जादूची छडी..(बालकविता)

आई ग आई, मला झोप आली
परीला भेटायची आता वेळ झाली

थापट हळूहळू माझ्या ग डोक्यावर
स्वप्नाची चादर मी घेईन अंगावर

परीशी स्वप्नात होईल माझी भेट 
मागेन मी तिला जादूची छडी थेट

सर्वांसाठी किती ग घरात राबतेस
थकवा मनातल्या मनात लपवतेस

जादूची छडी सर्वच करील काम
आई, तू घे विश्रांती कर आराम

दाखवीन जादूच्या छडीची कमाल
संपवीन आई, तुझे नक्की मी हाल

आई ग आई, मला झोप आली
बघ ना परी मला भेटायला आली !
.

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे.. (गझल)

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे
सख्खा भाऊ पक्का वैरी बनवत आहे

बघून वावर माझ्या घरात दु:खाचाही 
घरात आता शिरण्याला सुख कचरत आहे

दिली सोडुनी चिंता करणे मरणाची मी 
यमराजाला आता बसली दहशत आहे

आहे शोधत आता उन्हात का तो छाया 
झाडे तोडुन हाती ज्याच्या करवत आहे

मैत्री जडली दु:खांशीही इतकी माझी
संधी सुखात लोळायाची दवडत आहे
.

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर.. (गझल)

अनलज्वाला मात्रावृत्त -
८+८+८=२४
................................................

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर
गेल्यावर का वेळ वाटते आहे कातर..

विरहानंतर तिला पाहुनी धावत सुटलो
मिठीत होती छान तरी पण नवथर थरथर..

मीही माझी जपली होती नातीगोती
खिसे रिकामे दिसले माझे पडले अंतर..

संवादाची तार आपली जुळली होती 
का मौनाचा आणलास तू मधेच अडसर ..

अनुभव सगळे पाठीशी मी घेतच थकलो
उरले नाही त्राण जीवनी खाण्या ठोकर..
.

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही .. गझल

वृत्त- आनंदकंद
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा
काफिया- खंत अंत वसंत...
रदीफ- नाही
अलामत- अं
....................................................

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही 
जे जे जिवंत त्यांच्या हालास अंत नाही..

दुष्काळ खूप पडला ना ज्ञात पाखरांना- 
शोधात ती फळांच्या कोठे वसंत नाही..

कर्जास हात पुढती कित्येक रोज येती
फेडीस मात्र सौदा त्यांना पसंत नाही..

खड्ड्यात रोज कोणी पडतो नि जीव देतो
मुर्दाड शासनाचे का मन जिवंत नाही..

कुरवाळती स्वत:च्या सगळे सुखास आता
दु:खात कोण रडतो बघण्या उसंत नाही..

इतरांस खास तत्पर उपदेश डोस देण्या
सन्मार्ग चालणारा कोणीच संत नाही..

आहोत आज आम्ही जनता सुखात आहे
हे ऐकणे कुणाला आता पसंत नाही..
.