लुकलुके ती चांदणी का --[गझल]

लुकलुके ती चांदणी का रोज पाहुन मजकडे
तूच का ती भास सखये लक्ष ठेवुन मजकडे ..

माळलेला मी सखे तुज आवडे गजरा किती
आणतो संदेश वारा खूष होउन मजकडे ..

खूप झाली नजरभाषा आपली नजरानजर
शब्दही कंटाळले का बघत राहुन मजकडे ..

ना करी स्वीकार माझा टाक करुनी ठार तू
ना करी तू वार बसुनी नजर लावुन मजकडे ..

जीवनी अंधार माझ्या ह्या जगा पाहू कसे
खेळ असुरी दैव बघते नजर टाकुन मजकडे ..

बोलले ना शब्द एकहि जगत होतो मी जरी
पाहती सरणावरी ते अश्रु ढाळुन मजकडे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा