जे न देखे रवी -



छानशा चित्तवृत्तीत सकाळी सकाळी लिखाण चालू केले होते !

मधेच थोडासा हातापायाला विरंगुळा म्हणून उठून, पूर्वेकडच्या  खिडकीचे दार किलकिले केले. 

मी काय करतोय ते पहायला, तो टपून राहिलेला सूर्य हजर होताच समोर ! 

आता सूर्य एकदम तोंडासमोर आल्यावर,
मला  शिष्टाचाराला धरून काहीतरी बोलणे भाग होतेच ! 

म्हणून मी सूर्याला म्हणालो -
" सुप्रभात ! "

आपली सोनेरी किरणे तोंडभरून विचकत तो उत्तरला -
" काही नाही ... आपलं सहज डोकावत होतो .. 
तुझं कस काय चालल आहे ते पहायला ! "


मी खिडकीची दारं  पूर्ण उघडत म्हणालो -
" माझ काय वेगळ चाललेलं असणार बाबा  ?
 तुझं आपलं बरं आहे - सकाळ झाली रे झाली की,  तुला कुठेही कसेही डोकावता येतं ! आमचं तसं नाही ना !
आम्हा कवीमंडळीना- तुला जे जे कधीच दिसू शकत  नाही ,
 ते ते कल्पनेतूनच  बघत बसावे लागते ...! "

प्रसन्न हसून सूर्य दुसऱ्यांच्या खिडक्यात डोकावून पाहायला गेला !
.

डुलकी आणि स्वप्न -




भोजनोत्तर वामकुक्षीचा ठरलेला कार्यक्रम चालू झाला .

ठरलेल्या वेळी येणारी डुलकीपाठोपाठची स्वप्नावली सुरू - 

स्वप्नात साक्षात छत्रपती आले आणि गरजले -

" मूर्खा ! ऊठ .. जागा हो .. !!
एका वर्षात माझ्या तीन तीन जयंत्या साजऱ्या करताना,
 तुम्हाला लाज लज्जा शरम काहीच कशी वाटत नाही ?
- आणि येता जाता नुसतच "मी मराठी मी मराठी" म्हणत का गळा काढतोस रे !
इथे मेजावर तर सगळी विंग्रजी बुकं दिसत आहेत ;
 पोरांनाही विंग्रजी विद्यालयात धाडतोस ना ?
दूरदर्शनवर वेळ मिळाला की, फ्याशन वाहिनीवर त्या ललना न्याहाळत बसतोस !
माझे नांव पुढे पुढे करून "जय भवानी जय शिवाजी" म्हणत...
 आपल्या भावाला बदडत होतास ना  ?
लहान घोडा आहेस का तू अशी मारामारी करायला ?
कधी येणार आहे तुला अक्कल आता ? 
साहित्यातला तू पी एच डी ना ? 
त्या "पी एच डी"चा भलताच अर्थ स्वत:ला लावून घेतोस का ! 
सगळ्याजणांच्या एकीच्या नावाखाली वेगवेगळे समूह बनवतोस, ते कळत नाही का मला ?

माझ्या काळात फंद फितुरी, गनिमी कावे, बंडखोरी होती - 
तेवढीच फक्त आता तुम्हाला चालू ठेवायची आहे काय ? 
मी तुमच्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केलेले विसरलात वाटतं सगळेच !
तुम्हा सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवायला पाहिजे .............!"

स्वप्नातही मला घाम फुटला होता....

"चुकलो महाराज चुकलो " म्हणत मी त्यांचे पाय धरायला लागलो - - -

"अहो, वेडबीड लागलं की काय तुम्हाला ...." असा जोराचा आवाज आला आणि -
डोळे उघडून पहातो तो,

बायको मला आपल्या पायापासून दूर ढकलत होती ! 
.

का मन फसते तू नसताना - [गझल]

का मन फसते तू नसताना 
चिडके असते तू नसताना

दिसतो भारी बहर फुलांचा
मरगळ ठसते तू नसताना 


कानी येते मधुर कहाणी
घुसमट वसते तू नसताना


वाजे सनई तुझिया कारण
शांती डसते तू नसताना


जवळी तू जर माझे जीवन
जगणे नसते तू नसताना 


बघतो स्वप्ने जन्मभराची
नियती हसते तू नसताना 


मनपाखरु हे असते उधळत
गुपचुप बसते तू नसताना ..

.
.

थांग मनाचा -




मना मज सांग ना


 तव भावना जराशी , 

उगाच वरवर 


असा कसा हिरमुसशी !


भेटणार म्हणुन तू


किती उताविळ होशी 

दिसणार म्हणुन ती


 किती स्वत: हुरहुरशी ! 


ती येता, गप्प घुम्यास


 परि तू बसशी - 

ना थांग आपुला 

मुळीच मज लागू देशी ! 


ती समोर असता 


पाडशी मज तोंडघशी

का अनोळख्यासम 


कांगावा रे करशी !

.

होळीचा गोंधळ ...



होळीचा गोंधळ ...
दारे- खिडक्या बंद केली तरी ऐकू येतच होता..

ठो ठो करून,
बेंबीच्या देठापासून केलेली बोंबाबोंब,
कानात बोळे कोंबूनही असह्य होती

बायको आपल्या कमरेवर एक हात ठेवून
एका हातात लाटणे तसेच धरून तावातावाने
तव्यावरची पुरणाची पोळी तशीच ठेवून
बाहेर दिवाणखान्यात येउन ओरडली-
" मला काही म्हणालात काय ? "

मी शांतपणे
माझ्या दोन्ही कानावर हात ठेवून
आपली मुंडी नकारार्थी हलवत म्हणालो-
" ह्या बाहेरच्या गोंगाटापेक्षा वरचढ आवाजात
"मी तुला काही बोलणे"
शक्य आहे काय ? " 
.

अरे अरे पुरे कान्हा ...




अरे अरे पुरे कान्हा...
विनवते पुन्हा पुन्हा
फोडू नकोस ना घडा
मारूनिया त्याला खडा -
नको रंगाचा बेरंग
भारी खट्याळ  श्रीरंग !

अंग चिंब भिजेल ना
बोभाटा रे  होईल ना
काय आईला मी सांगू
नको जीव माझा टांगू -

ऊर माझा धडधडे
गाफील मी तुझ्यापुढे 
मारशी तू एक खडा
दह्यादुधाचा हा  सडा -

त्रास देशी येताजाता
मनीं वाढविशी  चिंता -
सहवासाची ओढ कान्हा
नको लावू पुन्हा पुन्हा ! 
.

प्रेमभंग आणि नशीब -



जीव द्यायला गेला बिचारा आगगाडीखाली
त्या गाडीला आधी नेमका अपघातच झाला,

घरी येउनी हाती विषाची शिशीच ती धरली 
उघडे झाकण जवळी उंदीर मेलेला दिसला, 

पंख्याला लटकून जीव तो द्यायाला बघतो 
जुनाट दोरच पंख्यावरुनी  तुटून की  पडला,

नदीवर गेला जीव द्यायला कुंठीतच झाला 
नदी कोरडी दगड नि वाळू बघुन घरी आला, 

ब्लेड घेतले ऐटित हाती नस ती कापायाला
जुने गंजके दिसता  जिवाचा थरकापच झाला, 

भ्रमणध्वनीवर संदेशध्वनी हळुच एक वाजला 
कां कू करीत प्रियतमेचा होकार परी वाचला, 

वाचत असता आनंदातही घाम तया फुटला
दिल का दौरा पडुन बिचारा देवाघरी गेला !
.

रविवार -


काही झालं तरी शेवटी, आमच नात नवराबायकोच.. !


आठवड्यातून येणारा एकुलता एकच रविवार आणि -
बायकोही एकुलती एकच !

आज ठरवून टाकलं आहे ..
काहीही झालं, तरी आज मी तिला प्रत्येक कामात हिरीरीन मदत करणार !

ती ओरडणार -
" अहो तुम्हाला कितीदा सांगितलंय - असं मधेमधे लुडबुडू नका म्हणून !
माझ मग अशान कुठलच काम पूर्ण होत नाही..
आणि ते एकदा बिघडलं की, दुसऱ्या कामातही लक्ष लागत नाही ! "

आज ओरडली तर खुशाल ओरडू दे !

बायकोच ती !
ओरडणे आणि रडणे - दुसरे काही जमणारच नाही तिला नीट !
पक्की खात्री आही माझी !

सकाळ झाली की,
ती एका लांबलचक जाम्भईने "रविवार उजाडला" म्हणून जाहीर करील !

आधीच तिला मी आज मदत करायची ठरवली असल्याने.....
मी ग्यास पेटवून देणार आणि तिला सांगणार -
" तुला मी ग्यास पेटवून दिलाय, आता चहा कर. आपण "दोघे" पिऊया ! "

नऊ वाजता तिने पुन्हा ग्यास पेव्ला की,  मी सांगणार -
" तू ग्यास पेटवला आहेसच, तर तेवढा नाष्टा बनव -
 आपण "मिळून" खाऊया ! "

एक वाजता ती स्वैपाकघरात गेली, तर मी म्हणणार -
" आता स्वैपाकघरातच आहेस तर,
स्वैपाक कर,
 म्हणजे  "आपण मिळून" जेऊया ! "

......... अशा रीतीने जेवण झाले की,
 ती उष्टी खरकटी काढील,
 मग आम्ही दोघेही विश्रांती घेणार !

एक्मेकांच्या सहकार्याशिवाय,
संसार कधी कुणाचा सुरळीत झालाय का हो ?
तुम्हीच सांगा बरं !

अश्शीच आम्ही आज रविवारी एकमेकांना मदत करून-
रविवार मस्त मजेत घालवणार !
.

पाणी पाणी पाणी -



सारे बसले निवांत घेउन हाती बिस्लरी पाणी
दोनच घोट गळ्याखालती फेकत उरले पाणी
कशी सांगावी महति जलाची श्रीमंताना कोणी
लाथ मारती पाणी काढती रुपये भरली गोणी !

आडही सुकले सुकल्या विहिरी कुठेच नाही पाणी
प्राणी पशुपाखरे दिसत ही उदास केविलवाणी
दयाघनाला दयाच नाही कलीयुगाची करणी
आभाळाकडे नजर ना खळे डोळ्यामधले पाणी !

पोरं पोरी घेऊन भांडी डोक्यावर अनवाणी
मैलांवरून आणती पाणी गात सुखाची गाणी
दु:ख कुणाचे कुणास नाही रोजची रडगाणी
शहरी नेते मस्त काढती दुष्काळ-सहल-पहाणी !

कळते साऱ्या नेत्यांना जीवन म्हणजे पाणी
तरिही वाचवती ना आपल्या घरातले पाणी   
सरकारी योजना बहुत त्या वाचवण्या पाणी
गुंडाळुन नाचती कागदी घोड्यावर पाणी !

पाणी पाणी म्हणुनी जो तो पळतो वेड्यावाणी
टँकरमधले पाणी संपले कळता किति हैराणी
दु:ख तयांचे मुर्दाडाना सांगेल का कधि कोणी
काढत बसले खुशालचेंडू पाणी घुसळुन लोणी !
.

का रुसला शब्दांनो -

. 
डोकावलो मी मनांत जरा
आटुनी गेला शब्द-झरा
रुसून बसले शब्द का बरे
अबोल झाले शब्दच सारे

मन कविता तन कविता
जीवन सारे आहे कविता
चडफड तडफड व्यथा वेदना
व्यक्त करावी कशी कळेना

नका शब्दानो कोंडुन घेऊ
नका असे घुसमटून जाऊ
आधीसारखा लोभ असू द्या
मनातनाला हर्ष होऊ द्या

शब्दाविण ही कसली सृष्टी
विनाभावना कसली दृष्टी
बाहेर पडा सारे उसळुनी
हासत या सारे खळखळुनी

शब्दांच्या मी माळा बनविन
कवितेमधुनी जगास विनविन
रागावुन ना जुळते प्रीती
नांदो जगती प्रेम नि शांती 

.

संसाराची पंचविशी -



रुसून फुगायची आवड तुला
मनवत बसणे नावडे मला -

भाकरी नव्हती आवडत तुला
भाकरीवाचून ना चाले मला -

तुल गोड खाण्याची आसक्ती
मला मात्र बिनसाखरेची सक्ती -

कडू कारल गोड लागत मला
त्याचा ग पूर्ण तिटकारा तुला -

बसमधून हिंडायला आवडे मला
बसमधे नेमकी 'बस लागे' तुला -

चालायची मला भिनली आवड
चालायची तुला पूर्णच नावड -

उगवता सूर्य मला खूप आवडे
डोळे तुझे नेहमी पश्चिमेकडे -

किती मला सासर आवडत तुझ
तुला मात्र सासर आवडत माझ -

दोघांची भिन्न आवड-निवड जरी
उलटली संसाराची पंचविशी तरी !
.

काव्य वाचन - एक प्रश्नचिन्ह !


      तुम्ही आपले आयुष्य जन्मठेपेच्या शिक्षेमुळे एखाद्या निर्जन बेटावर घालवले,  तरी मला काहीच वाटणार नाही ! तुम्ही आपले जीवन कजाग बायकोच्या कबजात  सोपवले, तरी मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही ! निरनिराळ्या कचे-यातील कामचुकार कारकुनांच्या कारवायांमुळे हेलपाटून आत्मबलिदान तुम्ही केले, तरी मी तुमच्यासाठी दोन आसवेही गाळणार नाही ! पण.. पण..., तुम्ही आयुष्यात प्रथमच  एखाद्या काव्य-वाचनाच्या कार्यक्रमास निघाला असाल, तर तुमच्या श्रद्धांजलीचा पहिला वक्ता मी असेन !

            कदाचित तुम्हाला वाटत असेल की, मला दिवाळीचा फराळ 'चढला' असेल, म्हणून मी 'बरळत' सुटलोय ! पण वस्तुस्थिती तुमच्यासमोर निदर्शनास आणल्यावर तुम्हीदेखील माझ्यासह 'खांदेकरी' म्हणून यावयास दुप्पट उत्साहाने नक्कीच तयार  व्हाल !

               एक 'कविराज' आहेत . (खऱ्या कवीलाच फक्त कवी म्हणायचे असते.) बसल्या बैठकीला आपल्या कवितेच्या भट्टीतून पाच-पन्नास कविता पाडायचं कसब त्यांना  चांगलंच अवगत आहे .  त्यांच्या सुदैवाने- अन् आमच्या दुर्दैवाने, एक दिवस काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.  वाचन सुरू होऊन बराच काळ लोटला, तरी 'कविराज' आटोपते घेईनात. त्यांनी  आमच्या सहनशीलतेवर विनयभंग, अत्याचार, बलात्कार वगैरे सारे 'अमानुष' जुलूम केले . त्यांच्या त्या जबरदस्तीने एकाचा कान फुटला ! दुसऱ्या एकाला वेड लागून, तो सारखा 'वा वा छान' असेच म्हणत राहिला. तिसऱ्याने वासलेला जांभईचा 'आss' मिटण्यासाठी आम्ही अद्याप कुशल  'घसा-तज्ञा'च्या शोधात आहोत ! असले भयंकर छान प्रकार अगदी 'आणीबाणीत'ही करायला कुणी धजावत नव्हते, असे 'आमच्या पक्षा'चे कार्यकर्ते अजूनही सांगतात !

        'काव्य-वाचन' हा प्रकार म्हणजे केवळ 'काव्य वाचणं' (-आणि श्रोत्याने मरणं) इतपतच थांबणारा नसतो. माझ्या पहिल्या कवितेचं नांव..दुसऱ्या..तिसऱ्या..चवथ्या..वगैरे.. कवितेचं नांव आहे.., हे सर्व अब्ज दशअब्जपर्यंत आकडे मोजून होईपर्यंत काव्यवाचन चालूच असते ! पण आपल्या सुदैवाने 'कवीराजा'ची उजळणी पक्की नसल्याने, तमाम श्रोते (अनुभवाने) मधेच काही आकड्यानंतर, जीव बचावून पळू शकतात ! "माझ्या शेवटच्या कवितेचं नांव आहे -" इथपर्यंत कवीराजाच्या तोंडून ऐकणारा श्रोता, अजूनपर्यंत तरी मला दिसलाच नाही बुवा ! अगदी मी मी म्हणणारा श्रोता पहिल्या कवितेला मान डोलावताना दिसतो, दुसऱ्या कवितेला चुटक्या वाजवताना आढळतो, तिसऱ्या कवितेला जांभई वाजवतो, चवथ्या कवितेला .. तो बहुतेक  'गतप्राण' झालेला असतो ! त्यामुळे कुठल्याही कवीने नक्की किती कविता वाच(व)ल्या  हे ठामपणे कुणीच सांगू शकत नसतो !

              पूर्वी 'कवी' म्हणताच- दाढीचे खुरटे खुंट वाढलेले, प्रकृती खंगलेले, गालफाड बसलेले,  चिंताग्रस्त चेहरा, शून्यात नजर लावलेले अशा लक्षणांचे  माणसाचे चेहरे नजरेसमोर यायचे ! पूर्वीचे कवी स्वत:साठीच कविता करत , ते स्वत:च ऐकत बसत ! त्यामुळे जुन्या कविता छान दर्जेदार असत ! हल्ली काव्य-वाचनाची साथ विलक्षण झपाट्याने फैलावलेली असल्याने, कवी म्हणताच- चांssगली घोटून घोटून गुळगुळीत दाढी केलेला, ठणठणीत तब्येतीचा, मार्दवयुक्त आणि महिला वर्गाकडे जास्त 'विशेष' कटाक्ष टाकणारा- अशा लक्षणांनी पीडित चेहरा असलेली व्यक्ती नजरेसमोर येते ! हल्लीच्या कविता दुसऱ्यांसाठीच 'तयार' केलेल्या असतात, त्यामुळे त्या रद्दी(त घालण्यालायक) असतात !

 इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमात चहापान, पानसुपारी, तीर्थप्रसाद आदींचा अंतर्भाव असतो ! पण काव्यवाचन प्रसंगी असले जोड आणि गोड समारंभ  चुकूनही आढळत नाहीत. कारण कवी दरिद्री असतो, हे सर्वमान्य विधान आहे ! अर्थात, 'निवडक' श्रोत्यांना एखाद्या कवीकडून गुपचुप चहा पाजला जातो, ही गोष्ट विरळच !

               पुढाऱ्यांच्या सभेला ट्रकभरून माणसे आणली जातात, म्हणे. पण काव्य-वाचनाच्या  कार्यक्रमास ट्रकड्रायव्हर देखील हजर राहू इच्छित नाही, तिथं इतर सामान्य माणसाच काय सांगाव !

      अशाच एका 'अविस्मरणीय' काव्यवाचनप्रसंगी घडलेली ही एक ऐकीव दंतकथा आहे.  कार्यक्रम संपल्यावर, हॉलमधे 'कवी' आणि एक श्रोता- असे दोघेजणच शेवटी उरले ! आधीचे बिलंदर रसिक श्रोते कंटाळून, संधी साधून कधीच धूम ठोकून सहीसलामत गेले होते ! उरलेल्या एकुलत्या एका श्रोत्यासमोर तो खरा बहाद्दर कवी न कंटाळता, चिकाटीने आपल्या कविता पेश करत होता ! कविता ऐकवणे (एकदाचे) संपवल्यावर उत्साहाने तो कवी त्या श्रोत्याकडे गेला. त्याच्यासमोर कवीने आधीच्या सर्व पळपुट्या व नतद्रष्ट श्रोत्यांची अरसिकता तासभर सुनावली आणि अखेरीस अत्यादराने त्या एकमेव श्रोत्याला विचारले-

 " आता मला सांगा, कशा काय वाटल्या माझ्या कविता आपल्याला ? " त्यावर त्या एकमेव श्रोत्याने तत्परतेने आपली मुंडी हलवत आणि आपल्या खिशातून "कर्णयंत्र" आपल्या कानावर चढवत, खास चढ्या आणि खड्या आवाजात कवीला प्रतिप्रश्न केला- 
"आपण मला काही विचारलत काय ? "

                 अशा रीतीने काव्यवाचनावर अस्मादिकांनी एवढे तोंडसुख घेतले असले, तरी काही बाबतीत ह्या कर्यक्रमास महत्व देणे आवश्यक ठरते. परवाचीच गोष्ट घ्या. एका कविसंमेलनात एका नवकवीला प्रथम पारितोषिक मिळाले. अस्मादिकांना 'नवकाव्य' हे 'अपचनीय' असल्याने, आम्ही त्या  'प्रथमपारितोषिकप्राप्त' अशा नवकवितेचा अर्थ उत्सुकतेने त्या कवीला विचारला. त्यावर त्याने उत्साहाने हसत हसत खुलासा केला तो येणेप्रमाणे - " तुम्ही कौतुकाने विचारताय,   तुम्हाला म्हणून मी सांगतो -  मी आजवर काव्य-वाचनाचे एकूण दहा कार्यक्रम अटेंड केलेत . (हे राम !)  त्या दहाही कार्यक्रमातल्या प्रत्येक कवीच्या पहिल्या कवितेची पहिली ओळ,  ओळीने लिहून तयार झालेली ही आजची माझी दहा ओळींची नवकविता आहे ! तिचा अर्थ मला सांगणे जमणार नाहीच, आणि परीक्षकांच्या बापानांही तो सांगता येणे अशक्यच ! "

 पाहिलात ना- काव्यवाचन अटेंड करण्याचा फायदा कसा होतो ते !
           काव्यवाचन करणारे कवी आणि तो ऐकणारे श्रोते, हे दोन्ही घटक प्रथम एकमेकांना जमिनीवर पहातात आणि नंतर पाण्यात ! दोघेही एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.                       काव्यवाचन ही श्रोत्याला 'चकटफू' करमणूक असते, तर कवीला श्रोत्यांवर पूर्वजन्मीचा सूड घेण्याची अपूर्व संधी असते ! काही श्रोत्यांनी 'टाईमपास', काहीनी 'वैताग', काहीनी 'काव्यवाचक बसेपर्यन्तची शिक्षा'- असे असल्या काव्यवाचनप्रसंगाचे 'बारसे' केले आहे ! माझ्या दृष्टीने तरी 'काव्यवाचनप्रसंग' म्हणजे 'एक प्रश्नचिन्ह' आहे ! कारण शेवटी रहाणारा कवी अक्षरश: 'बिचारा' ठरत असतो. आधीचे सर्व कवी आपापल्या कविता वाचून मंचावरून धूम ठोकून अदृश्य झालेले असतात. उरलेल्या श्रोत्यामधले रसिक/अरसिक किती ह्याचा थांगपत्ता त्या शेवटच्या कवीला नसतो. कशासाठी आणि कुणासाठी हा काव्यवाचनाचा कार्यक्रम असतो, हे कुणालाही सांगता येत नसते !

          तरी पण, काव्यवाचनाचे सामर्थ्य जबरदस्त आहे. पंगु माणसालाही पळते करायची शक्ती त्यात आहे ! निद्रानाशाचा विकार जडलेल्यांना चिरनिद्रा घ्यायला लावण्याची त्यात ताकद आहे ! काव्यातील प्रत्येक अक्षराला मोकळ्या हवेत फिरू देण्यासाठी पूर्णहॉल रिकामा ठेवू शकण्याची हिंमत त्यात आहे ! अभिनय आणि ताल-स्वरातील काव्यवाचनाने कोठाही साफ रहात असल्याचे आमच्या एका कवीमित्राचे प्रांजळ आणि स्पष्ट मत आहे !

         (मी स्वत: लेखकच असल्याने-) आमचे बहुतेक नातेवाईक मासलेवाईक आणि तऱ्हेवाईक कवी असल्याने, काव्य-वाचनप्रसंगी श्रोता म्हणून मला मारूनमुटकून पहिल्या नंबरवर हजर रहावेच लागते ! त्यामुळे आणखी जादा श्रोत्यांची कुमक गोळा करण्याची नावडती जबाबदारी मला पार पाडावी लागते.  श्रोत्यांची 'पुढील सगळी व्यवस्था' करायला खूप खांदेकरी मलाच जमवावे लागतात ! अर्थात त्यामुळे नाही म्हटले तरी, काव्यवाचन हा एक उत्साहवर्धक कार्यक्रम समजावा लागतो ! त्या उत्साहाच्या भरात समस्त कवीराजाना उद्देशून, अस्मादिकांनी संधी साधून एकदा स्वरचित एक शेर ऐकवलाही होता -

" वो कौनसा जिंदादिल शमशान है जिसमें तुम नही ,
वो क्या काव्यवाचनसमारंभ है जिसमें हम नही ! "                                 
.                                                       

जागतिक चिमणी दिन


आज "जागतिक चिमणी दिन" होता -

'चिमणे चिमणे, दार उघड....'ची आठवण होत होती .

बायको म्हणाली -
"अहो, आज सगळी घरातली कामं आटोपली आहेत !
फिरून येऊ ना जरा ."

मी उत्तरलो -
" थांब थोडं, एवढं हातातलं लिखाण होऊ दे ! "

पंधरा मिनिटांनी परत ती म्हणाली -
" झाली की पंधरा मिनिटं. चला आटपा गडे लौकर ! "

मी म्हणालो -
" थांब दोन मिनिट, एवढ लिहिलेलं ब्लॉगवर टाकतो ! "

दहा मिनिटांनी पुन्हा स्मरणघोषणा झाली -
" अहो, दहा मिनिट होऊन गेली ना ---"

मी पुन्हा कुरकुरत उत्तरलो -
" फक्त एकच मिनिट हं आता -
 फेसबुकात हीच पोस्ट टाकतो आणि तयार होतो...!"

............ फेसबुकावर पोस्ट टाकल्यावर,
लगेच बाहेर फिरायला जायला कुणीतरी तयार असणार का कधी ?
लाईक-- कॉमेंट --- शेअर --- सगळं सगळं पहाण आलंच की हो ओघाने !

दार वाजलं .....
तासभर फिरून आली वाटतं बायको एकटीच बाहेर !
.

चार चारोळ्या -


१)   कवितेचा उगम -

              मनाचा घडा भरला अन्
              चांगले विचार वाहू लागले -
              लोक वाहत्या प्रवाहाला
              छान कविता म्हणू लागले !
.             


२)    सुखाचे वारे -

              भयकंपित मी कधी किती
              सुखाचे वारे वाहताना ,
              अडविण्यास टपलेले किती
              बहुत जन ते पाहताना !
.
 

३)     स्मित अन् हुंदका -

              एक कवडसा तुझ्या स्मिताचा 

              खेळीमेळीत माझे विश्व -
              नाद तुझ्या
अस्फुट हुंदक्याचा 
              डळमळीत सारे विश्व !
.
 

 ४)  आनंद -

              दुष्काळी वातावरण खिन्न
             अन् अचानक आलेला पाऊस -
             तुझ्या भेटीसाठी मी सुन्न
             अन् अचानक अशी आलेली तू !
.

काव.. काव..


दुपारची निवांत वेळ -
रोजच्यासारखे बायकोच्या हातचे मस्त जेवण झालेले ...
डुलकी लागणार होतीच ;

इतक्यात -----
खिडकीतून कावळा ओरडला ..
"काव.. काव.. काव.."

बायको स्वत:शीच पुटपुटलेली मी ऐकलं -
" मेला कोण पाहुणा आताच नेमका कडमडणार आहे,
ह्या निवांतवेळी कुणास ठाऊक !"

योगायोगाने -
दारावरची घंटी वाजली ..

मीच दार उघडले......... दारात "बायकोची आई" उभी !

बायकोला ऐकू जावे,
इतक्या मोठ्या आवाजात स्वागत करत,
मी म्हणालो -
" अरे वा, नेमक्या ...ह्यावेळी.. तुम्ही ....! "

बायकोचा चेहरा टिपायला,
माझ्या हातात क्यामेरा असता तर........ !

.

अरे देवा !


दगड होतो... तेच बरे
आज वाईट, काल चांगले  -
कुण्या लेकाला सणक आली,
मला त्याने देव बनवले !

एकटा आहे असेही नाही
एकाला सणक दुसऱ्याला संसर्ग -
दिसला दगड थापला शेंदूर
सगळे आम्ही देवत्वाच्या वाटेवर !

कुणाला प्रसन्न व्हावे
कुणाचे रोष ओढवावे -
आता प्रसंग बाका आहे
सारे समजण्यापलीकडे आहे !

आम्ही जागृत नसलो तरी
बरेच भक्त जागे आहेत -
आमच्या नावावर ते
पाण्यावर लोणी काढत आहेत !

साधेपणाने रहात होतो
सगळेकाही झेपत होते -
अलंकारांच्या ओझ्याने
सारे आता असह्य होते !

ह्याच्यावर कृपा केली
तर तो निष्कारण चिडतो -
त्याच्यावर कृपा केली
तर हा विनाकारण उखडतो !

कुशल आहेत वैद्य डाक्टर
वड्याचे तेल वांग्यावर ...
नवस जपाने आम्ही हैराण
पावलो ठीक- नाहीतर गतप्राण !

वाटते पुन्हा दगड व्हावे
मस्त कुठेतरी निवांत पडावे,
उगाच टाकीचे घाव सोसले
तिथेच आमचे दैव फसले !
.

झुकझुकगाडी -


मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया  -

दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,

दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी  -

हिरवी निशाणी दाखवली    
दादाने कुकशिटी वाजवली  -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक ! 

धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी  -

जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?

इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक ! 

सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -
 
छान छान आवाज गाडीचा
गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा ,
 
  आपल्या तीन चकरा झाल्या  
 सगळे तयारीत रहा.. उतराया ,

फुर्रर्रर्र शिट्टी मी वाजवली
झुकझुकगाडी ही थांबवली -   

भाक चूक  भाक चूक 
भाक चूक भाक चूक !  
.

" रविवार आज हा रविवार - "


रविवार आज हा रविवार
किती छान छान हा वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज हा वार !

मारामारी आणि ती कुस्ती
येतच नसते मुळीच सुस्ती
खेळ खेळण्याची होई कमाल
दिवसभर नुसती येई धमाल !

चोविस तास हो खाणेपिणे
नाचणे निवांत  अन् हुंदडणे
गट्टी फू त्या अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

रविवार आज हो रविवार
आमचा आवडता हा वार
घरात आणि मैदानावर 
दंगामस्ती खूप होणार !

.

"माझे विमान - "


ताई, कर ना लौकर घाई
विमान चालू करून देई -
चावी दे तू विमानाला
फिरवून आणिन मी तुजला !

खेळणी पसरली सगळीकडे
विमान सरकत नाही पुढे ,
भूभू, हत्ती, उंट नि घोडा -
विमान आले रस्ता सोडा !

विमान निघाले, हळूच ये ना
तायडे, खेळणी मोडतील ना...
विमान माझे छान किती
वाटत नाही आता भिती !

घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !
.

"डराव डराव - "


टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत

येता जाता डराव डराव 
का ओरडता बेडूकराव 

तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक  

अंगणातल्या डबक्यात 
किती करता बाहेर आत

पाण्यात जास्त भिजू नका
डराव  डराव  गर्जू नका

सर्दी पडसे  झाल्यावर
खोकत बसता काठावर

औषध कधी घेत नाही 
डराव डराव थांबत नाही  

झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर  सांगीन नांव आईला !  

.

दिवस चांगले आले का वाईट -


दिवस चांगले आले का वाईट -
ठरवणे कठीण झाले आहे
बायकोसमोर तोंड दाबून
बुक्क्यांचा मार बसत आहे

सासूबाई समोरच आहे
मी स्वैपाकाची तारीफ करत आहे
जेवण अंगी लागत आहे
सासूबाईचा मुक्काम वाढत आहे

अशा स्टेजला आलो आहे
बायकोला 'शिकून घे' म्हणता येत नाही
'असेच शिकवले का हो लेकीला'
सासुबाईला विचारण्याची सोय नाही

बायको मनातून धुमसत आहे
सासू जावयामुळे खुषीत आहे
बायकोची 'खाऊ का गिळू' नजर
माझी सासूबाईपुढे तृप्तीची ढेकर !

.

राजकारणी व्हायरस -




घुसला रे, घुसला रे 
राजकारणी व्हायरस घुसला रे ...

दिसला रे, दिसला रे 
पांढरा टोपीवाला दिसला रे ...

हसला रे, हसला रे
टोपीवाला माणूस हसला रे ...

डसला रे, डसला रे
आश्वासनातून डसला रे ...

फसला रे, फसला रे 
सामान्य मतदार फसला रे ...

बसला रे, बसला रे 
गेंड्याच्या कातडीत बसला रे ...

घुसला रे, घुसला रे 
सत्तेच्या पदात घुसला रे ...

कसला रे, कसला रे 
खुर्चीच्या नादात नासला रे ...!
.

घे धाव शंकरा महादेवा -



घे धाव शंकरा महादेवा

अवतार झणी घेई देवा ||


उघड तुझा तिसरा नेत्र 

घेऊन हाती त्रिशूळ अस्त्र 

सज्ज हो करण्यास भस्म 

तांडव करीत येई देवा ||


इथे माजले  दैत्यच सारे 

छळती शांत जनांस उगा रे 

नायनाट करण्यास ये रे 

भूवर नराधमांचे देवा ||


अबला पोरीबाळी यांचे 

भान सोडुनी निजनात्यांचे 

करती अत्याचार बळे 

डसुनी  फुत्कारावे देवा ||


अराजकाचा उरलेला तम 

प्रकाशकिरणांचा धूसर दम 

आशा नुरली तुझ्याविना 

हे भालचंद्रा रे सदाशिवा ||

. . .

अबला नव्हेच -

सुसंस्कार शिक्षिका.........शिवबाची जिजाऊ तू 
 रागिणी मर्दानी.............झाशीची राणी तू
संसार कर्तव्यदक्ष...........किरण बेदी तू 
जिद्दी ध्येयप्रेरित...........सुधा चंद्रन तू 
निरक्षर उपदेशपंडिता.....बहिणाबाई तू 
संकटहारिणी मानिनी....सिंधूताई तू 
स्त्री कल्याणी धडपडी....सावित्री ग तू 
मूर्तीमंत करुणानिधी.....मदर तेरेसा तू 
अंधांची काठी.................हेलन केलर तू

विविध रूपे वेळोवेळी......एकच स्त्री तू 
अबला नव्हेच................सबला ग तू 

तुझ्या सारखी...............अन्य ना कुणी 
तुझ्यासारखी................तूच आदर्श तू !
.

आपली पुरुष जात ....


" आज तू स्वैपाकघरात पाऊल टाकायचे नाहीस

हा बघ तुझ्यासाठी मी गरम गरम चहा आणला आहे

सकाळचा नाष्टाही मी रेडी ठेवतोय

दुपारी जेवण आज बाहेरच

नंतर मस्तपैकी चित्रपट पहायला जाऊ

बागेत जाऊन भेळ, खास सोलापुरी पाणीपुरी खाऊ

येतानाही छानशा हॉटेलात डिनर, माय स्वीट डार्लिंग ! " -

- - - कधी नव्हे ते, 

एवढे मोठ्ठे वाक्य, 
मी एका दमात,
 बायकोला म्हणालो  !


बायको मला गदगदा हलवत म्हणत होती -
"अहो, सूर्य कधीच उगवला ! उठा आता,
आणि हा घ्या गरम गरम चहा !
आज बेड-टी खास तुमच्यासाठी ! "

निदान आजच्या "महिला-दिना"निमित्त तरी,
बायकोला त्रास होऊ नये,
म्हणून किती छानसे मनोराज्य रचले होते मी !

------- पण आपली पुरुष जात -
शेवटी थापाडी ती थापाडीच !

. . .

सारेकाही स्वानंदासाठी -


सकाळी सकाळी
एक कविता तळली -

कुणी म्हणाली
खमंग आहे ,

कुणी म्हणाली
तवंग आहे ,

कुणी म्हणाला
झकास आहे ,

कुणी म्हणाला
भकास आहे ,

कुणाला कशीही
यापुढे वाटू दे -

मला तरी -
' आपण स्वत:
कविता तळणार '
याचाच आनंद आहे !
.

खरे दर्दी -




मैफील मैफील
म्हणजे काय असते -


बस्स.... 


तू माझ्यासमोर
अन् मी तुझ्यासमोर -


आळीपाळीने..
आपण दोघे
वाचक आणि श्रोते -


पुरे की दोघांची गर्दी 


एकमेकासमोर
आपण दोघे 


साऱ्या जगातले
दर्दी !
.

मनाचे वय -


जुना कधीचा
हातातला कागद
माझ्यासारखा जीर्ण
ओळखू न येणारा

धडधाकट मी
आणि तोही
- एकेकाळी दोघेही

वाचणे अवघड
हाताळणे अवघड
डोळ्यावर दुर्बिण

प्रयत्न करतोय
अस्पष्ट अंधूक
अनाकलनीय अक्षरे ...

तेव्हाचे मन
आताचे मन
दोघामधली आता
तुलना अपरिहार्य

उलगडत आहे
मनातली जाणिव

तेव्हांचे मन तरुण
प्रेमाराधानेची
खुमखुमी जोषात

आज वय वाढलेले -
मन मात्र.....

अगदी तस्सेच तरुण !
.

हळूच रे -



दार किलकिले झाले
मी हळूच तिथे पाहिले
 

दाराआड कुणी लपले
दार मी ते हलवले
 

कंकण किणकिणले 
मन  माझे रुणझुणले

हात पुढती मी केला
तो हातही पुढेच आला
 

हात हातात गुंतला
शहारा एक अस्फुटला
 

' हळूच रे ....'

दाराआड चेहरा
मी ना पाहिला
 

पण जाणवला
नक्कीच आहे 

तो लाजलेला !
.

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना - [गझल]

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना
एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना..

स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही
कुठल्याच मनपतंगा मी काटतो कटेना..

उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो
सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना ..

भिक्कार खूप म्हणुनी धिक्कारला कुणी जो
किति छान मीच म्हणुनी का दूर तो हटेना..

माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला
गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना..
.

संसार म्हणजे -


संसार म्हणजे आज
दोन जिवांची फरपट

तू पण अती हेकट
मी पण किती हेकट

रोज वाढतीच आहे
एकमेकाला कटकट

काढून टाकूया आज 
मनीचे सारे जळमट

आटप लवकर गडे
हो तयार तू झटपट

पाहुन येऊ छानसा
प्रौढासाठीचा चित्रपट

जोडीने खाऊया काही
मस्त चविष्ट चटपट

गोडीगुलाबी हवीच
मज्जा थोडीशी चावट

भांडणतंटा रोजचा
जगूया थोडेसे नटखट

क्षणभंगुर हा सारा
रहाणारा ग जीवनपट

करूया ग तडजोडीची
चल, थोडीशी खटपट !
.

आ ळ शी -


मला आळशी का समजतात सगळे,
तेच अजून कळत नाही !

जाग आल्याबरोब्बर,
सर्व विधी विधीवत आटोपल्याशिवाय,
इतर कामाकडे मी वळत नाही !

त्याआधी फक्त
ब्रश बायकोकडून
पेस्ट पोराकडून
पाणी पोरीकडून
मागून घेत असतो इतकच -
दात तर माझे मीच घासत असतो !

पेपर पोराला धरायला सांगून
पोरीकडून चष्मा चढवून
बायकोला फक्त वाचायला सांगत असतो -
माझ्या कानाने मीच तर ऐकत बसतो !

रात्री नऊ वाजता
पोराकडून टीव्ही बंद करतो
पोरीकडून लाईट बंद करतो
बायकोकडून चादर अंगावर घेतो
माझा मीच तर घोरत पडतो !

आता माझा मीच
जर सगळे हे करत असतो
तर मला आळशी म्हणायला
का प्रत्येकजण पुढे पुढे करतो !

हे सगळे
माझे मीच करता करता
सकाळी लवकर अकरा वाजता
माझा मीच जागा होतो !

तरीही -

मला प्रत्येकजण
आळशी म्हणायला टपलेला असतो ! 

.

"हिवरे बाजार" -


"हिवरे बाजार" -
ह्या आदर्श गावातील
 पाणी-नियोजन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी,
आपले मंत्रीमंडळ 

"परदेशा"त दौरे काढण्यास सज्ज झाले असल्यास, 
आश्चर्य वाटायला नको ....

नाहीतर,
याआधीच सर्व मंत्रीमंडळाने विरोधी पक्षासह -
त्या गावाचा "आदर्श" पूर्ण महाराष्ट्रात अवलंबण्यासाठी,

 चढाओढ नसती का केली ?

पण,
कुणाला खरच पडलं आहे का -
ते दुष्काळ निवारण्याच सोयरसुतक !

( सर्व मंत्रीमंडळासाठी -

आता,
"हिवरे बाजार" महाराष्ट्रात कुठे आहे,
हे शोधण्यासाठी -
नकाशा-खरेदी-घोटाळ्याची उत्तम संधी आहे ! )

.

" तुम्ही एवढे सुशिक्षित ....! "


          बसथांब्यावर बससाठी थांबलो होतो. संध्याकाळची वेळ ! गर्दी "मी" म्हणत होतो. कारण कुणाची सिनेमाची वेळ झालेली, तर कुणाची फिरायला निघायची ! बससाठी खास रांगेत असे कुणीच नव्हते. कारण बस वेळेवर सोडणे हे जसे 'महापालिका परिवहना'ला ठाऊक नाही, तसेच रांग नीट  धरणे,  हेही समस्त नागरिक प्रवाशांच्या रक्तातच नाही !  रांगेत उभे नसतानाही पटकन आपला पाहिला नंबर पटकावणे- ही आमची वैशिष्ट्यपूर्ण बाब !

           बससाठी बहुतेक 'मध्यमवर्गी सभ्य माणसे'च उभी होती !  एवढयात बस आली- कसाबसा माझा प्रवेश आत झाला. आणखी तीन-चार जणांना आत जागा मिळताच वाहकाने दोनदा घंटी वाजवली, तरी एक प्रवासी  बसमध्ये चढत होताच ! ते पाहून वाहकसाहेब आपल्या कमावलेल्या 'खास' आवाजात खेकसलेच, "अहो महाशय, तुम्ही एवढे सुशिक्षित ....! " पण वाहकाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो प्रवासी चट्कन खाली उतरला देखील ! 


            .......बस पुढे निघाली अन् तिच्याशी स्पर्धा करीत माझ्या मनातले विचारही धावू लागले !  जगात खराच सुशिक्षित कोण आहे ? तो कसा ओळखावा ? आपण किती शिकावे, म्हणजे दुसऱ्याने आपल्याला सुशिक्षित म्हणता येईल ? किंवा काय केल्यास 'सुशिक्षितपणा'स बाधा येईल ? सुशिक्षितांचे काही खास 'नियम व  कर्तव्य' याबद्दलची लक्षणे आहेत काय !

           उपरीर्निर्दिष्ट उतरलेला प्रवासी 'सुशिक्षित' हे संबोधन प्राप्त होताच खाली उतरला ! ते संबोधन त्याला भूषणावह वाटले असेल की, गालीप्रदान ? एखादा मनुष्य रस्त्यावर चालताना ठेचकाळतो. इतरांच्या मुद्रेवर लगेच भाव उमटतो - " एवढा हा सुशिक्षित दिसतोय, पण नीट पुढे बघून चालता येऊ नये ? "
    
          गर्दीत चालताना एका गृहस्थाचा (खरोखरच-) चुकूनजरी  दुसऱ्या महिलेला ओझरता धक्का लागतो, तरी  इतरेजन टवकारून पहातात-         " एवढा सुशिक्षित दिसतोय आणि असले धंदे ! " एक जोडपे आपल्या अपत्यास घेऊन फिरावयास निघते.त्या अपत्याच्या डोईवर एखादे गोंडेदार काश्मिरी टोपडे मजेत विराजमान झालेले असते . तेवढ्यात कोण्या त्रयस्थाच्या हालचालीने, ते टोपडे स्थानभ्रष्ट होऊन खाली पडते. ते पाहून एक 'सोवळा' आवाज पुटपुटतो - " एवढे मेले सुशिक्षित दिसतात, पण पोराकडे पहायलासुद्धा वेळ नसतो यांना ! "   ही आणि आणखी अशी कितीतरी उदाहरणे वानगीदाखल देता येतील !

          मनुष्याचे जीवन चाकोरीबद्ध आहे. मनुष्याने अमुक रीतीनेच वागले पाहिजे, राहिले पाहिजे, बोलले पाहिजे , चालले पाहिजे ! या चाकोरीबाहेर जाऊन त्याने दुसरे काही केले की लगेच त्याच्यातला तथाकथित 'सुशिक्षितपणा' डळमळीत होऊ लागल्याची कोल्हेकुई सुरू होते . त्याच्या काचेच्या प्रतिमेला तडा जाऊ पाहतो !

          गंमत म्हणजे हा 'सुशिक्षितपणा'चा मुखवटा एका विशिष्ट वर्गाभोवातीच आढळतो. श्रीमंत मनुष्य इतर लोकांच्या रागालोभाची पर्वा  करत नाही. दरिद्री माणसाला तर स्वत:च्याच जिवाची पर्वा नसते. हे दोन्ही वर्ग मन चाहेल तैसे स्वैर वर्तनाने  जीवन जगू शकतात ! उरला तो सुशिक्षितपणाचा मुखवटा सांभाळणारा "मध्यमवर्ग" !

          प्राणापेक्षा अब्रूला, जीवापेक्षा स्वाभिनाला जपणारा 'मध्यमवर्ग' ! या वर्गाचे जीवन नेहमीच संभ्रमात, दोलायमान स्थितीत ! सर्व गोष्टी धाडसाने कराव्या तर वाटतात, जीवनाचा आनंद स्वच्छंदीपणाने मनमुराद लुटावा तर वाटतो.... पण ! आजूबाजूचे टपलेले चेहरे, रोखलेल्या नजरा आपल्याला नांव ठेवतील का या विचारानेच अर्धमेला होऊन मनांत खंत करत रहातो - हाच तो मध्यमवर्ग ! कारण हाच तो "तुम्ही एवढे सुशिक्षित-" ला  भिणारा सुशिक्षित वर्ग आहे !

           या सुशिक्षित वर्गानेच नियमितपणाने आयकर भरला पाहिजे ! भले कुणी मंत्री लाखो रुपये चुकवो किंवा कोटीचा कर कुणी नट-नट्या न भरोत ! पाच आकडी पगार घेणारा वरिष्ठ कार्यालयात कधीही येवो, पण आपल्यावरचे हजेरीपत्रकावरचे लाल फुलीचे अरिष्ट टाळण्यासाठी मात्र वेळेवर या वर्गानेच यायला हवे ! महिन्याला ठराविक जादा काम करून त्याने प्रपंचाशी तोंडमिळवणी केलीच पाहिजे. इतर वर्गानी भले वंश-विस्तार कितीही केला, तरी 'हम दो हमारा एक'चा नारा यानेच केला पाहिजे ! यानेच आपले कुटुंब मर्यादित ठेवले पाहिजे. बस रिकामी असली तरी, वाहकाने दोनदा घंटी मारून 'खाली उतरा' म्हटले की त्याने पाय निमूटपणे मागे घेतला पाहिजेच !

           या मध्यमवर्ग-सुशिक्षितांचे जीवन चाळीशी निगडीत पाहिजे . कर्ज काढून एखाद्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद व्हायलाच पाहिजे . याच्या घरांत दूधवाल्याच्या आरोळीपाठोपाठ रोज सकाळी एखादे दैनिक घरांत फेकले गेले पाहिजे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे मुलाबाळांच्या कल्याणासाठी त्याने सावधगिरी म्हणून नजीकच्या 'स्टेट ब्यांके'त 'आज'च खाते खोलले पाहिजे !

          श्रीमंत वर्ग उच्च शिक्षित असो वा अडाणी ! त्याचे फारसे बिघडत नाही . दरिद्री वर्ग तर अडाणी-अशिक्षित असतोच.  तेव्हां वर लिहिलेली लक्षणे ज्याला लागू पडत नाहीत, तो सुशिक्षित नसलाच पाहिजे ना !

           जन्मापासून मरेपर्यंत मध्यमवर्गाने चाकोरी सोडू नये . वहिवाटीने पडलेला रस्ता या वर्गाने सोडला की, दाही दिशांनी आक्रोशाचा डोंब उसळतो- " तुम्ही एवढे सुशिक्षित ...! " ( म्हणजेच - तुम्हाला एवढीसुध्दा अक्कल असू नये ? )

          सुशिक्षित मध्यमवर्ग शिवीपासून अलिप्त राहिला पाहिजे. त्याच्या घरांत अभंग-ओवीचाच वावर असायला हवा.  गुंडगिरी त्याला सोसत नाही. संप बंद निदर्शने यांची झळ त्यालाच पोचते. म्हणून विध्वंसक कार्याची त्याला अलर्जी आहे !

           माझा उतरण्याचा थांबा समोरच्या काचेतून दिसू लागलाय ! मी बसमधून खाली उतरण्याची आधीच तयारी करत आहे, पुढे पुढे सरकत आहे. कारण बसथांब्यावर बस थांबण्याआधीच मी दाराशी हजर असायला हवे ! 


         नाही तर ..... मी एक मध्यमवर्गी साधासुधा माणूस असल्याचे, वाहक अचूक ओळखेल आणि जाहीर गर्जना करील-    " काय राव ! तुम्ही एवढे सुशिक्षित ..! "  
त्याचे शब्द कानावर आधी येण्यापेक्षा, मीच पटकन उतरण्याची पूर्वतयारी केलेली काय वाईट !
.                                

ओळख


बाळा, तू लहान असताना
छान खेळ खेळायचास ..


हळू पावलांनी माझ्यामागे
येऊन उभा रहायचास ..


आपल्या चिमुकल्या बोटांनी
माझे डोळे झाकायचास ..


घरात खुणावत इतरांना
मला जोरात विचारायचास ..


"ओळखा बाबा, मी कोण
ओळखाना बाबा, मी कोण?" .....


.....आपल्या दोघांमधला खेळ
आज मला आठवत आहे ..


तुला न ओळखण्याचे "नाटक"
डोळ्यांपुढून सरकत आहे ..


स्वप्नातही जे खरे ठरेल
असे कधी वाटले नव्हते ..


भावी जीवनात ते नाटक
खरोखरचे ठरले होते ..


मुला, तुला ओळखण्यात
फार झाला उशीर रे ..


पश्चात्तापाशिवाय हातात
काही नाही शिल्लक रे ..


"वृद्धाश्रमाच्या" खिडकीतून
बाहेर मी डोकावतो जेव्हा ..


घरी न्यायला येशिल परतून
उगाच मनात वाटते तेव्हा ..


पाठीमागून गुपचुप येशील
हळूच ओले डोळे झाकशील ..


जगात खुणावत सगळ्यांना
जोरजोरात मला विचारशील-


"ओळखा बाबा, मी कोण,
ओळखाना बाबा. मी कोण?" ...

..