खास दिवाळीसाठीः

ऐन दिवाळीत शिमगा नको म्हणून,
तुमच्या अर्धांगीने खास तुमच्यासाठी मन लावून केलेल्या ...
तुमचे मजबूत दात तुमच्याच घशात घालणा-या,
केवढ्याही कसल्याही लाडू, चकलीचे
तुम्हाला हव्या त्या आकाराचे प्रकाराचे 
तुकडे, चूर्ण, वड्या 
क्षणात आणि कमी त्रास कष्टात करून मिळण्यासाठी . . .
खास खलबत्ता, 
लहान मोठ्या आकाराची करवत, 
हाताळणीय हातोडी, 
दंतवाचवणयंत्र, 
भुगाकरणीयंत्र 
माफक किँमतीत मिळतील.
.

दोष ना कुणाचा . .

पळाला लंगडा जोराने

पाहिले त्यास आंधळ्याने


साद घातली त्या मुक्याने 

ऐकली निमूट बहि-याने ..


हात ओले करतो जोमाने

पाहिले मुकादम काँट्-याक्टरने


पडावे खड्ड्यात जनतेने

बघावे निमूट शासनाने ..

.

खूप जाहल्या गाठीभेटी --[गझल]

खूप जाहल्या गाठीभेटी आज समाप्ती मौनाची
मोकळीक देऊ ओठांना भाषा बोलत शब्दाची ..

वाटत बघुनी आहे भीती पाझर अश्रूंचा नयनी
वाटली कधी भीती न मनी होती त्या जलप्रलयाची ..

चेहऱ्यास तव आठवता मी गायब थकवा का होतो 
दगदग सगळी माझी विसरुन जातो मी दिवसभराची ..

हलवतो हळू चावट वारा येता जाता पडद्याला
हुरहुर तिजला बघण्या वाढे सोबत धडधड हृदयाची ..

विखुरती फुले प्राजक्ताची सुंदर जमिनीवर सारी
गंध आसमंती पण विहरे किमया न्यारी का "त्या"ची ..
.

रीत स्वागताची ही न्यारी ..[गझल]

रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी ..करतो उत्साहाने प्रयत्न धडपडून मी जगण्याचा
ससा नि कासव कथा तीच ती अजून ऐकत आहे मी ..

कोसळला ना कधीच धो धो लहरी तो पाऊस जरी
भरून वाटी चिमणीपुरते पाणी ठेवत आहे मी ..

लागुन ठेचा होतो जखमी प्रेमाच्या खेळात जरी
असते आशा अमर जाणुनी तसाच खेळत आहे मी ..


कर्जातुन घेतल्या घराचे दार बंद ठेवतो सदा
अतिथी देवो भव म्हणण्याला किती घाबरत आहे मी ..


शिते जिथे ती भुतेहि जमती शिकलो ज्ञानातून असे
माया पोटापुरती जमवत नाती टाळत आहे मी .. 
.

कुठे कशी फिर्याद करू मी ..[गझल]

कुठे कशी फिर्याद करू मी झाली हृदयाची चोरी
हिंडत आहे करून चोरी प्रेमिकाच वर शिरजोरी ..


फसले नाटक तुझे छान ते चोरुन बघण्याचे ग मला
होता नजरानजर आपली का होशी गोरीमोरी ..


घेण्या झोके मनासारखे प्रयत्न जीवनभर केले
समजायाला उशीर झाला नियती हाती ती दोरी ..


असता सोबत तुझी मला ती गिरवत होतो नाव सखे
सुटली अर्ध्यावरती सोबत आहे ती पाटी कोरी ..


दार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती
दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी ..

.

नसती सुरेख मोहकशी --[गझल]

नसती सुरेख मोहकशी खळी तुझ्या जर गालावर      
नसते बसले मन माझे घिरट्या घालत मग त्यावर  ..

सहज एकदा पडली त्या आरशावर नजर माझी 

प्रतिबिंबाला पाहुन मी गेलो भाळुन माझ्यावर  ...

गाढ झोपलो असता मी स्वप्नी सुंदरशा ललना  
सगळ्या पसार का होती पण मी जागा झाल्यावर ..

झाली वाटुन अर्धी ती स्थावरजंगम पाहुनिया
एक वाटणे आईचे काळिज उरले अर्ध्यावर ..

बसलो मारत गप्पा मी नावाशीहि निवांत तुझ्या
लिहिले होते नाव तुझे कागदाच्याच तुकड्यावर ..

बभ्रा केलाच गावभर उघडपणे पण वाऱ्याने
जरी माळला गुपचुप मी गजरा तुझ्या ग केसावर .
.

झुळुक हळु ती छानशी . .[गझल]

झुळुक हळु ती छानशी स्पर्शुनी गेली मला
भेट पहिली आपली भेटुनी गेली मला ..

बघत होती वळुन ती गडप झाली पण कुठे
काळजावर घाव का घालुनी गेली मला ..

पावसाला पाहुनी आठवावी तीच का
पावसाची एक सर रडवुनी गेली मला ..

शुष्क गजरा टाकला खूण पटली खास ती
वाट ती होती बघत कळवुनी गेली मला ..

स्वप्न रात्री पाहिले वरुन आली अप्सरा
चांदण्यातुन विहरण्या घेउनी गेली मला ..
.

अरे संसार ... !

सकाळच्या रामप्रहरी मी जागा झाल्याबरोबर, 
आधी दारासमोर असलेल्या मंडपातील जगदंबेला
मनोभावे "प्रार्थना" करतो...

"हे माते,

मला दिवसभर मानसिक शांती, 
समाधान मिळू दे !"

नंतर त्या समाधानात मी शांतपणे- 

स्वैपाकघरात असलेल्या, 
माझ्या गृहलक्षुमीला हात जोडून, 
मनातून "प्रार्थना" करतो...

" हे त्राते, 

घालिन लोटांगण वंदीन चरण, 
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे..."

मग मला दिवसभर--

अगदी वेळेवर चहा,पाणी, नाष्टा, जेवणखाण व्यवस्थित मिळत रहाते !!
.

नऊ रात्री नऊ माळा

नवरात्रीः

रोज एका रंगाची साडी नेसून,
पेपरात फोटो येण्यासाठी धडपडण्यापेक्षा- 

समस्त महिलांनी रोज एखादे सत्कृत्य करायचे .....

जसे -

पहिली माळ म्हणून- गरीबांना अन्नदान

दुसरी माळ- ग्रंथालयाना घरात साठवलेली पण न वाचलेली पुस्तके दान

तिसरी माळ- साखळीचोर पकडदिन आणि पोलीस कोठडीत रवानादिन ..

चौथी- रस्त्यावरचे रोडरोमियो पकडदिन आणि चोपदिन ..

पाचवी- वाहतूक जागृतीदिन म्हणून वाहतुकीचे नियम स्वत: पाळायचे

 आणि पाळायला लावायचेच ..

सहावी- सर्व महिलांनी पदपथावरूनच चालणेदिन, 

जेणेकरून दुकानदारानी रस्त्यावरची आपली अतिक्रमणे काढून टाकावी ..

सातव्या माळेला- वाहनत्यागदिनानिमित्त चालत राहणे

 आणि इंधनाची बचत करणे ..

आठवी माळ म्हणून ....

तुम्हालाही काही तरी सुचत असणारच ना ?
.

शरण तुला जगदंबेः


काय सांगू हो आता तुम्हाला ! 
खोटं वाटेल.. पण,

दुपारी डुलकी घेता घेता, 

साक्षात जगदंबामाताच पुन्हा पुन्हा,
 माझ्या कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झाला मला ..

" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे, 
जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून, 
माझ्या दोनही कानात घालतोस का रे जरा ?
मी माझे डोळे स्वतःच बंद करून घेऊ शकते रे, पण ...
माझ्याच कानाला मी माझे हात लावू शकत नाही ना....

 ह्या सर्व आठही गुंतलेल्या हातातल्या आयुधांमुळे !
हा दसरा संपेपर्यंत, मी भक्तांवर त्यांचा उपयोगही नाही करू शकत !

 अरे, हे सगळे भक्तगण माझीच छान छान गाणी,पण
किती कर्णकर्कश्श आवाजात, सहन होण्यापलीकडे ऐकवत आहेत..
तूही ऐकू शकतोयस ना जरा तरी ! "
.

खड्डेच खड्डे सगळीकडे !

भर पावसातला कालचा रविवारचा सुट्टीचा छानसा निवांत दिवस...
घरात बसून मी पेपरातली जुनी कात्रणे चाळत होतो.

काही काही सिरीयलमध्ये असते, तश्शी.... 
अगदी साधीभोळी, सरळ स्वभावाची बायको, 
नेहमीप्रमाणे अधून मधून-
आपले डोके, डोळे आणि तोंड मधेच खुपसत होती.

समोर हातात आलेले एक कात्रण दाखवत, 
मी तिला म्हणालो,
" हा बघ, हा नील आर्मस्ट्राँग !
अंतराळवीर !! चंद्रावर पहिले पाऊल ठेवून- 

चंद्रावर खड्डे आहेत, हे त्यानेच प्रथम पाहिले बरं का !"

जगात आपल्याला एकटीलाच सगळं काही कळत, 
अशा आविर्भावात माझ्या हातातले चित्राचे कात्रण पहात,
तिने डाव्या पंजावर उजव्या हाताची मूठ आपटत, 

आपली प्रतिक्रिया दिली -
" मी म्हणते, त्याला जर खड्डेच बघायचे होते, 

तर चंद्रावर कशाला जायला हवं हो ? 
आपल्या गावातल्या रस्त्यावरून जरी त्याने एखादी चक्कर मारली असती, 
तरी हेss इतके खड्डे त्याला बघायला मिळाले असते की ! "
.

वळ छडीचे मास्तरांच्या --[गझल]

वळ छडीचे मास्तरांच्या उमटले माझ्या मनावर
प्राक्तनाला जाणले त्यांनीच का माझ्या करावर ..

लाटुनी पैसे सुखाची झोप ना नेत्यास येते
कार्यकर्ता घोरतो पण कार्य अपुले संपल्यावर ..

"या सुखांनो जवळ माझ्या-" खूप दमलो साद घालत --
धावली दुःखे कशी ही भेटण्याला मज अनावर ..

झाड असता खंगलेले ना फिरकती पाखरेही
दिसुन येता बहरलेले झेप घेती तीच त्यावर ..

काम ना ते करत असती आस ना करण्यास पण   
शंख मोठा फक्त तोंडी काम फत्ते जाहल्यावर ..
.

कोठे गुलाब ..[गझल]

कोठे गुलाब काट्याशिवाय दिसेल का
कोणी सुखात दुःखाशिवाय असेल का ..


आहे खडतर चालायचेच पुढे जरी
थोडा प्रवास त्रासाशिवाय नसेल का..


'येथे कुणी रिकामा उगाच बसू नये'

मग जाणकार कामाशिवाय बसेल का ..

म्हणती झकास आता दिसेल सुधारणा
एक तरि गाव खड्ड्याशिवाय वसेल का ..


कामानिमित्त मानव रुसून चिडेल तो
पण कारकून दामाशिवाय हसेल का ..
.

दिवाळी आणि दिवाळे

हां हां म्हणता म्हणता-
 आता दसरा संपला की,
 दिवाळी आलीच की हो ..

दिवाळीनिमित्त संकल्प -

पहिला दिवस - जिलेबी
दुसरा दिवस - गुलाब जामून
तिसरा दिवस - बासुंदी
चौथा दिवस - श्रीखंड
पाचवा दिवस - साजूक तुपातले बुंदी लाडू ....

आणिः

सहाव्या दिवशी -
महागाईवर गरमागरम चर्चा .
.


वात होऊन जळायचे ..[गझल]

वात होऊन जळायचे
ज्योतीने झगमगायचे ..

समोर कधी ना भेटता
स्वप्नात जात छळायचे ..

उपदेश करून छानसा
वाट्टेल तसे जगायचे ..

बोलायाचे गोड गोड
ऐनवेळेस पळायचे ..

सहनशील ते असू देत
आपण पाहत रहायचे ..
.


आरती बायकोची .

करशी कटकट भारी तू पण संसारी,
हातचे लाटणे पडते पाठीवर भारी ..
सारी सारी रात्र ठणके च्यामारी
पायी पडतो आता थांबव मुजोरी ..
जय बाई, जय बाई, जय नवरासुरमारणी ..
पुरे कर मारझोड संहारक जीवनी ..।। जय बाई .. जय बाई..

शेजारीपाजारी तुज जैसी नाही
सांगुन थकलो पण ऐकणे नाही
सारे संवाद करता ओरडलो काही
पालथ्या घागरीवरती पाडसी पाणीही .. ।। जय बाई .. जय बाई..

प्रसन्नमुद्रे प्रसन्न कर तू या दासा
त्रासापासुनी सोडवी गोडीत कर भाषा
संगे तुज नाचून झाली दुर्दशा
सा-या गल्लीत कारण शंख जल्लोषा .. ।। जय बाई .. जय बाई..
.