१) हा खेळ पावसाचा
गल्लीच्या पल्याड तुझं घर सखे,
तिकडे पाऊस ये जा करतो -
आमच्या गल्लीत ढगांना पाठवून
'टुकटुक माकड' म्हणत पळतो ...
.
२) निर्धन श्रीमंत
खिसा कापता पाकीट गेले
नोटा सगळ्या गायब झाल्या -
फोटो खिशात शाबूत तुझा
आठवणी मोलाच्या उरल्या ...
.
३) दूत
वारा असतो उत्सुक सखे,
तुझ्या माझ्या भेटीसाठी -
तू असतेस दूर तरी
वर्दी गजऱ्याची माझ्यासाठी ...
.
४) अती सर्वत्र
हुरळून सांगत सुटलो जगाला
सखे, तुझी नि माझी ओळख झाली -
जो तो उत्तर देई मजला
गोष्ट कधीच ही जगजाहीर झाली . ..
.
५) आशावादी
दिवसभर वाट पाहिली सखे,
का बरे आली नाहीस तू -
आता झोपण्याचा प्रयत्न करतो
वाटते.. स्वप्नात भेटशील तू . ..
.
६) गोड जखमा
केसांना झटकत होतीस सखे,
मान वेळावत सकाळी न्हायल्यावर -
तुझ्या प्रत्येक झटक्यासरशी
घाव बसत होता आरपार हृदयावर ...
.
७) चाचपणी
तुझ्या माझ्या प्रेमात सखे,
बंधन तुझ्या पापणीचे -
मी दिसता वा नसता समोर
नाटक सुरू चाचपणीचे . ..
.
८) बोलकी अबोली
सुगंध कुणाला मोगऱ्याचा
सुवास कुणाला जाईजुईचा -
शोभतो तुझ्या केसात सखे,
बोलका गजरा अबोलीचा . ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा