वाट पाहुनी जीव हा थकला - -


वाट पाहुनी जीव हा थकला
घडले दर्शन मजला..


वेद चार ते श्वान जाहले
वसुधा ती गोमाता
सदा राहती तुझ्याभोवती
त्रेलोक्यी तू फिरता
जो तो दिसतो धरतीवर या
तुझ्या कृपेचा भुकेला .. 


शंख चक्र अन कमलपुष्पही
शोभती तव रे हाती
गदा त्रिशूलासंग कमंडलू
पावन हो भटकंती
त्रिमुखावर तव स्मित नित बघता
आनंद होई मनाला ..


दर्शन घडले आज तुझे रे
धन्य जन्म हा आता
स्मरण मी करतो अंत:करणी
ठेवून चरणी माथा
भावफुलांची ओंजळ माझी
अर्पण करतो तुजला ..

--

जे सभागृही.. तेच ममगृही !

छे छे छे छे . . .

माझ्याही "गृहा"त 
अगदी तश्शीच परिस्थिती ?

सकाळपासून 
खरंच माझे कान बधीर झालेत -

आई येते 
आणि माझ्या कानाशी ओरडते,
 "सूनबाई मला काहीच बोलू देत नाही रे !"

थोड्या वेळात 
सूनबाई माझ्या कानांना ऐकवते,
 "बघा ना, सासूबाई मला काही बोलूच देत नाहीत हो !"

माझ्याच "गृहा"त, 
मी गृहपती असूनही, 
मी कुणाला गप्प बसवू शकत नाही ! 

दोघींच्या गदारोळात
स्वैपाकघराचे कामकाजही 

अगदी "ठप्प" झाले आहे ... !

काय करणार . . ?

आपलेच दात अन ..
.

कुणाला कशाचे..कुणाला कशाचे !


बहुतेक -
एटीएमच्या लांबलचक रांगेतून
 मित्र परतला असावा.


त्याचा उत्साह उतू जाणारा चेहरा पाहून

 मी विचारले,

"काय रे, किती मिळाले शेवटी, इतका वेळ थांबून ?"


आपल्या हातातला मोबाईल माझ्यासमोर धरून, 
विजयी मुद्रेने, 
तो हसत हसत उत्तरला -

"छे रे, पैसे काढायला कुठे गेलो होतो मी ?

 हे बघ, 
तीन चार सेल्फी काढून आलोय मी मस्तपैकी,
 एटीएमसमोरच्या रांगेत उभा राहून !"
..

खरे दु:ख

हार्ट आनंदात असताना

अमाप पैसे खर्चून


चायनीज पिझ्झा बर्गर


खाल्ल्याने ओढवून घेतलेल्या


पोटदुखीच्या दुःखापेक्षा ..



यष्टीच्या प्रवासात

कंडाक्टरसाहेबाकडून


तिकिटाचे उरलेले 


एक दोन रुपये 


घ्यायचे विसरलेले ..



लक्षात आले की

आपल्या हार्टला होणारे दुःख हे


नक्कीच कैकपटीने जास्त असते !

.

जीवन


हसायचे कुणापुढे
कुणापुढे कण्हायचे -


प्रसंगानुरूप पण
मुखवट्यात लपायचे -


नेहमी स्वतःलाच
फसवत रहायचे -


यालाच तर आपण
"जीवन" म्हणायचे ..

. .

कहीपे निगाहे कहीपे निशाना

"बहुत प्यार करते हैं, तुमको सनम-
कसम चाहे ले लो, ख़ुदा की कसम.."


..... मी एटीएममधून
 नुकत्याच मिळालेल्या
दोन हजारच्या 

त्या गुलाबी नोटेकडे बघत
कौतुकाने 

गुणगुणत होतो ..

--- तेवढ्यात
 हातात चहाचा कप घेऊन
आलेल्या बायकोने
माझे गुणगुणणे ऐकले..................!


मग काय ..

ती खूष -
म्हणून मीही खूष !
.

मीही एक याचक . . . !


योगेश्वरीदेवीच्या दर्शनास जाण्यासाठी 

सोलापूर ते अंबाजोगाई

यष्टीत बसलो होतो. 


बाजूच्या खिडकीतून आवाज आला-
" गरिबाला रुपया रुपया/दोन रुपये द्या की हो दादा ..."


मी माझ्या खिशात हात घातला आणि 


माझ्या खिशातून हातात आलेले 


दोनचे नाणे त्याच्या हातावर ठेवले.

यष्टी निघाली.

वाहकाने मला तिकीट दिले.. 


बहुधा नेहमीच्या सवयीनुसार सोयिस्करपणे
उरलेले दोन रुपये मला देण्याचे तो विसरला.


अंबाजोगाई स्थानकावर यष्टी थांबली.

उतरताना मी वाहकाला दोन बोटे दाखवली .


कसनुसे हसत 
त्याने दोनचे नाणे मुकाट्याने माझ्या हातावर ठेवले !
...

तीन चारोळ्या -

'अरे देवा -'

दगडातून मूर्ती साकारणारा 
पैसा पैसा करतच मरतो -
दगडातून निर्मित देव 
निवांत पैसा गोळा करतो ..
.

'लेकराची माय -'

डोळियांची निरांजने 
आसवांचे तेल तयात -
जपून ठेविते माऊली 
प्रकाश अपुल्या हृदयात ..
.

'हसरी जखम -'

दिला गुलाब तिच्या हाती 
मिळे गोड स्मितातून पावती -
टोचे काटा बोटास माझ्या 
हसतो मधुर रुधिरथेंबही किती . .
.

दोन चारोळ्या -

'अगतिक -'

देवळातल्या देवाच्या  
पायावर हात मी ठेवत आहे -
देवाशपथ, खरं सांगतो  
शंभर टक्के मी नास्तिक आहे ..
.


'असे का -'

दुसऱ्याच्या मदतीला धावायला 
दोन पाय असून नसतो तयार - 
दुसऱ्याचे वाईट करायला मनुष्य 
एका पायावरही असतो तयार ..
.

अतिक्रमण

फूटपाथवरची 

मुजोर अतिक्रमणे

पाहून...


काही दिवसांनी

अशीही वेळ

 येईल की,


फूटपाथवरून

चालणा-या पादचा-यांनाच,

"अतिक्रमण" समजून, 


नगरपालिकेच्या 

जागरूक 

अतिक्रमणवाहक गाड्या 

उचलून नेतील !
.

स्वप्नपाखरांनो -

झोपेत आहे 

मी जोवर -

स्वप्नपाखरांनो, 

हवे तेवढे 

फिरून घ्या हो -


जागा झालो 

मधेच मी तर -

तुटतील नाती ..


उरतील दोन

दिशा अन दशा 

कोण तुम्ही अन -

मी कोण हो .. !
...