दत्त दिगंबर दत्त दिगंबर.. भक्तीगीत

दत्त दिगंबर दत्त दिगंबर घेऊ मुखाने नाम
मिळवू जीवनात सुखधाम..

दत्त दिगंबर मंत्र जपा हो

भावभक्तीने स्मरण करा हो
गुरुदत्ताच्या कृपे लाभतो संकटास विराम..

त्रिशूल कमंडलू शोभती हाती 

शंख नि डमरू नाद घुमवती
चक्र सुदर्शन फिरते हाती विश्वाला आराम..

वसुधा उभी गोमाता रुपाने

वेद चारही श्वानरुपाने
दर्शन घेऊ श्रीदत्ताचे आयुष्यात ये राम..

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर

सोपे करती जीवन खडतर
करू प्रार्थना मनापासुनी शांत हो आत्माराम..
.

विसरून भान, चला करू ध्यान.. भक्तीगीत

विसरून भान, चला करू ध्यान
दंगून जाऊ नामस्मरणात छान..

पंढरीची वारी करू पांडुरंग पाहू
विठ्ठल विठ्ठल नाम घेत राहू
दर्शन विठूचे घेऊ थोर सान..

वाळवंटी जाऊन जयघोष करूया
चंद्रभागेत न्हाऊन पुण्य मिळवूया
दान करू साठवू चित्ती समाधान..

टाळ वीणा चिपळ्यांचा घुमवूया नाद
विठ्ठला पांडुरंगा घालून साद
भजनात किर्तनात तृप्त करू कान..
.

गुलाब हाती झेलले जरा होते मी.. गझल

शुभगंगा वृत्त..
(८+८+६ मात्रा)

गुलाब हाती झेलले जरा होते मी
टोचुन काटे घेतले जरा होते मी

विजयी ठरलो झुंज देत मी मरणाशी
डाव यमाशी खेळले जरा होते मी

टाळत होतो सावलीसवे उन्हास ज्या
पायदळीही ठेचले जरा होते मी

रडलो होतो सुखातही मी कधीतरी
दु:ख हासुनी पेलले जरा होते मी

जीवन माझे रिक्त शिंपले जे आता
सुरेख मोती वेचले जरा होते मी..
.

कशासाठी पोटासाठी- कविता

कुणीतरी कधीतरी 
एकदातरी जेवताना 
इकडे लक्ष देईल का.. ?

घरात मेजवानी झोडताना
आपण "माणूस" होण्याचे 
जरासे कष्ट घेईल का - !

अन्न पुढ्यातल्या ताटात 
माजून टाकत असताना, 
आपले ताट पाहिल का..?

अख्खी मेजवानी नाही
पण जमलाच तर
त्यातला एखादा घास ..

दारातल्या 
भुकेल्या पोटासाठी
घरातल्या ताटात ठेवील का .. ?
.

श्री स्वामी समर्था... भक्तीगीत

श्री स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था
आलो शरण चरणी तुमच्या स्वामी जगन्नाथा

भक्तांचे तुम्ही कैवारी  आम्हा पावता सत्वरी
हाकेला धावून येता चिंता ना मुळी अंतरी

भीत नाही आम्ही हो तुम्ही उभे पाठीशी
नामस्मरणी गुंतता नसते काळजी थोडीशी

जपतो एकच मंत्र "श्री स्वामी समर्थ"
काळ ना घालवतो आम्ही जीवनातला व्यर्थ

मंदिरात मन रमते हो येतो धावत नेहमी
घडता दर्शन तुमचे हो दु:ख विसरतो आम्ही

भजनी रमता तुमच्या होते सोने आयुष्याचे
लोटांगण घालता वाटते सार्थक जीवनाचे !
.

"तू तिथे मी..".. कविता

तू तिथे मी..तू तिथे मी..
गोंडा घोळत म्हणायचास नेहमी
सारखी सारखी वळवून मान
माझ्यापुढे तू करायचास कान..

माझा हात आपल्या एका हातात
कुरवाळत होतास दुसरा केसात
माझ्या लांबसडक केसांतला सुगंध
करत होता किती किती तुला धुंद..

मांडीवर घेऊन माझे मस्तक
डोळ्यात पहात रहायचास एकटक
ऐकत होतास रे मनापासून तू
तुला मी म्हटलेले, आय लव यू..

आता जरी ऑफिस एके ऑफिस 
जाताना घेत जा एक तरी किस
प्रेम हळुवार करून दाखव जरा
येताना आण मला एखादा गजरा..

वाटेकडे डोळे लागलेले असतात
तुझ्या नजरेत फायलीच दिसतात
घे मिठीत, पौर्णिमेच्या चंद्राला बघत 
पूर्वीचं आपलं प्रेम मनात आठवत..!
.

विठ्ठला, दर्शन कधी घडणार-

विठ्ठला, दर्शन कधी घडणार
थकले डोळे, देहही थकला
जीवन हे सरणार..

विठ्ठल विठ्ठल नाद रंगतो

नाम तुझे घेण्यात गुंगतो
टाळ मृदंगी जीव दंगतो 
भजनातच रमणार..

रूप विठूचे बघत सावळे

भान विसरतो आम्ही सगळे
मनी दाटती भाव आगळे 
वाट किती बघणार..

रांग लांब ही दर्शन घेण्या

हात जोडुनी वंदन करण्या
मंदिरात बघ उशीर शिरण्या 
कळसच का दिसणार..
.

कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे.. गझल

लवंगलता वृत्त..(मात्रा- ८+८+८+४,
रदीफ- येथे, काफिया- सादर, घागर,
अलामत- अ )

कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे
पाणी ओतू नका पालथी आहे घागर येथे..

संस्काराचा लवलेश कुठे आढळतो ना जेव्हा
विनयभंग तो समजत फासू मुखास डांबर येथे..

निर्दयतेने झाड तोडतो उत्साहातच कोणी
असेल पण त्या चिमणीलाही दु:ख अनावर येथे..

पाखराविना उदास आहे उभे झाड हे आता
फळभाराने झुकले तेव्हा होता वावर येथे..

सबला होते हतबल अबला निर्धार जरी केला
मानव का तो वासनेमुळे बने जनावर येथे..
.