कविता वृक्ष
" स्वामी समर्था, संकटहर्ता - "
स्वामी समर्था, संकटहर्ता
दुबळ्यांचा तू रक्षणकर्ता ..
"भिऊ नकोस,पाठीशी आहे"
नित्य वचन हे ध्यानी आहे ..
रात्रंदिन स्मरणात गुंततो
मनोमनी मी तुला वंदितो ..
माझे दु:खहरण तू करशी
मज आनंदी क्षणही देशी ..
शक्य अशक्यासी तू करशी
अद्भुत लीला सहज दाविशी ..
उपकार तुझे मानु किती मी
अनंत जन्मी तुझा ऋणी मी .. !
.
" श्री गुरुदेव दत्त.."
'श्री गुरुदेव दत्त' करा जप आनंदाने
जीवन आपले जगत रहा शांत चित्ताने..
आळशी होऊन कर्तव्याला चुकू नका
कर्तव्यपूर्ती आनंदाला मुकू नका..
दत्त गुरूंचे स्मरण करा जमते जेव्हा
नामजपाची गोडी वाढवा मनात तेव्हा..
ध्यानीमनी नित्य असू द्या मूर्ती दत्ताची
भजन कीर्तन यात रमू द्या ओढ चित्ताची..
'श्री गुरुदेव दत्त' जपता नयनासमोर मूर्ती
हृदयी वसू द्या दत्तगुरूंचा महिमा आणि कीर्ती..
वंदन मनापासून करावे दोन्ही कर जोडुनी
शरणागत सद्गुरूस व्हावे शांती सुखाचे धनी..!
.
आकाशाने भाव मनीचे जणू जाणले..गझल होते
लवंगलता- मात्रावृत्त..
८+८+८+४ मात्रा
अलामत.. अ
रदीफ.. होते
.....................................
आकाशाने भाव मनीचे जणू जाणले होते
दुष्काळाने त्रस्त भुई ते बघत बरसले होते ..
का दाखवली वाट सुखाची मज देवाने तेव्हा
दु:खी मन हे गाण्यामध्ये माझे रमले होते ..
किती वेदना मजेत होत्या मनात नांदत माझ्या
मी आनंदी दिसता सुखही रुसून बसले होते ..
बडबड कानी ऐकून तिची हैराण जरी झालो
मौनानंतर शब्द ऐकण्या मन आतुरले होते..
रंग माणसे बदलत होती पाहत होते सरडे
वरचढ झाली किती जाणुनी ते हिरमुसले होते..
.
क्षणात जेव्हा गुलाब हसतो.. गझल
क्षणात जेव्हा गुलाब हसतो
उदास काटा मनात खुपतो..
म्हणे न कोणी जगात दु:खी
सुखी कुणीही मला न दिसतो..
तिने झुलवणे तिचे न येणे
जिवंत असुनी मनात मरतो..
कधी पहाटे तिच्या मिठीचे
अधीरतेने 'सपान' बघतो..
असे करावे तसे करावे
मनी ठरवतो तसाच बसतो..
.
पाच दोनोळ्या..
झाला विस्मित अती मृतात्मा श्रद्धांजली ऐकुनी..
हसवत बसतो तो लोकांना आवडते म्हणुनी
फसवत असतो स्वतःस पण तो व्यथा दडवुनी..
कटीवर हात ठेवत तू निवांत उभा रहा विठ्ठला
दाखव दुष्काळात माझ्या गावी तू पाऊस पाडुनी..
फूल न साधे दिले कुणी जिवंतपणी ज्याला
निघाला पहा खांद्यावर तो हारांनी सजुनी..
समोर न भेटलीस मला तू नाही बिघडत काही
दिसते तुझीच प्रतिमा घेता डोळे बंद मी करुनी..
.
गाढवाची शाळा..(बालकविता)
झाले शाळेत सगळे उत्सुक प्राणी गोळा
हत्ती बनला हेडमास्तर लांब सोंड उंचावून
सिंह झाला पर्यवेक्षक आपली मान हलवून
गेंडा ठरला मॉनीटर वर्गाचा मग एकमताने
ऐकून खूप खूष गेंडा जयजयकार जोराने
हरीण शेळी गाय ससा वर्गात पुढे बसले
वाघ बोकड लांडगा कोल्हा सर्व मागे बसले
मान खाली घालून जिराफ मास्तर वर्गात
थांबला वर्गाबाहेर शहाणा उंट उंच सर्वात
इकडे तिकडे माकड उड्या मारत होते
बैल घोडा शेपटाने माशा सारत होते
आले गाढव पहायला नवीन आपली शाळा
वर्ग सोडत सर्व प्राणी त्याच्याभवती गोळा
इतके विद्यार्थी झाले माझ्या शाळेत भरती
आनंदी गाढव लोळू लागले उकिरड्यावरती !
.
सहा चारोळ्या..
कोठवर चालायची -
मौन तुझे, मीहि संधी
न घेतो बोलायची ..
.
अजब खेळ पावसाचा
धरतीच्या लेकराशी-
गाव एखादा उपाशी
गाव एखादा तुपाशी..
.
शक्य वाटते दगडातही
"देव" पाहणे-
अवघड वाटते माणसांत
"माणूस" शोधणे..
.
जो तो हात जोडतो
मागण्यास सुख देवापुढे-
सुख पडताच पदरी
पाठ फिरवतो देवाकडे..
.
आयुष्याची नाव निघाली
धाव घेउनी किना-याकडे,
'उरला प्रवास असाच घडावा'
देवाला घालतो साकडे !
.
हिंडतो मी वेदनेला
घेउनीया संगती-
मत्सरी सुख होत नाही
मज कधीही सोबती..
.
गजानना गजानना.. (भक्तीगीत)
सद्बुद्धी दे सकलांना
समाधान सुख आम्हा देशी
विघ्न संकटे दूर तू करशी
नष्ट करावे अविचारांना
मनी भरावे सुविचारांना
द्वेष नको भांडणे ना मनी
प्रेम सलोखा नित्य जीवनी
सदैव आचरतो सद्वर्तन
तुला स्मरूनी घेतो दर्शन
असशी दुःखात तूच आधार
जीवन सागर सुखात पार
करतो प्रार्थना तुला गणेशा
पूर्ण करी सर्वांच्या अपेक्षा..!
.
पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी.. गझल
८+८+८.
..........................................
पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी
होता कौतुक पण इतरांचे जाशी पळुनी..
पावसातली भेट आपली का आठवली
आठवणींच्या सरीत गेलो पुरता भिजुनी..
तिने वाचली माझ्या नयनी कथा व्यथेची
दादही दिली तिने मग मला आसवांतुनी..
फुलांसवे मी किती खेळलो बागेमध्ये
काट्यांनी पण सूड घेतला मला टोचुनी..
आठवणींचे पंख लावले मनास माझ्या
फिरून आलो पुन्हा तिच्या मी दारावरुनी..
.
अनाथांच्या नाथा पंढरीनाथा..
दीनदयाळा तू भक्तांचा त्राता..
पायी वारकरी मैल पार करी
दर्शनाची ओढ ठेवून अंतरी..
राम कृष्ण हरी जयघोषात वारी
पांडुरंग चित्ती सांगे एकतारी..
तल्लीन भजनी टाळ मृदुंग ध्वनी
वारकरी चालती शिस्त समाधानी..
विठ्ठल मुखात विठ्ठल मनात
सान थोर सगळे दंगले नामात..
स्वच्छ तन मन चंद्रभागा स्नान
डोळ्यात सुंदर सावळ्याचे ध्यान..
पाय विठ्ठलाचे मस्तक भक्ताचे
टेकले म्हणता सार्थक जन्माचे.. !
.
माणसे .. (गझल)
गालगाल गालगाल गालगाल गालगा
............
खोपटातली सुखात राहतात माणसे
बंगल्यातली उदास वाटतात माणसे..
पाठ पाहुनी लगेच नाक वाकडे किती
का समोर गोड गोड बोलतात माणसे..
कौतुकास ना पुढे कधीच जीभ येतसे
भेटता उणेदुणेच काढतात माणसे..
स्वागतास धावती बघून 'राव' पाहुणा
पण गरीब पाहुण्यास सारतात माणसे..
कार्य हातुनी न होतसे नवीन चांगले
जुन्याच मग कथा पुन्हा उगाळतात माणसे..
.
आजीचा लाडका दोडका मी.. (बालकविता)
नेहमी घरात खेळतो मी
माकडउड्या बेडूकउड्या मारतो मी..
आजीला पायरीवर बघतो मी
मनातल्या मनात हसतो मी..
हळूच आजीच्या मागे जातो मी
गुपचुप डोळे तिचे झाकतो मी..
आजीच्या खांद्यावर बसतो मी
"पोतं घ्या साखरेचं पोतं" म्हणतो मी..
आजीसोबत खूप खेळतो मी
आजीचा लाडका दोडका मी..!
.
स्वामी समर्था, स्वामी समर्था ...
दोन चारोळ्या..
तीन चारोळ्या..
धो धो धो धो पाऊस झाला
पूर किती कवितेला आला -
बनल्या कवितांच्या होड्या
पुरात आनंद वाहू लागला ..
.
२
का आभासी दुनियेमध्ये
वाटे आपुलकीचे नाते-
अनुभव येता, धक्के खाता
"परके अपुले" उमजत जाते..
.
३
दारी मरणाच्या कळले
घरात जगणे होते सुंदर-
हातचे सोडून पळत्यापाठी धावणे
माझे होते वरवर..
.
मायबाप राबतात.. गझल
अशाच "माणसां"त मी कसे पुन्हा रमायचे --- गझल
त्रिवार भेटले तरी अनोळखी बघायचे ..
जपून जात ती कधी न ठेवली मनात मी
विचारती मलाच ते सहन किती करायचे ..
जिवास चैन ना पडे उदास रात्र जागतो
तुफान उसळते तरी मनास आवरायचे ..
प्रवास जीवनातला नि ऊन खूप तापते
तिथे नसेच सावली जिथे मला बसायचे ..
कशास पोट हे दिले भरीस भूक ईश्वरा
विहीर आड कोरडे उगाच डोकवायचे ..
.
आपण काही खरडत नाही .. गझल
इतरांचेही भावत नाही..
करती मिळून इतर चांगले
खीळ घालतो करमत नाही..
वरचढ होतो दुसरा कोणी
पाण्याशिवाय पाहत नाही ..
बोलत नाही आपण काही
दुसऱ्याची री ओढत नाही..
सरकत नाही कधी पुढे तो
मदतीलाही धावत नाही..
.
कोरोना, सांग कधी जाणार ..
छळवादी तू, हटवादी तू
अंत किती बघणार..
गर्दीला ना कुणी आवरे
मास्कविनाही असंख्य चेहरे
खात दंडुके पाठीवरती शहाणेही फिरणार..
संसर्गाची खंत ना कुणा
नियमभंग पण खेद ना कुणा
डिस्टन्सिंगचा फज्जा नेहमी असाच का उडणार..
ठाऊक असते जमावबंदी
घोळके परी फिरती छंदी
असती डोंगर दुरुन साजरे माहित कधी होणार..
पेशंट निजे मृताभोवती
उपचाराची मनात भीती
एकच आशा कोरोनाच्या विळख्यातुन सुटणार..
.
स्नेह फेसबुकातला-
जगण्यातले सत्य आणि स्वप्न मांडणारे गझलकार – विजयकुमार देशपांडे
माधव राघव प्रकाशन ताळगाव, गोवा यासंस्थेतर्फे ‘काव्यास्वाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एका कवी/कवयित्रीची कविता/गझल अथवा मुक्तछंदातील रचना घेऊन त्या रचनेचे रसास्वादात्मक रसग्रहण करण्यात येणार आहेत. गझलकार, पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर तसेच कवयित्री चित्रा क्षीरसागर हे रसग्रहण करणार आहेत. या सदरात कवीचा अल्पपरिचय, प्रकाशित पुस्तके समाविष्ट करण्यात येणार आहे.
आज या उपक्रमात आपण भेटणार आहोत, सोलापूर येथील एक ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार देशपांडे यांना. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. आता ते निवृत्त आहेत. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले विजयकुमारजी मात्र साहित्य क्षेत्रात रममाण झालेले आहे. सातत्याने लेखन करणारे विजयकुमारजी समर्थ रामदास स्वामींचा दिसामाजी काहीतरी ते लिहावे हा मंत्र आचरणात आणत आहे. परंतु लिहायचे म्हणून काहीही ते लिहीत नाहीत. सोलापुरातील बहुतेक दैनिकांतून आणि नियतकालिकांतून त्यांचे साहित्य नियमित प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांतून ते लेखन करीत आहेत. हायकू व चारोळ्या या अल्पाक्षरी काव्यापासून विडंबन, वात्रटिका कविता आणि गझल लेखनात त्यांचा हातखंडा आहे. काव्याबरोबरच गद्यलेखनातही त्यांनी झेप घेतली आहे. बालसाहित्य, लघुकथा, ललित लेखन आणि विनोदी तसेच निबंध आणि एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. फेसबुकवर आणि स्वतःच्या ब्लॉगवर त्यांचे सतत लेखन सुरू असते. सोलापूर आणि पुणे आकाशवाणीवरून त्यांचे काव्यवाचन झालेले आहे. त्यांचे दैव जाणिले कुणी हे अप्रकाशित नाटक असून, आभाळमाया आणि काव्यसुगंध या दोन प्रातिनिधिक संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. त्यांचे स्वतःचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यातील एक चांदोबाचा दिवा हा बालकवितासंग्रह आणि सखे तुझ्यासाठी हा चारोळी संग्रह प्रकाशित झालेला आहे. पुण्यातील मराठीबोली समूहातर्फे लोकसाहित्यिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांच्या फेसबुकवरील अनेक गझल व शेर तसेच कविता आणि विडंबने ही दाद मिळवून जातात. त्यांच्या पुस्तकांवर अनेकांनी परीक्षणात्मक लेखन केले आहे. ते त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळते. बँकेतली आकडेमोड करता करताच गझलेतील मात्रा मापन पक्के झाले. गझल निर्दोष कशी असावी याविषयी ते दक्ष असतात. त्यांनी अनेक वृत्तांमध्ये लेखन केले आहे. त्यांची विडंबने ही सात्विक असतात. त्यात उगाच ओढून ताणून काही नसते.
आता त्यांच्या गझलेचे आकलन करून घेऊ. अर्थात मी कुणी मोठा समीक्षक असल्याचा माझा दावा नाही. एक रसिक म्हणून आणि वाचनाची आवड नसल्याने तसेच स्वतः थोडेफार लेखन करीत असल्याने त्यांच्या गझलेचे आस्वादक परीक्षण करू शकेन.
या गझलेत विजयकुमारजींनी जगाच्या रहाटगाडग्याचे यथार्थ वर्णन केले आहे. लोकांचे स्वभाव नेमक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची स्थिती देशापुढे अनेक समस्या निर्माण करणारी आहे. लोक अनेक व्यथांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थिती लोकांच्या मनाचे वर्णन करणारी ही गझल आहे.
गझल उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो
उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो
जागोजागी घडे पालथे जरी पाहतो
घेत राहतो रोजच फाशी कुणीतरी पण
कुठला नेता पोट उपाशी धरून बसतो
एक वेगळी तुजवर कविता कशाला करू
नजरेसमोर कायम प्रतिमा तुझी ठेवतो
गावामधल्या सुधारणाची रोज वल्गना
पण त्यासाठी शहर कुणीही सोडत नसतो
होते माती जास्ती धरता हाव जर मनी
माहित असले तरी न संधी कोण सोडतो
--------
अनलज्वाला वृत्तात लिहिलेल्या या गझलेच्या पहिल्याच शेरात ते सतत उपदेश आणि फक्त उपदेशाचा मारा करणाऱ्या लोकांवर ते शेरेबाजी करतात. काही लोकांना आपल्या पायाखाली काय जळते हे न पाहता दुसऱ्याच्या चुका दाखवणेच समजते. किंवा तीच त्यांची वृत्ती असते. ते म्हणतात, मला तू सतत उपदेशाचे डोस कशाला पाजतोस रे बाबा, तुझ्या नशिबाचे पालथ घडे मला जागोजागी दिसतात. उणेदुणे स्वतःचे कुठे दिसते कुठे असा प्रश्न मनात येतो. आपले काहीच धड नसताना, आपल्याला काही अनुभव नसताना उपदेशाचे डोस पाजणे प्रत्येकाला छान जमते. ही जनमानसाची वृत्ती आहे.
शेतकरी, तरुण आणि स्त्रिया असे कुणी कुणी नैराश्याने ग्रासलेला आहे. बेरोजगारीमुळे प्रत्येक जण व्यथित आहे. शिक्षण घेऊनही नोकरी किंवा रोजगार मिळेलच अशी खात्री नाही, शाश्वती नाही कुणाला भाकरीची अन् गरज आहे चाकरीची अशी प्रत्येकाची स्थिती आहे. अनेकदा पदव्यांचे भेंडोळे घेऊन कंपन्यांच्या दारोदारी फिरणारे तरुण आणि दुसरीकडे नोकरकपातीची भीती, शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुगीनंतर भावच मिळत नाही. त्याच्या मालाला मातीमोलाने मागितले जाते. कर्जाचे डोंगर उरावर घेऊन शेतकरी जगत असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आहे. सावकार काय आणि बँका काय सतत तगादे लावतात. जप्तीची भाती घालतात. अशा परिस्थितीत त्याचे जगणे सतत भीतीच्या सावटाखाली असते. अशा सतत आत्महत्येच्या व भुकेने व्याकुळ झालेल्यांच्या आत्महत्या वाढत असताना निर्ढावलेले नेते मात्र एसी कार्यालयात बसून नुसते योजनांचे भेंडाळे जाहीर करतात. त्यांच्या भुकेने व्याकुळ होऊन कुणा नेत्याने कधी उपोषण केल्याचे ज्ञात नाही.
गझलमध्ये प्रेमाचा संदर्भ आला नाही तरच नवल. विरह, प्रेम, प्रणय आणि भावुकता हे गझलेमध्ये येत असते. गझलकार म्हणतात, माझ्या हृदयात तुझे स्थान अढळ आहे. आणि माझ्या मनात तुझी प्रतिमा सतत उजळत असते. मनी वसे ते नयनी दिसे (स्वप्नी तर दिसतेच) असे असल्याने सखीची प्रतिमा सतत माझ्या नजरेसमोर आणि मनात असल्याने तिच्यावर वेगळी कविता लिहिण्याची गरजच नाही. साक्षात प्रिय सखी सतत अवतीभवती असल्याने तिचे वर्णन कुणासाठी करायचे. स्वान्तःसुखाय अशी साहित्य साधना करायची असताना माझी प्रत्येक कविता ही सखीवर आणि सखीच असते, मग कविता आणि सखी वेगळी कुठे आहे, असे गझलकार या शेरात म्हणतात.
नोकरीच्या निमित्ताने शहरात गेलेल्या चाकरमान्यांना आणि ग्रामीण भागातून निवडून आलेला नेता सतत विकासाची व ग्रामसुधारणेची पुडी सोडत असतात. आपले गाव सुधारले पाहिजे अशी वल्गना चाकरमानी करीत असतात. नेतेही करीत असतात, परंतु प्रत्यक्ष गावात जाऊन सुधारणांच्या योजना राबवण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, या बोचऱ्या परिस्थितीची जाणीव हा शेर करून देतो. नुसत्याच वल्गना करणे हा माणसांचा स्वभाव आहे. आपल्याला काही करायचे म्हटले की काढता पाय घेण्याच्या वृत्तीवर हा शेर प्रहार करतो.
शेवटच्या शेरात गझलकार म्हणतात, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा अधिकस्य अधिक फलं प्राप्त करून घेण्याचा असतो. अनेकदा तो इतकी हाव करतो की, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हे माहीत असूनही तो आणखी मागतच असतो कधी देवाकडे कधी आप्तस्वकियांकडे. सामान्य माणूस असो की अब्जाधीश त्याला संपत्तीची हाव असतेच. आजकाल तरुण तरुणींना आपण अधिकाधिक सुंदर दिसावे अशी हाव असते मग ते प्लास्टिक सर्जरी वगैरे करून घेत असतात, परंतु त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात, याची कुणाला तमाच नसते, हे हा शेर सूचित करतो. अति तेथे माती हा सिद्धान्त गझलकाराने मांडून तरीदेखील माणसे मला हे हवे ते हवे, अधिक हवे अशी कामना करतात. हे सगळे माहीत असले तरी एखादी संधी उपलब्ध झाल्यास कुणीही लाभ मिळवायचे सोडत नाही. या गझलेच्या प्रत्येक शेरात असा शाश्वत संदेश गझलकाराने दिला आहे.
कृपया कविता अथवा गझल आणि रसग्रहणावर अभिप्राय नोंदवा..
_____ प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ९०११०८२२९९
तासगाव, गोवा
०२/०६/२०२०
बसलो होतो ती जाता मी.. गझल
मात्रा वृत्त ८+८+८
.................................................
बसलो होतो ती जाता मी डोळे मिटुनी
आठवणींचे पक्षी गेले मनात फिरुनी..
निरोप घेण्या सामोरा मी थांबलो जरा
किती खुबीने लपवले तिने अश्रू हसुनी..
काही कडवट काही चविष्ट आठवणींना
घोळत गेलो का मी तिच्याच दारावरुनी..
आसपास तू आहेस सखे नक्की आता
गेले क्षणात सुगंधात मन बघ दरवळुनी..
वाटे कौतुक भेटीचे का अपुल्या त्याला
स्वागतास त्या सज्ज चांदण्या नभ हे भरुनी..
.
" आणू कुठून तुजला - - -" [हझल]
उगाच का छळे व्यथा .. गझल
उगाच का छळे व्यथा पुन्हा पुन्हा मनात ती
जरी प्रयत्न रोखण्यास भांडणे घरात ती..
विचार खूप धावती मनात सारखे तिचे
तिला समोर सांगतो अधीरता उरात ती..
घमेंड ना कुठे कधी फुशारकी न जाणवे
दिसे पदोपदी विनम्रता सुटाबुटात ती..
अबोल ती म्हणून मी तिच्यासमोर भांडतो
तरी न सोडताच मौन राहते सुखात ती..
कडाडते किती ढगात वीज जोर लावुनी
करी बळीस सावधान धावुनी नभात ती..
.
न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला ... गझल
पाखराला चोच देतो.. (गझल)
आज कोठे पाखराला लाभतो साधा निवारा..
पाहुनी भूमीस कसले खेळ खेळे तो विधाता
धाडतो दुष्काळ कोठे आणि कोठे तोच गारा..
काल तेथे बॉस होता आज येथे घरगडी तो
वेळ येता आवरावा लागतो घरचा पसारा..
नाव लिहितो मी तिचे का छानसे वाळूवरी त्या
लाट येते नाव पुसते बघत बसतो मी बिचारा..
आपल्या पदरास घेते ती कितीदा सावरूनी
पाहुनी का नेमका तो झोंबतो अंगास वारा..
.
हायकू ...
गर्दी बेभान
कोरोनाचे थैमान
शांती उध्वस्त ..
.
२.
सगळे बंदी
दंडुक्याचे फटके
किती आनंदी ..
.
३.
जीवनगाणे
रोजचे रडगाणे
सूर बेसूर ..
.
४.
बहर खूप
दरवळे सुवास
फुलांना त्रास ..
.
५.
सूर्याचा ताप
लाही लाही संताप
जीव निर्जीव ..
.
६.
धुंद मोगरा
कासावीस गजरा
नजरा दंग ..
.
लॉकडाऊन ..
ठेव मला मुठीत सखे-
शुभमंगल आपले सरताच
लॉकडाऊनचा अंतरपाट सखे..
.
मुखचंद्र तुझा बघण्यास सखे
झालो मी आतुर आहे-
लाॅकडाऊनचा दंडुका पाठीवर
पडण्या आतुर आहे..
.
घर माझे या गल्लीत सखे
राहतेस तू त्या गल्लीत सखे-
लाॅकडाऊन आले ग मधे
भेट कधी होणार सखे..
.
बरे झाले देवा लॉकडाऊन आले-
लॉकडाऊन आले_
पोलिसांकडून रिकामटेकड्यांना
व्यायाम प्रकार कळाले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
माणसातले देव
माणसाला दिसले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
नात्यातले सुसंवाद
वाढीस लागले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
घरातले सगळे
एकमेकांना माहित झाले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
रांधा वाढा उष्टी काढायला
"हे" मदतनीस झाले..
.
"श्री स्वामीसमर्थ.."
जय जय स्वामीसमर्थ
जगणे झाले सुसह्य
नाही नामस्मरण हे व्यर्थ..
आधार आम्हाला तुमची
नजरेसमोरची मूर्ती
संकटसमयी रक्षणकर्ता
तुमची हो कीर्ती..
शरण तुम्हाला आम्ही
नतमस्तक होऊनी
मनास लाभे शांती
दर्शन तुमचे घेऊनी..
स्वामी समर्थ स्वामी समर्थ
जपाची माळ घ्या हाती
तुमच्या मनातल्या दु:खांची
पळून जाईल भीती..
भावभक्तीने हात जोडतो
वंदन करण्या स्वामी
तुम्ही आमच्या पाठीशी
निर्धास्त जगतो आम्ही.. !
.
नवीन म्हणी..
१. फॉरवर्डची पोस्ट वाचली तर वाचली, नाहीतर डिलीट केली..
२. असतील फॉरवर्डकर्ते तर, जमतील डिलीटकर्ते..
३. फॉरवर्ड करून हसला, डिलीट बघून रुसला..
४. फॉरवर्ड पहावे करून, डिलीट करावे पाहून..
५. चार तास फॉरवर्डचे, चार तासडिलीटचे..
६. लिहिणे जमेना, फॉरवर्डशिवाय करमेना..
७. व्हाट्सअप पोस्टला फॉरवर्डचा आधार..
८. आधी केली फॉरवर्ड, मग झाली रडारड..
९. व्हाट्सपचे फॉरवर्ड वाचायचे कशाला..
१०. फॉरवर्ड करायला नि डिलीट व्हायला..
११. आपलेच व्हाट्सप, आपलेच फॉरवर्ड..
१२. फॉरवर्डचा गोंधळ डिलीटचा सुकाळ..
१३. फॉरवर्डशिवाय डिलीट दिसत नाही..
१४. फॉरवर्ड करीन पण वाचणार नाही..
१५. फॉरवर्ड करील तो डिलीट पाहील..
१६. दिसलं व्हाट्सप की केलं फॉरवर्ड..
१७. फॉरवर्ड जिथे, वाचनाची रड तिथे..
१८. उथळ व्हाट्सपला फॉरवर्ड फार..
१९. व्हाट्सपवरी फॉरवर्डच्याच पोस्टी..
२०. उचलले बोट लावले फॉरवर्डला..
२१. इकडे फॉरवर्ड, तिकडे डिलीट..
२२. फॉरवर्ड पाहून डिलीट करावे..
२३. उठता फॉरवर्ड, बसता डिलीट..
२४. एक ना धड भाराभर फॉरवर्ड..
२५. नावडत्याचे फॉरवर्ड डिलीट..
२६. सगळच फॉरवर्ड डिलीटात..
२७. फॉरवर्डपुरते व्हाट्सप..
२८. फ्रेंड तिथे फॉरवर्ड..
- - विजयकुमार देशपांडे
(सूचना..
ही पोस्ट आवडली व फॉरवर्ड किंवा शेअर करावीशी वाटली तर, कृपया ती माझ्या नावासह करावी. धन्यवाद.)
फॉरवर्ड तुझे ..डिलीट माझे ..
बसल्या बसल्या
घरातून मित्राशी
सुरू झाली मोबैलवर
एकमेकात चौकशी
काय झाले रे बोटाला
पट्टी का बांधलीस अशी
रोज चोवीस तास
मोबैल असतो हाताशी
व्हाट्सअपवर करतो मी
पोस्ट "फॉरवर्ड"तुजशी
त्यामुळे सुजली तर्जनी
पट्टी बांधली आहे अशी
पण.. तुझ्याही बोटाला
पट्टी बांधलेली कशी
चोवीस तास माझाही
असतो मोबैल हाताशी
"फॉरवर्डेड"वाचायला
तू मला सतत पाठवशी
ते सगळे वाचायला
वेळ कुठे माझ्यापाशी ?
"डिलिट" करतो प्रत्येक
व्हिडिओ/पोस्ट कशीबशी
झाली माझ्या बोटाची बघ
शेवटी दुर्दशा ही अशी !
.
अफाट गर्दी हरवले किती.. गझल
स्पर्श हवेसे वरमले किती..
सूर्य दिसेना ढगात गडगड
लगेच जमले बरसले किती..
पाळ कायदा घरात थांबा
तरी शहाणे हटकले किती..
नवीन नवरी सासुरवाशी
फोनवर सदा करपले किती..
संपर्क नको नकोच गर्दी
सांगितले पण सरकले किती..
शिकले होते काही थोडे
देत अंगठा शरमले किती..
दार मागचे दिसता उघडे
बार पाहता हरखले किती..
.
न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला .. गझल
लगावली.. लगालगा×४
मात्रा.. २४ , अलामत.. अ
काफिया.. बोलला, जाहला, दंगला
गैरमुरद्दफ.
________________________________
न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला
अखेरच्या दिनी किती स्तुतीस पात्र जाहला..
हसून लोळवी किती जनांस तो सहजपणे
व्यथा मनात दडवुनी खुषीत तोच दंगला..
समोर ती न भेटली कधी न बोललो तिला
मनी जपून ठेवली छबीत जीव गुंतला..
कटीस हात लावुनी निवांत तो उभा पहा
मनात प्रश्न नेहमी कधी कुणास पावला..
कुणी जिवास त्या कधी न एक फूलही दिले
कितीक हार शेवटी कसा सजून चालला..
.
का झिडकारत संस्कारांना .. गझल
टाळून सरळ वाटेला पळवाट शोधतो मी..
मी सांगतो खास लाभाचा व्यायाम हो सकाळी
डोक्यावर येतो रविराजा गादीत लोळतो मी..
रस्त्यावर दिसताना खड्डा डोळ्यासमोर माझ्या
सावध मीही होता होता दुसऱ्यास पाडतो मी..
शांतीस जपावे सर्वांनी उपदेश नेहमीचा
का इतरांची भांडाभांडी बिनधास्त लावतो मी..
म्हणतो आहे जेव्हा सगळी दुनिया सत्याची ही
मुलाम्यात छान असत्याच्या सत्यास गाडतो मी..
.
थाळीत टाकले मी साधेच एक नाणे- गझल
डोळे तरी चमकले त्याचे उदासवाणे..
खिडकीत आज थोडी डोकावली मनाच्या
मन गात काय बसले अजुनी तिचेच गाणे..
आहे जगायचे जर दु:खात रोज मजला
घेऊ उगाच का मी हसुनी सुखी उखाणे..
जातो बुडून जेव्हा मी आसवात माझ्या
असते हवे तिच्या मज का आठवात जाणे..
धुंदीत भांडला तो पत्नीसवे कितीदा
गातो पुन्हा कशाला दु:खातले तराणे..
.
उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो - गझल
(८+८+८ मात्रा)
....................................................
उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो
जागोजागी घडे पालथे जरी पाहतो..
घेत राहतो रोजच फाशी कुणीतरी पण
कुठला नेता पोट उपाशी धरून बसतो..
एक वेगळी तुजवर कविता कशाला करू
नजरेसमोर कायम प्रतिमा तुझी ठेवतो..
गावामधल्या सुधारणेची रोज वल्गना
पण त्यासाठी शहर कुणीही सोडत नसतो..
होते माती जास्ती धरता हाव जर मनी
माहित असले तरी न संधी कोण सोडतो..
.
खरोखर जगी का खुळे वाढलेले .. (गझल)
स्वागतास तो छान मुखवटा.. गझल
८+८+८+४
अलामत.. ऊ
रदीफ.. जातो
काळिमा.. करून, होऊन
स्वागतास तो छान मुखवटा धारण करून जातो
निरोप देता आरशापुढे खूष होऊन जातो
खिन्न मनाने तळहाती तो बघतो अंधुक रेषा
होत निश्चयी कुदळ फावडे हाती धरून जातो
युद्ध संपता हरवत बसतो नादात कुठे योद्धा
अगणित जखमा न्याहाळत तो मनी हरखून जातो
घाव सोसतो जीवनभर तो दुसऱ्यांसाठी मोठे
कावळ्यासही आधार कसा पुतळा बनून जातो
आवडले ना भिरभिरणारे पाखरू कधी होणे
पुस्तकातला किडा एक मी त्यातच रमून जातो..
.
दत्त दिगंबर दत्त दिगंबर.. भक्तीगीत
मिळवू जीवनात सुखधाम..
दत्त दिगंबर मंत्र जपा हो
भावभक्तीने स्मरण करा हो
गुरुदत्ताच्या कृपे लाभतो संकटास विराम..
त्रिशूल कमंडलू शोभती हाती
शंख नि डमरू नाद घुमवती
चक्र सुदर्शन फिरते हाती विश्वाला आराम..
वसुधा उभी गोमाता रुपाने
वेद चारही श्वानरुपाने
दर्शन घेऊ श्रीदत्ताचे आयुष्यात ये राम..
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
सोपे करती जीवन खडतर
करू प्रार्थना मनापासुनी शांत हो आत्माराम..
.
विसरून भान, चला करू ध्यान.. भक्तीगीत
गुलाब हाती झेलले जरा होते मी.. गझल
कशासाठी पोटासाठी- कविता
एकदातरी जेवताना
इकडे लक्ष देईल का.. ?
घरात मेजवानी झोडताना
आपण "माणूस" होण्याचे
जरासे कष्ट घेईल का - !
अन्न पुढ्यातल्या ताटात
माजून टाकत असताना,
आपले ताट पाहिल का..?
अख्खी मेजवानी नाही
पण जमलाच तर
त्यातला एखादा घास ..
दारातल्या
भुकेल्या पोटासाठी
घरातल्या ताटात ठेवील का .. ?
.
श्री स्वामी समर्था... भक्तीगीत
आलो शरण चरणी तुमच्या स्वामी जगन्नाथा
भक्तांचे तुम्ही कैवारी आम्हा पावता सत्वरी
हाकेला धावून येता चिंता ना मुळी अंतरी
भीत नाही आम्ही हो तुम्ही उभे पाठीशी
नामस्मरणी गुंतता नसते काळजी थोडीशी
जपतो एकच मंत्र "श्री स्वामी समर्थ"
काळ ना घालवतो आम्ही जीवनातला व्यर्थ
मंदिरात मन रमते हो येतो धावत नेहमी
घडता दर्शन तुमचे हो दु:ख विसरतो आम्ही
भजनी रमता तुमच्या होते सोने आयुष्याचे
लोटांगण घालता वाटते सार्थक जीवनाचे !
.
"तू तिथे मी..".. कविता
गोंडा घोळत म्हणायचास नेहमी
सारखी सारखी वळवून मान
माझ्यापुढे तू करायचास कान..
माझा हात आपल्या एका हातात
कुरवाळत होतास दुसरा केसात
माझ्या लांबसडक केसांतला सुगंध
करत होता किती किती तुला धुंद..
मांडीवर घेऊन माझे मस्तक
डोळ्यात पहात रहायचास एकटक
ऐकत होतास रे मनापासून तू
तुला मी म्हटलेले, आय लव यू..
आता जरी ऑफिस एके ऑफिस
जाताना घेत जा एक तरी किस
प्रेम हळुवार करून दाखव जरा
येताना आण मला एखादा गजरा..
वाटेकडे डोळे लागलेले असतात
तुझ्या नजरेत फायलीच दिसतात
घे मिठीत, पौर्णिमेच्या चंद्राला बघत
पूर्वीचं आपलं प्रेम मनात आठवत..!
.
विठ्ठला, दर्शन कधी घडणार-
थकले डोळे, देहही थकला
जीवन हे सरणार..
विठ्ठल विठ्ठल नाद रंगतो
नाम तुझे घेण्यात गुंगतो
टाळ मृदंगी जीव दंगतो
भजनातच रमणार..
रूप विठूचे बघत सावळे
भान विसरतो आम्ही सगळे
मनी दाटती भाव आगळे
वाट किती बघणार..
रांग लांब ही दर्शन घेण्या
हात जोडुनी वंदन करण्या
मंदिरात बघ उशीर शिरण्या
कळसच का दिसणार..
.
कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे.. गझल
रदीफ- येथे, काफिया- सादर, घागर,
अलामत- अ )
कुणी कुणाला उपदेश करू नकाच सादर येथे
पाणी ओतू नका पालथी आहे घागर येथे..
संस्काराचा लवलेश कुठे आढळतो ना जेव्हा
विनयभंग तो समजत फासू मुखास डांबर येथे..
निर्दयतेने झाड तोडतो उत्साहातच कोणी
असेल पण त्या चिमणीलाही दु:ख अनावर येथे..
पाखराविना उदास आहे उभे झाड हे आता
फळभाराने झुकले तेव्हा होता वावर येथे..
सबला होते हतबल अबला निर्धार जरी केला
मानव का तो वासनेमुळे बने जनावर येथे..
.
दाही दिशांना गाजत आहे ..
विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने नयनी साजिरी मूर्ती
हात कटीवर पाय विटेवर उभा छान विठुराया
रात्रंदिन तो उभा तरीही थकली नाही काया
विठ्ठल विठ्ठल नाम या सारे भजनी रंगत गाऊ
विठुरायाच्या जयघोषाला ऐकत दंगत जाऊ
चंद्रभागेच्या तीरावर मेळा जमला भक्तांचा
सामिल होऊ चला चला सत्संग तिथे संतांचा
टाळचिपळ्यांच्या गजरामध्ये तल्लीन होतच राहू
सावळ्या विठुरायाला आपल्या डोळे भरून पाहू
मी देशाभिमानी...
उभी ही धारण करुनी
विराजमान झाली छान
सागरांच्यामधे तिन्ही
अशा या भारतमातेचा
सुपुत्र मी देशाभिमानी..
प्रयत्न असतो जाण्याचा
सत्याच्या मार्गावरुनी
परदेशावर कुरघोडी
शांती सलोखा राखुनी
उंच फडकत्या तिरंग्यापुढे
झुकतो मी देशाभिमानी..
जवान किसान देशामधले
होती अमर जन्म घेऊनी
दु:ख विसरुनी ताठ कण्याने
वारसदार जगती मानी
अडचणीत त्यांच्या मदतीला
तत्पर मी देशाभिमानी..
स्नेहभाव माया आपुलकी
आदर विविध राज्यांमधुनी
सुकाळ दुष्काळ परिस्थितीत
जगतो जो तो धडपडुनी
प्रतिकूल स्थितीतही लढायला
सज्ज मी देशाभिमानी..
जन्म कुशीत भारतमातेच्या
सुटका न हवी तिच्यापासुनी
सुखी आनंदी तिला पाहण्या
येईन पुनर्जन्म घेऊनी
नागरिक भारतमातेचा मनी
कृतज्ञ मी देशाभिमानी.. !
.
प्रजासत्ताकदिन...
आदर्श आली अंमलात,
आज साजरा करायचा
प्रजासत्ताकदिन कौतुकात..
लोकांचे लोकांनी लोकांसाठी
बनले आहे आपले राष्ट्र,
जनमनकानोशासाठी
सदैव आपल्यापाठी राष्ट्र..
रांगोळी रोषणाईत सजवू
प्रजासत्ताकदिन हा महान,
गल्लीबोळ शाळा ऑफिसात
वाढवूया हो त्याची शान..
राष्ट्रीय एकात्मता आणखी
सर्वधर्मसमभाव जपूया,
तिरंग्याचा मान राखण्या
या सारे वंदन करूया..!
.
विठ्ठल विठ्ठल नाम जपूया .. (भक्तीगीत)
डोळ्यासमोर सुंदर मूर्ती
हृदयी विराजमान करूया !
टाळमृदुंगाच्या तालावर
भजनामधे रंगूया
तल्लीन होऊन करुनी जागर
कीर्तनात दंगूया
संकटकाळी अपुला त्राता
पंढरीनाथा वंदन करूया !
पांडुरंग तो उभा विटेवर
हात कटीवर दोन्ही
युगे युगेही लोटली किती
दमला नाही अजूनही
सारे प्रदक्षिणा घालूया
विठूचा जयजयकार करूया !
.