी उरावे .. 

.

नवीन खेळ

न राहवून शेवटी........
बायकोवर अंमळ वैतागानेच मीही ओरडलो -
"अग ए, किती गोंधळ चाललाय ग पोरांचा घरात मघापासून .
दंगा बडबड धिंगाणा....... 

पाच मिनिट स्वत: स्वस्थ बसत नाहीत
 आणि आम्हालाही बसू देत नाहीत !
शांतता काही ती नाहीच ...
हाकलून लाव बर सगळ्यांना बाहेर ! "

बायको माझ्याहून दुप्पट जोराने ओरडली -
" खेळू द्या की हो पोराना, एखादा नवीन खेळ .
'संसद' 'संसद' तर खेळताहेत बिच्चारी !"
.

जागतिक किस डे

ही बायको म्हणजे ना ... !

काय सांगू मित्र मैत्रीणीनो तुम्हाला आता -
पण सांगणे तर भागच आहे .
अगदी जवळचे असे,

 तुम्हीच ना काही झालं तरी.
काल सकाळपासून घरात.....
बटाट्याचा कीस,
रताळ्याचा कीस,
कांद्याचा कीस-
बायकोचा हाच उद्योग चालला होता हो !

काल सकाळी चहा पिताना,
 गप्पा मारता मारता मी तिला म्हणालो होतो ना -

" 'आज जागतिक किस डे' आहे-" म्हणून !
.

नऊ चारोळ्या -

'नेमबाज -'
कटाक्ष पडे तुझ्या नजरेचा 
माझ्या हृदयजलाशयावर - 
असंख्य उमटू लागले सखे 
अलवार प्रेमतरंग त्यावर ..
.

'आला श्रावण -'
कुठे एखाद्या गरीब बाईचे पोर
दुधावाचून घरात तडफडत राहते -
देवासाठी ती बाई अभिषेकास 
विकतचे दूध घेऊन धडपडत जाते .. 
.

'काडी -'
काडी "पेटवाल" 
अंधार सरेल -
काडी "कराल" 
अंधार पसरेल ..
.

'व्यथा शेतकऱ्याची-'
कसे जगावे किती मरावे
दखल ना घेई कोणी -
आशेने का पीत रहावे
डोळ्यामधले पाणी ..
.

'कित्ती मज्जा -'
कित्ती मज्जा मित्रहो ती 
बायको लाटणे मारत होती -
दोन तुकडे त्या लाटण्याचे 
पण पाठ माझी शाबुत होती ..
.

'लपंडाव -'
काही क्षण मिटता डोळे 
नजरेसमोर तूच दिसतेस -
पटकन मी उघडतो डोळे 
नेमकी कशी अदृश्य होतेस ..
.

'आठवणींचे पत्ते -'
कधीतरी तुझी आठवण होते 
मन कावरेबावरे होऊन जाते -
पत्ते तुझ्या आठवणींचे ते 
निवांत एकटेच पिसत बसते ..
.

'पाषाणहृदय -'
"किती निर्दयी काळजाचा हा" 
ऐकून घेत राहतो सतत मी -
हृदय हुंदक्यानीच भरलेले  
कुणाकुणाला बसू दाखवत मी ..
.

'हा दैवाचा खेळ निराळा -'
कर्णासम मी दान दिले 
पर्वा करता ना कसली -
गरजेपोटी हात पसरले 
नियती हळूच का हसली ..
.

शेवटी नवराच तो !

परवा सर्कस पाहून आलो.
आरशासमोर सिंहासारखी डरकाळी फोडण्याचा बराच "प्रयत्न" केला....
पण कुठली जमतेय हो आपल्यासारख्या गरीब नवऱ्याना !

तेवढ्यात बायको आलीच !
तिने प्रश्न केला -
" काय हो ? कसली गुरगुर चालली होती इथे आत्ता ? "

जरासा चाचरतच मी उत्तरलो -
" छे छे कुठे काय ..
काही नाही ग ..
आपले ते हे ..हे.. ते..हे...
म्हणजे बघ ना ..

सर्कशीतला सिंह जर बाहेर....
चुकून हं ...
रस्त्यावर आला,
तर कसा ओरडण्याचा प्रयत्न करील,
ते आपले सहज पहात होतो ....
बाकी काही नाही ग ! "

"हं ! मग काही हरकत नाही .."
- पुटपुटत बायको स्वैपाकघरात वळली .

" हुश्श " म्हणत एक सुस्कारा टाकून ,
मी सोफ्यावर निमूट बसलो !
.