सहज थांबलो कळीस बघून -- [गझल]


सहज थांबलो कळीस बघून 
का आली मी दिसता खुलून ..

दारात उभा असा अचानक 
धांदल तिचीच पडदा धरून ..

कळला रे तव होकार सख्या 
दारी तुझिया स्वागत झटून..

प्रवास अपुला एका मार्गे 
इकडुन माझा तुझा तिकडून ..

केली पूजा दगडाची मी 
बघत राहिला देवहि दुरून .. 
.

दमला दु:खे तो विकताना -- [गझल]


दमला दु:खे तो विकताना थंडीउन्हात सारी 
भलाबुरा ना कुणी फिरकला घेण्या ती बाजारी.. 
.
करण्या विक्री बसलो घेउन सुखास सगळ्या मीही 
टपले होते उचलण्यास ते उंदरास जणु घारी.. 
.
झोप न त्याला गादीखाली बेनामी ती माया  
घाम गाळुनी पसरे हा तर पथारीवरी दारी..
.
माझ्याइतका मीच शहाणा अन्य न दुसरा कोणी 
पाठ थोपटत करतो पारख स्वत:च अपुली न्यारी..
.
चार इयत्ता शिकला तो पण विनाकाळजी होता  
चालायाची पिढीजात ती निवडणुकीची वारी ..
.

पाठलाग का तुझाच करते -- [गझल]


पाठलाग का तुझाच करते 
हृदयही कसे मला न कळते..

मोह सुगंधी तव गजऱ्याचा
श्वासालाही मन गुंगवते..

डोळे माझे टकमक बघती
पाठीवर ती नागिण डुलते..

वळणावरती थांबतेस तू
मन माझे का तिथे धावते..

आठवणी मी तुझ्या काढतो     
उदासवाणे मन हुरहुरते..
.

खूप मीही नवस केले-- [गझल]

खूप मीही नवस केले देव ना मज पावतो 
आस वेडी भाव वेडा मग भयाने पूजतो..
.
चोर तो का साव आहे ओळखू त्याला कसा 
आरसा बघताच मी मज चेहरा जो दावतो..
.
सारवासारव तुझी त्या चालते पदरासवे 
हेतु डोळयांना समजता उघडझापी टाळतो.. 
.
फूल हाती मज दिलेे हे आज प्रेमाने तिने 
निर्दयी काटा हळू का मज हसूनी टोचतो.. 
.
पीठ जातींचे दळूनी काढले जात्यातुनी 
पण पिठाला जात कुठली प्रश्न आता त्रासतो ..
.
माज मस्ती आणि गुर्मी यात मुरलेला गडी 
राख पण ठरल्या ठिकाणी व्हायची का विसरतो..
.

ऊन आले ओसरीवर-- गझल


ऊन आले ओसरीवर 
सावली ना झोपडीवर..
.
हाल सांगू मी कुणाला 
स्वप्न ना पडते भुईवर..
.
शेंदणे मज जीवनी या 
नजर त्यांची बिसलरीवर..
.
घोरती ते, घोर मजला 
या कुशीवर त्या कुशीवर..
.
दाम मिळतो घाम गळता- 
ऐतखाऊ ते भिशीवर..
.
रंक राबे भूक विसरत 
ताव रावाचा मिशीवर.. 
.

घरात बसुनी खुशाल -- [गझल]

घरात बसुनी खुशाल नेता घोरत आहे 
अनुयायी का घरदाराला सोडत आहे .. 

करतो सभेत बडबड बाष्कळ कृतीविनाही 
उपदेशाचा डोस न चुकता पाजत आहे.. 

चुका दाखवी बोटाने जो तो दुसऱ्यांच्या 
उरली बोटे स्वत:कडे का विसरत आहे .. 

जगात एकी करण्यासाठी करी गर्जना 
भांडणतंटा भावकीत ना संपत आहे .. 

शंख ठोकतो जाळ पाहुनी "अरे बापरे" 
कुणी न बघतो बुडाखालचा पसरत आहे .. 
.