चार चारोळ्या -

'गंगा गये गंगादास -'

सत्तेचा लोण्याचा गोळा
ठेवती सदा त्यावर डोळा -
खोबरे तिकडे चांगभले
नीतिमूल्यांचा चोळामोळा ..
.

हेही ध्यानच -

सुंदर ते ध्यान
उभे कट्ट्यावरी
न्याहाळती सारी 
येणारी जाणारी !
.

जातीचे सौंदर्य -

 साध्याभोळ्या तुझ्या सौंदर्यात
नंदनवनाचा वास असतो 
पार्लरमधून येताक्षणी तू 
मेंटल हॉस्पिटलचा भास डसतो !
.

रहस्य उलगडा -

सुरू जाहले कवितावाचन मंडपात माझे
हळुहळु जमता गर्दी, कौतुक केले मी माझे
थोड्याकाळानंतर कळले मजला रहस्य ताजे
तिकडे खूपच पाऊस, इकडे मंडपात ओझे !
.

प्रत्येकाचा चंद्र वेगळा

आमच्या गच्चीवरून
चंद्र खूप छान दिसतो
बंगलेवाला मुलगा
झोपडीवाल्याला म्हणाला ..आमच्या झोपडीतून तर
डायरेक्ट चंद्रच दिसतो
झोपडीवाला मुलगा
बंगलेवाल्याला म्हणाला ..


बंगलेवाल्याला
कुठे ठाऊक आहे ....
झोपडीला वर
छप्परही नाही ..!

.

बारा वाजले झोपेचे

रात्र झाली
झोप आली
निरोप घेऊन
सखी गेली..

जावे तरी
मुकाट तिने..
जाता जाता
हसून गेली..

हसावे तरी
जरा स्मितातून
खूप छानसे
हसून गेली..

गेली ती गेली
जाता जाता
उचक्या मला
देऊन गेली ..

.

आ रही हूँ मैं बरसात

नीले नीले आकाशमें
कालेसफेद मेघोमें
चमकती बिजलीके साथ
आ रही हूँ मैं बरसात ..

काली काली धरतीपर
बूंदबूंदमें टपटपाती
खेलने शोर मचानेको
हरे हरे पौधोंके साथ ..

लहर लहर लहराती
झूमझूमके मैं दौडती
पीले पीले फूलोंमें
मैं अपनी धाराके साथ ..

देखो देखो प्यारे बच्चो
रंगबिरंगी इंद्रधनू
ऊँचे ऊँचे नील गगनमें
दिखाती हूँ मैं अपने साथ ..

दुखको दूर करती हूँ
सुखको मै बांटती हूँ
मनमयूरों को नचाने
फैलाती अपने विशाल हाथ ..


.

नऊ चारोळ्या -

दैव -
क्षणैक वासना
बळी निष्पाप जाई -
सग्यासोयऱ्याना
जगण्यास ताप होई ..
.
आशा -
कोण जाणे उद्याचे जिणे
जगणे होईल का नाही -
जमेल तसे जगावे म्हणतो
वाट पाहू दे मरणालाही ..
.

सुटका नाहीच -
'करवा चौथ' पुरती आज
गरज चाळणीची भासते 
उद्यापासून हाती पुन्हा   
 नेहमीचे लाटणे असते !
.

दलाली दंगा -
काय करू आम्ही सांगा
तुम्हीच आता  पांडुरंगा 
आमच्या रांगेभवती का 
दलालांचा चालू  दंगा !
.

दु:ख -
कितीदा ऐकवशील तू मला
"पावसात भिजायची हौस मला"-
तू नसताना, माझ्या आसवांचा
कसा दिसणार पाऊस तुला!
.

काळजी -
काळजी करत बसल्यामुळे...
झोप पाखरासारखी उडून जाते -
 झोप उडून गेल्यामुळे
काळजी गोचिडासारखी चिटकते !
.

मौनाचे हत्यार -
कुणी वाराने जखमी करते
कुणी शब्दाने जखमी करते -
जगावेगळी तिची रीत पण  
मौनाने ती जखमी करते !
.

काय करावे -
खडाजंगी सासू सुनेची 
चालली होती जोरजोराची -
"तुम्ही मधे पडू नका "
तंबी होती 'महिला दिना'ची ..
.

बायकोगिरी  -
काय करावे समजत नाही 
सभा गाजवून येतो मी -
बायको समोर दिसताक्षणी 
मान का खाली घालतो मी ..
.

चिमणे चिमणे दार उघड-

१.
चिमणा हपीसातून हाश्श हुश्श करत घरात शिरतो.
पुकारा करतो - "पाणी देता का कुणी पाणी ?"

टीव्हीच्या पडद्याकडे टक लावणारी चिमणी...... सहेतुक सासूकडे बघते .
सासू बिलंदरपणे भलतीकडे रिमोटची नजर वळवते .
मुलगी अभ्यासाचे नाटक करते .
मुलगा मोबाईलच्या गेममधे गुंग .

एकंदरीत काय ?

"चिमणे चिमणे दार उघड - थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे ......." ची ष्टोरी ,
अजूनही घराघरात घडतच आहे ना ?.

/././/././/./././././././/.././././././././././././.../....//..///././././//./././/././././././././././././././././././././././/. 


२.

 "'अरसिक किती हा मेला-'"

मागच्या वर्षातली आठवण .
मित्राला म्हटलं -
" चल बाहेर जरा, ती पालखी आलीय म्हणे . 

बघून यायची का !"

मित्र लगेच म्हणाला-
" पालखी काय पहायची रे .

 बसू इथेच गप्पा मारत ! "
काय उत्तर देणार मी त्याला ?

आपण बरे, आपले काम बरे -
अशी वृत्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे ना ?

पण -
इंद्रधनुष्य ... त्यात काय पहायचे ?
पहिला धो धो पाऊस ... त्याला काय पहायचा ?
लाटांचा उसळता डोंगर .. त्यात काय विशेष ?
एखादा चांगला सिनेमा, एखादे चांगले नाटक,
एखादे चांगले पुस्तक, एखादी दुर्मिळ गोष्ट ...असली, दिसली, भेटली तरी -
" त्यात काय विशेष ? "

- असला संवाद करणारा ..
आणि इतरांचाही त्यामुळे विरस करणारा..
अरसिक कशासाठी जगात जगत असेल ?

.

चांदोबाचा दिवा

आई  ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला  -
 उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई  ,
चांदण्यांच्या पणत्या
किती लावल्या  -
उंच उंच आकाशात
कुणी सजवल्या ..

आई ग आई  ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून  -

चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई  ,

चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात  -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात .. 

.

असा मी असामी - [गझल]

नाही उद्धट मी हो कोणी बघुनी व्यक्ती मी झुकतो  
हळवाही नाही मी तितुका देण्या दणका ना डरतो    

वाऱ्यासंगे तोंड फिरवतो जैशाला तैसा भिडतो  
संधी साधत निवडणुकीची हातापायाही पडतो   

मागे कोणी गरजेपोटी शक्यच तेथे भागवतो   
ना घाबरता घातापाता वार समोरुन मी करतो  

रचुनी कपटी कारस्थाने इतका मोठा झालो मी 
बोलत असते जग दो तोंडी अनुभव घेतच मी असतो  

गंगेमधुनी पावन होतो पडतो बघुन गटारीला    
ठेवत राहो कोणी नावे जीवन माझे मी जगतो ..
.

तीन चारोळ्या पावसाच्या

१.
हट्टी -

तो पाऊसही सखे, तुझ्यासारखाच
अगदी पारंगत रुसव्याफुगव्यात -
ये रे ये रे म्हणून विनवणी करताच
नेमका लपून बसतो ढगांच्या थव्यात . .
.२.
दुर्मिळच -

दुधात साखर म्हणजे काय
अचानक धोधो पाऊस यावा -
जोडप्याजवळ नसावी छत्री
असा क्षण रस्त्यातच न्हावा ..
.


3.
अचानक -
सुखदु:खांना तराजूत मी 
रोज तोलतो 
दिसता जड पारडे सुखाचे 
मीच दचकतो..
.

प्रश्न -

मला लिहावेसे वाटते
मी लिहीत रहाणार,
तुला वाचावेसे वाटले
वाच नाहीतर नको -

'तू का लिहितोस'
असे विचारण्याचा
वेडगळ प्रयत्न
तू करू नकोस !

तूच सांग, मी तुला
विचारले आहे का,
आजवर कधीतरी
'तू का जगतोस' ?
. . .

वेग चक्र

पायी चालणाऱ्याकडे
घोडेस्वार हसून बघतो -

घोडेस्वाराकडे पहात
सायकलस्वार पळतो -

सायकलस्वाराकडे बघत
स्कूटरवाला बघून हसतो -

स्कूटरवाल्याला हसून
कारवाला निरोप देतो -

बंद कारला ढकलायला 
पायी चालणाराच मदत करतो !
.

माते -

माया तुझी छत
सहवास भिंती
प्रेम तुझे खिडकी
कृपा तुझी दार
अस्तित्व ही भूमी
वेगळे कशास हवे घर
माते, तुझे विश्व माझे घर !

श्वासात तू
हृदयात तू
संकटात तू
स्पंदनात तू
हुरहूर तू
चिंतेत तू
हर्षात तू
आसपास तू
वेगळे काय जगणे
माते, माझे जीवन म्हणजे तू !
.

हुषार कोण -


रोज सकाळी शाळेत जातो
पाढे बाराखडी शाळेत शिकतो ..


बाईंच्यासमोर पुस्तक वाचतो
पाढे धाडधाड म्हणून दाखवतो ..


मन लावून अभ्यास करतो
प्रश्नांचे उत्तर भरभर देतो ..


बाई "वा वा छान" म्हणतात
पाठीवर शाबासकी देतात .. 


मला एक समजत नाही
कसे विचारावे कळत नाही ..


बाईना पाढे येत नाहीत का
बाईना वाचता येत नाही का ..


वर्गात पुस्तक मीच वाचतो
वर्गात पाढे मीच म्हणतो .. !


.

शाळा


आई स्वैपाकघरात फिरणार
बाबा ऑफिसात काम करणार ..

दादा बाहेर क्रिकेट खेळणार
ताई सारखी मैत्रिणीत  असणार ..

कुणीही शाळेत नाही जाणार
मला मात्र शाळेत पाठवणार .. !

आजपासून मी शाळेत जाणार
शाळेत जाऊन खूप शिकणार ..

सर्वांपेक्षा मोठ्ठा मी होणार
सर्वांना घरात मी शिकवणार ..

अ आ ई काढायला लावणार
शिकवून त्यांना शहाणे करणार ..

त्यानी माझे ऐकले नाहीतर
शंभर उठाबशा काढायला लावणार  .. !

बरं झालं बाबा आज -

बरं झालं बाबा, आज  
जिवंत नाहीत तुम्ही 
सुखासमाधानाने मी 
छान लोळत आहे नेहमी ..

तुमच्या कष्टाच्या फंडातून 
घेतलेल्या दुचाकीवरून 
फिरतो मी दोस्त जमवून  
हिंडतो तिघ तिघ बसून ..

एका हातात पुडी धरतो 
दुसऱ्या हाताने शिस्तीत मळतो  
नसलीच कधी तर बिनधास्त
दोस्तापुढे हातही पसरतो ..

मस्त केसांचा कोंबडा उभारून 
चौकात उभा ष्टाईल मारून 
येणाऱ्या जाणाऱ्या आयटेम्स 
बघत बसतो डोळे भरून ..


चौकात जेव्हा उभा असतो 
काळवेळ मी पाळत नसतो
सावली जरी असली तरी 
गॉगलशिवाय फिरत नसतो ..

हिरवळ बघून शीळ घालून  
चकरा मारूनही दमत नाही 
कबुतरांची मोजदाद मी 
केल्याशिवाय रहात नाही ..

देवळात कधी जात नसतो 
देवाला पुजत बसत नसतो 
मात्र वाईनशॉप दिसताच 
प्रथम बाटलीला वंदन करतो .. 

अधी मधी चारचौघे जमून  
जोरात बेंबीच्या देठापासून  
पूर्वजांची आठवण काढून 
देत असतो आरोळ्या ठोकून ..

रस्त्याच्या मधोमध थांबतो 
बनारस कलकत्ता तोंडात कोंबतो 
लालभडक पिचकारी मारतो 
स्मार्ट सिटी रंगीन बनवतो ..

माझ्या हातून काही घडतही नाही 
दुनियेचे त्यावाचून अडतही नाही  
खाना पिना सोना जिंदगी माझी 
सिग्रेटीचा धूर हीच ओळख माझी ..

बाबा, सिग्रेटच्या प्रत्येक झुरक्यात 
तुमची आठवण होत असते 
प्यान्टच्या खिशातून हडपलेल्या 
नोटांची धुंदी स्मरत असते ..

काळजी केली नाही काल 
उद्याची मला नाही फिकीर 
तुम्ही नसल्यामुळे, आईची
कधीच ऐकत नाही किरकीर ..

दादाचे बोलणे नेहमीचेच 
इकडून ऐकत तिकडून सोडतो 
ताईच्या भविष्यवाणीला 
ठेंगा दाखवत मोकळा होतो ..

घरात लक्ष द्यायला मला 
नाही वेळ कधी मिळत 
अरबट चरबट खाण्याशिवाय 
दुसरे काही नाही गिळत ..

घरात लक्ष देत बसलो तर 
दोस्तांशी कसा जमायचा मेळ 
दोस्त आहे तर जिंदगीत 
रमतो जुगारी पत्त्याचा खेळ ..

आयजीच्या जिवावर बायजी उदार 
तुमच्या शिलकेवर माझी मदार 
मनसोक्त बेफिकीर बनलो आहे 
वाया गेलेला म्हणून गणलो आहे ..

बरं झालं बाबा, तुम्ही 
आता जिवंत नाहीत -
तुमच्या उपदेशाचे डोस
मला ऐकावे लागत नाहीत ..

नाहीतर येताजाता ते
ऐकत बसावे लागले असते  
माझ्या अख्ख्या जिंदगीला  
बरबाद व्हावे लागले असते ..
बरबाद व्हावे लागले असते ! 
.

अकरा चारोळ्या -


गुरुकिल्ली यशाची -

"सॉरी प्लीज थँक्यू" त्रिसुत्री
नित्य ज्याच्या वसे मुखी -
व्यवहारी जगातल्या जीवनी
तो यशस्वी असे सुखी ..
.

आहेस घरी तू म्हणुनी -

साधासुधा गुलाम संसारातला आहे मी
हुकमाची राणी संसारातली आहेस तू -
प्रपंचाचे रहाटगाडगे चालेल सुरळीत 
जोवर भक्कम माझ्यासमोर आहेस तू ..
.

तेवढेच समाधान -

स्वप्नातल्या राज्यात मी 
सुखाचे मनोराज्य रचत बसतो -
वाकुल्या नियतीला दाखवत
दुःखांना हाकलत हसत असतो ..
.

गुंता -

सुखदु:खाची भवती जाळी
त्यात लटकतो मानव कोळी -
झटकायाचा प्रयत्न करता
अधिकच गुंता होतो भाळी !
.

जळवा -

सांडून रक्त जवानानी
जीवन सुसह्य केले -
शोषून रक्त नेत्यानी
जीवन असह्य केले . .
.

दु:ख पर्वताएवढे -

सवयीचे झाले माझे जीवन
दु:खातच मी जगताना -
दचकुन क्षणात जागा होतो
सुख स्वप्नात मी बघताना . . 
.

रणभागिनी -

संकटसमयी मी मदतीला
धावत येईन तुझ्या सख्या रे -
समोरची ती पाल नि झुरळे
आधी हाकलुन लाव सख्या रे ..
.

मन श्रीमंत श्रीमंत -

श्रीमंत घरातून आलेली तू 
गरीबाच्या झोपडीत रमलीस -
माझ्या मनाच्या श्रीमंतीवर 
खरच का तू इतकी भाळलीस ..
.

तोल-

संसाराचा तराजू
जर राखायचा समतोल -
पतीपत्नीने एकमेकांचा
वेळीच सावरावा तोल ..
.

शिते तिथे भुते -

सुखाचा क्षण मला गवसला 
सगळे ओरबाडायला तयार -
दु:खाचा मी सेल लावला 
कुणी न फुकटही न्यायला तयार ..
.

चेहरा -

शंभर आठ्या बाळगणारा 
जोडू शकत नाही एकही मित्र -
एखाद्या स्मिताने वावरणारा 
जमवू शकतो हजार मित्र ..
.

अनुयायी


तू येत होतीस
अनुयायी पाऊस
तुझ्या मागे मागे
तेव्हा येत होता..


तुझे येणे नंतर
झाले अनियमित
त्याचेही आगमन
असेच क्वचित..


तुझे येणे जेव्हा
कायमचे थांबले
त्याचे येणेही आता
कायमच लांबले ... !
.

बारा चारोळ्या -

आपमतलबी -
स्वस्तुती ऐकण्यासाठी 
टवकारता कान तुम्ही जसे -
इतरांच्या कौतुकासाठी 
पुढे येऊ द्या तोंडही तसे .. 
.

सा.सू. X सू.न.
सुरू जाहल्या सासूच्या सूनबाईला सूचना
नकोस लावू येताजाता ओठाला लिपस्टिक -
गेली वैतागून सून ऐकून अती सूचना
निमूट सासूच्या हाती ठेवून गेली फेविक्विक ..
.

बिच्चारी -
सहवास.. तुझा लाभता 
कळी मनाची फुलून येते -
वनवास.. जवळ तू नसता 
कळी मनाची सुकून जाते ..
.

जीवन -
सखे, नेहमी आपण भांडतो 
थेंब तुझ्या डोळ्यांतून गळतो -
घात शेवटी तेथे होतो 
थेंबातच का मी विरघळतो .. 
.

गर्वाचे घर -
"सगळे घाबरती मजला"
अंधाराला गर्व जाहला - 
ठिणगी पडली छोटीशी 
अंधार जळून खाक जाहला ..
.

ईमान -
सन्मान दिलेल्या मानाशी
बेईमान का "मानव" होतो - 
श्वान छान ईमान राखुनी 
कृतघ्न कधी न धन्यास होतो . .
.

खंत -
'सुख" हा शब्द लिहायला
सोपा कितीतरी वाटतो -
आयुष्य वेचले तरीही 
नशिबात कधीतरी भेटतो ..
.

घावावर घाव -
सखे, आठवणींचे घाव घालून 
जखमा मनात करून जातेस -
नकारानंतर समोर येऊन 
जखमेवर मीठ चोळत राहतेस ..
.

वटवट सावित्री -
सारखा भानावर येत आहे दचकून 
 पुन्हा सात जन्म सहवास -
वडाला फेऱ्या तिच्या मनापासून 
मी भोगणारा सात जन्म बंदिवास ..
.

ज्याची त्याची चौकट -
श्रीमंताने बसवले सोन्याच्या चौकटीत 
गुदमरणाऱ्या श्रीमंत साईला -
गरिबाने बसवले हृदयाच्या चौकटीत 
साध्यासुध्या फकीर साईला ..
.

पराजय -
सारे जग मी जिंकत आलो
 सुटलो सांगत ज्याला त्याला 
माझे जग मी हरून बसलो
पाहताक्षणीच आता मी तुला ..
.

आधार -
साधासुधा जोकर मी
हुकमाची ग राणी तू -
प्रपंच सुरळीत नेहमी  
जोवर माझा आधार तू ..
.

तीन चारोळ्या ---

कधीच पडले धारातीर्थी
इमानी सच्चे वीर मावळे -
शिवरायाचे नांव गर्जुनी
जगती लुच्चे डोमकावळे !
.

कुठे भेटलो दोघे आपण
कशा स्मराव्या आज खुणा
पावलात मिसळली पावले
उरल्या कोठे पाऊलखुणा !
.

कुणी कुणाचे येथे नसते
जमती सगळे तिकिटापुरते -
मेनका सत्तेची नाचे जिकडे
विश्वामित्र पळतो तिकडे...
.

सांगा बरे लोक हो माझे काय चुकले ..


सकाळी सकाळी तिने  
 मला "गुड डे"म्हटले -
चार पुडे मी तिला  
"गुड डे" बिस्किटांचे दिले -  

तोंड तिने माझ्यापुढे 
कसे तरी केले ,
सांगा बरे लोक हो  
माझे काय चुकले ..  

तिला फूल आवडते 
पहिल्यांदा जेव्हा कळले -
सूर्यफूल एक मोठे    
तिच्या केसात खोवले -

रागारागाने माझ्याकडे 
जरी तिने बघितले ,
सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले  ..

गाडीवर फिरते आवडीने 
जेव्हा मला कळले  -
हातगाडीचे धूड मी 
तिच्यासमोर उभे केले  - 

लालभडक डोळे 
तिचे जरी मी पाहिले ,
सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले ..

आंबटशौकीन आहे ती 
माझ्या कानावर आले -
लिंबूपाणी तांब्याभर 
तिला प्रेमाने पाजले -

तोंड वेडेवाकडे 
जरी तिने केले ,
सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले ..

तिला प्राण्यांचा लळा
जेव्हा मी जाणले  -
पिंजरा उघडून उंदीर 
तिच्यापुढे मी सोडले -

दाणदाण पाय आपटत 
जाणे तिचे झाले ,
सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले .. 

तिला सिनेमे आवडतात   
जेव्हा मला माहित झाले - 
रामसे बंधूंचे सिनेमे  
खास तिलाच दाखवले - 

आवडीने सारे मी 
तिच्यासाठीच केले ,
सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले ..   

 'बाय बाय टाटा '  
एकदा तिने म्हटले - 
टाटा मिठाचे पुडे   
विकत आणून दिले -

खाऊ की गिळू अशा 
नजरेने तिने पाहिले ,
सांगा बरे लोक हो  
माझे काय चुकले ....

सांगा बरे लोक हो 
माझे काय चुकले .... !

.

असंतुष्ट आत्मे

आपल्या हातून काही घडत नाही
दुसरे घडवतात ते बघवत नाही..

आपल्याला काही लिहिता येत नाही
दुसऱ्याने लिहिलेले आवडत नाही..

आपण  स्वत:हून काही करत नाही
दुसऱ्याला मदत करवत नाही..

दुसरा वरचढ आपल्यापेक्षा झाला
पाण्यात पाहिल्याशिवाय राहवत नाही ..

आपल्याला  चांगले बोलता येत नाही
दुसऱ्याची री ओढता येत नाही..

इतर काहीतरी  करायला धडपडतात
आपण खो घातल्याशिवाय रहात नाही..

दुसरे काहीतरी करून बोलतात
आपण बडबडीशिवाय काही करत नाही . .! 

.

स्त्री पुरुष कर्तव्य

१)

"दमले ग बाई "
- असे म्हणत म्हणत,
स्त्री पट्कन पुढील आवराआवरीच्या तयारीला
 जुंपून घेताना दिसतेच ......

"छे, फार दमलो बुवा आज !"
- असे म्हणत म्हणत ,
भविष्याची फिकीर न करता-
 आपण पुरुष खुशाल ताणून देत असतो ..!

खरं आहे ना ?
.

२)

खरेच बायकांच्या कामाचे कौतुक

 करावे तेवढे थोडेच !

दोनच हात...पण झपाटा पाहिला तर ,
आठ हातांच्या कामाचा-
न कुरकुरता उरक !

- आणि आम्हा पुरुषांच्या दोन हातांना ,
एका हातातले काम निपटायलाही,
दहावेळा किरकिर केल्याशिवाय-
चैनच पडत नाही ना .

खरंय की नाही ?
.

आधी "त्यांना" वरती ने -


आधी "त्यांना" वरती ने-
गर्जतो आम्ही एकमुखाने..

धावा नेहमी करतो आम्ही
देवा रोजच नित्यनेमाने ..

अंत आमचा किती पाहणे
ठरवशी कसा तू वेगाने..

"त्यांना" सोडून येथे खाली
"ह्यांना" का नेशी घाईने.. ?

स्वर्गातही का तुला नकोसे
वाटते लगेच "त्यांना" नेणे..

दु:खात लोटशी का आम्हाला
"ह्यांना" नेऊन तत्परतेने ..! 


.

क्षण एक पुरे झटक्याचा -


रुसतेस फुगतेस
निघून जातेस..

जाता जाता हळूच
मागे वळतेस..

माझ्याकडे पाहून
मान झटकतेस..

ज्या क्षणाची वाट -
तोच क्षण पाठवतेस..

थांबलेल्या हृदयात
प्राणवायू भरतेस..

उद्या येण्याची
खात्रीच पटवतेस.. !

.

स्त्री पुरुष मन

१)
         पोलिओ झालेल्या मुलाचे दु:ख
हृदयात लपवून आई 
उसने हासू आणून
हसतखेळत जगात वावरत असते ...

          त्याच मुलाचा बाप मात्र
आपल्या दु:खाची जाहिरात करत
 रात्री चारजणांच्या सोबतीने 
बारच्या अंधारात लपवत बसतो ....... !

वाईट वाटते ना ?


            ............................................................२) 

          स्त्रिया आपले दु:खातले आसू 
हूं की चू न करता, शक्यतो गिळू पाहतात
आणि खोटे खोटे हासू
चेहऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न तरी करतात ....

          आपण पुरुष मात्र
दु:खांचे डांगोरे पिटतच राहतो -
आणि कुणी थोडेसे जरी दुर्लक्ष केले की
त्याचेही गावभर ढोल बडवत सुटतो !

खरंय का नाही ?


.