तुम्ही आपले आयुष्य जन्मठेपेच्या शिक्षेमुळे एखाद्या निर्जन बेटावर घालवले, तरी मला काहीच वाटणार नाही ! तुम्ही आपले जीवन कजाग बायकोच्या कबजात सोपवले, तरी मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही ! निरनिराळ्या कचे-यातील कामचुकार कारकुनांच्या कारवायांमुळे हेलपाटून आत्मबलिदान तुम्ही केले, तरी मी तुमच्यासाठी दोन आसवेही गाळणार नाही ! पण.. पण..., तुम्ही आयुष्यात प्रथमच एखाद्या काव्य-वाचनाच्या कार्यक्रमास निघाला असाल, तर तुमच्या श्रद्धांजलीचा पहिला वक्ता मी असेन !
कदाचित तुम्हाला वाटत असेल की, मला दिवाळीचा फराळ 'चढला' असेल, म्हणून मी 'बरळत' सुटलोय ! पण वस्तुस्थिती तुमच्यासमोर निदर्शनास आणल्यावर तुम्हीदेखील माझ्यासह 'खांदेकरी' म्हणून यावयास दुप्पट उत्साहाने नक्कीच तयार व्हाल !
एक 'कविराज' आहेत . (खऱ्या कवीलाच फक्त कवी म्हणायचे असते.) बसल्या बैठकीला आपल्या कवितेच्या भट्टीतून पाच-पन्नास कविता पाडायचं कसब त्यांना चांगलंच अवगत आहे . त्यांच्या सुदैवाने- अन् आमच्या दुर्दैवाने, एक दिवस काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. वाचन सुरू होऊन बराच काळ लोटला, तरी 'कविराज' आटोपते घेईनात. त्यांनी आमच्या सहनशीलतेवर विनयभंग, अत्याचार, बलात्कार वगैरे सारे 'अमानुष' जुलूम केले . त्यांच्या त्या जबरदस्तीने एकाचा कान फुटला ! दुसऱ्या एकाला वेड लागून, तो सारखा 'वा वा छान' असेच म्हणत राहिला. तिसऱ्याने वासलेला जांभईचा 'आss' मिटण्यासाठी आम्ही अद्याप कुशल 'घसा-तज्ञा'च्या शोधात आहोत ! असले भयंकर छान प्रकार अगदी 'आणीबाणीत'ही करायला कुणी धजावत नव्हते, असे 'आमच्या पक्षा'चे कार्यकर्ते अजूनही सांगतात !
'काव्य-वाचन' हा प्रकार म्हणजे केवळ 'काव्य वाचणं' (-आणि श्रोत्याने मरणं) इतपतच थांबणारा नसतो. माझ्या पहिल्या कवितेचं नांव..दुसऱ्या..तिसऱ्या..चवथ्या..वगैरे.. कवितेचं नांव आहे.., हे सर्व अब्ज दशअब्जपर्यंत आकडे मोजून होईपर्यंत काव्यवाचन चालूच असते ! पण आपल्या सुदैवाने 'कवीराजा'ची उजळणी पक्की नसल्याने, तमाम श्रोते (अनुभवाने) मधेच काही आकड्यानंतर, जीव बचावून पळू शकतात ! "माझ्या शेवटच्या कवितेचं नांव आहे -" इथपर्यंत कवीराजाच्या तोंडून ऐकणारा श्रोता, अजूनपर्यंत तरी मला दिसलाच नाही बुवा ! अगदी मी मी म्हणणारा श्रोता पहिल्या कवितेला मान डोलावताना दिसतो, दुसऱ्या कवितेला चुटक्या वाजवताना आढळतो, तिसऱ्या कवितेला जांभई वाजवतो, चवथ्या कवितेला .. तो बहुतेक 'गतप्राण' झालेला असतो ! त्यामुळे कुठल्याही कवीने नक्की किती कविता वाच(व)ल्या हे ठामपणे कुणीच सांगू शकत नसतो !
पूर्वी 'कवी' म्हणताच- दाढीचे खुरटे खुंट वाढलेले, प्रकृती खंगलेले, गालफाड बसलेले, चिंताग्रस्त चेहरा, शून्यात नजर लावलेले अशा लक्षणांचे माणसाचे चेहरे नजरेसमोर यायचे ! पूर्वीचे कवी स्वत:साठीच कविता करत , ते स्वत:च ऐकत बसत ! त्यामुळे जुन्या कविता छान दर्जेदार असत ! हल्ली काव्य-वाचनाची साथ विलक्षण झपाट्याने फैलावलेली असल्याने, कवी म्हणताच- चांssगली घोटून घोटून गुळगुळीत दाढी केलेला, ठणठणीत तब्येतीचा, मार्दवयुक्त आणि महिला वर्गाकडे जास्त 'विशेष' कटाक्ष टाकणारा- अशा लक्षणांनी पीडित चेहरा असलेली व्यक्ती नजरेसमोर येते ! हल्लीच्या कविता दुसऱ्यांसाठीच 'तयार' केलेल्या असतात, त्यामुळे त्या रद्दी(त घालण्यालायक) असतात !
इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमात चहापान, पानसुपारी, तीर्थप्रसाद आदींचा अंतर्भाव असतो ! पण काव्यवाचन प्रसंगी असले जोड आणि गोड समारंभ चुकूनही आढळत नाहीत. कारण कवी दरिद्री असतो, हे सर्वमान्य विधान आहे ! अर्थात, 'निवडक' श्रोत्यांना एखाद्या कवीकडून गुपचुप चहा पाजला जातो, ही गोष्ट विरळच !
पुढाऱ्यांच्या सभेला ट्रकभरून माणसे आणली जातात, म्हणे. पण काव्य-वाचनाच्या कार्यक्रमास ट्रकड्रायव्हर देखील हजर राहू इच्छित नाही, तिथं इतर सामान्य माणसाच काय सांगाव !
अशाच एका 'अविस्मरणीय' काव्यवाचनप्रसंगी घडलेली ही एक ऐकीव दंतकथा आहे. कार्यक्रम संपल्यावर, हॉलमधे 'कवी' आणि एक श्रोता- असे दोघेजणच शेवटी उरले ! आधीचे बिलंदर रसिक श्रोते कंटाळून, संधी साधून कधीच धूम ठोकून सहीसलामत गेले होते ! उरलेल्या एकुलत्या एका श्रोत्यासमोर तो खरा बहाद्दर कवी न कंटाळता, चिकाटीने आपल्या कविता पेश करत होता ! कविता ऐकवणे (एकदाचे) संपवल्यावर उत्साहाने तो कवी त्या श्रोत्याकडे गेला. त्याच्यासमोर कवीने आधीच्या सर्व पळपुट्या व नतद्रष्ट श्रोत्यांची अरसिकता तासभर सुनावली आणि अखेरीस अत्यादराने त्या एकमेव श्रोत्याला विचारले-
" आता मला सांगा, कशा काय वाटल्या माझ्या कविता आपल्याला ? " त्यावर त्या एकमेव श्रोत्याने तत्परतेने आपली मुंडी हलवत आणि आपल्या खिशातून "कर्णयंत्र" आपल्या कानावर चढवत, खास चढ्या आणि खड्या आवाजात कवीला प्रतिप्रश्न केला-
"आपण मला काही विचारलत काय ? "
अशा रीतीने काव्यवाचनावर अस्मादिकांनी एवढे तोंडसुख घेतले असले, तरी काही बाबतीत ह्या कर्यक्रमास महत्व देणे आवश्यक ठरते. परवाचीच गोष्ट घ्या. एका कविसंमेलनात एका नवकवीला प्रथम पारितोषिक मिळाले. अस्मादिकांना 'नवकाव्य' हे 'अपचनीय' असल्याने, आम्ही त्या 'प्रथमपारितोषिकप्राप्त' अशा नवकवितेचा अर्थ उत्सुकतेने त्या कवीला विचारला. त्यावर त्याने उत्साहाने हसत हसत खुलासा केला तो येणेप्रमाणे - " तुम्ही कौतुकाने विचारताय, तुम्हाला म्हणून मी सांगतो - मी आजवर काव्य-वाचनाचे एकूण दहा कार्यक्रम अटेंड केलेत . (हे राम !) त्या दहाही कार्यक्रमातल्या प्रत्येक कवीच्या पहिल्या कवितेची पहिली ओळ, ओळीने लिहून तयार झालेली ही आजची माझी दहा ओळींची नवकविता आहे ! तिचा अर्थ मला सांगणे जमणार नाहीच, आणि परीक्षकांच्या बापानांही तो सांगता येणे अशक्यच ! "
पाहिलात ना- काव्यवाचन अटेंड करण्याचा फायदा कसा होतो ते !
काव्यवाचन करणारे कवी आणि तो ऐकणारे श्रोते, हे दोन्ही घटक प्रथम एकमेकांना जमिनीवर पहातात आणि नंतर पाण्यात ! दोघेही एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काव्यवाचन ही श्रोत्याला 'चकटफू' करमणूक असते, तर कवीला श्रोत्यांवर पूर्वजन्मीचा सूड घेण्याची अपूर्व संधी असते ! काही श्रोत्यांनी 'टाईमपास', काहीनी 'वैताग', काहीनी 'काव्यवाचक बसेपर्यन्तची शिक्षा'- असे असल्या काव्यवाचनप्रसंगाचे 'बारसे' केले आहे ! माझ्या दृष्टीने तरी 'काव्यवाचनप्रसंग' म्हणजे 'एक प्रश्नचिन्ह' आहे ! कारण शेवटी रहाणारा कवी अक्षरश: 'बिचारा' ठरत असतो. आधीचे सर्व कवी आपापल्या कविता वाचून मंचावरून धूम ठोकून अदृश्य झालेले असतात. उरलेल्या श्रोत्यामधले रसिक/अरसिक किती ह्याचा थांगपत्ता त्या शेवटच्या कवीला नसतो. कशासाठी आणि कुणासाठी हा काव्यवाचनाचा कार्यक्रम असतो, हे कुणालाही सांगता येत नसते !
तरी पण, काव्यवाचनाचे सामर्थ्य जबरदस्त आहे. पंगु माणसालाही पळते करायची शक्ती त्यात आहे ! निद्रानाशाचा विकार जडलेल्यांना चिरनिद्रा घ्यायला लावण्याची त्यात ताकद आहे ! काव्यातील प्रत्येक अक्षराला मोकळ्या हवेत फिरू देण्यासाठी पूर्णहॉल रिकामा ठेवू शकण्याची हिंमत त्यात आहे ! अभिनय आणि ताल-स्वरातील काव्यवाचनाने कोठाही साफ रहात असल्याचे आमच्या एका कवीमित्राचे प्रांजळ आणि स्पष्ट मत आहे !
(मी स्वत: लेखकच असल्याने-) आमचे बहुतेक नातेवाईक मासलेवाईक आणि तऱ्हेवाईक कवी असल्याने, काव्य-वाचनप्रसंगी श्रोता म्हणून मला मारूनमुटकून पहिल्या नंबरवर हजर रहावेच लागते ! त्यामुळे आणखी जादा श्रोत्यांची कुमक गोळा करण्याची नावडती जबाबदारी मला पार पाडावी लागते. श्रोत्यांची 'पुढील सगळी व्यवस्था' करायला खूप खांदेकरी मलाच जमवावे लागतात ! अर्थात त्यामुळे नाही म्हटले तरी, काव्यवाचन हा एक उत्साहवर्धक कार्यक्रम समजावा लागतो ! त्या उत्साहाच्या भरात समस्त कवीराजाना उद्देशून, अस्मादिकांनी संधी साधून एकदा स्वरचित एक शेर ऐकवलाही होता -
" वो कौनसा जिंदादिल शमशान है जिसमें तुम नही ,
वो क्या काव्यवाचनसमारंभ है जिसमें हम नही ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा