कोजागरीचा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र... आनंदाचे क्षण 
मसाला दूध... प्रसन्न वातावरण

साक्षात लक्ष्मीची पूजा...
पुजेचे ताट.. शेजारी पाट.. बसायचा थाट

बायकोची धावपळ... नटूनथटून पळापळ --

देवघरातून बाहेर चंद्राची पूजा झाली - 
पातेल्यातला चंद्र पहायची वेळ आली....

बायको हसत म्हणाली- "अहो--- तो बघा,
पूर्ण चंद्र दिसला... कित्ती छान आहे नै !"

आनंदी प्रसन्न बायको-

मीही तिच्या सुरात सूर मिसळून उत्तरलो-
[तिच्याकडेच पहात-]

"खरच, आजचा चंद्र अगदी छानच,
आणि किती वेगळा दिसतोय.. मलाही ! "

बायको तिच्या नादात...
नभातल्या चंद्राकडे ....पाहत होती -

मी माझ्या नादात...
माझ्या जवळच्या.... चंद्राकडे बघत होतो .. !!
.

हायकू

१. स्वच्छ आकाश लख्ख चंद्र प्रकाश मन मोहित .. . २. कर्दनकाळ पसरला दुष्काळ बळी हताश .. . ३. पाऊस गाणी पण काही ठिकाणी उजाड शेते .. .

किती चांदणे छान बहरते .. [गझल]

मात्रावृत्त - अनलज्वाला ,  मात्रा- ८+८+८ 
अलामत- अ,  रदीफ- तू 
---------------------------------------------
किती चांदणे छान बहरते हसल्यावर तू 
रणरणते मग ऊनच उरते रुसल्यावर तू ..
.
लख्ख किती ती चमकधमक पण कुंदकळ्यांची   
वेधुन घेशी लक्षहि माझे असल्यावर तू ..
.
कधी कधी तू लवकर चिडशी लवकर निघशी 
बघत रहावे मला वाटते बसल्यावर तू ..
.
चेष्टा थोडी केल्यावर ती मुळी नावडे     
धमाल येते फुरंगटूनी नसल्यावर तू ..
.
खेळत असता तू एखादा डाव हारता
गोरीमोरी होशी पत्ते पिसल्यावर तू ..
.

झाला सराव इतका दु:खासही तमाचा -- [गझल]

वृत्त- आनंदकंद ,   मात्रा-  २४ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा  
अलामत- आ ,  गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------
झाला सराव इतका दु:खासही तमाचा 
वाटे प्रकाश आता अडसर मला सुखाचा..

लढतो जवान तिकडे जातीस विसरुनीया

नेत्यात चुरस इकडे हा कोण तो कुणाचा ..

तृष्णा कुण्या जिवाला प्राणावरीहि बेते

निर्जीव पत्थरावर अभिषेक हो दुधाचा ..

नाभीत कस्तुरी पण जाणीव ना तयाला

शोधात जीव होई हैराण त्या मृगाचा ..

स्वप्नात रोज भिजतो घेऊन मी सखीला

अन वास्तवात बघतो पत्ता न पावसाचा ..
..
[ ई साहित्य दरबार http://esahityadarbar.in च्या 
"दीपोत्सव २०१७" दिवाळी अंक]

भावनेला वाव नाही -- [गझल]

वृत्त- व्योमगंगा ,   मात्रा- २८ 
लगावली-  गालगागा  X  ४ 
रदीफ - आहे ,   अलामत- आ 
-----------------------------------------------------
भावनेला वाव नाही रोकडा शेजार आहे
माज पैशाचा इथे रे कोरडा आधार आहे..
.
कौतुकाला मौन आहे जीभ निंदेला पुढे ती  
खास काही माणसांचा बेरकी आजार आहे..
.
पाडुनीया चेहऱ्याला जोडतो माझ्या करांना   
वाटतो मी, फक्त त्याला "हा किती लाचार आहे"..
.
गुंतलेले दु:ख माझ्या जीवनी या पाहतो मी 
वाटते आता सुखाला भेटणे बेकार आहे..
.
खूप झालो मी शहाणा सारख्या खाऊन ठेचा 
पारखूनी सर्व नाती यापुढे घेणार आहे..
.

" चित्र हे विचित्र "

फोर बीएचके फ्ल्याट आहे त्यांचा
चौघांना उपयोग चार दिशांचा

रूममधे एका बायको रिमोटवर
दुसऱ्या रूममधे तो फेसबुकवर

तिसरीत रमतो मुलगा कार्टूनवर
मुलगी चौथ्या रुमात व्हाटसपवर

धुण्याला बाई भांड्याला बाई
स्वैपाकाला बाई वाढायला बाई

कुणाला नाही कसलीच घाई
बसल्या रूममधे जेवण येई

प्रपंच चालू असा जोरात घरात
जो तो मग्न आपल्याच थेरात

कुणा न कुणाचा आहे अडथळा
स्वकर्माचा ज्यालात्याला लळा

येणाऱ्याजाणाऱ्यांना माहित आहे
सगळीकडे "चित्र हे विचित्र" आहे

कुणी कुणाकडे जातयेत नाही
फ्ल्याटचे दार कधी उघडत नाही

"आपण सुखी.. तर सर्व सुखी"
- हीच घोषणा हल्ली सर्वामुखी ..
.

कट्टी करून आपण- [गझल]

कट्टी करून आपण जवळीक वाढवूया 
उकरून भांडणे चल आनंदही लुटूया..

बघ चंद्र मीच झालो हो चांदणी सखे तू 
गगनात आज स्वप्नी धुंदीत या फिरूया ..

हातात हात घे तू स्पर्शात जाण मजला 
संवाद आज दोघे मौनात ये करूया ..

सांभाळता तुला मी सांभाळ तू मलाही
केली कुणी न पर्वा तर तोल सावरूया ..

नजरानजर पुरे ही पाठीस पाठ लावू 
विरहातल्या क्षणांची जगुनी मजा बघूया ..
.
["चपराक"- दिवाळी महाविशेषांक२०१७]

बघतो जिकडे तिकडे दिसती -- [गझल]

बघतो जिकडे तिकडे दिसती मनातले ना कळणारे
कळता सुखात असतो हल्ली नशिबावर जळफळणारे ..

संधी साधत जगती येथे त्यांच्या पदरी यश पडते
अचूक वेळी संधीचा ते वारा बघुनी वळणारे ..

शब्द मधुरही कानी पडता टपके लाळ तोंडातुनी
पिकल्या पानी मनात हिरवळ आढळती पाघळणारे ..

प्रामाणिक राहून ते जरी करती काम इमानाने
पाठी लागत असती त्यांच्या काही काही छळणारे ..

ताव मारती टाळूवरच्या लोण्यावर मेलेल्याच्या
मिरवत असती सभेस दावत नक्राश्रू घळघळणारे ..

द्वेष असो वा कौतुक अपुले स्थितप्रज्ञ असती काही
व्यथा मांडता समोर त्यांच्या क्षणात ते विरघळणारे ..

कौतुक त्यांच्या नसते नशिबी असती जोवर जिवंत ते
जगती त्यांच्या अवतीभवती जगण्यावर त्या जळणारे ..

प्रयत्न केले किती जरी पण पाणी उलट्या घड्यावरी
सुखात भिजले किती जरी ते दु:ख सदा उगाळणारे ..
.
["मिसळपाव"- दिवाळी अंक २०१७]

येता जाता गोड बोलतो शेजारी दारात हल्ली -- [गझल]

येता जाता गोड बोलतो शेजारी दारात हल्ली
शिजत असावी निंदा काही त्याच्याच का मनात हल्ली

सोकावला किती आहे हा गुलाब तिच्या दारापुढचा
दिसता मी येताच दुरूनी झुलतो तो झोकात हल्ली

अखेर झाली ती दुसऱ्याची गेली परक्या दूरगावी
दारासमोर जुन्या पावले माझी अडखळतात हल्ली

होता चोवीस तास उघडा दरवाजा जिचिया मनाचा
खिडक्यांचेही दरवाजे का बंद तिचे दिसतात हल्ली

शब्दातून ग नकोस बोलू सखये तू काहीही मला
झाला सराव संवादाचा खूप मला स्पर्शात हल्ली ..
.
https://issuu.com/marathicultureandfestivals/docs/diwali_ank
.
[२०१६ चा पहिला दिवाळी अंक: पान 46 वर माझी कविता वाचा:]

माणूस

काम निमूटपणे करत 
करत रहायचे एकाने 
त्यात खो घालायचे 
प्रयत्न करायचे दुसऱ्याने ..

एकाने दुसऱ्याला 
करण्याऐवजी मदत 
तिसऱ्याकडे कागाळी 
रहायची करत ...

छान विकास केला मी 
म्हणत रहायचे पहिल्याने 
मदतीऐवजी अडचणी त्यात 
नेहमी आणायच्या दुसऱ्याने ..

" एकमेकांच्या साहाय्याने 
व्यवस्थित जगूया,
आपण दोघे नीटनेटके 
इतरांना जगू देऊ या " ..

- असे कुणीच कुणाला 
कधीच नाही म्हणत 
कर्तव्यचुकार होऊन 
फक्त बसायचे कण्हत ..

कारण एकच आहे जगात 
जो तो मग्न आहे स्वार्थात  ..
आपल्या पोळीवर तूप ओढायचे 
मढ्याच्या टाळूवरचे लोणी ओरबडायचे ..

माझे ते माझे म्हणायचे 
तुझे तेही माझे कण्हायचे  
दुसऱ्याच्या सुखात आपले सुख 
मानणारा "माणूस" दिसला आहे ?..

आपले ताट झाकून ठेवायचे  
दुसऱ्याचे ताट हिसकावून घ्यायचे 
आपले ताट दुसऱ्याला देणारा    
पृथ्वीवर माणूस आहे का न्यारा !
.

क्षण जपलेले

कुठेतरी तलावाच्या 
काठावरती बसायचे 
दोघांनी हातात हात 
प्रेमभराने धरायचे -

अलगद दोन चार खडे 
दूरवर भिर्कावयाचे 
शांतशा त्या जलाशयात 
बघत बघत रहायचे -

डुबुक डुबुक आवाज 
ऐकत एकदम हसायचे 
एकमेकास नजरेतून  
प्रसन्नतेने पहायचे -

तरंग पाण्यातले ते 
हळुवार किती उठायचे 
त्यातून मौल्यवान असे 
क्षण जपलेले आठवायचे !
.

मन माझ दंगल -

मन माझ दंगल भवानीआईच्या ध्यानात
सिंहावर बसून आली देवी मनात ..

भक्ताच्या हाकेला धावुन येते ही देवी
रक्षण करण्या घेऊन शस्त्रे हातात ..

त्रस्त ती प्रजा भाकते करुणा देवीची
असुरी वृत्ती बघून ये देवी रागात ..

भक्ताचे रक्षण दुष्टाचेही निर्दालन
सज्जच धनुष्य चक्र नि गदाही करात ..

घेण्या दर्शन दुरून येती भक्तजन
बुडती मंदिरी श्रद्धा भक्तिच्या पुरात ..

वंदन देवीच्या चरणी जोडुन हे हात
माळ फुलांची अर्पण देवीच्या गळ्यात ..

सकलजनांना सद्बुद्धी दे भवानीआई
हीच प्रार्थना करतो नित्य मी मनात .. !
.

जाहली आहे तयारी - [गझल]

जाहली आहे तयारी आज पोळी भाजण्याची
बस तवा तो बघत आहे वाट आता तापण्याची..

का उगा भांडे लपवतो ताक त्याला पाहिजे जर
वेळ आहे बेधडक ही पाहिजे ते मागण्याची..

सारखे त्याच्या घड्यावर कोण पाणी ओततो रे
पालथा आहे घडा तो गरज त्याला सांगण्याची..

येत कानामागुनी जर तिखट होते खूप कोणी
गाठ नावडतीस संधी मीठ अळणी बोलण्याची..

कोरडा पाषाण आपण बनवतो लोकास ज्ञानी
गाठुनी खिंडीत त्याला बोल भाषा ठोकण्याची..
.

[ शब्दगांधार ... दिवाळी अंक २०१७ ] 

पाच दोनोळ्या -

नाव तुझे मी शोधत दमलो पानोपानी हरवलेले 
ध्यानी आले उशिरा पण ते मनात होते गिरवलेले ..
.

सुखाची पालखी असता उचलण्या किती धडपडले-
झोळी दुःखाची दिसता हकलण्या तेच बडबडले..
.

क्षणभर मस्तक ठेवावे वाटते सजीव ज्या चरणावर 
वेळ नेमकी झुकवण्यास आणतो देव का सरणावर . .
.

डांबरी रस्ते न्हाताना नागरिकाजवळ चिंता असते -
थेंबासाठी तरसताना शेतकऱ्याजवळ चिता असते !
.

पहात सोनेरी किरणे सकाळ आयुष्याची सरली 
काळोखात झुरण्यासाठी आयुष्यात रात्र ही उरली..
.

निसर्ग

निसर्ग चैतन्याची सळसळ 
निसर्ग उत्साहाचा दरवळ

निसर्ग करतो सदैव वळवळ 
निसर्ग ना तर ठरतो मळमळ

निसर्ग माजवतो का खळबळ 
निसर्गातल्या जखमा भळभळ

निसर्ग जैसी सरिता खळखळ 
निसर्ग स्वच्छतेची तळमळ

निसर्गास्तव करा चळवळ 
निसर्गाप्रती ठेवा कळकळ

निसर्ग म्हणजे सुंदर हिरवळ 
निसर्ग नसता वणवा जळजळ

निसर्ग म्हणजे चित्ती तळमळ 
निसर्ग करतो जीवन निर्मळ !
.

दोन चारोळ्या -

अश्रू एका नयनी वसतो 
हासू दुसऱ्या नयनी असते -
"होकारा"पूर्वीची हालत 
सखे, किती जीवघेणी असते..
.

प्रेमळ होतो फुलांसवे मी 
काटे मजला पाहत असती 
म्हणून का अधिकच सलगी 
काटे माझ्याशी दाखवती..
.