वाट पाहुनी जीव हा थकला - -


वाट पाहुनी जीव हा थकला
घडले दर्शन मजला..


वेद चार ते श्वान जाहले
वसुधा ती गोमाता
सदा राहती तुझ्याभोवती
त्रेलोक्यी तू फिरता
जो तो दिसतो धरतीवर या
तुझ्या कृपेचा भुकेला .. 


शंख चक्र अन कमलपुष्पही
शोभती तव रे हाती
गदा त्रिशूलासंग कमंडलू
पावन हो भटकंती
त्रिमुखावर तव स्मित नित बघता
आनंद होई मनाला ..


दर्शन घडले आज तुझे रे
धन्य जन्म हा आता
स्मरण मी करतो अंत:करणी
ठेवून चरणी माथा
भावफुलांची ओंजळ माझी
अर्पण करतो तुजला ..

--

जे सभागृही.. तेच ममगृही !

छे छे छे छे . . .

माझ्याही "गृहा"त 
अगदी तश्शीच परिस्थिती ?

सकाळपासून 
खरंच माझे कान बधीर झालेत -

आई येते 
आणि माझ्या कानाशी ओरडते,
 "सूनबाई मला काहीच बोलू देत नाही रे !"

थोड्या वेळात 
सूनबाई माझ्या कानांना ऐकवते,
 "बघा ना, सासूबाई मला काही बोलूच देत नाहीत हो !"

माझ्याच "गृहा"त, 
मी गृहपती असूनही, 
मी कुणाला गप्प बसवू शकत नाही ! 

दोघींच्या गदारोळात
स्वैपाकघराचे कामकाजही 

अगदी "ठप्प" झाले आहे ... !

काय करणार . . ?

आपलेच दात अन ..
.

कुणाला कशाचे..कुणाला कशाचे !


बहुतेक -
एटीएमच्या लांबलचक रांगेतून
 मित्र परतला असावा.


त्याचा उत्साह उतू जाणारा चेहरा पाहून

 मी विचारले,

"काय रे, किती मिळाले शेवटी, इतका वेळ थांबून ?"


आपल्या हातातला मोबाईल माझ्यासमोर धरून, 
विजयी मुद्रेने, 
तो हसत हसत उत्तरला -

"छे रे, पैसे काढायला कुठे गेलो होतो मी ?

 हे बघ, 
तीन चार सेल्फी काढून आलोय मी मस्तपैकी,
 एटीएमसमोरच्या रांगेत उभा राहून !"
..

खरे दु:ख

हार्ट आनंदात असताना

अमाप पैसे खर्चून


चायनीज पिझ्झा बर्गर


खाल्ल्याने ओढवून घेतलेल्या


पोटदुखीच्या दुःखापेक्षा ..यष्टीच्या प्रवासात

कंडाक्टरसाहेबाकडून


तिकिटाचे उरलेले 


एक दोन रुपये 


घ्यायचे विसरलेले ..लक्षात आले की

आपल्या हार्टला होणारे दुःख हे


नक्कीच कैकपटीने जास्त असते !

.

जीवन


हसायचे कुणापुढे
कुणापुढे कण्हायचे -


प्रसंगानुरूप पण
मुखवट्यात लपायचे -


नेहमी स्वतःलाच
फसवत रहायचे -


यालाच तर आपण
"जीवन" म्हणायचे ..

. .

कहीपे निगाहे कहीपे निशाना

"बहुत प्यार करते हैं, तुमको सनम-
कसम चाहे ले लो, ख़ुदा की कसम.."


..... मी एटीएममधून
 नुकत्याच मिळालेल्या
दोन हजारच्या 

त्या गुलाबी नोटेकडे बघत
कौतुकाने 

गुणगुणत होतो ..

--- तेवढ्यात
 हातात चहाचा कप घेऊन
आलेल्या बायकोने
माझे गुणगुणणे ऐकले..................!


मग काय ..

ती खूष -
म्हणून मीही खूष !
.

मीही एक याचक . . . !


योगेश्वरीदेवीच्या दर्शनास जाण्यासाठी 

सोलापूर ते अंबाजोगाई

यष्टीत बसलो होतो. 


बाजूच्या खिडकीतून आवाज आला-
" गरिबाला रुपया रुपया/दोन रुपये द्या की हो दादा ..."


मी माझ्या खिशात हात घातला आणि 


माझ्या खिशातून हातात आलेले 


दोनचे नाणे त्याच्या हातावर ठेवले.

यष्टी निघाली.

वाहकाने मला तिकीट दिले.. 


बहुधा नेहमीच्या सवयीनुसार सोयिस्करपणे
उरलेले दोन रुपये मला देण्याचे तो विसरला.


अंबाजोगाई स्थानकावर यष्टी थांबली.

उतरताना मी वाहकाला दोन बोटे दाखवली .


कसनुसे हसत 
त्याने दोनचे नाणे मुकाट्याने माझ्या हातावर ठेवले !
...

तीन चारोळ्या -

'अरे देवा -'

दगडातून मूर्ती साकारणारा 
पैसा पैसा करतच मरतो -
दगडातून निर्मित देव 
निवांत पैसा गोळा करतो ..
.

'लेकराची माय -'

डोळियांची निरांजने 
आसवांचे तेल तयात -
जपून ठेविते माऊली 
प्रकाश अपुल्या हृदयात ..
.

'हसरी जखम -'

दिला गुलाब तिच्या हाती 
मिळे गोड स्मितातून पावती -
टोचे काटा बोटास माझ्या 
हसतो मधुर रुधिरथेंबही किती . .
.

दोन चारोळ्या -

'अगतिक -'

देवळातल्या देवाच्या  
पायावर हात मी ठेवत आहे -
देवाशपथ, खरं सांगतो  
शंभर टक्के मी नास्तिक आहे ..
.


'असे का -'

दुसऱ्याच्या मदतीला धावायला 
दोन पाय असून नसतो तयार - 
दुसऱ्याचे वाईट करायला मनुष्य 
एका पायावरही असतो तयार ..
.

अतिक्रमण

फूटपाथवरची 

मुजोर अतिक्रमणे

पाहून...


काही दिवसांनी

अशीही वेळ

 येईल की,


फूटपाथवरून

चालणा-या पादचा-यांनाच,

"अतिक्रमण" समजून, 


नगरपालिकेच्या 

जागरूक 

अतिक्रमणवाहक गाड्या 

उचलून नेतील !
.

स्वप्नपाखरांनो -

झोपेत आहे 

मी जोवर -

स्वप्नपाखरांनो, 

हवे तेवढे 

फिरून घ्या हो -


जागा झालो 

मधेच मी तर -

तुटतील नाती ..


उरतील दोन

दिशा अन दशा 

कोण तुम्ही अन -

मी कोण हो .. !
...

चार चारोळ्या ..

'जुने ते सोने -'

जुन्या फडताळात रात्री 
कागद कवितेचा  सापडला एक -
स्वप्नातल्या मनांत मी 
आठवणी जागवल्या तुझ्या अनेक ..
.

'जनरीत -'

जनरीत आहे ती इथे खरी
कौतुक हळूच असते समोरी - 
वळता पाठ तयाची खचित
निँदेची वाजत असते तुतारी ..
.

'आयत्या पिठावर रेघोट्या -'

जो तो येतो, जोषात म्हणतो 
"राजे, तुम्ही असायला हवे होते "-
एकजुटीची जबाबदारी मात्र 
सोयीस्कर सगळ्यांना विसरायला होते ..
.


'नात्याचे मीठ -'

जास्त पडले तर खारट होते 
कमी पडले तर होते आळणी -
नातेही मिठासारखेच असते 
 जाणून असते कुशल गृहिणी ..
..

मुहूर्ताची ऐशी तैशी -

उशीर होईल म्हणून रिक्षाला नको तेवढे पैसे घालवून,
घरातली काही कामं अर्धीच टाकून,
आम्ही उभयता बरोब्बर अकरा पंचेचाळीसला कार्यालयात हजर ...
दुपारचा अकरा पन्नासचा लग्नाचा "शुभमुहूर्त" गाठण्यासाठी .....!

अकरा तीसला नवरदेवाचं घोडं देवाला गेलं होतं म्हणे ----

एकदाचं परत थडकलं. पाठोपाठ वरातीमधली मंडळी-
विशेषतः पाच ते पंचावन्न वयोगटातला महिलावर्ग 

अगदी बेभान आणि बेढब होऊन ब्यांडच्या तालावर
 "नाचकाम नावाचा प्रकार" करून दाखवत होता. 
दोनचार मिनिटे नवरदेवानेही घोड्यावरून पाय उतार होवोन, 
समस्त हजर मंडळीना घेऊन, 
अंगविक्षेपासह  "कुंगफू ज्यूडो नागीन सैराट शांताबाई"चे जमेल तसे नाचकाम केले..

अखेरीसबारा वाजून चाळीस मिनिटांनी एकदाचे 

पवित्र मंगलाष्टक नावाचे गायन सुरू झाले ! 
एक हौशी गायिका "स्वयंवर नवरीचे झाले..." 
असे ट ला ट जुळवलेले मंगलाष्टक, 
मोठ्या उत्साहात म्हणून एकदाची मोकळी झाली...
आणि आम्हीही सुटलो !
 [स्वयंवर न होता, रीतसर "दाखवून"
 होत असलेला नवरा बिचारा कदाचित मनात ओशाळला असणार !]

"शुभमुहूर्ता"वर म्हणून जमलेल्या वेळेवर, 

लोक कंटाळून टाळ्या वाजवते झाले ! 
नंतर नवीन प्रथेप्रमाणे फोटोसाठी "नवरानवरी ओळखपरेड" सुरू झाली.

पोटात कावळेच नाही तर वाघ, सिँह, हत्तीही ओरडू लागल्याने,
आम्ही भोजनपंगतीकडे वळलो.

.....लग्नपत्रिकेत यापुढे लग्नमुहूर्त लिहितांना-
कृपया नाचकाम वेळ, फोटो शुटिँग वेळ, मंगलाष्टकांची वेळ

 आणि अक्षता टाकण्याचा " खरा शुभमुहूर्त "वेळ------ 
इ. वेळापत्रक देण्याचीही सर्व संबंधितांना विनंती करावी म्हणतो !
.

मीही .. एक भावूक !

आज सकाळी सकाळीच
बायकोला मी नाष्ट्यासाठी भजी तळायला सांगितली होती.
भज्यांसाठी पीठ कालवता कालवता,
बायकोने मला हाक मारली आणि ती म्हणाली,
"दोनतीन कांदे चिरून द्या हो .."

आपल्याला थोडा त्रास होणार असला तरी,
सकाळच्या मस्त प्रसन्न थंडगार वातावरणात,
चहाच्या वाफाळत्या कपाबरोबर गरमागरम कांदाभजी खायला मिळणार..
या आनंदात,
मी उस्फूर्तपणे कांदे चिरायला घेतले आणि तिथेच घात झाला ...

कांदे चिरताना माझ्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला ..
आणि नेमके ते बायकोच्या भावाने पहायला,
एकच गाठ पडली की हो !

झाsssलं ...

"मी बायकोला मदत करताना अतिशय भावूक होतो..!"
- अशी बातमी आमच्या समस्त सासुरवाडीला विजेच्या वेगाने पसरली,
आणि जो तो माझे घरी सांत्वन करण्याच्या निमित्ताने,
माझ्याच घरातली माझ्या बायकोने केलेली भजी हादडत बसलाय !

मी मात्र बिनभज्याचा एवढा मोठा आ वासून..
तेव्हापासून नुसता बघत राहिलो आहे..
.

खेळखंडोबा

येता जाता
उठता बसता
दर क्षणाला
"प्रोफाईल पिक"
बदलत राहतेस तू ..

येत नसेल
तुला कंटाळा-
अग पण
"लाईक"वरचे
दुखणारे
माझे बोट
पाहतेस ना तू ..

थोडा तरी
त्याचा विचार
मनात करून..


थांबव ना
असला खेळखंडोबा तू .. !
..

मोबाईलाय तस्मै नम:

कुणाच्याही घरच्या बाळाच्या जन्मानिमित्ताने
दवाखान्यात गेलात तर
सर्वजण मोबाईलमधे
डोके खुपसून बसलेले दिसतील-

आणि ...

कुणाच्याही घरच्या आजोबांच्या निधनानिमित्ताने
स्मशानात गेलात तरी
सर्वजण मोबाईलमधे
डोके खुपसून बसलेलेच दिसतील !
.

भिक्षापात्र

रोज रात्री
बारा वाजता
दजकून जागा होतोय..

मला
उद्या कोणत्या
रांगेत कशासाठी..

आधारकार्डाचे
भिक्षापात्र
हातात घेऊन..

त्यात कसली
भिक्षा मागावी
लागणार आहे !
..

ज्येष्ठ नागरिक ?

आजचा दिवस
बँकेत ज्येष्ठ नागरिकांनाच 
पैसे भरणे/काढणे हा व्यवहार 
सरकारी नियमानुसार करायचा असल्याने,
विशेषकरून माहित करून घ्यावे वाटत आहे ..

आयकरखात्याच्या, रेल्वेच्या नियमानुसार 60पूर्ण झालेला -
का -
यमयसारटीसीच्या नियमानुसार 65पूर्ण झालेला -
"ज्येष्ठ नागरीक" असतो ?

एकाच देशात
नागरीक तोच-
पण
"दोन" नियमात बांधील का ?

लोकप्रतिनिधी किँवा यूनोने
यात तातडीने लक्ष घालावे
आणि लगेच दुरुस्ती करण्यास सांगावे,
कारण -

मी आता बँकेसमोर रागारागात रांगेत उभा आहे !
..

आभास हा

काळाची गरज समजून,
 आम जनतेच्या कल्याणासाठी,
देशातले सर्व लोकप्रतिनिधी-
 आपापल्या प्रभागात सहकुटुंब टेबलखुर्ची टाकून बसले होते.
बाजूलाच नोटांची पोती भरलेली होती.
टेबलासमोर ही लांबलचक रांग लागलेली . . !

प्रत्येक लोकप्रतिनिधी
आपल्या जोडीदाराच्या हस्ते,
रांगेतल्या नागरिकाची समयोचित अत्यावश्यक गरज जाणून-
शंभर, पन्नास, वीस आणि दहाची नोट एकत्र असलेले एकेक पाकिट,

 अगदी हसतमुखाने फुकटात देत होता हो !

माझा नंबर आला----
आदबीने वाकत मी डाव्या हातात माझे आधार कार्ड दाखवत,
माझा उजवा शुभ हात पाकिटासाठी पुढे केला ..

"अहो, जागे व्हा आधी, टाळी कसली मागताय झोपेत ? "
 - असा बायकोचा सुपरिचित कर्णकटुकर्कश्य असा,
 मधुर ध्वनी कानावर पडताच,
मी दचकून जागा झालो !
. .

ना नियम ना कायद्याला --[गझल]

ना नियम ना कायद्याला जात माझी पाळणारी
पदपिपासू भ्रष्ट माझी जात संधी साधणारी ..

दाखवाया तू खळी का हासशी स्वप्नात माझ्या 
जाग येता वाढते मग ओढ हुरहुर वाटणारी ..

पाहिले का कलियुगी त्या कावडीला श्रावणाच्या
आंधळ्या मातापित्याला ही पिढी कंटाळणारी ..

या म्हणे देशात माझ्या भेद नाही ना विषमता
फक्त गरिबांच्याच नशिबी रांग का मग लांबणारी ..

ती नको मज कॅटरीना माधुरी वा दीपिकाही 
पाहिजे ती मी दिलेला एक गजरा माळणारी ..
.

मनपरिवर्तन

सुप्रभात, शुभदिन !

दिलेल्या मुदतीच्या 
अंतीम क्षणी रांगा लावून,
एक रुपयाचाही कर भरणा-या 

व्यक्ती आणि वल्ली,
रांगा लावून,
मनापासून 
पाचशे हजार हातात घेऊन,
कर भरायला 

तत्परतेने 
तयार झालेल्या दिसत आहेत ..

साम दाम दंड भेद न वापरता 
घडलेले मनपरिवर्तनदेखील 
अभिनंदनीयच आहे ना !
.

दोन चारोळ्या -

'बाळपणीचा काळ सुखाचा -'

धावत येते कसे दुडूदुडू 
बालपणीचे हास्य परतुन -
आरशात हसुन कसे पाहती 
आजोबा कवळी हळूच काढुन .. 
.

'थैमान -'

दिसले जुन्या वहीत मजला 
जाळीदार एक पिंपळपान -
घातले मनी क्षणात माझ्या 
आठवणींनी का थैमान . .
.

फोडफोडुनी अति मी दमलो

(चालः नाचनाचुनी अति मी दमले ..)

फोडफोडुनी अति मी दमलो,
चकल्या अन लाडूला ..

खलबत्ता हा फुटून गेला,
अडकित्ता ग तुटला
हात किती बघ गेले सुजुनी,
लाडु मुळी ना फुटला
एक न तुकडा मुखात जाता
बघतच जीव हा थकला ..

भूक चाळवे पहात फराळा,
पाणी सुटे तोंडाला
काय करावे काही सुचेना,
चैन पडे न जिवाला
मोह अती हा पडे मनाला
किती जरी आवरला ..

स्वतःशीच मी चडफडतो हा
राग अनावर झाला
तोल सावरू कसा मनाचा
डोंब भुकेचा उसळला
सर्व भाळी मम घाम साठला 
फोडत या लाडूला ..

रागावुन का गेली प्रतिभा .. [हझल]

रागावुन का गेली प्रतिभा आल्यावाटे तरातरा
काय करावे सुचले नाही घाबरलो मी जराजरा ..

मुकाट बसलो हताश होउन न कळे काहीही मजला
चुकलो कोठे शोधत उत्तर डोके खाजवत कराकरा ..

रागारागाने मी पुढ्यात कागद झरणी घेउनिया
सुटलो निकराने शब्दांशी जवळिक साधत भराभरा ..

संपत आली शाई केली तरीहि घाई लिहिण्याची
खेळत होतो शब्दांशी मी खरडत कविता खराखरा ..

सांग मला तू रसिक वाचका आवडले जर लिहिलेले
नाही तर हे लेखन माझे फाडुन टाकिन टराटरा ..

लुकलुके ती चांदणी का --[गझल]

लुकलुके ती चांदणी का रोज पाहुन मजकडे
तूच का ती भास सखये लक्ष ठेवुन मजकडे ..

माळलेला मी सखे तुज आवडे गजरा किती
आणतो संदेश वारा खूष होउन मजकडे ..

खूप झाली नजरभाषा आपली नजरानजर
शब्दही कंटाळले का बघत राहुन मजकडे ..

ना करी स्वीकार माझा टाक करुनी ठार तू
ना करी तू वार बसुनी नजर लावुन मजकडे ..

जीवनी अंधार माझ्या ह्या जगा पाहू कसे
खेळ असुरी दैव बघते नजर टाकुन मजकडे ..

बोलले ना शब्द एकहि जगत होतो मी जरी
पाहती सरणावरी ते अश्रु ढाळुन मजकडे ..
.

चित्र विचित्र

तळागाळातले कार्यकर्ते 
उन्हातान्हात राबून, 
थंडीपावसात मरून, 
तहानभूक घरदार विसरून, 
कार्य करून, 
फाटक्याच नशिबात गहाळ होतात..

आणि ..

त्यांची नेतेमंडळी मात्र,
अहोरात्र फ्लेक्सवर झळकत, 
संपत्तीत लोळत, 
मानसन्मानात घोळत, 
परीटघडीचे कपडे कुरवाळत, 
पद सत्ता खुर्ची 
पिढ्यानपिढ्या सांभाळत राहतात !
.

आस . .

रांग किती ही लांब आहे  
दर्शन लवकर दे विठुराया,
राहू किती काळ उभा मी
सांग तू मजला रे विठुराया ..

जीवन ओझे झाले आहे 
दुःखणे वाढत आहे ..
लवकर दर्शन होतच नाही
काया थकते आहे ..
घेतो जमेल तितके नाम
जिवाला चैन ना आराम
घडले नाही दर्शन आता 
माझा जन्म जाईल वाया ..

दिंडी चालत झाल्या वा-या 
नामस्मरण मुखी या ..
चिपळ्यासंगे टाळ हाती या   
पाठीशी तुझी माया ..
आस तुझ्या भेटीची आहे
ध्यानी चंद्रभागा वाहे
स्नानानंतर आतुर आहे  
माथा चरणावर ठेवाया ..
.

खास दिवाळीसाठीः

ऐन दिवाळीत शिमगा नको म्हणून,
तुमच्या अर्धांगीने खास तुमच्यासाठी मन लावून केलेल्या ...
तुमचे मजबूत दात तुमच्याच घशात घालणा-या,
केवढ्याही कसल्याही लाडू, चकलीचे
तुम्हाला हव्या त्या आकाराचे प्रकाराचे 
तुकडे, चूर्ण, वड्या 
क्षणात आणि कमी त्रास कष्टात करून मिळण्यासाठी . . .
खास खलबत्ता, 
लहान मोठ्या आकाराची करवत, 
हाताळणीय हातोडी, 
दंतवाचवणयंत्र, 
भुगाकरणीयंत्र 
माफक किँमतीत मिळतील.
.

दोष ना कुणाचा . .

पळाला लंगडा जोराने

पाहिले त्यास आंधळ्याने


साद घातली त्या मुक्याने 

ऐकली निमूट बहि-याने ..


हात ओले करतो जोमाने

पाहिले मुकादम काँट्-याक्टरने


पडावे खड्ड्यात जनतेने

बघावे निमूट शासनाने ..

.

खूप जाहल्या गाठीभेटी --[गझल]

खूप जाहल्या गाठीभेटी आज समाप्ती मौनाची
मोकळीक देऊ ओठांना भाषा बोलत शब्दाची ..

वाटत बघुनी आहे भीती पाझर अश्रूंचा नयनी
वाटली कधी भीती न मनी होती त्या जलप्रलयाची ..

चेहऱ्यास तव आठवता मी गायब थकवा का होतो 
दगदग सगळी माझी विसरुन जातो मी दिवसभराची ..

हलवतो हळू चावट वारा येता जाता पडद्याला
हुरहुर तिजला बघण्या वाढे सोबत धडधड हृदयाची ..

विखुरती फुले प्राजक्ताची सुंदर जमिनीवर सारी
गंध आसमंती पण विहरे किमया न्यारी का "त्या"ची ..
.

रीत स्वागताची ही न्यारी ..[गझल]

रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी ..करतो उत्साहाने प्रयत्न धडपडून मी जगण्याचा
ससा नि कासव कथा तीच ती अजून ऐकत आहे मी ..

कोसळला ना कधीच धो धो लहरी तो पाऊस जरी
भरून वाटी चिमणीपुरते पाणी ठेवत आहे मी ..

लागुन ठेचा होतो जखमी प्रेमाच्या खेळात जरी
असते आशा अमर जाणुनी तसाच खेळत आहे मी ..


कर्जातुन घेतल्या घराचे दार बंद ठेवतो सदा
अतिथी देवो भव म्हणण्याला किती घाबरत आहे मी ..


शिते जिथे ती भुतेहि जमती शिकलो ज्ञानातून असे
माया पोटापुरती जमवत नाती टाळत आहे मी .. 
.

कुठे कशी फिर्याद करू मी ..[गझल]

कुठे कशी फिर्याद करू मी झाली हृदयाची चोरी
हिंडत आहे करून चोरी प्रेमिकाच वर शिरजोरी ..


फसले नाटक तुझे छान ते चोरुन बघण्याचे ग मला
होता नजरानजर आपली का होशी गोरीमोरी ..


घेण्या झोके मनासारखे प्रयत्न जीवनभर केले
समजायाला उशीर झाला नियती हाती ती दोरी ..


असता सोबत तुझी मला ती गिरवत होतो नाव सखे
सुटली अर्ध्यावरती सोबत आहे ती पाटी कोरी ..


दार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती
दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी ..

.

नसती सुरेख मोहकशी --[गझल]

नसती सुरेख मोहकशी खळी तुझ्या जर गालावर      
नसते बसले मन माझे घिरट्या घालत मग त्यावर  ..

सहज एकदा पडली त्या आरशावर नजर माझी 

प्रतिबिंबाला पाहुन मी गेलो भाळुन माझ्यावर  ...

गाढ झोपलो असता मी स्वप्नी सुंदरशा ललना  
सगळ्या पसार का होती पण मी जागा झाल्यावर ..

झाली वाटुन अर्धी ती स्थावरजंगम पाहुनिया
एक वाटणे आईचे काळिज उरले अर्ध्यावर ..

बसलो मारत गप्पा मी नावाशीहि निवांत तुझ्या
लिहिले होते नाव तुझे कागदाच्याच तुकड्यावर ..

बभ्रा केलाच गावभर उघडपणे पण वाऱ्याने
जरी माळला गुपचुप मी गजरा तुझ्या ग केसावर .
.

झुळुक हळु ती छानशी . .[गझल]

झुळुक हळु ती छानशी स्पर्शुनी गेली मला
भेट पहिली आपली भेटुनी गेली मला ..

बघत होती वळुन ती गडप झाली पण कुठे
काळजावर घाव का घालुनी गेली मला ..

पावसाला पाहुनी आठवावी तीच का
पावसाची एक सर रडवुनी गेली मला ..

शुष्क गजरा टाकला खूण पटली खास ती
वाट ती होती बघत कळवुनी गेली मला ..

स्वप्न रात्री पाहिले वरुन आली अप्सरा
चांदण्यातुन विहरण्या घेउनी गेली मला ..
.

अरे संसार ... !

सकाळच्या रामप्रहरी मी जागा झाल्याबरोबर, 
आधी दारासमोर असलेल्या मंडपातील जगदंबेला
मनोभावे "प्रार्थना" करतो...

"हे माते,

मला दिवसभर मानसिक शांती, 
समाधान मिळू दे !"

नंतर त्या समाधानात मी शांतपणे- 

स्वैपाकघरात असलेल्या, 
माझ्या गृहलक्षुमीला हात जोडून, 
मनातून "प्रार्थना" करतो...

" हे त्राते, 

घालिन लोटांगण वंदीन चरण, 
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे..."

मग मला दिवसभर--

अगदी वेळेवर चहा,पाणी, नाष्टा, जेवणखाण व्यवस्थित मिळत रहाते !!
.

नऊ रात्री नऊ माळा

नवरात्रीः

रोज एका रंगाची साडी नेसून,
पेपरात फोटो येण्यासाठी धडपडण्यापेक्षा- 

समस्त महिलांनी रोज एखादे सत्कृत्य करायचे .....

जसे -

पहिली माळ म्हणून- गरीबांना अन्नदान

दुसरी माळ- ग्रंथालयाना घरात साठवलेली पण न वाचलेली पुस्तके दान

तिसरी माळ- साखळीचोर पकडदिन आणि पोलीस कोठडीत रवानादिन ..

चौथी- रस्त्यावरचे रोडरोमियो पकडदिन आणि चोपदिन ..

पाचवी- वाहतूक जागृतीदिन म्हणून वाहतुकीचे नियम स्वत: पाळायचे

 आणि पाळायला लावायचेच ..

सहावी- सर्व महिलांनी पदपथावरूनच चालणेदिन, 

जेणेकरून दुकानदारानी रस्त्यावरची आपली अतिक्रमणे काढून टाकावी ..

सातव्या माळेला- वाहनत्यागदिनानिमित्त चालत राहणे

 आणि इंधनाची बचत करणे ..

आठवी माळ म्हणून ....

तुम्हालाही काही तरी सुचत असणारच ना ?
.

शरण तुला जगदंबेः


काय सांगू हो आता तुम्हाला ! 
खोटं वाटेल.. पण,

दुपारी डुलकी घेता घेता, 

साक्षात जगदंबामाताच पुन्हा पुन्हा,
 माझ्या कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झाला मला ..

" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे, 
जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून, 
माझ्या दोनही कानात घालतोस का रे जरा ?
मी माझे डोळे स्वतःच बंद करून घेऊ शकते रे, पण ...
माझ्याच कानाला मी माझे हात लावू शकत नाही ना....

 ह्या सर्व आठही गुंतलेल्या हातातल्या आयुधांमुळे !
हा दसरा संपेपर्यंत, मी भक्तांवर त्यांचा उपयोगही नाही करू शकत !

 अरे, हे सगळे भक्तगण माझीच छान छान गाणी,पण
किती कर्णकर्कश्श आवाजात, सहन होण्यापलीकडे ऐकवत आहेत..
तूही ऐकू शकतोयस ना जरा तरी ! "
.

खड्डेच खड्डे सगळीकडे !

भर पावसातला कालचा रविवारचा सुट्टीचा छानसा निवांत दिवस...
घरात बसून मी पेपरातली जुनी कात्रणे चाळत होतो.

काही काही सिरीयलमध्ये असते, तश्शी.... 
अगदी साधीभोळी, सरळ स्वभावाची बायको, 
नेहमीप्रमाणे अधून मधून-
आपले डोके, डोळे आणि तोंड मधेच खुपसत होती.

समोर हातात आलेले एक कात्रण दाखवत, 
मी तिला म्हणालो,
" हा बघ, हा नील आर्मस्ट्राँग !
अंतराळवीर !! चंद्रावर पहिले पाऊल ठेवून- 

चंद्रावर खड्डे आहेत, हे त्यानेच प्रथम पाहिले बरं का !"

जगात आपल्याला एकटीलाच सगळं काही कळत, 
अशा आविर्भावात माझ्या हातातले चित्राचे कात्रण पहात,
तिने डाव्या पंजावर उजव्या हाताची मूठ आपटत, 

आपली प्रतिक्रिया दिली -
" मी म्हणते, त्याला जर खड्डेच बघायचे होते, 

तर चंद्रावर कशाला जायला हवं हो ? 
आपल्या गावातल्या रस्त्यावरून जरी त्याने एखादी चक्कर मारली असती, 
तरी हेss इतके खड्डे त्याला बघायला मिळाले असते की ! "
.

वळ छडीचे मास्तरांच्या --[गझल]

वळ छडीचे मास्तरांच्या उमटले माझ्या मनावर
प्राक्तनाला जाणले त्यांनीच का माझ्या करावर ..

लाटुनी पैसे सुखाची झोप ना नेत्यास येते
कार्यकर्ता घोरतो पण कार्य अपुले संपल्यावर ..

"या सुखांनो जवळ माझ्या-" खूप दमलो साद घालत --
धावली दुःखे कशी ही भेटण्याला मज अनावर ..

झाड असता खंगलेले ना फिरकती पाखरेही
दिसुन येता बहरलेले झेप घेती तीच त्यावर ..

काम ना ते करत असती आस ना करण्यास पण   
शंख मोठा फक्त तोंडी काम फत्ते जाहल्यावर ..
.

कोठे गुलाब ..[गझल]

कोठे गुलाब काट्याशिवाय दिसेल का
कोणी सुखात दुःखाशिवाय असेल का ..


आहे खडतर चालायचेच पुढे जरी
थोडा प्रवास त्रासाशिवाय नसेल का..


'येथे कुणी रिकामा उगाच बसू नये'

मग जाणकार कामाशिवाय बसेल का ..

म्हणती झकास आता दिसेल सुधारणा
एक तरि गाव खड्ड्याशिवाय वसेल का ..


कामानिमित्त मानव रुसून चिडेल तो
पण कारकून दामाशिवाय हसेल का ..
.

दिवाळी आणि दिवाळे

हां हां म्हणता म्हणता-
 आता दसरा संपला की,
 दिवाळी आलीच की हो ..

दिवाळीनिमित्त संकल्प -

पहिला दिवस - जिलेबी
दुसरा दिवस - गुलाब जामून
तिसरा दिवस - बासुंदी
चौथा दिवस - श्रीखंड
पाचवा दिवस - साजूक तुपातले बुंदी लाडू ....

आणिः

सहाव्या दिवशी -
महागाईवर गरमागरम चर्चा .
.


वात होऊन जळायचे ..[गझल]

वात होऊन जळायचे
ज्योतीने झगमगायचे ..

समोर कधी ना भेटता
स्वप्नात जात छळायचे ..

उपदेश करून छानसा
वाट्टेल तसे जगायचे ..

बोलायाचे गोड गोड
ऐनवेळेस पळायचे ..

सहनशील ते असू देत
आपण पाहत रहायचे ..
.


आरती बायकोची .

करशी कटकट भारी तू पण संसारी,
हातचे लाटणे पडते पाठीवर भारी ..
सारी सारी रात्र ठणके च्यामारी
पायी पडतो आता थांबव मुजोरी ..
जय बाई, जय बाई, जय नवरासुरमारणी ..
पुरे कर मारझोड संहारक जीवनी ..।। जय बाई .. जय बाई..

शेजारीपाजारी तुज जैसी नाही
सांगुन थकलो पण ऐकणे नाही
सारे संवाद करता ओरडलो काही
पालथ्या घागरीवरती पाडसी पाणीही .. ।। जय बाई .. जय बाई..

प्रसन्नमुद्रे प्रसन्न कर तू या दासा
त्रासापासुनी सोडवी गोडीत कर भाषा
संगे तुज नाचून झाली दुर्दशा
सा-या गल्लीत कारण शंख जल्लोषा .. ।। जय बाई .. जय बाई..
.

गुंतता कलह हे


ऑफिसचे काम लवकर आटोपले.
इकडे तिकडे न भटकत घरी पोहोचलो .


दारातच सगळीकडे सामसूम शांतता असल्याची जाणीव झाली .
आपल्याच घराजवळ आल्याची खात्री करावी की काय -
असेही क्षणभर वाटून गेले.


ल्याचकीने दार उघडले.
आत गेल्यावर डोक्यात उजेड पडला. 


अपेक्षेप्रमाणे फक्त टीव्हीचाच आवाज दिवाणखान्यात घुमत होता.


आई, बायको आणि सूनबाई डोक्याला डोके लावून,
मालिका पाहण्यात मग्न होत्या. 


शांतता भग्न पावणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊन चहा केला.
मालिकेची ब्रेकची वेळ साधून तिघींपुढे तीन कप ठेवले !

आपसूकच तिन्ही माना माझ्याकडे वळल्या.
" अरे -
अहो -
अय्या -
आज लवकर कसे ? "
तिन्ही पिढयांचे उद्गार.. एकापाठोपाठ कानावर पडले.


तब्ब्ल दोन मिनिटांचा ब्रेक असल्याने, तिघींना उद्देशून एकच प्रश्न विचारला..
" काय असते या मालिकेत गुंतून जाण्याएवढे ?" 


आई आधी उत्तरली -
" अरे बाबा, तोंडात बोट घालायला लावणाऱ्या,
सुनेच्या एकेक हिकमती / करामती बघण्यात काय मजा येते म्हणून सांगू...... ! "


घाईघाईने आईचे उत्तर पूर्ण होण्याआधीच सूनबाई उद्गारली
" अहो बाबा, आणि बर का.. अगदी अचंबित करणाऱ्या,
अविश्वसनीय अशा सासूच्या उचापती / कुरापती पाहतानाही,
अगदी थक्क व्हायला होते हो ! मस्त धमाल येते ! "


त्या दोधीकडे आळीपाळीने बायको पाहत असतानाच ,
ब्रेक संपला आणि माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत,
तिन्ही डोकी उलट्या दिशेला वळली !


निमूटपणे चार कप हातात धरून,
मी बेसिनच्या दिशेने वळलो ..... !

.

दोन चारोळ्या -

आनंद खूप होता
"महिला दिना"त त्याला-
झाला तो दीन आता
पाहून लाटण्याला..

.
असते सवय कुणाला
आनंद वाटण्याची-
असते सवय कुणाला
दु:खात लोटण्याची..

.

बायको आणि साडी


... मंडईतून आलेली बायको 
दाणकन आपले धूड आणि बूड सोफ्यावर आदळत,
भाज्यांच्या पिशव्या बाजूला टेकवत, 

आपल्या इवल्याशा रुमालाने भलेमोठे कपाळावरचे घामाचे थेंब टिपत, 
हाश्श हुश्श करत उद्गारली-

" बै बै बै... हे आपले चार जिने खाली उतरून, 

परत वर चढून जायचे यायचे म्हणजे अगदी अग्नीदिव्यच आहे की ! 
 तेवढा फ्यान सुरू करता का हो ? "

होकारार्थी मुंडी हलवत, तिचाही मी फ्यान असल्यामुळे, 
लगेच डोक्यावरचा फ्यान चालू करत मी म्हणालो -

" अग, आज तुला दसऱ्यासाठी साडी आणायला जायचं ठरल होतं ना, आपलं काल ! "


क्षणार्धात . . .
सोफ्यावरून टुण्णकरून उडी मारत, 

अपूर्व उत्साहाने बायको चित्कारली,

" विसरलेच होते की मी ह्या भाज्यांच्या नादात ..
बसलात काय असे मग उगीच ! चला बरं पटकन..,
तयार होऊन आले हं, मी दोन मिनिटातच ! "


मघाची "ती दमलेली बायको" खरी का,
आता समोर दिसणारी "ही उत्साही खरी"...
असा विचार माझ्या मनात डोकावेपर्यंत ,
बायको फ्रेश होऊन,
"हं चला लवकर !" म्हणत माझ्यासमोर हजरसुद्धा !

.

हे फ्री ते फ्री

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...
  
"मी अमुक तमुकच्या सेंटर मधून बोलतेय -
  

सीम कार्डः फ्री
 

मेमरी कार्डः फ्री
 

अमुक इतका टोकटाईमः फ्री
 

आमच्या 4जीवर अमुक इतका एमबी इंटरनेटः फ्री ...."

..तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच,
मी ओरडलो -


" मोबाईलचा हँडसेट फ्री असेल तर लगेच आलो ..."


खाडकन्‌ तिने आपला आवाज बंद केला !
.

दोन चारोळ्या

तू तू आणि फक्त तूच --

वाचण्याचा प्रयत्न करतोय सखे ,
प्रेमाने भेट दिलेले पुस्तक तू -
समजत नाही, कसे वाचावे ,
अक्षरांऐवजी.. दिसतेस फक्त तू ..
.

घात -

सुटलो सांगत सर्वांना 
आलो सारे जग जिंकून मी -
पाहताक्षणी मी ग तुला 
बसलो ते जग हरून मी..
.

आपल्याच पायावर धोंडा -

रविवारचा आजचा मस्त दिवस !

निवांतपणे तासभर रंगोलीची मधुर गाणी सकाळी ऐकायचे ठरवले
आणि त्या नादात बडबड्या बायकोला मी म्हणून चुकलो -

" तू तासभर गप्प बसून राहिलीस, तर मी तुला,
तू म्हणशील ती भेट द्यायला तयार आहे ! "

...... तर सांगायचा मुद्दा हा की,

 सकाळी सकाळीच दोन तास -

" एखादी भेट देणे-घेणे हा भ्रष्टाचार कसा .."
ह्या विषयावर मला बायकोची बडबड ऐकत बसावे लागले की हो !

... रंगोली पार बोंबल्ली !

..

करावे तसे भरावे

घरात शिरता शिरता, त्याने बायकोला बातमी दिली -

" अग ए , ऐकतेस ना-
तुझ्या सांगण्याप्रमाणे,
आताच आईबाबांचे त्या वृद्धाश्रमात नांव नोंदवून आलो बघ ! "

ती जोषात, टाळ्या पिटत, गिरकी घेऊन म्हणाली,
" बर झालं बाई !
तिथं ती दोघं आनंदान, मजेत आणि अगदी सुखात राहतील ! "

तिच्या समोर उभा राहून,
तो पुढे म्हणाला....
" आणि हो,
मुख्य तेच सांगायचं राहिलं की.....
म्हटलं आता गेलोच आहे वृद्धाश्रमात तर ,
तुझ्या आई-बाबाचही नांव नोंदवून आलो बर का ...!
अग, तुझे आईबाबाही आनंदान, मजेत
आणि अगदी सुखात राहतील ना तिथं ? "

..... घेरी येत असलेल्या बायकोला सावरायला,
पटकन तो पुढे धावला !

.

सवलत

घराबाहेरच्या बाप्पाच्या मिरवणुकीत,
मनसोक्त नाचायला मिळाले.


दमूनभागून घरात आल्याने, गणपती विसर्जनानंतर,
मी अंमळ गाढ झोपलो होतो.

पण असे ते क्षणैक सुखही उपभोगू देईल,
ती बायको कसली !


"अखंड बडबड सप्ताहा"च्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणारी
माझी बायको, 

गदागदा मला हलवत,
माझ्या कानाशी ओरडत होती-
"अहो, किती मोठ्याने बडबड चालली आहे हो तुमची झोपेत ! "

थोडासा भानावर येत मी म्हणालो -
" माझे आई, निदान झोपेत तरी अशी बडबड करायची,
थोडी सवलत मला घेऊ दे ना ग ! "
.

फुटला अखेर पाझर . .(गझल)

फुटला अखेर पाझर दुष्काळ बघुन खाली
नयनातुनी नभाच्या बरसात खूप झाली ..

समजावले मनाला अपुले कुणी न तिकडे
तिकडेच का मनाची आशा खुळी पळाली ..

खुलतो गुलाब गाली पाहून मज जरी तो
दुःखात मग्न मी पण अश्रू तुझ्याच गाली ..

राज्यात फार झाले बेरोजगार माझ्या
सिग्रेट दारु गुटखा विक्री भरात आली ..

पाहून खूष झालो बाप्पा तुझी मिरवणुक
शिक्षा उगाच माझ्या कानांस रे मिळाली ..

.

तीन हायकू

१. 

वेध आगळे
पिंडापाशी कावळे
स्तब्ध सगळे ..२.

एकांती दंग
मनोराज्यात गुंग
भासात रंग ..
.


३.

कितीसे खरे 
ओळखीचे चेहरे
का मुखवटे ..
.

टकलावरून माझ्या ..[हझल]

टकलावरून माझ्या मी कंगवा फिरवला
मज "बालदिन" सुखाचा नशिबातला गवसला ..

"मौना"चिया व्रताचा दिन आज बायकोचा
बडबड घरात करुनी आनंद मीहि लुटला ..

मग पुस्तकेच भारी मी घेतली उशाला
तेव्हां कुठे जराशी ही झोप येइ मजला ..

स्मरणास वाढवीण्या क्लासात नाव दाखल
"जॉईन क्लास केला" मुद्दाच हा विसरला ..

हत्तीस खेद भारी मुंगीस पाहिल्यावर
"डाएट पाळु कैसे" हत्ती मनी शरमला ..

आलीया भोगासी

ऑफिसमधून तो जरा लवकरच घरी आला आणि मोठया आशेने सोफ्यावर बसून, त्या चौघींना पाहत राहिला ..

आजी, आई, बायको आणि सूनबाई-
मोठ्ठा आवाज केलेल्या टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसलेल्या दिसत होत्या !

दिवसभर या ना त्या कारणाने, एकमेकीपासून दूर राहणारी ती चार तोँडे,
"एकटीव्हीसमभाव" या न्यायाने टीव्हीसमोर मात्र शेजारीशेजारी न भांडता, चिटकून बसलेली दिसत होती !

यावेळी अचानक तो आला असला, तरी त्यामुळे त्या चौकडीला काहीच फरक पडला नव्हता ..

पण -   तो मात्र आपल्या स्वागताविषयी
भलत्याच अपेक्षा बाळगून लवकर आला होता !

. . मालिका पाहण्यात गुंगलेल्या त्या चौघीकडे हताशपणे पाहण्याखेरीज,
 तो आता काहीच करू शकणार नव् आला आणि मोठया आशेने सोफ्यावर बसून, त्या चौघींना पाहत राहिला ..

घरात मोठ्ठा आवाज केलेल्या टीव्हीसमोर आजी, आई, बायको आणि सूनबाई-   ठिय्या मांडून बसलेल्या होत्या !

दिवसभर या ना त्या कारणाने, एकमेकीपासून दूर राहणारी ती चार तोंडे,
"एकटीव्हीसमभाव" या न्यायाने टीव्हीसमोर मात्र, शेजारीशेजारी न भांडता चिटकून बसलेली दिसत होती !

यावेळी अचानक तो आला असला, तरी त्यामुळे त्या चौकडीला काहीच फरक पडला नव्हता ..

पण - 
तो मात्र आपल्या स्वागताविषयी भलत्याच अपेक्षा बाळगून लवकर आला होता !

. . मालिका पाहण्यात गुंगलेल्या त्या चौघीकडे हताशपणे पाहण्याखेरीज,
तो आता काहीच करू शकणार नव्हता !

मालिका सुरू होऊन, पंधरा मिनिटे झाली..

अचानक मोठ्या आवाजातल्या जाहिरातींचा अखंड मारा सुरू झालेल्या उपद्रवामुळे-

आजीने नाक मुरडले,
आईने त्रासिक मुद्रा केली,
बायकोने आणि सूनबाईने, एकसमयावच्छेदेकरून,
"चहात माशी पडल्यावर" बघून होतो,
अगदी तसाच चेहरा करत,
एकमताने नाराजी व्यक्त केली..

"शी बै, नको तेव्हाच हे च्यानेलवाले
या जाहिराती कशा काय मधेच लावतात की !"

आता तरी चहाचा कप आपल्या पुढ्यात येईल, या आशेने तो उत्सुक झाला होता ..

पण मोठ्या आवाजातला तो टीव्ही बंद तर झाला नाहीच, त्याऐवजी जाहिरातीपुरता आवाज सूनबाईने म्यूट केला ..

आणि-
"जाहिरातवाले आपला रसभंग किती निर्लज्जपणे व बेमालूमपणे करतात-"
या विषयावर एक मिनिट व एकोणपन्नास सेकंद तावातावाने बिचा-या चौघीत चर्चा चालूच राहिली ..
--- टीव्हीच्या आवाजापेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात !

एकंदरीत वातावरण आणि रागरंग पाहून, पण वैतागून न जाता, तो बिचारा मुकाट्याने चहा करायला किचनकडे निघाला !
.

अविवाहित... दु:खी ?

आज सकाळी चहा पिता पिता, 
माझ्या एका मित्राबद्दल मी बायकोला सांगत होतो-
"खूप दु:खात दिवस काढलेत बिचाऱ्याने !"

पुढे मी आणखी काही सांगणार, 
तेवढ्यात बायकोने मधेच मला थांबवत विचारले,
"लग्न झाले होते का त्याचे?"

तिचा विचारण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला नव्हता, 
सहजपणे मी उत्तरलो,
"नाही ना."

विजयी मुद्रेने, 
मला काहीच कळत नसल्याच्या नजरेने माझ्याकडे बघत, 
बायको उद्गारली,
"अहो, त्याचं लग्न झालं नव्हत, 
तर त्याला दु:खात असायचं कारणच काय मुळी ?"
.

अ से आ हे फे स बु क ..

फेसबुकाच्या रंगमंचावर
येतीजाती पात्रे अगणित.. 

फेसबुकावर मैत्रीचे 
कित्येकांचे जमते गणित.. 

फेसबुक सर्वांसाठी आहे
उत्तम व्यासपीठ फुकट.. 

फेसबुकावर एकाचवेळी
आनंद आणि कटकट.. 

फेसबुकावर एकमेकांचे
हेवेदावे-साटेलोटे.. 

फेसबुकावर मौनातूनही
संभाषण खोटे मोठे.. 

फेसबुकाशी जुळवावे 
नाते खरे मनातून वाटे.. 

फेसबुकावर राग दाखवत
पळती काही फेक खोटे..

.

पाच हायकू

१.
एकच खंत
भेदाभेद जिवंत 
जातीत भिंत ..
.

२.
चंचल मन
व्यसनाधिन तन
संगती दोष ..
.

३.
ही हाणामारी
पुतळ्याच्या समोरी
पुतळा स्तब्ध ..
.

४.
नातेवाईक
किती त-हेवाईक
आयुष्य खेळ ..
.

५.
उभी ती दारी
भरली रहदारी
भुकेल्या पोटी ..
.

जशास तसे

पगार हातात आला होता. 
महिन्याच्या हिशेबाची मनात जुळवाजुळव करीत होतो. 

बायको अशा वेळी नेमकी समोर आली.. 

तिला माझी फिरकी घ्यायची लहर आली असावी !

तिने हसत हसत विचारले ,
" आपण न्यानो कार घेऊया का ?"

उपरोधाने मी विचारले, 
" पैसे माहेराहून आणणार का ?"

शांतपणे ती उद्गारली, 
" माहेराहून कशाला ? 
हे तुमचे न खपलेले कविता-संग्रह आणि पुस्तके रद्दीत घालू की !
त्यात कार आणि पेट्रोल - दोन्ही खर्च अगदी सहज भागतील !"

पेट्रोल पिल्यासारखा माझा चेहरा तुम्हाला दिसलाच असेल !
.

विसराळू बहिरा

आमचं म्हातारपण, फारच वाईट हो ! 

सकाळचं कोवळं ऊन खात, 
मी खिडकीजवळ जरा निवांत बसलो होतो.

समोरच्या खुर्चीवर बायको बसली होती. 

आमच्या गप्पा चालू होत्या, काही वेळ शांततेत गेला.

थोड्या वेळाने, सतत तीनचार मिनिटं तिच्या हातवाऱ्याबरोबर 
तोंडाची हालचालही मला दिसू लागली होती....

नक्कीच ती मला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असावी... 
म्हटलं, हिच्या आवाजाला झालं तरी काय !

मला राहवेना ;
मी ओरडलो-
" अग, घशात काही अडकलं आहे का ?
 नुसतच तोंड काय हलवतीस, काही बोलायचं आहे काय ?
 सांग ना लौकर काय ते ! "

काही क्षण तसेच गेले, 
बायको माझ्याकडे नुसतच पहात राहिली ..

नंतर ती खुर्चीवरून सावकाशपणे उठली, 
आणि ... 

माझ्या कानातून खांदयावर घसरलेलं,
माझं "श्रवणयंत्र" माझ्या कानात नीट बसवलं !

या म्हातारपणामुळे मी 'बहिरा' तर आधीच झालो होतो,
.... आजपासून 'विसराळू' पण ?

एकापेक्षा एक

छे छे छे !

काहीच समजेनासं झालंय हो !

कसं आवरावं बरं,
बायको आणि तिच्या आईच्या 
अखंड आणि मोठ्या आवाजात चाललेल्या ह्या आपापसातल्या बडबडीला !

बाहेरच्या गणपतीच्या मंडपासमोरून जाणा-या
 मिरवणुकीतल्या डॉल्बी सिस्टमवर ..

छानपैकी शांताबाई, सैराट, कल्लोळाची गाणी चालू आहेत ..

पण...

या दोघींच्या आवाजाच्या गोंगाटात, इच्छा असूनही,
मला त्या मस्त मस्त गाण्यातला 
एक शब्द कानावर नीट ऐकू येईल तर शपथ !
.

पाहुणचार

यजमान स्वागताला दारात उभे असतानाच,

"अग, पण मी तुला ---"

"अहो पण मी, लगेच ब्याग ----"

. . .अशी आपापसात तणतण करत,
हातातल्या ब्यागा सावरत मिस्टर व मिसेस पाहुणे घरात आले.

त्रासिक मुद्रेने मिस्टरांनी बहुधा मिसेसवरचा राग व्यक्त करण्यासाठीच,
हातातला मोबाईल सोफ्यावर आदळला.

मिसेसनी नुसते त्यांच्याकडे बघत,
नाक मुरडत स्वैपाकघराकडे पावलं टाकली,

..... यजमान भलतेच चाणाक्ष !

त्यांनी आपल्या मुलाकडे नजर टाकून खुणावले .
मुलगा लगेच एका ताटलीत मोबाईलचा चार्जर ठेवून, 
ती ताटली आदबीने मिस्टरांपुढे धरून उभा राहिला !

यावेळी मिस्टरांना नाहीतरी नकोच होते... 
अगदी चहाचे पाणीसुद्धा ! 

त्याऐवजी अगदी मनातली हवी असलेली गोष्ट..... 
अचानक पुढ्यात आल्याने, 
मि. पाहुणे एकदम खूष होऊन गेले !

आपल्या घरातून बाहेर पडून, यष्टीतून उतरताना, 
मिस्टर आणि मिसेस पाहुण्यांना आपण मोबाईलचे चार्जर 
घरातच विसरल्याचे ध्यानात आले होते . . . ! 
.

हायकू

१.

शब्द पाखरु
मनाच्या घरट्यात
फिरे वाह्यात ..
.

२.

मन तुरुंग
कल्पनेची भरारी
शब्द फरारी ..
.

आशावादावर पाणी

छे छे छे ..

दुपारच्या जमेल त्या कुक्षीतल्या स्वप्नांनी,

 मला भलतेच हैराण केलेय ब्वा !

काय तर म्हणे ...

आपले सगळे लोकप्रतिनिधी,
एकमताने वाढवून घेतलेले व यापुढेही मिळणारे,

 आपले सर्वच्यासर्व मानधन।वेतन,
आपल्या देशाची मान उंचावणा-या,
ऑलिंपिक पदक जिंकणा-या विजेत्यांना दान करणार !

... पण..
नतद्रष्ट बायकोने,
माझ्या स्वप्नातल्या खुळ्यासारख्या वाटणाऱ्या भोळ्या आशावादावर,
मला गदागदा हलवून जागे करत,
चक्क ग्लासातले पाणी पाडले की हो !
.

जेव्हा मनी सखीचा - [गझल]

जेव्हा मनी सखीचा माझ्या विचार करतो 
प्राजक्त अंगणी का तिकडे उगा हुरळतो

प्रेमास ऊत येता सगळेच गोड वाटे 
हसतेस गोड तूही मिरची जरी भरवतो

न्याहाळता न तुजला क्षण एक थांबुनीया 
शोधात चांदणीच्या वेड्यासमान फिरतो

सत्यातला भिकारी मी दास लक्षुमीचा
स्वामी तिन्ही जगाचा स्वप्नात होत रमतो

सुख देउनी चिमुटभर दु:खात बुडवशी तू 
आम्हास न्याय देवा ना तव अजब उमजतो ..
.

स्वातंत्र्यदिन

स्वैपाकघरातून खणखणीत आवाजात बायकोचा प्रश्न कानावर आदळला-
"अहो, ऐकलंत का ?"

मीही हॉलमधून ओरडूनच दणदणीत आवाजात प्रत्युत्तर देण्यासाठी, 
तोंड उघडणार होतो, पण "काही कारणा"ने तसे करणे अशक्यच होते. 
[ते कारण, सूज्ञ अनुभवी नवरेमंडळीच सहजपणे ओळखू शकतील !]

स्वैपाकघराच्या दारापर्यंत गेलो.
तिचे लाटण्याने कणिक तिंबणे चालू होते.

पुरेशा अंतरावरून उभ्याउभ्याच मी विचारले,
"काय ग, मला काही म्हणालीस काय ?"

बायको दाणकन लाटणे कणकीच्या गोळ्यावर आपटत उत्तरली,
"दुसरे कुणी आहे का आता घरात [-वस्सकन ओरडण्यासारखे ?] !
अहो, आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ना ?"

[मी मनात म्हटले- 'माझा कधी आहे कुणास ठाऊक, 
तुझ्या तावडीतून सुटण्याचा स्वातंत्र्यदिन ?' ]

तिला उत्तरादाखल नंदीबैलासारखी नुसतीच मान हलवली मी !

ती पुढे म्हणाली-
" आज काहीतरी गोड पक्वान्न नको का करायला मग ?"

[मी मनात म्हटले- 'तू नुसते गोड बोललीस तरी, 
मला एखादे पक्वान्न गिळल्याचा आनंद होतो ग माझे आई !']

"मग श्रीखंड जामून जिलेबी लाडू.... 
काय घेऊन येता ?" 
- तिने मला विचारले.

लग्नाच्या बेडीमुळे गेली ४३ वर्षे पारतंत्र्यात अडकून वावरणारा मी---
काय उत्तर देणार होतो हो बापुडा !

मी विचारले- "श्रीखंड जामून जिलेबी लाडू, काहीही आवडते मला. 
यातले तुला काय आवडते ते आणतो !"

त्यावर ती उत्तरली- " आज एवढा स्वातंत्र्यदिनाचा महत्वाचा दिवस. 
बासुंदीच आणावी म्हणते मी !"

देशात सर्वत्र साजरा होणाऱ्या या महत्वाच्या दिनी,
माझ्यातला बिच्चारा नवरा काय उलट बोलणार यावर ?

मुकाट्याने बाहेर पडलो---
माझा सर्वात जास्त नावडता पदार्थ आणायला !
.

चांगले तू वाग.. [गझल]


'चांगले तू वाग..' त्याला नेहमी उपदेशले
घर कितीदा मीच माझे लडखडत पण शोधले ..

पूर येता लेखणीला शब्दही आनंदले
हायकू गझला नि कविता लोक वाचू लागले ..

लहर आली पावसाला अन तरू सजले पहा
कैक पानांवरच त्याने छान मोती ठेवले ..

दु:ख माझे दडवुनीया वाटला आनंद मी
विदुषकाचे वेड माझे ना कुणाला समजले ..

माणसांना जोडले मी छंद माझा आगळा
छंद त्यांचाही अनोखा माणसांना तोडले ..
.

नाव माझ्या मी सखीचे ..[गझल]

नाव माझ्या मी सखीचे जे किनारी कोरले 
लाट आली मत्सरी का धावुनी ते खोडले ..
.
बाग होती भेळ होती बाकडेही शोधलेे
आठवाने पण सखीच्या दु:ख माझे वाढले ..
.
वादळेही वेदनांची झेलली मी लीलया
ना सखीच्या आसवांना त्या कधी मी पेलले ..
.
बोल म्हणता दोन शब्दां 'बरय येते' बोलली
वाकडे हे बोलणे ना साजणीला शोभले ..
.
सवय इतकी बडबडीला ऐकण्याची जाहली
मौन पण ते ऐकुनीया कान माझे त्रासले ..
.
नाव डोले बघ सखे ही कागदी पण छानशी
आठवण डोकावली अन बालपणही डोलले ..
.

मग सुखास जागा कुठली .. [गझल]

दु;खांची गर्दी जमली
मग जागा सुखास कुठली

का भाव सुखाचा पडता
बाजारी दु:खे हसली

दु:खांचा उजेड आला
सावली सुखाची सरली

दु:खांची करता विक्री
का पांगापांगच दिसली

हा कोलाहल दु:खांचा
आनंद भावना बुजली ..
.

खोट्यास भाव आहे ..[गझल]

 खोट्यास भाव आहे
पाठीस नाव आहे..

भवनात झोपला जरि
चर्चेत ताव आहे..

संधीच साधतो तो
त्याला सराव आहे..

कर घोषणा कितीही
सत्तेत वाव आहे..

सोबत नसेल चटणी
खाण्यास पाव आहे..

सात्वीक चेहरा पण
भलतीच हाव आहे ..

.

टु गो... ऑर... नॉट टु गो --- ?

कुठे जायचं
चालायचं म्हटलं तर,
फारच जिवावर येऊ लागलंय ब्वा !

त्यातही 
पुलाशी संबंध येणार असेल, 
तर जास्तच धडकी भरतेय ---

कधी आपल्या जिवावर बेतेल -
सांगताच येत नाही कुणाला !

पुलावरून चालावं म्हटलं तर,
आपल्यामुळे
पूल कोसळायची भीती ---

आणि..

पुलाखालून चाललो तर ,
वरून अचानक
धाडकन आपणहून
पूलच अंगावर पडायची भीती !!
.

भेट घडता दो जिवांची बांध झाले पापण्यांचे ..[गझल]

भेट घडता दो जिवांची बांध झाले पापण्याचे
पूर त्यांनी थोपवीले भावनेतुन वाहण्याचे

मी तुझा अन तूच माझी एक दोघे जाहलो की
या जगाला काय कारण मग मिठीतुन जाणण्याचे

दूर असता आपल्याला आणले ना जवळ कोणी
वेड होते एकमेका भरुन डोळे पाहण्याचे

दोन होते ध्रुव तेव्हा एकवटले आज बघ हे
गोल पृथ्वी हीच नक्की योग कुठले हरवण्याचे

वर गगन ते जमिन खाली क्षितिज आहे संगतीला
फक्त दोघे ठेव ध्यानी विश्व आता विसरण्याचे ..
.