'मोह -'

भुलवले मन किती
टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनी ..

झुलवले तन कसे
टपटपणाऱ्या प्राजक्तफुलांनी ..

हरवले क्षण किती
हुरहुरणाऱ्या त्या आठवणीतुनी ..

फिरवले मन कसे
झरझर त्या निसर्गसृष्टीतुनी ..


ठरवले किती जरी
वरवर रहायचे हे आज दुर्लक्षुनी .. !

.

जालीम गोळी चारोळीची

दिवसभर मंडपातल्या वाद्यांचा ढणढणाट,
आणि गणपतीपुढची प्रेमगीत ऐकून,
जाम कंटाळलो होतो.
त्यात दिवसभर बायकोची "एकेरी वाहतुकीची" बडबड !

रात्र उजाडली...
अंथरुणावर पडलो तरी बडबड झोपायची काहीच चिन्ह दिसेनात !
शेवटी एक आयडिया सुचली आणि बायकोला म्हटलं -

"तू एकच क्षणभर गप्प बसतेस का ?
तुला मी शेजारणीची एक गंमत सांगतो."

लगेच तिची बडबड थांबली आणि कान टवकारले गेले.
ती संधी अचूक साधून मी म्हणालो -
"आधी ही आत्ताच मनात सुचलेली,

 माझी ताजी चारोळी तुला ऐकवतो !"

काय आश्चर्य कुणास ठाऊक ..
दुसऱ्या क्षणी,
ती मात्रा लागू पडून -
तिच्या घोरण्याचा आवाज हॉलभर ऐकू येऊ लागला !

त्या घोरण्याच्या तालात मी कधी झोपलो ते मलाही कळलेच नाही .

---- तात्पर्य :
काही वेळेला झोपेची गोळी लागू पडत नाही,
पण कवीची चारोळी..........?
.

प्रांजळ मत

त्या मोनालिसाच इतकं का कौतुक करतात-
हे मला पामराला तरी आजवर कळले नाही !

मुळात ती रडून हसते का हसून रडते,
तेही तिच्या चित्रावरून मला कळत नाही.


कुण्या एकाने वारेमाप कौतुक केले -
म्हणून बाकीचे करू लागले असावेत !

गूढ हास्य म्हणजे...
कुणाला न कळलेले हास्य !

कुणाला जे कळलेच नाही....
त्यात कसले बोड्ख्याचे कौतुक ?

बिनवस्त्राच्या गावभर हिंडणाऱ्या,

 त्या राजाची गोष्ट आठवते ना ?
.

सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते -

  
आजपासून ....

बरीच सेलेब्रिटीज मंडळी,

बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला 

आणि देखाव्यांना भेट देऊन येतील ......


बरे वाटते !


बऱ्याच वृत्तपत्रांनी

दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचेही,

वारेमाप कौतुक केलेले दिसेल .........


आणखी बरे वाटले !!


पण -

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,

किंवा झोपडीत,

किंवा पत्र्याच्या शेडमधील,

किंवा खोपटातल्या गरीब गणपतीचे छान छान फोटो,

वृत्तपत्रात आणि विविध वाहिन्यांवर झळकलेले दिसले तर.....


सोन्याहून पिवळेअसे खुद्द श्रीगणेशालाही नक्कीच वाटेल ना !
.

पदक


नेत्याच्या, 

आमदाराच्या, 

नामदाराच्या,

खासदाराच्या पोराला-

" जवान " म्हणून....

 सीमेवरच्या लढाईच्या धुमश्चक्रीमुळे-

" मरणोत्तर एखादे पदक " 

मिळाल्याची एखादी तरी बातमी,

आजपर्यंत -

कधी वाचण्यात आली का हो ?
.

तीन चारोळ्या

१.
वाहतील शिव्यांची लाखोली 
वचने कधी न उच्चारावी-
वाहतील ते आदरांजली 
नित्यच भाषा ऐसी बोलावी..
.


२.कान डोळे बंद करुनी 
जाणतो ना "कर्म" त्याचे- 
द्वेष करणे "जात" बघुनी 
जीवनाचे तत्व ह्याचे..
.


३.
होत्या देत छान गारवा 
उन्हाळ्यात त्या जुन्या आठवणी-
शेकोटीच ऊबदार जणु 
हिवाळ्यात त्या जुन्या आठवणी..
.

कवितेचे दु:ख -

 कागद हरवला
कोपऱ्यात सापडला
मावेना आनंद
हृदयात झालेला ..

कागद होता तो
कविता लिहिलेला
वाईट वाटले खूप
कागद चुरगळलेला ..

कागद तसा साधाच
कुणीतरी टाकलेला
वाचून कवितेला
फेकून टाळलेला ..

माझ्या हातात मी
कागद धरलेला
किंचित थरथर
थोडा ओलावलेला ..

कवितेचा त्यावर
अश्रू झरलेला ....!

.

आयुष्याचा पावा

कसा घडविलास रे देवा
माझ्या आयुष्याचा पावा ..

नीट मी वाजवण्या बघतो
सूर आता बेसूर उमटतो ..

वाजवतो मी व्यथा जरी
हर्ष नादतो मधुर तरी ..

आनंदाने वाजवतो मी
आर्त स्वर का निघती नेहमी ..

वाजवून मी थकलो देवा
केला कितीतरी मी धावा ..

बघ बोटे ही माझी थकली
पाव्यानेही मान टाकली ..

घेई परत तुझा तू पावा
शरणागत मी तुजला देवा !

.

मनीचा डबा


सकाळी सकाळी लौकर उठून
दप्तरात ठेवला डबा भरून ..

निघाली शाळेत मनीमावशी
मनीच्या बोटाला नीट धरून ..


मनीने विचारले- "डब्यात काय"
मावशी म्हणाली- "उंदराचे पाय" ..


मनी म्हणाली जोरात हसून-
"कंटाळले रोज उंदीर खाऊन" ..


मावशी म्हणाली- "इलाज नाही...
चिमणी कावळा सापडत नाही !"

.

प्लांचेट

टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात बातम्या पाहून मला सुचलेला अभद्र-
पण, चांगला विचार !
बऱ्याचवेळा,
आपली एखादी वस्तू, गाडी, साधनसामग्री हरवली/गहाळ झाली/चोरीला गेली ----
तर लगेच "विशिष्ट" लोकांकडे धाव घेतली जाते-


ते लोक चोपडीत बघून,
काही ठोकताळ्यावरून,
लगेच काही प्रश्न विचारून,

वेळ बघून सांगतातही-

"अमुक दिशेला, अमुक वेळेला, अमुक परिसरात ती नक्कीच मिळेल, सापडेल !"

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी लोकांचा विश्वासही बसलेला दिसतो !

लवकर तपास लागणार नसेल तर, 

वेळीच "प्लांचेट"ऐवजी पोलिसांनी, सीआयडीने, सीबीआयने-
गुन्हेगार, खुनी, दरोडेखोर शोधण्यात -
अशा लोकांची मदत घ्यायला काय हरकत आहे ?
.

पुन्हा प्रपंच

संसार म्हटला की,
 अधून मधून भांड्याला भांडे लागून आवाज होणारच !
त्याशिवाय खरी मज्जाच नाही.

काल रात्री आम्हा नवराबायकोचे कडाक्याचे भांडण झाले .
आमच्या भांडणाला विषय कुठलाही चालतो .
"हे असे का केले नाही" अथवा "हे असेच का केले" .... वगैरे !
मग काय ...?

रात्रीचा स्वैपाक सगळा वायाच !
 

रात्र संपली .....
 

"भांडणास्त" अन "प्रेमोदय" क्रमप्राप्त ... .
झालेगेले विसरून जायचे आणि,

पुन्हा मस्तपैकी नव्याने संसारात पडायचे !

तुम्हाला सांगतो....
बायकोने मायेची फोडणी टाकलेल्या पोळ्यांचा चिवडा आणि-

 नंतर प्रेमाच्या फोडणीचा गरम गरम भात..... 
नाष्ट्यात हजर ठेवला .
अहाहा ! इतकी मजा आली....
बस्स- मी तर आता अधून मधून,

भांडायचे मनातून ठरवूनच टाकलेले आहे !

तुमच्या त्या फाईव्हष्टारमधे लाख रुपये मोजले तरी,
असे घरच्यासारखे लाखमोलाच्या चवीचे,
तुमच्या पुढ्यात नाष्ट्याला ठेवील का हो कुणी ?
.

दु:खी भागीदारी

लग्न झाल्यावर तीन वर्षानंतर,
त्याच्या बायकोला अचानक साक्षात्कार झाला.

ती त्याला जेवताजेवता, जरासे फुरंगटूनच म्हणाली-
"आपल्या लग्नानंतरचे काही महिने आठवतात का तुम्हाला ?
रोज जेवतांना न चुकता,
तुम्ही तुमच्या प्रत्येक घासातला अर्धा घास-

 मला बळेबळेच भरवत होता.
पण हंssssss
अलिकडे मात्र पहिल्यासारख तुम्ही कधीतरी....

 प्रेमानेही मला ...."

तिला अर्ध्यावरच थांबवत तो म्हणाला -
" अग, तेव्हाची गोष्ट वेगळी होती....
आता तुला सगळा स्वैपाक किती मस्त जमतोय ना ! "
.

जे न देखे

ह्या "फेसबुका"वर डोके आपटून,
हसाव का रडावं-
तेच कळतही नाही !

एखाद्याने छानसे व्यक्तीचे चित्र "स्टेटस"मधे टाकलेले दिसते ,
आपल्याला ती व्यक्ती "उघडे डोळे "असलेली दिसते ,
.......पण-
फेसबुकवरचा चारोळीकार तिला उद्देशून खरडतो ..
" तुझ्या मिटलेल्या डोळ्यांत मला सये .."

दुसऱ्या एखाद्या फोटोतल्या व्यक्तीने "हातांची घडी" घातलेली,
आपल्याला दिसत असते ,
पण....फेसबुकी कवी (डोळे झाकूनही-) लिहीत सुटतो -
" सखे, तुझ्या ह्या पसरलेल्या बाहूत मला ..."

तिसऱ्या कुणाच्यातरी फोटोत आपल्याला "हसरी छबी" दिसत असते......
पण-
तिच्याकडे पाहून...... कवी दु:खाने लिहीतो..
" तुझ्या चेहऱ्यावरच्या वेदना मला प्रियतमे ...."

---किंवा ह्याउलटही म्हणजेच -

आपल्याला चित्रात "व्याकुळ, केविलवाणा चेहरा" दिसत असतो,
पण---
कवीला मात्र तो बघत फेसबुकावर सुचत असते.....
" हर्ष तुझा सये, हा तव मुखावरीचा, क्षण माझा ग आनंदाचा ...! "
.

समजूतदार आम्ही दोघे

ताई मला चिमटा काढते
मी ताईला गुद्दा घालतो..

ताई जोरात भोकाड पसरते
मी बाबांसारखे समजावतो..


ताई हळूच डोळे पुसते
मीही खूप खुषीत येतो..


आंधळी कोशिंबीर खेळतो
ताईमागे धावत पळतो..


ती मला सापडत नाही
मी रडकुंडीला येतो..


ताई आईसारखे समजावते
मी मोठ्ठा दादा होतो..


समजूतदार आम्ही दोघे
भांडण करतो.. मायाही करतो .. !

.

दिवस तुझे हे मिरवायचे ..


(चाल-  दिवस तुझे हे फुलायचे...)

दिवस तुझे हे मिरवायचे
चारोळ्या खरडून 
सतवायचे..

अक्षर जुळवाजुळव करणे

अशुुुुद्ध लिहीत राहणे
दुरुस्त करीत बसायचे..

खावी शिव्यांची लाखोली  
घालावी मग मान खाली 
घशात हुंदके दाटायचे..


व्याकरणाची तुज ना भीती
ट ला ट जुुुळवायची ख्याती
वाचकांनी सहन करायचे..

तुझ्या
 ग कागदांच्यापाशी
ठेव एक कात्री उशाशी  
कागद कापत झोपायचे..
.

घासाघीस

काल संध्याकाळी, शुक्रवारची पेन्शनरांची मिटिंग संपवून,
बाळी वेसमधून घरी परत निघालो.
कानावर आवाज आला-
"पेरू घ्या पेरूssss--- ग्वाड ग्वाड पेरूssssss"
सायकलवाल्याला हात करून थांबवले. म्हणालो-
"एक किलो दे रे बाबा."
आईसाठी(वय वर्षे फक्त ८९) घ्यायचे ठरवले.

 तिला फळे खूप आवडतात.
सीझनप्रमाणे आवडीने फलाहार चालू असतो.
नेहमीप्रमाणे
भावात घासाघीस न करता,
एक किलो पेरू घेतले.
पैसे दिल्यावर, पेरूवाल्याने एक पेरू पिशवीत जादाच टाकला.

मनातून खरेतर बरेच वाटले.
तरीपण विचारायचे म्हणून मी विचारले-
" अहो, हा कशाला टाकला आणखी एक ?"

सायकलवर टांग मारत, तोंडभरून हसून तो म्हणाला-
" सकाळपासून तुम्ही पहिलेच भेटलात राव,
भाव सांगितल्यावर, कायबी घासाघीस न करणारे ....!"
.

पाऊस गीत

पाऊस आला माझ्या अंगणी
"डराव डराव" म्हटले कुणी !                                                                                                                               


पाऊस पडला रानावनात              

"थुई थुई" नाच केला कुणी !   
 

      


 
पाऊस पडला अंगावर तर
"चिव चिव" आवाज केला कुणी !
 

                                                     

 

                                    
झिमझिम धारा झाडावरती 
"चीं चीं"चित्कारलं फांदीवर कुणी !
     

 


टपटप टपटप पाऊस बरसला
"काव काव" कल्ला केला कुणी !


 

  उडताना भिजले पावसाने अंग
"मिठू मिठू" नाद केला कुणी !   
                              

                                                                          अचानक आली पावसाची सर
"भो भो" आवाज काढला कुणी !
 

                                                                               
                                           


 
कोसळला पाऊस रात्रभर 
"म्यांव म्यांव"ऐकले कोपऱ्यातुनी.!                                                                                                                
                                                                                                                                                              
                            
.
.

वाण नाही पण-

छ्या ! ही बायको इतकी आक्रस्ताळी असेल असे वाटले नव्हते हो !
तशी ती अधून मधून बसते, माझ्याजवळ म्हणजे फेसबुकजवळ ...

पण म्हणून इतकी बारीक नजर ठेवायची माझ्या खात्यावर ?
हे फारच झाल हो , नाही का !

तो "सीआयडी"वाला देखील अस "लक्ष्य" ठेवत नसेल ...

चिडचिड कशासाठी ? 
तर म्हणे -

" मी मित्रापेक्षा मैत्रिणींच्या फोटूला जास्त लाईक/कॉमेंट देतो ! "

आता इतके दिवस बघून बघून लागली असेल...
मला मित्रांची चांगली सवय !
म्हणून एवढा कांगावा करायची,
काही गरज आहे का खरेच- म्हणतो मी ?
.

टोमॅटो पुराण

शेजारीण घरी येऊन गेली आणि -
मी बायकोचा चिडका झालेला चेहरा पाहिला,
काळजात धस्स झाले की हो !

एकदम विचारायचं तरी कसं....
वस्सकन अंगावर आली तर,
अवघडच की ..

थोडासा वेळ गेल्यावर,
हळूच मी विचारायचं धाडस केलच !
" काय हो, काय झाल अचानक अस चिडायला ? "

ती जवळ जवळ ओरडलीच -
" अहो, बघा ना .
ती मेली शेजारीण-
आज मुद्दामच आपल्याकडे नमुना म्हणून -
टोमॅटोची भाजी, टोमॅटोची चटणी आणि टोमॅटोचे सार देऊन गेलीय ! "
.

दिवेलागणी

दिवेलागणीच्या वेळेला
तुझा चेहरा उजळलेला -
अगरबत्तीच्या सुवासात
आसमंत दरवळलेला..


निरांजन तू लावता
ज्योत पसरवी प्रकाश मंद
शुभंकरोतीचा आवाज
ऐकण्याचा जडलेला छंद..


स्वच्छ होतसे अंतर्मन
वाटे जळून जातसे पाप
प्रपंचातल्या अडचणीचा
वाटे निघून जातसे ताप..


हात जोडता देवापुढती
मुखी उमटतसे प्रार्थना
' सुखी मी राहो विश्वासंगे
आळवणी जावो व्यर्थ ना ' . .
.