"सॉरी प्लीज थँक्यू" त्रिसुत्री
नित्य ज्याच्या वसे मुखी -
व्यवहारी जगातल्या जीवनी
तो यशस्वी असे सुखी ..
.
आहेस घरी तू म्हणुनी -
साधासुधा गुलाम संसारातला आहे मी
हुकमाची राणी संसारातली आहेस तू -
प्रपंचाचे रहाटगाडगे चालेल सुरळीत
जोवर भक्कम माझ्यासमोर आहेस तू ..
.
तेवढेच समाधान -
स्वप्नातल्या राज्यात मी
सुखाचे मनोराज्य रचत बसतो -
वाकुल्या नियतीला दाखवत
दुःखांना हाकलत हसत असतो ..
.
गुंता -
सुखदु:खाची भवती जाळी
त्यात लटकतो मानव कोळी -
झटकायाचा प्रयत्न करता
अधिकच गुंता होतो भाळी !
.
जळवा -
सांडून रक्त जवानानी
जीवन सुसह्य केले -
शोषून रक्त नेत्यानी
जीवन असह्य केले . .
.
दु:ख पर्वताएवढे -
सवयीचे झाले माझे जीवन
दु:खातच मी जगताना -
दचकुन क्षणात जागा होतो
सुख स्वप्नात मी बघताना . .
.
रणभागिनी -
संकटसमयी मी मदतीला
धावत येईन तुझ्या सख्या रे -
समोरची ती पाल नि झुरळे
आधी हाकलुन लाव सख्या रे ..
.
मन श्रीमंत श्रीमंत -
श्रीमंत घरातून आलेली तू
गरीबाच्या झोपडीत रमलीस -
माझ्या मनाच्या श्रीमंतीवर
खरच का तू इतकी भाळलीस ..
.
तोल-
संसाराचा तराजू
जर राखायचा समतोल -
पतीपत्नीने एकमेकांचा
वेळीच सावरावा तोल ..
.
शिते तिथे भुते -
सुखाचा क्षण मला गवसला
सगळे ओरबाडायला तयार -
दु:खाचा मी सेल लावला
कुणी न फुकटही न्यायला तयार ..
.
चेहरा -
शंभर आठ्या बाळगणारा
जोडू शकत नाही एकही मित्र -
एखाद्या स्मिताने वावरणारा
जमवू शकतो हजार मित्र ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा