बसलो होतो ती जाता मी.. गझल

अनलज्वाला ..
मात्रा वृत्त ८+८+८
.................................................

बसलो होतो ती जाता मी डोळे मिटुनी
आठवणींचे पक्षी गेले मनात फिरुनी..

निरोप घेण्या सामोरा मी थांबलो जरा   
किती खुबीने लपवले तिने अश्रू हसुनी..

काही कडवट काही चविष्ट आठवणींना   
घोळत गेलो का मी तिच्याच दारावरुनी..

आसपास तू आहेस सखे नक्की आता
गेले क्षणात सुगंधात मन बघ दरवळुनी..

वाटे कौतुक भेटीचे का अपुल्या त्याला
स्वागतास त्या सज्ज चांदण्या नभ हे भरुनी..
.

" आणू कुठून तुजला - - -" [हझल]

आणू कुठून तुजला मी चंद्र आणि तारे 
घासू कधी ग भांडी अन आवरू पसारे ..

म्हणतेस आज मजला मज मार रे मिठी तू 
बघ हात खरकटे हे खिडकीत पाहणारे..

नोकर तुझा न मी अन मालक तुझाच आहे 
हातात चार पिशव्या का संशयात सारे.. 

घाई किती ग करशी निघण्यास तू फिराया 
विसळून कपबशा या करु दे ग केरवारे..

केसात माळण्या तुज घेईन छान गजरा
पैसे मला जरा दे खर्चास लागणारे..
.

उगाच का छळे व्यथा .. गझल

कलिंदनंदिनी वृत्त-

उगाच का छळे व्यथा पुन्हा पुन्हा मनात ती
जरी प्रयत्न रोखण्यास भांडणे घरात ती..

विचार खूप धावती मनात सारखे तिचे
तिला समोर सांगतो अधीरता उरात ती..

घमेंड ना कुठे कधी फुशारकी न जाणवे
दिसे पदोपदी विनम्रता सुटाबुटात ती..

अबोल ती म्हणून मी तिच्यासमोर भांडतो
तरी न सोडताच मौन राहते सुखात ती..

कडाडते किती ढगात वीज जोर लावुनी
करी बळीस सावधान धावुनी नभात ती..
.

न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला ... गझल

कलिंदनंदिनी वृत्त..
लगावली.. लगालगा×४
मात्रा.. २४ , अलामत.. अ
काफिया.. बोलला, जाहला, दंगला
गैरमुरद्दफ.
________________________________

न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला 
अखेरच्या दिनी किती स्तुतीस पात्र जाहला..

हसून लोळवी किती जनांस तो सहजपणे
व्यथा मनात दडवुनी खुषीत तोच दंगला..

समोर ती न भेटली कधी न बोललो तिला
मनी जपून ठेवली छबीत जीव गुंतला..

कटीस हात लावुनी निवांत तो उभा विठू
मनात प्रश्न नेहमी कधी कुणास पावला..

कुणी जिवास त्या कधी न एक फूलही दिले
कितीक हार शेवटी कसा सजून चालला..
.