आला पहा कवी तो -

आला पहा कवी तो - दिसला पहा कवी तो - उलट्या दिशेस पळतो पाहून त्यास जो तो ! इकडून सिंह आला ; तिकडून बघ कवी तो सिंहासमोर जो तो जबड्यात शिरु पहातो ! का वाटते कवीचे भय फार सज्जनाला वाळीत का कवीला तो टाकण्यास बघतो ! जखमी कधी कुणाला ना वार करि कुणावर अध्यात ना कुणाच्या मध्यात तोच नसतो ! आली जरी त्सुनामी ; लाटांवरी तियेच्या हळुवार तो मनाने कविता करीत असतो ! ती एक ठेच साधी जखमी तुम्हांस करते डोळ्यात अश्रु कविच्या - कवितेतुनी टपकतो !! . [अर्थ - मराठी ई दिवाळी अंक २०१७]

चष्मा असुनी दिसले नाही -


(चाल :  शब्दावाचून कळले सारे  शब्दांच्या पलीकडले - )


चष्मा असुनी दिसले नाही -
 रस्त्याच्या पलीकडले ,
 प्रथम तुला पाहियले ; पाउल
खड्ड्यात कसे पडले ?

 शर्ट नवा मी खास घातला -
 पँट नवी अन् चष्माहि  नवा !
 त्या दिवशी का ; प्रथमच माझे
 बूट सांग अडखळले ?

आवडते कपडे त्या रात्री ;
 खड्ड्यातच फाटले किति तरी ...
 परीटघडीच्या त्या कपड्यांचे
रफू न मज परवडले !

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -


(चाल :  देहाची तिजोरी - भक्तीचाच  ठेवा )


फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?

                                नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
                               तरी चोरटयांना नाही  भीती मुळी त्यांची -
                               सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?

 उजेडात होते पहाणी , अंधारात साSSफ
 चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -
 दक्ष पोलिसांची कैसी नसे गस्त तेव्हां ?

                               फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
                              आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी
                              माल मनीं तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!

वाच वाचुनी अति मी दमले

(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -)

" वाच वाचुनी अति मी दमले - "

वाच वाचुनी अति मी दमले -
विटले रे कवितेला ...

कवितालेखन तुज न झेपते
आशय त्यात न कसला
विषय चांगला काही सुचेना
अती ताप तो झाला
रोख मानधन..नाही काही
मजवर राग का धरला ...

दारी कचरा घंटागाडी
सफाईवाला आला
निरुपयोगी कविता-कागद
रद्दी घातली त्याला
अजब तुझ्या त्या छंदापायी
सुसंवाद ना घडला..

अशुद्ध लेखन आणि व्याकरण
 गुंता वाढत गेला
 कवितेतील मज काव्य दिसेना
 कागद वाया गेला
 अंधारी ही डोळ्यांपुढती
 जीव वाचण्या भ्याला ...
.

एक त्रागा सुनेचा

(चाल : एक धागा सुखाचा -)

एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - 
घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे !

तू असशी जरी कर्तां  तगडा ,
सासू सुनेचा बघशी झगडा -
सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे !

उचलबांगडी बालपणाची ,
धुळीत स्वप्ने तारुण्याची -
जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे !

सासू सुनातें बघतो कोणी ,
एक सारखी बसती फुगोनी -
कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचा-याचे !

दाणे पडले टप टप टप

दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
                             चिव चिव करता टिपती दाणे
                             टिपता टिपता म्हणती गाणे
या रे पिलांनो जवळी या
आपण गाणे गाऊ  या
                             घरटे काडयांनी सजवू                         
                             दाणे पोटापुरते जमवू
हाव नको ती जास्तीची
सवय करू या कष्टांची
                             चोच दिली ज्या देवाने
                             घास ठेवले समोर त्याने
आभार त्याचे मानू या
चिव चिव गाणे गाऊ या