' बुढ्ढीका बाल -' (बालगीत )लाल लाल लाल लाल 
घेऊन आलो बुढ्ढीका बाल ..

या बाळानो आजोबा या 
आईला आजीला घेऊन या ..

कापसापेक्षा मऊ मऊ 
किती लुसलुशीत हा खाऊ ..

सशासारखा दिसे लोभस 
खाल तर तोंडात पाणी फस्स .. 

ओठ लाल गाल लाल 
तोंडामधली जीभ लाल ..

जिभेवर आहे क्षणात गडप 
पुन्हा घालाल खाऊवर झडप .. 

ताई माई लौकर या 
संपत आला खाऊ घ्या ..

लाल लाल लाल लाल 
बुढ्ढीका बाल खा करा धमाल . .

.

दिवस माझे हे फुगायचे - (विडंबन)(चाल- दिवस तुझे हे फुलायचे )

दिवस माझे हे फुगायचे 
तिकिटावाचून रुसायचे ...

तुरुंगात आनंदी राहणे 
तिथेच भेटती पाहुणे 
पाहुण्यात रंगत रहायचे ..

पाजावी देशीची बाटली 
करावी गळ्याशी ओली 
नेत्याचे स्वप्न ते पहायचे ..

थरार मिळाले जर 
आनंदे तिकिटाचा भार 
इतरांनी द्वेषच करायचे .. 

माझ्या या तुरुंगापाशी 
थांबली गाडी दाराशी 
पक्षात स्वागत व्हावयाचे ..
.

सावधान . .समोर नसता कुणी तिथे 
बडबड करतो आम्ही इथे 

ताशेरे ओढत असतो तेव्हां 
हातून घडते काही न जेव्हां 

बाह्या एकांती फुरफुरती
सभेत घामाने डबडबती 

उपदेश लढा तुम्ही त्वेषाने 
करती गर्जना घरी ईर्षेने 

निजकर्तव्यात सदा कुचराई 
इतरावर तोंडसुखाची घाई 

टीका करणे सदा आघाडी 
कार्यासमयी वळते बोबडी 

अशी माणसे बहुतच दिसती 
दिसता माणूस अजून डसती . .

.

सात चारोळ्या -

सावधान -
जर दोषच शोधत बसाल 
मित्रांच्या स्वभावातला..
तर लागणार नाही वेळ
शत्रूंची पैदास व्हायला !
.

दोन ध्रुव -
जंगलात वाढलेला वटवृक्ष मी 
दिवाणखान्यातली बोन्साय तू - 
कशी जमावी आपली कुंडली 
मी वळू माजरा गरीब गाय तू ..
.

जीवन नौका -
जीवननौका भरलेली
माझी अवघी दुःखाने-
तारते इवलीशी काडी 
सुखाची पण आनंदाने..
.

काडीमोड अन् घरोबा -
जमले नाही कधी सुखाशी 
"काडीमोड" घेतला तयाने -
संधी साधून त्याचक्षणी 
"घरोबा" जमवला दु:खाने ..
.

'जनरीत -'
जनरीत आहे ती इथे खरी
कौतुक हळूच असते समोरी - 
वळता पाठ तयाची खचित
निँदेची वाजत असते तुतारी ..
.

आयत्या पिठावर रेघोट्या -
जो तो येतो, जोषात म्हणतो 
"राजे, तुम्ही असायला हवे होते "-
एकजुटीची जबाबदारी मात्र 
सोयीस्कर सगळ्यांना विसरायला होते ..
.

सूड -
जमेल तेव्हा दिली आश्वासने 
भेटण्याची मी तिला दिवसभर -
स्वप्नात येऊन मला छळणे 
चालू राहणार तिचे आता रात्रभर ..
.

चार चारोळ्या..

शेतात अचानक वरून
असा पुरेसा पाऊस यावा- 
त्यातच सगळा वाहून
बळीराजाचा अश्रू जावा..
.

इकडे तयार नव्हते दु:ख 
मज का सोडायला,
तिकडे होते आतुर सुख 
मजला भेटायला..
.

पिंज-यात तुझ्या प्रेमाच्या  
अडकते मनपाखरू-
किती कितीदा सांग सख्या, 
कसे त्यास आवरू..
.


होतो साठवत मिरवणुकीत
 रूप मी डोळ्यात देवाचे-
नाही कळले कधी फाडले
 पडदे डॉल्बीने कानाचे..
.

फूल और कांटे


लग्नाआधी त्याला -
रोजच्याच रस्त्यावर दिसणारा,
तो रोजचाच गुलाब..!

लग्नानंतरच्या वर्षात -
हमखास ऐकू येणारा तिचा उद्गार ..
"अय्या, कित्ती सुंदर आहे नै का हो तो गुलाब ? "
तिने तसे म्हटले की ,
तो पट्कन उद्गारत असे  -
" हो ना ! थांब हं , आणतोच तुझ्यासाठी तो लगेच ! " 

वर्षानंतर कधीतरी -
तोच रस्ता 
तोच तो 
तीच ती 
मूड आणि हिशेब मात्र वेगळे ... 

ती हटकून म्हणतेच-
" अय्या, किती सुंदर फूल आहे नै का ते गुलाबाचं ? "

तो पुढे चालत म्हणतो -
" त्याला काटे फार आहेत ग ! "
.

बाप्पा मोरया रे


स्वत: गणपतीने आपल्या आईवडिलाभोवती प्रदक्षिणा घालून ती विश्वप्रदक्षिणा जाहीर केली, 
हे सर्व जर "सुशिक्षित" (?) भाविक खरे मानतात,
तर.....
आपल्या घरातला गणपती जागृत असणारच-
आणि तोच आपल्या विश्वासाला नवसाला पावणार,
अशी दृढ श्रद्धा बाळगण्यात का कमीपणा वाटून घेत असतील बरे ?

त्यासाठी...
 पैसे खर्च करून रांगेत उभे करून,
तासनतास वेळ घालवून,
तथाकथित जागृत/नवसाला पावणाऱ्या राजा/महाराजा गणपतीसमोरच्या 
निर्बुद्ध/बिनडोक अशा कार्यकर्त्याकडून ... 
ऐन दर्शनाच्यावेळी ढकलले जाऊन/असभ्य/ अमानुष/ गैरवर्तणूक सहन करून...
शिकले सवरलेले/शहाणपणाने वागणारे/समंजस सुशिक्षित 
आपली बुद्धी का आणि कुठे बरे गहाण ठेवतात ?

"झी २४ तास"वरचे गणेश दर्शन घेणाऱ्या भक्तांचे चित्रित  दृष्य पाहून असे वाटले की, 
"जागृत" भाविक जनतेने "त्या" ढकलाढकली करणाऱ्या कार्यकर्त्यालाच बाप्पासमोर लाथाबुक्क्यांनी चांगले तुडवायला हवे होते ! 

महिला , पुरुष , मुले..
कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तो कार्यकर्ता महिलांच्या अंगाला धरून ढकलत होता ! 

सगळे भाविक भक्त  इतके सहनशील आणि आंधळे !
एकालाही त्यालाच धरून ठोकावे वाटले नाही ? 

स्वत:च्या अंगाला धरून ढकलणाऱ्या त्या पोलीस महिलेनेही....
हे का सहन केले सगळे ?

सर्वात वाईट वाटले...
ही सर्व गैरवर्तणूक दाखवणाऱ्या आणि टीआरपी वाढवून घेणाऱ्या
मिडीयावाले असली अमानुष वागणूक बघून का विरुद्ध उभे राहिले नाहीत ?

जनजागृतीही  करत असतात ना  हे मिडीयावाले ?
.

"किती अडवू मी अडवू कुणाला ..." (विडंबन)
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -) "किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला 

द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला ..... पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले 

नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले 

पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला ..... पोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती

कुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती

दहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला .......वेग हा मंदावताच, धावणारा थांबला, खड्ड्यात कोणी पडे 

लपून छपून अधिकारी, धरतो सावज तरी, धंद्यात नसती खाडे

लाजा सोडती कशा, खंत नाही वेषा, देश सगळाच खड्ड्यात गेला...... 

.

बैलपोळा


" तुझे डोके ठिकाणावर आहे का ...? "

- बायकोला असे ठणकावून विचारावेसे वाटत होते .

भलत्या वेळी, भलते काहीही -
 कसे सुचते हो तिला !

त्याचे असे झाले ...

काल रात्रीचे जेवण आटोपले .
घाईघाईने तिने पाट मांडला . 
समोर छानशी रांगोळी काढली .
औक्षवणाचे तबक सजवले ..

मला म्हणाली -
" ही टोपी घाला ,
मी ओवाळते तुम्हाला . "

अनुभवांती पाठीशी लाटण्याची भीती होती...
त्यामुळे  मला काहीच संदर्भ न कळल्यानेही ,
 मी मुकाट्याने टोपी घालून बसलो .

मनांत आठवत होतो .
आज काही तिचा वाढदिवस नाही .
आज माझाही वाढदिवस नाही .
आपल्या लग्नाचाही वाढदिवस नाही.
आज दिवाळीतला पाडवाही नाही .
मग कशाबद्दल बरे ही ओवाळणी ?

बायकोने कुंकवाचा हा भलामोठा उभा फराटा माझ्या कपाळावर ओढला .
ओवाळत म्हणते कशी -

" दिवसभरात लक्षात नाही राहिले हो !
खूप खूप शुभेच्छा ....
आज तुमचा सण होता ना - 
'बैलपोळा' ! "

निमूटपणे नेहमीप्रमाणे,
 नंदीबैलासारखी मान हलवण्याशिवाय-
 मी तरी दुसरे काय करू शकणार होतो !
.

उसवला शर्ट नवीन पुन्हा – (विडंबन)( चाल उगवला चंद्र पुनवेचा )


उसवला शर्ट नवीन पुन्हा,  
मज  देई शिवुनिया-“
उखडला पति तिचा ||
  
"काही सुया अशा घुसल्या,
सटकुनी अडकुनी तुटल्या,   
मम बघा रुधिर क्षती बोचल्या-"

करुणरस तो गळु पडे,
खवळता, पत्निचा ||


.

बालबुद्धी


लहानपणी गोष्टी वाचत असताना, 
कुठेतरी हमखास वाचण्यात यायचे ...

"' आणि मग आकाशातून,
 सर्व देवदेवतांनी उभे राहून,
 त्या मंगल प्रसंगी,
 आनंदाने पुष्पवृष्टी केली .'"

आणि मग माझ्या बालमनात
कुतूहलमिश्रीत  प्रश्न उभा राहायचा -

जर पावसाचा एक थेंब 
आकाशात एक सेकंद
 स्थिर राहू शकत नाही, 
तर हे एकाच वेळेस सर्व  देवदेवता
 आकाशात कसे काय स्थिर उभे राहू शकतात ,
एकामागे एक धपाधप
 पृथ्वीवर कसे काय आदळत  नाहीत बुवा ? 

विचारायला गेलो  की,
 आई आधी पाठीत धपाटा घालायची आणि,
 नेमके काहीतरी काम सांगून,
मला  घराबाहेर पिटाळायची !
.

हाडाचा कवी


त्या मार्केटिंगवाल्याने 
सतत तीन दिवस फोन करून
 सतावले होते .. !

परवा परत ऑफिसातून त्याचा फोन आला -
 त्याच्या स्कीमला
 हो/नाही म्हणण्याआधी, 
मीच  म्हणालो-

" आधी मी 
फक्त माझ्या तीन दीर्घकविता 
तुम्हाला ऐकवतो , 
आणि मग ....." 

माझे पूर्ण वाक्य ऐकून घेण्याआधीच -
 बहुतेक त्याने त्याचा फोन दाणकन आदळला असावा -
 आणि आत्तापर्यंत तरी,
 त्याचा फोन आलेला नाही !

हुश्श !

पटलं ना कवी का व्हावे ते ?
.

बंदिस्त


" विचारांच्या बंदिस्त पाखरांना 
बाहेरचा मोकळा श्वास घेण्यास 
आकाशही लहान भासत जाते -
तेव्हां मनाची घुसमट तगमग 
कुणाला जाणवत नाही ..

बंदिस्त अवस्थेलाच 
आपले विश्व समजून 
ती आनंदाने नाचत बागडत राहतात..
पण गुदमरलेल्या अवस्थेतच ! "

.......कवी खरडत राहतो ,
सुचलेली कल्पना -

नजर टाकायची ,
आणि पुढचे दुसरे काहीतरी 
वाचत  राहायचे...
कळून घ्यायच्या भानगडीत 
मुळीच न पडता...

नाहीतर -
आणखी एक जीव..
उगाच गुदमरलेल्या अवस्थेतच !
.