नेहमीच माझ्या बायकोची घाई ..

(चाल- नेहमीच राया तुमची घाई..)

नेहमीच माझ्या बायकोची घाई 
लागते शंख ती फुंकायलाssss
रोज रोज तयार ती भांडायला हो ..रोज रोज तयार ती भांडायला ..

सकाळी सकाळी "चहा द्या" म्हणते
"नाष्टाही तयार ठेवा की" म्हणते
वेळ लागे कपबशा धुवायला हो ..रोज रोज तयार ती भांडायला हो -

स्वैपाक लौकर तयार करतो
ताट पाट पाणी तयार ठेवतो
लागते बायको घोरायला हो ..रोज रोज तयार ती भांडायला -

आई माझी दुपारी देवळात जाई 
बायकोची किटी पार्टी रंगत राही 
पैशांचा घोर माझ्या काळजाला हो ..रोज रोज तयार ती भांडायला -

टीव्हीपुढे सातला होते हजर
माझ्यापुढे नऊला करते गजर
"लौकर वाढा ना जेवायला हो " ..रोज रोज तयार ती भांडायला -

आजाराची कारणे शंभर तिची-
अहो -
बसूनही दुखते कंबर तिची
कंटाळलो तिच्या मी वागण्याला हो ..रोज रोज तयार ती भांडायला -
..

आ बैल मुझे मार

काल सकाळी 
बायकोला मोठ्या कौतुकाने फ्लिपकार्ट . ची माहिती दिली.
घर बसल्याच ऑर्डर दिलेला जिन्नस,
किती कमी कालावधीत आपल्याला घरपोच मिळतो, 
ह्याचेही रसभरीत वर्णन करायला मी मुळीच विसरलो नाही !
........ रात्री नऊ वाजता-
ती मला काळजीच्या स्वरात म्हणाली -
"
अहो, तो कोपऱ्यावरचा भाजीवाला दुकान बंद करून गेला की हो ! "
मी विचारले -
"
हात्तीच्या ! एवढच ना ?
अग, सकाळी मंडईतून आणतो ना मी काय आणायचे आहे ते !
कशाला काळजी करतेस आता ."
किंचित विचारमग्न होत ती म्हणाली -
"
त्यापेक्षा आपण अस करू या का..
सकाळी तुम्ही सांगितले ना....
तिथेच ऑर्डर देऊ या की दोन लिंब आणि दहा रुपयांच्या कोथिम्बिरीची ! "

टेबलाला धरून बसलो... 
नाहीतर खुर्चीवरुन खाली धाडकन कधीच कोसळलो असतो
!
.

'"" - हिरव्या हिरव्या झाडावरून - ""' (बालकविता)

हिरव्या हिरव्या झाडावरून    
हिरवा हिरवा पोपट सांगतो ,  
"लाललाल माझ्या चोचीतून    
विडा पानांचा छान रंगतो" ..

वाळवंटात पाणी शोधत
सगळीकडे फिरती मान ,
उंट पळवी शहाण्याला
लांबच लांब करुनी मान ..

उड्या टणाटण मारताना 
सशाचा डोळा लुकलुकतो
गवताची सळसळ ऐकून    
ससोबा घरी धूम ठोकतो ..

उलट्यासुलट्या कोलांट्या
झाडांच्या फांद्यांवरुनी , 
सर्कशीतला विदूषक जणू
दावी माकड खोड्या करुनी ..
.

तीन चारोळ्या -

बरे वाटले जातानाही 
मनास माझ्या खड्ड्यांतून-
सापडत होता रस्ताही 
थोडाथोडासा अधूनमधून..
.

बघतो, हृदय जागेवर आहे ?
काही क्षण मी श्वास रोखुनी ..
तुझ्याजवळ ते सुरक्षित आहे,
येते दुसऱ्या क्षणात ध्यानी ..
.

बोट धरुन चालण्यास शिकला 
तो रस्त्यावरुनी ज्या बापाचे-
हात धरुन घालण्यास निघाला
तो नाव वृद्धाश्रमी त्या बापाचे ..
.

आपल्याच पायावर धोंडा !


टकलावरून हात फिरवत निवांत बसलो होतो.
तेवढाच विरंगुळा बसल्याबसल्या !

कंगव्याने आपले लांबसडक केस विंचरत,
 बायको आरशासमोर आली..
पर्यायाने माझ्याहीसमोर .

न राहवून उत्सुकतेने-
 (कुठून अवदसा आठवली आणि-) मी विचारले -

" तुझ्या ह्या लांबसडक केसांचे रहस्य काय ? "

मान वेळावत, हुंकारत....
 ती आरशात पाहून हसत उद्गारली-
" रहस्य कसल आलय त्यात डोम्बलाच !
ज्याच्यावर ते उगवलेत, ते महत्वाचे आहे की नै ?
ते रोज वापरात आहे ना....!"
.

नाइलाज आहे

"एssss
माझ्यावरही
कर ना एखादी कविता.."

बालिश हट्ट

तरी  किती
पदोपदी तुझा..

आता तुझी 

समजूत  घालण्यासाठी,
अख्ख्खा शब्दकोशही
मला अपुराच पडेल..

वेगळी कविता
मी
काय लिहावी ग...

तू ......
म्हणजेच
मूर्तिमंत कविता ..

तुला हे पटतच नाही
माझा नाईलाज आहे !
.

दोन चारोळ्या

जनरेशन गॅप -

चिमणी-कावळे पहिल्यासारखे 
आता कुठेही पाहिले नाहीत 
चिऊ-काऊच्या गोष्टी सांगणारे 
आजी-आजोबाही राहिले नाहीत..
.

फूल नात्याचे -

नात्याच्या सुगंधी फुलाने
असे फुलत फुलत रहावे 
एखादी पाकळी गळाली तरी
तिने आसमंती दरवळावे ..
.

पोरांची जमली पावसाशी गट्टी - (बालकविता)

आकाश होते स्वच्छ निवांत
क्षितिजापर्यंत सकाळी शांत ..

तिकडून आले पांढरे ढग
इकडून काळे काळे ढग ..

"आम्हाला आधी जाऊ द्या"
"आधी आम्हाला जाऊ द्या" ..

धक्काबुक्की सुरू जाहली
झाला गोंधळ ढकलाढकली ..

केला सगळ्यांनी गडगडाट
सुरू सगळ्यांचा थयथयाट ..

भांडता भांडता रडू लागले
धो धो पाणी वाहू लागले ..

पोरेबाळे पाहू लागली
"पाऊस.. पाऊस" ओरडू लागली ..

गल्लोगल्ली धुमाकूळ तो
जो तो पावसात भिजायला पळतो ..

हिवाळ्यात जरी.. जरा उन्हाळा
मधेच घुसला हा पावसाळा ..

नव्हती सुट्टी.. शाळेला बुट्टी
पोरांची जमली पावसाशी गट्टी !
.

ढोल नगारा

कोण कोण येणार
काय काय मी करणार
तुम्हा सर्वांना
सांगून ठेवणार ..

नवरा माझा येणार
खोबरे मी खाणार
करवंटी त्याच्यासाठी
खवून ठेवणार ..

नणंद माझी येणार
चॉकलेट मी खाणार
कागद तिच्यासाठी
बाजूला ठेवणार ..

दीर माझा येणार
पेढे मी खाणार
खोके त्याच्यासाठी
जपून ठेवणार ..

सासू माझी येणार
केळी मी खाणार
साली तिच्यासाठी
सांभाळून ठेवणार ..

सासरा माझा येणार
जेवण मी करणार
ताट धुण्यासाठी
त्याच्यापुढे ठेवणार ..

आई बाबा येणार
स्वैपाक मी करणार
ताई दादालाही
बोलावून घेणार .. !
.

स्वामी समर्था, संकटहर्ता

स्वामी समर्था, संकटहर्ता
दुबळ्यांचा तू रक्षणकर्ता ..


"भिऊ नकोस,पाठीशी आहे"
नित्य वचन हे ध्यानी आहे ..


रात्रंदिन स्मरणात गुंततो
मनोमनी मी तुला वंदितो ..


माझे दु:खहरण तू करशी
मज आनंदी क्षणही देशी .. 


शक्य अशक्यासी तू करशी
अद्भुत लीला सहज दाविशी  ..  

उपकार तुझे मानु किती मी
अनंत जन्मी तुझा ऋणी मी .. !

.

कोंडमारा

बऱ्याच कालावधीनंतर 
आपण दोघे 
भेटल्यावर -
अलगद 
टिपून घेतोस आसवे, 
धुळीचे कण 
डोळ्यात गेल्याचे 
निमित्त दाखवून ..
जणू काही विशेष 
घडलेच नाही -

तुझ्या बाबतीत 
हे ठीक आहे ..

मी नाहीच 
आवरू शकत, 
माझ्या मनातला 
माझा कोंडमारा - 

तू  जवळ घेतल्यावर
वाहू लागतात ,

तुझ्या अंगावर 
माझ्या अश्रूधारा .. !
.

कसे करू स्वागता

नेहमीच्या डौलात
स्वत:च्या तोऱ्यात
निघालेली असते ती
निवांत माझ्या घरी ..
 
वर्दी देण्यासाठी
माझ्या सखीची
उतावीळ वारा पोचतो
आधीच माझ्या दारी ..

... अचंबित चेहरा तिचा
उल्हासित होत जाई 
हास्यासवे पाहुनी  
स्वागताची माझी तयारी ..


.

साजणे

वर्दी मिळता तुझी साजणे
गंध पसरला जाईजुईने ..


हळूच हसला कसा मोगरा
बघुनी मुखडा तुझा साजणे ..
 

पहा लाजली मनी अबोली
मान हलवते संतोषाने ..

तुझी लागता चाहुल आता
चाफा डोलतो आनंदाने ..

गुलाब झाला वेडा का तो
रंगुन गेला लालीम्याने .. 

प्राजक्ताने सडा टाकला 

श्वेत केशरी बघ रंगाने  ..

निशिगंधाचे भान हरपले
झुलतो आहे बेहोषीने ..

गुलमोहर ग आला फुलुनी
पसरत आहे चार दिशेने ..

जास्वंदी झाली आनंदी
टवटवली ती हिरवी पाने ..   

ब्रह्मकमळ बघ सुखावले
बहुत दिसांच्या विश्रांतीने ..

गेली बहरुन बाग ही सारी
केवळ तुझिया आगमनाने ..


अद्भुत लीला सखे साजणे
जग फुलते बघ चैतन्याने .. 


निसर्ग सगळा हसू लागतो   
सखे साजणे, 
तू आणलेल्या श्रावणाने ..!
.