ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही - [गझल]

ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही 
ओळख असता टाळत नजरा उलटे फिरती काही 

उगवत मातीतून बिजाला आनंदाला भरते
शेवट अपुला अंती माती का घाबरती काही 

प्रयत्नांती ईश्वरप्राप्ती माहित हे सर्वांना 
देवावर नवसावर श्रद्धा ठेवुन फसती काही 

रस्त्यावरुनी पुष्प गुलाबी विकुनी जगती काही 
अंथरुणावर स्वप्न गुलाबी बघतच मरती काही 

कलियुग आहे कोणालाही कोठे कृष्ण न भेटे 
दु:शासन का जागोजागी मिरवत दिसती काही ..
.

सामर्थ्य मौनाचे

आज सकाळी सकाळीच
मला भांडणाचा इतका जोराचा झटका आला होता म्हणून सांगू ..


प्रत्येकाची सकाळची प्राथमिक गरज म्हणजे काय असते हो ?

एका हातात पेपर-

आणि ---
दुसऱ्या हातासोबत -
गरमागरम चहाचा कप -
..... इतकीच माफक असते की ना !


पण छे ..
 

अर्धा तास झाला-
निवांत वाट पाहत बसलो , तरीही -
  पेपर नाही, 

चहा नाही .. 
बिस्किटे तर दूरच !

वैतागाने ओरडलो -
"ए बैको, अग आज दिवसभरात,

 एक कप चहा तरी मिळेल का ग वेळेवर ?"

उत्तरादाखल बायको आली,
आणि -

माझ्या हातावर तिळाचा एक लाडू ठेवून,
एक अक्षरही न बोलता चुपचाप निघून गेली .. !

पण -
न बोलताही..
बरेच काही बोलून गेली !
.

आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -


हल्ली-
उन्हाळ्यात वर्षा कोसळते
पावसाळ्यात हुडहुडी भरते  

उन्हाळ्यात ऊन रणरणते ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -


हल्ली-
दिवसा काही झोपा काढतात
रात्री जागरणे काही करतात
फेस्बुकात फेस घालतात ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -


हल्ली-
एकेकजण एकेका खोलीत
प्रत्येकजण स्वत:च्या चालीत
कानात हेडफोन असतो घालीत ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -


हल्ली-
तो गाडीवर वाकडी करतो मान
तो हातवारे करत बसतो छान
तो धडकून घालवत असतो जान
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -


हल्ली-
संक्रांतसण पंधरा जानेवारीला
लग्नाऐवजी महत्व शूटिंगला
शांततेची सुरुवात गोंधळाला ..
आमच्यावेळी नव्हते ब्वा असे -

.

दोन हायकू

पडता भाव
महागाईचा ताव
खिन्न बाजार ..
.

 हिरवेगार
झाड हे डेरेदार
सावली खूष ..
.