" सीमोल्लंघन..."



"तो" 
भयंकर अस्वस्थ !
क्षुल्लक कारण,
त्यावरून भांडण,
भांडणातून अबोला,
अबोल्यातून आणखी गैरसमज !
 
पण कालांतराने...
आपलीच स्वत:ची झालेली चूक 
उमगलेली
चुकीचे परिमार्जन करावे कधीतरी-
पश्चात्तापदग्ध अस्वस्थता 
शिगेला पोचलेली.....

' काय करावे, कोठे जावे, 
नुमजे मजला की विष खावे.. '
इतकी कविमनासारखी तगमग,
चिंता. चिंता.. चिंता...
आतल्या आत 
पोखरत चाललेली,
पाण्याला चव राहिली नाही
साखरेला गोडी उरली नाही
अन्नात जीभ सरली नाही !

धाडस.. धाडस.....

केव्हातरी 'शेजारी' चित्रपट पाहिलेला होता,
नेमका आताच आठवला ..
शेवटी -
अंतर्मनाला साद घातली
मनाचा हिय्या करून ..
दसऱ्याचा मुहूर्त साधायचा प्रयत्न,
खरेखुरे----
 "सीमोल्लंघन" !

दसरा उजाडला,

शेजाऱ्याच्या दारात
 "तो" उभा ..!
दारावर टकटक..
शेजारी दारात
कोण ही कटकट...

"त्या"ने गळामिठीसाठी आपले हात पसरले-

शेजारी अवाक..
क्षणभरासाठी गडबडला,
पण त्याचेही हात..........
आपसूकच समोर झाले !

दोन शेजाऱ्यांचे मनोमीलन

जणू काही 
कलियुगातली 'भरतभेट' !
अद्वितीय सोहळा !
खरेखुरे सीमोल्लंघन !!

दोन्ही शेजारणींच्या डोळ्यातून

गंगायमुना अविरत वहात होत्या....
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा