मनास वाटे -

मनास वाटे
उगाच वाटे
उदास वाटे
भकास वाटे

मनात वारे
उगाच सारे
भलते सारे
गोळा सारे

मनात काय
उगाच काय
भलते काय
वाटते काय

मनास नाही
उमगत काही
भलते प्रवाही
वहातच राही !
.

फिकीर


शासनास ना फिकीर कुणाची
घाई तिजोरीत कर भरण्याची -
जगो वा मरो दुर्बल जनता
खुर्ची पक्की, पक्की सत्ता !

आरोग्यास जे हानिकारक
सत्तेला होई हितकारक -
उत्पादन व्यसनांचे ना उखडू
हितसंबंधच पैशाने जखडू !

व्यसनी होऊन मजेत चाखू
सिगार गुटखा अन् तंबाखू -
स्वत:ही होऊन कर्कग्रस्त
कुटुंबासही करू उध्वस्त !
.

" सीमोल्लंघन...""तो" 
भयंकर अस्वस्थ !
क्षुल्लक कारण,
त्यावरून भांडण,
भांडणातून अबोला,
अबोल्यातून आणखी गैरसमज !
 
पण कालांतराने...
आपलीच स्वत:ची झालेली चूक 
उमगलेली
चुकीचे परिमार्जन करावे कधीतरी-
पश्चात्तापदग्ध अस्वस्थता 
शिगेला पोचलेली.....

' काय करावे, कोठे जावे, 
नुमजे मजला की विष खावे.. '
इतकी कविमनासारखी तगमग,
चिंता. चिंता.. चिंता...
आतल्या आत 
पोखरत चाललेली,
पाण्याला चव राहिली नाही
साखरेला गोडी उरली नाही
अन्नात जीभ सरली नाही !

धाडस.. धाडस.....

केव्हातरी 'शेजारी' चित्रपट पाहिलेला होता,
नेमका आताच आठवला ..
शेवटी -
अंतर्मनाला साद घातली
मनाचा हिय्या करून ..
दसऱ्याचा मुहूर्त साधायचा प्रयत्न,
खरेखुरे----
 "सीमोल्लंघन" !

दसरा उजाडला,

शेजाऱ्याच्या दारात
 "तो" उभा ..!
दारावर टकटक..
शेजारी दारात
कोण ही कटकट...

"त्या"ने गळामिठीसाठी आपले हात पसरले-

शेजारी अवाक..
क्षणभरासाठी गडबडला,
पण त्याचेही हात..........
आपसूकच समोर झाले !

दोन शेजाऱ्यांचे मनोमीलन

जणू काही 
कलियुगातली 'भरतभेट' !
अद्वितीय सोहळा !
खरेखुरे सीमोल्लंघन !!

दोन्ही शेजारणींच्या डोळ्यातून

गंगायमुना अविरत वहात होत्या....
.

सुख - दु:ख म्हणजे ......

"सुख" म्हणजे काय -

सुट्टीच्या दिवशी 
धुण्याभांड्यांचा हा ढीग 
थंडीने हात नि बोटे आखडलेली 
कामाला जुंपून घ्यायला 
जीव कासातीस झालेला 
आणि अशावेळीच-
बायकोने नवऱ्याच्या पाठीशी आवाज देणे-
"अहो, किती त्रास करून घ्याल ..
पुरे आता.. 
सरका बर बाजूला ..
मी उरकते ही सगळी धुणीभांडी !"
-.............................................................

बायकोच्या माहेराहून चाराठ दिवस 
सुंदरशी मेव्हणी रहायला आलेली 
पण बायकोसमोर 
तिच्याशी नीट "दिलखुलासपणे" 
वागता बोलता येत नाही 
आणि अशावेळीच-
बायकोने नवऱ्याला म्हणावे-
"अहो, मला अंमळ बर वाटत नाही 
ताई चार दिवसासाठी 
आपल्याकडे आलीय 
माझ्याच्याने हिंडणेफिरणे 
काही होत नाही तर 
तुम्हीच जरा तिला 
एखादा सिनेमा दाखवून 
बागेत फिरवून आणा ना 
तसेच तिला काय ते खायप्यायला 
तिच्या आवडीचे घेऊन द्या !"

.-----------------------------------------.
=======================================

"दु:ख" म्हणजे काय ?

बायको चार दिवसासाठी 
माहेरी गेल्यावर 
चार मैत्रिणीबरोबर 
धमाल गप्पा चालू असतांनाच....
माहेराहून 
बायको अचानक परत येणे !
.....................................................
चार मित्रांबरोबर 
अस्ताव्यस्त पत्ते कुटत 
तीर्थ प्राशन करतांना
धूम्रवलयातच...... 
दत्त म्हणून 
दार वाजवत 
सासरेबुवांचे अवतीर्ण होणे !
.............................................................

सुट्टीच्या दिवशी 
चार वाजता 
बायकोच्या हातच्या 
चहाची तलफ आल्यावरच.....
"अहो, मांजर दूध पिऊन गेलं वाटत ! " 
- असले अभद्र उद्गार कानावर येणे 
आणि....... 
पुढची कामगिरी पार पाडण्यासाठी 
झक मारत 
पिशवी हातात घेऊन बाहेर निघणे.....!!
.........................................................................
====================================

मनुष्य-स्वभावच तो !


मनुष्य स्वभावच शेवटी ..!

चांगल्या गोष्टी जवळ बाळगणे,
दुर्मिळ वस्तु जपणे,
अप्राप्य साधनांचा ध्यास धरणे,
अशक्य ध्येयाने वेडे होणे,
हे त्या स्वभावास दुर्मिळ ..!

चांगल्या कामाचा कंटाळा,
टाळाटाळ करण्यात उत्साह,
वाईट गोष्टी करण्यात पुढाकार,
संयम दाखवण्यात घाई,
हे मात्र त्या स्वभावास सहजसाध्य ...!

सुखी माणसाचा सदरा दिसला तरी,
'तो आपल्याजवळ नाही- 
तर त्याच्याजवळ तरी का असावा -? '
ह्या असल्या कुविचार वृत्तीतून, 
शक्य तेवढ्या लौकर,
तो कुरतडता कसा येईल...
यासाठी, 
एरव्ही मठ्ठ थांबलेले मनुष्य-स्वभावाचे विचारचक्र
जोरात फिरू शकते .
.

का .. का.. का ..?


आपल्याच घरात,
 आपण किती वर्षे वास्तव्य केलेले असते ?

तरीही....
उंबऱ्याला पंजा ठेचकाळणे
दाराच्या चौकटीवर डोके आदळणे
जाता-येता हाताचा कोपर खाटकन त्या चौकटीला आपटणे
बाथरूममधे पाय घसरणे
पंख्याऐवजी लाईटचे / लाईटऐवजी कॉलबेलचे...बटन दाबणे
रोजच्या खुर्चीवर बसतो, ती अनवधानाने कलन्डणे
 
.....असे हमखास का होते ?

आपण निष्काळजी असतो का ?
आपली बेपर्वाई नडते का ?
ज्यादा आत्मविश्वास अडतो का ?
आपले अवधान सुटते का ?

मी असा आहे, मी तसा आहे,
अशी फुशारकी मारणारे देखील,
मी मी म्हणणारेदेखील...

ह्या असल्या साध्यासाध्या गोष्टीत
का....का...का ?
.

तुझे नि माझे जमेना अन्


दसरा संपला....
आनंदाचे वातावरण संपले-
दोघांचे आवडते भांडण सुरू झाले !

पर्यावसान ......
बायको माहेरी निघाली !
 

मी सुन्नपणे बसून राहिलो-

दाराबाहेर गेलेली बायको, दाराबाहेरूनच ओरडली-
"रात्री याल ना तिकडेच जेवायला ?
........ मी वाट पहात्येय बर का ! "

पर्यावसान.....
तुझे नि माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना !


तिकडे निघायची तयारी करावी...
आता मस्तपैकी झोप काढून -

होय ना ?
.

पारितोषिक विजेता चित्रपट


एका मराठी चित्रपटाला सातआठ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली होती
म्हणून उत्साहाने आम्ही घरातले सर्वच तो पहायला गेलो

तो पाहून आलो.....
येताना प्रत्येकजण गप्प होता !
पैसे फुकट गेले होते.
वेळ फुकट गेला होता..
खाद्यपदार्थ वाया गेले होते...
उत्साहाने वर्तमानपत्रातले वाचून,
सर्वांना घेऊन गेलेला भाऊ नर्वस होता !
आज त्या चित्रपटाचे नावही आठवत नाही कुणालाच !

सर्वांचे एकमत झाले होते
......' चित्रपट एकदम भिकार '

तुम्ही गेला आहात का कधी असल्या भयाण आणि भयानक प्रसंगातून ?

.

एक नजरबायको ही एक स्त्री असते.
प्रत्येक स्त्री ही बडबडी असते.
बडबडीचा त्रास किती होत असतो,
हे बहिऱ्या नवऱ्याला देखील माहित असते !

काल सकाळपासून 'हे आणा' 'ते आणा', 

अशी आणायची भुणभुण कानाशी अखंडपणे,
 येता जाता उठता बसता लोळता पडता, 
चालूच होती .

आज सकाळी पुन्हा तोच प्रकार !
पेपर वाचत असतांनाच मी
बायकोचे 'आणा-पुराण' ऐकून घेतले !
मी पिशव्या घेऊन बाहेर पडत असतांना,
तिला शांतपणे विचारले-
"हं ! सांग काय काय आणायचे आहे ? "

तिने पुन्हा तासभर.....
आतूनच सांगून होईपर्यंत,
मी सर्वकाही तिच्या पुढ्यात आणून ठेवलेले होते ....!

आपल्या आज्ञाधारक नवऱ्याकडे टाकलेली तिची कौतुकाची,
एकच नजर...
कानावरचा सर्व शीण घालवून गेली की हो !
.

आधुनिक बिचारी सावित्री !


'सेल' , 'डिस्कोउंट' , 'एकावर एक फ्री '-
असला जमाना चालू आहे .
कुणाच्या शत्रूणीवर येऊ नये,
अशी वेळ दुर्दैवाने,

 आजच्या सावित्रीवर आली आहे ..
 

बिचारीसमोर अपघातात तिघेही जीव गमावलेले ..
पती - सासू - सासरा !
 

तरीही.....
 तिने प्रथेप्रमाणे, रीतीरिवाजाप्रमाणे,
यमराजाची प्रार्थना केली.
तोही नीती नियमाप्रमाणे हजर झाला, ड्यूटीवर..


सावित्री समोर हजर !
तो तिला म्हणाला,
" सावित्री, मागच्या वेळी, 

मी तुझ्या पतीला पुन्हा जिवंत केले.
आता इथे,

 तिघेजण माझ्या समोर मृतावस्थेत आहेत.
स्वर्गातल्या नवीन स्कीमनुसार....

"एकाला जिवंत केले तर,
तुझ्या प्रार्थनेमुळे,

 मी आणखी एकाला-" 
जिवंत करू शकतो ..!
सांग, कोणत्या दोघांना मी जिवंत करू ? "

सावित्री बिचारी....
अजूनही त्या भीषण अवस्थेत विचारच करत बसलीय !!!
.जशास तसे ...

घरात शिरता शिरता, 
त्याने बायकोला बातमी दिली -

" अग ए , हे बघ- 

तुझ्या सांगण्याप्रमाणे,
आताच आईबाबांचे त्या वृद्धाश्रमात नांव नोंदवून आलो बघ ! "

ती जोषात, टाळ्या पिटत, गिरकी घेऊन म्हणाली,
" बर झालं बाई !
तिथं ती दोघं आनंदान, मजेत आणि अगदी सुखात राहतील ! "

तिच्या समोर उभा रहात तो पुढे म्हणाला....

" आणि हो, सांगायचं राहिलंच की,
म्हटलं आता गेलोच आहे वृद्धाश्रमात तर ,
तुझ्या आई-वडीलांचही नांव नोंदवून आलो बर का ...
ती दोघंही आनंदान,

 मजेत आणि अगदी सुखात
 राहतील ना तिथं ? "

.....घेरी येत असलेल्या बायकोला सावरायला तो पुढे धावला !
.

एकच इच्छा !


आता गणेशोत्सव संपलेला आहे ! 
अंगारकी नाही, विनायकी नाही, गणेशजयंती दूर...
 सध्या निवांतच !

रोजच्याप्रमाणे मी देवळात उभा ...
आश्चर्य म्हणजे,
समोर गाभाऱ्यातच मला ...
 
सर्व ठिकाणचे -
" राजे, शेठ, श्रीमंत, मानाचे आणि नवसाला पावणारे जागृत
श्रीगणेश "...
थोडेसे निद्रिस्त अवस्थेत बसलेले भासले .
 
विलक्षण दृष्य होते हो ....

मी आनंदाने डोळे मिटले आणि आळवणी सुरू केली ..

" हे समस्त श्री गणेशांनो,
मी एक त्रासलेला, गांजलेला, पिचून निघालेला,
पिळून निघालेला एक आमआदमी विनंती कम् प्रार्थना करतो की,
कसलीही पावती न फाडता -
कुणाचाही वशिला न लावता -
तुमच्या पायाशी पोचल्यावर, कुणीही बेजबाबदारपणे हुसकावून न लावता -
कुणाचीही ओळखपाळख, चिठ्ठीचपाटी न लागता -
तुमचे दर्शन मला विनासायास, विनात्रास व्हावे,
एवढी एकच इच्छा
 आपणासर्वांसमोर हात जोडून व्यक्त करतो आणि ...."

माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच-

" हा काय भलतच बरळत आहे ..चला, निघूया इथून पट्कन .."
अशाप्रकारची कुजबुज आणि हालचाल माझ्या कानाशी आली, 
म्हणून मी डोळे उघडले .........
 
गाभारा पूर्ण रिकामा दिसत होता !!!
.

तीन चारोळ्या

येता जाता नकोस धमकावू यमराजा 
नको विचारू, आता येऊ का मी नंतर -
जीवन जगणे झाले इथले मस्त कलंदर 
सरले जीवन-मृत्यूमधले कधीच अंतर ..
.


बोट धरुन चालण्यास शिकला 
तो रस्त्यावरुनी ज्या बापाचे-
हात धरुन घालण्यास निघाला
तो नाव वृद्धाश्रमी त्या बापाचे ..
.


बघ तो तूही चंद्र सखे, 
ढगाआड का हळूच पळतो -
येता माझ्याजवळ तू सखे
मनात का तो खरेच जळतो ..
.

आ ळ स ....


एकजण दुसऱ्याला सांगत होता
कंटाळलो आता इतके घोटाळे करून

दुसरा म्हणाला
कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ?

पहिला उत्तरला
आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ?

दुसरा म्हणाला
एका घोटाळ्यातून दुसरा करायचा
त्यात नको त्याला अडकवायचं
परत त्याची सुटका करण्यासाठी,
आपणच धडपड करायची
स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ...
हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ?

पहिला म्हणाला
खर आहे दोस्ता ...
असे म्हणून-

तो पहिला
दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे
ह्याचा मनातल्या मनात विचार करून
आळस झटकू लागला !!!
.

फ.. फ.. फे स बु का चा
फेसबुकाच्या रंगमंचावर
 येतीजाती पात्रे अगणित
फेसबुकावर मैत्रीचे 
कित्येकांचे जमते गणित
 
फेसबुक सर्वांसाठी 
उत्तम व्यासपीठ फुकट
फेसबुकावर एकाचवेळी 
आनंद आणि कटकट
 
फेसबुकावर एकमेकांचे 
हेवेदावे-साटेलोटे
फेसबुकावर मौनातून 
संभाषण खोटे मोठे
 
फेसबुकाशी जुळवावे नाते 
खरे मनातून वाटे
फेसबुकावर राग दाखवून 
पळती काही खोटे !!
 

.