आत्महत्या

               जगात करमणुकीचे किती विषय आहेत, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. मनोरंजन कशामुळे जास्त होते, हा एक संशोधनाचा विषय आहे.
विनोदाचे  प्रकार किती, हे ठरवायचे म्हटले तर प्रकरण शेवटी गुद्दागुद्दीवर येईल . हे सगळे जरी खरे असले तरी करमणूक, मनोरंजन, विनोद वगैरे वगैरे गोष्टी ज्या भोवती फिरतात, असा विषय म्हणजे "आत्महत्या !"

             तसे पहायला गेले तर (- किंवा असे पहिले तरी हरकत नाहीच !) 'आत्महत्या' म्हटल्याबरोबर अंगावर शहारे यायला हवेत ! छातीत धडकी भरली पाहिजे ! हातापायातले अवसान गळून गेले पाहिजे ! त्यांना कंप सुटला पाहिजे; शरीराला दरदरून घाम फुटावयास हवा ! ह्या सर्व गोष्टी व्हावयास हव्या हे खरे , पण -  महाभारत घडावयास दुर्योधन-धर्मराजाचा "पण" आडवा आलाच होता ना ? 'रोज मरे त्याला कोण रडे' ही जी काही म्हण (-का वाक्प्रचार ?) आहे ती खरोखरच खरी वाटते ! वर्तमानपत्राचे पान डोळ्याखालून सहज घातले, तरी आत्महत्येच्या नादाने एखादा/दी तरी खालून 'वर' पोचलेला/ली आढळतो/ते ! आपण उत्सुकतेने ती आत्महत्येची बातमी अधाशीपणाने वाचतो (-नाहीतरी ती दुसऱ्याचीच आत्महत्या असते ना !). आणि  वाचून स्वत:शीच पुटपुटतो- " आयला ! ही रोजचीच रड आहे. उपासमारीने बायका-पोराचा जीव घेऊन, कुटुंबकर्त्याने स्वत: आत्महत्या केली म्हणे ! त्या बिचाऱ्या 'कर्त्या'ला करता येण्यासारखी बरी आत्महत्या हीच बिचारी एक गोष्ट सापडते ! आपल्याला उगीचच मिस्कील हसू येते ! आपण दुसऱ्या बातम्या मख्खपणे नंतर वाचावयास सुरुवात करतो ! जाणारा जातो जिवानिशी , वाचणारा बिचारा वाचत बसतो !

            तर सांगायचा मुद्दा हा की पूर्वीसारखा 'आत्महत्या' हा प्रकार आता गांभिर्याचा राहिलेला वाटत नाही.  कुणीही उठतो आणि आत्महत्या
करतो, अशी आजची स्थिती आहे !  त्या गोष्टीत दु:ख करण्यासारखे काही उरलेच नाही . विरोधानेच म्हणायचे झाले तर, त्या गोष्टीत सुख दडले आहे-  म्हणजेच मनोरंजन, करमणूक, विनोद वगैरे वगैरे !

            काही वर्षाखाली एका पेपरात बातमी वाचली होती- " मालकाने आपल्याला हिप्पीसारखे केस वाढवू दिले नाहीत, म्हणून त्याच्या नोकराने
चक्क 'आत्महत्या' केली !"  अहाहा , किती आनंदाचा क्षण असेल त्या नोकराच्या आयुष्यातील आत्महत्येचा ! मालकापासून सुटका, केसांच्या
जंजाळातून पळवाट, कामापासून दूर आणि या पृथ्वीतलावरच्या महागाईतून मुक्ती !  एकाच वेळेस किती गोष्टी साधल्या बरे त्या एका क्षणैक आत्महत्येने !

             विनोदाचा भाग असा की, आमच्यावर आत्महत्येची कुणी वेळच येऊ देत नाही मुळी !  आम्ही हिप्पी होण्यास, पिताजींची साथ आहेच.
नापास झालो परिक्षेत कधी, तर माताजींची ममता सामोरी येते. प्रेमभंगाचे दारूण दु:ख आमच्या वाट्याला कुणी येउच देत नाही. कारण 'लाईन'
क्लिअर करतांना आमचा एक डोळा अंमळ बारीक झाला, तर प्रतिपक्षाकडून दोन्ही डोळे बारीक करून 'दाद' मिळते !  दुष्काळामुळे आत्महत्या करावी म्हटली, तर आम्ही खाल्लेली बाजरी अरगटमिश्रित न मिळता नेमकी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ निघते !  त्यामुळे माझ्या दृष्टीनेतरी आत्महत्या ही काळजी व चिंतेची बाब नसून एक फार्स आहे, करमणुकीचा प्रकार म्हणा ना !

             आत्महत्या करायला जावे आणि त्यातून वाचून नेमकी पोलीस-कोठडीची हवा खावयास मिळावी, यापरते मनोरंजन ते कोणते ?
ज्याची आत्महत्या यशस्वी होते, त्याला किती गंमत वाटत असेल ना ? 'मी आत्महत्या करतो', 'आत्महत्या पहावी करून', 'आत्महत्येला जेव्हां
यश येते'- अशा विषयावर लेख/नाटक/कविता लिहीणाऱ्यांना किती खमंग, चुरचुरीत 'विषय' मिळाला याची कल्पना यशस्वी आत्महत्याकर्त्यानाच
येईल !

         आपण व्यवहारात बोलताना पुष्कळवेळा म्हणतो की, 'अमुक एखादी गोष्ट येत नसेल तर, त्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट ?' म्हणजे असे पहा की, एखादी गोष्ट जमत नसेल तर चुटकीसरशी त्यावरचा तोडगा म्हणजे 'आत्महत्या' ! आता तुम्हीच सांगा- याहून चांगला विनोद कुठे आढळेल ? मनुष्याच्या अंगवळणी पडत चालले आहेत हे विनोद !

    ' मी ठरवलेल्या मुलीशी लग्न करीन, नाहीतर आत्महत्याच करीन !' 'आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही उपोषण करू(-पर्यायाने
आत्महत्या करू) ! 'आम्हाला परीक्षेत पास करा, नाहीतर आम्ही आत्महत्या करू !' - असली ही विनोदी वाक्ये कशी ऐकण्यासारखी वाटतात ना ?  मी तर म्हणतो की, ह्यानी असली 'जर-तरी' भाषा न वापरता, प्रथम आत्महत्या करूनच दाखवावी ! आत्महत्या हा प्रकार या धमकी देणाऱ्यांना भलताच मनोरंजक वाटत असावा ! आपले छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हणाले नाहीत -" मावळ्यानो, हे सर्व किल्ले जिंकून आणा, नाहीतर मी आत्महत्याच करतो! " उलट त्यांनी सर्व मोहिमांत सक्रीय सहकार्य केले !

             'अति केले नि वाया गेले' ही म्हण आत्महत्येच्या बाबतीत सार्थ आहे. ज्याच्या अंगी सामर्थ्य नाही, धडाडी नाही, उत्साह नाही, त्याने खुशाल हा प्रकार हाताळावा ! 'नेसेन तर शालूच, नाहीतर xxx बसेन' या असल्या आततायीपणाचा काय उपयोग ?

              जी गोष्ट करता येणे अशक्यच आहे, तिच्या वाटेला जाऊन डोकेफोड कशाला करायची ?  एखाद्या मंत्र्याने उद्या सर्वासमक्ष सांगितले
की, 'मी आता खुर्ची आणि पद दोन्ही सोडणार आहे !'- असले खोटेनाटे थापेबाज बोलणे ऐकण्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली काय वाईट, असा
विचार क्षणभर मनांत चमकून जातो !

         'धरले तर चावते अन् सोडले तर पळते'- हे म्हणणे आत्महत्येबाबत चिंतनीय आहे. करावी तर वाटते, पण केली, तर 'खानदानकी  इज्जत मिट्टीमें' जाईल म्हणून वैताग- असा विरोधाभास आढळतो .

               आत्महत्या अयशस्वी ठरली तर, यशाचे प्रयत्न मनुष्य का बरे करीत नाही, हे एक कोडेच आहे. अपयश पचवून आयुष्याला सामोरे
जाण्यात जो आनंद आहे, तो आत्महत्येने हसू करून घेण्यात नक्कीच नाही !  नापास होऊन आत्महत्येपर्यंत वेळ आणण्यापेक्षा, पासाच्या तयारीत वेळ का घालवू नये ? रागे भरल्याने वाईट वाईट वाटून आत्महत्या करण्यापेक्षा, आपल्या चांगल्या स्वभावाचे, चांगल्या पैलूंचे दर्शन का घडवू नये ? मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा, मिळमिळीत विचार मनात बाळगण्यापेक्षा, अपराधी मनाने आत्महत्या करण्यापेक्षा- सदैव ताठ मानेने प्रयत्नशील जगण्यात आत्मसमर्पण केलेले काय वाईट ?
.
                                
                                            

'''''''''' उद्घाटन ''''''''''''


" केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार "-


                हे प्रसिद्ध वचन,  आमच्यामते थोडेसे बदलू पहात आहे. कारण हल्ली 'देशाटना'ची जागा 'उद्घाटन' घेऊ पहात आहे . म्हणून 'केल्याने उद्घाटन...' हेच योग्य वचन ठरेल ! शिवाय दूर ठिकाणी जाऊन उद्घाटन करायचे असेल, तर त्यात देशाटन आपोआपच साधले जाते. आजकाल कानमंत्र द्यायचा झालाच तर तो उद्घाटनविषयक देणेच सोयीस्कर !

               मयताचा दाखला आणल्याविना एखादा इसम मृत झाल्याचे सरकार-दरबारी जसे सिद्ध होत नाही, तसे एखादा उद्घाटनसमारंभ आयोजित केल्याशिवाय नियोजित कार्य सुरू केलेले आहे, हे सर्वांना समजणार नाही, असाच (गैर-)समज सध्या सर्वत्र प्रचलित आहे .

              एखाद्या डॉक्टरने प्रसुतीगृह बांधले, त्याचे उद्घाटन होते.  त्याशेजारीच 'कुटुंबनियोजन'केंद्र सुरू केले तरी त्याचेही उद्घाटन करतात. एवढेच काय पण, पुढेमागे एखादी स्मशानभूमी झाली, तरी तिचे उद्घाटन लोक वाजतगाजत धूमधडाक्याने करतील. हौसेला मोल नाही, हेच खरे !

                  बरे, महागाईच्या काळात उद्घाटन समारंभ थोडक्या खर्चात, वेळात, त्रासात होतो म्हणता ?  छे ! सन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून तयारी, तशी मोठ्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी साध्या रिबिनीपासून तयारी करावीच लागते ना !   उद्घाटन पुढील वर्षाच्या तीनशे पासष्टाव्या दिवशी असले, तरी "रिबिनी" शोधण्यास आजच सुरुवात करावी लागते !

               दुसरी एक गंमत म्हणजे, उद्घाटन कधी व कशाचे करावे, हा मुद्दा पुष्कळदा गौण ठरून, उद्घाटनासाठी कुणाला बोलवायचे, ह्या प्रश्नावरच वादंग माजतो. शेवटी एकाचीच 'एक ना धड भारंभार' उद्घाटने केली जातात !

               असे सांगतात की, एका  बहुमजली टोलेजंग इमारतीचे उद्घाटन व्हावयाचे होते. इमारत बांधण्याआधी एकदा भूमीपूजनाने उद्घाटन झाले होते . नंतर पायाभरणीच्या निमित्ताने एक उद्घाटन ! पण इमारत बांधून पूर्ण झाल्याचे एक उद्घाटन करणे आवश्यक होते. म्हणून त्या इमारतीच्या ५/६ भागीदारात चर्चा सुरू झाली. एकाच्या मते त्या गावच्या नगरपित्यास, दुसऱ्याच्या मते जिल्हाधिका-यास, तिसऱ्याच्या मते
एखाद्या मंत्र्यास बोलावण्याची आवश्यकता होती. यावर वरताण म्हणूनच की काय, चवथ्याने त्याच्या लग्नाच्या चवथ्या नूतन पत्नीस उद्घाटनासाठी बोलावण्याचा हट्ट धरला.....म्हणे !   त्या भागीदारात शेवटी उद्घाटनसमारंभासाठी बोलावण्याच्या व्यक्तीबद्दल तंटा माजून.... इतका काळ  लोटला की, अखेरीस नगरपिता, जिल्हाधिकारी, एक मंत्री आणि चवथ्याची जुनी पत्नी-  हे सर्वजण त्या टोलेजंग इमारतीच्या उद्घाटनासाठी जेव्हां आले, त्यावेळी ती इमारत पार भुईसपाट होऊन गेली होती !

               उद्घाटन  ज्याच्या हस्ते करायचे, अशाच्या बाबतीतही एक गंमत विशेषकरून आढळते. आपल्याला असे दिसून येईल की, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीबाबत काहीही गम्य वा माहिती वा स्वारस्य नसते, अशीच व्यक्ती उद्घाटक म्हणून आमंत्रित केली जाते ! उदाहरणार्थ - एखाद्या टेलरिंग फर्मच्या उद्घाटनास सुतारास, तर एखाद्या 'बुद्धीविकासकार्य'संस्थेच्या उद्घाटनास एखाद्या पुढाऱ्याला पाचारण केले जाते ! लहान मुलाच्या केस कापण्याच्या उद्घाटनास (-'जावळ') तर, चक्क  त्याच्या मामास बोलावले जाते !

               वास्तविक पाहता, केशकर्तनालयाच्या उद्घाटनास एखाद्या कुशल अनुभवी नापितास, तर नगरपालिकेच्यासंबधी उद्घाटनास नगरपित्यालाच पुढे बोलावणे योग्य नाही काय ?  पण मग 'रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी' ही म्हण तरी कशी सार्थ ठरणार म्हणा !
    
             सर्व उद्घाटन-समारंभांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास असे आढळून येईल की, अशा समारंभांना बोलावलेली उद्घाटक-व्यक्ती ही विवाहित असते ! तसा काही नियम असावा, ही शक्यता पण कमीच आहे ! परंतु, जिकडे पहावे तिकडे, उद्घाटक व्यक्ती सहकुटुंब (-शक्य असल्यास सहपरिवार) आलेली दिसतेच !  परवा तर म्हणे,  एका ब्रम्हचर्याश्रमाच्या उद्घाटनासाठी एक महाशय आपल्या पत्नीसह (जी अष्टपुत्रा सौभाग्यवती होती.) आले होते !
 

              उद्घाटनसमारंभाचा सोहळा तरी  काय वर्णावा हो !  अशा प्रत्येक समारंभाचे वर्णन 'झालेत बहु, होतील बहु, परंतु यासम (रद्दी-) हाच' ! अशा धर्तीवर छापून येतो. उद्घाटकाच्या प्रवासाची, राहण्याची, खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवताठेवता बिचाऱ्या व्यवस्थापकाच्या नाकी नऊच काय पण,  दहा-बारा तर नक्कीच येत असतील ! शिवाय, उद्घाटकाबरोबर (स्व-)हितचिंतक, फोटोग्राफर, हारतुरेवाली मंडळी जातीने हजर असतातच ! या गदारोळात असा काही फोटो पेपरात छापून येतो की, बिचाऱ्या वाचकाला संभ्रम पडावा- '  हा त्या उद्घाटनसमारम्भाचा फोटो आहे का, चुकून कुठल्या एखाद्या प्रेतयात्रेच्या फोटोचा ब्लॉक छापला गेला आहे ! '  पण 'फोटो छापून येणे' हीच गोष्ट उद्घाटक आणि आयोजक यांच्या मते महत्वाची - मग फोटो कसला का असेना !

               'अशी उद्घाटने- असे उद्घाटक' या विषयावर देखील खूपसे लिहिता येईल. एका मंत्रीमहोदयांना एका विवाहसमारंभाची पत्रिका दिली. सवयीनुसार, मंत्रीमहोदय विवाहमुहुर्तानंतरच आले.  मंडपात घुसले आणि गडबडीत, ताबडतोब कात्रीची मागणी करू लागले . ज्यावेळी त्यांच्या हातातल्या अक्षतांकडे लक्ष वेधले, त्यावेळी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की, आपण येथे कुठल्याच उद्घाटनाची रिबीन कापण्यासाठी आलेलो नाहीत !

               स्त्रिया केसाने गळा कापू शकतात, तर ' निदान आपण कात्रीने रिबीन तरी कापू शकतो का नाही ',  हे पाहण्यासाठी उद्घाटनसमारंभ अस्तित्वात आलेले असावेत, असा आमचा अंदाज आहे !

                "उद्घाटनाने येई मनुजा मोठेपण" अशी म्हण उगाचच का पडली आहे ? त्यामुळे माझे ध्येय सध्यातरी एखादा "उद्घाटक" होण्याचे आहे.
 

                वाचकहो, "उद्घाटक पाहिजे" अशी जाहिरात कुठे तुम्हाला आढळली, तर मला कळविण्याची व्यवस्था करा हं !
.                          
         
              

                       
 

शिकवण

किनारा स्तब्ध
मीही स्तब्ध !

 अजस्त्र लाटा
लाटामागून लाटा

मोठ्या लाटेत लाट लहान
लहान लाटेत तिच्याहून लहान....
  
  शेवट एकच ,
मोठी कोणती अन् लहान कोणती
कोण करू  शकणार गणती ?

रुबाबदार लाट फेसाळणारी
  येतात परततात विचारलहरी -

एकच शिकवण मिळते  मनाला 
तू दिसणार नाहीस नंतर कुणाला  !

क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे 
जगून घे छानसे मनासारखे !
.

दगडइकडून एक दगड फेकला
तिकडून दगड वर्षाव आला

दगडालाही भाव आहे
दगडापासून भिती आहे

दगडाने डोके फोडतात
दगडातून देव घडवतात

दगड  हाताळावा तरी कसा 
ज्याचा त्याचा प्रश्न तसा

वेळेवर फेकला- जीत आहे
वेळ गेल्यावर- फजीत आहे

दगडात शहाणपणा नसतो
फेकणाऱ्यात नक्कीच असतो

दगडांची इमारत का बांधायची
दगडांची नुसती रास का रचायची

दगडा दगडाची गोष्ट फळली
दगड नसेल त्यालाच कळली !

.

नेता आणि अनुयायी


सत्तेसाठी हपापलेला हर एक नेता असतो,
हे ना कळणारा अनुयायी नेमकाच फसतो !

आपापसात अनुयायी लढती, सोयरसुतक ना नेत्याला
अनुयायाला नसते डोके, ठाऊक असते नेत्याला !

जीव द्यावया अनुयायी धावे, आपुल्या नेत्यासाठी -
विकास करता 'स्व'त्वाचा नेता, नसतो त्यापाठी !

नेता ठरतो तडफदार हो, बसतो फोडत डरकाळी
जखमी अनुयायी तडफडतो- घरात फोडत किंकाळी !

मुडद्यावरच्या टाळूवरचे लोणी खातो जो नेता ,
मेला का जगतो अनुयायी- नेता कशास करी चिंता ?

सहनशील ही जनता इथली, आंधळेच अनुयायी
दळती पीठ इमानाने ते, नेता ऐटित बसून खाई !
.

तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे ....कितीवेळ आजोबा
सुनावणार तुम्ही -

' पन्नास पावसाळे
जास्त पाहिले आम्ही !'

आम्हाला एवढेच
आता सांगा तुम्ही -

पन्नास पावसाळे
पाहिलेत ना तुम्ही ?

पन्नास पावसाळे
दुष्काळी, सुकाळी किती ?

उपयोग काय
ते सांगून तुम्ही ....

खात्री आहे आम्हा
ते सगळेच कोरडे !

दुष्काळ भोगतो
अजूनही आम्ही !
.

आठवण -तू लाजतेस जेव्हां
आठवण लाजाळूची

अबोल होतेस जेव्हां
आठवण अबोलीची

आरक्त होतेस जेव्हां
आठवण गुलाबाची

मिठीत असतेस जेव्हां
आठवण कमलदलाची

तू नसतेस तेव्हां -
साठवण निवडुंगाची !
.

टाळ बोले माझ्या मनीं -


टाळ बोले माझ्या मनीं
नाद करी मृदुंग कानीं
चिपळ्यातुनी येई ध्वनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

हाती झेंडा नाचवुनी
स्मरण होई गजरातुनी
नामाचा जप मुखातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

डोईवरी तुळशीवृंदावनीं
पावलांच्या ठेक्यातुनी
टाळ्यांच्या तालातुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

भक्तीच्या या वाटेवरुनी
जाऊ सगळे आनंदुनी
गाऊ सगळे दंग होउनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

देहभान अपुले हरपूनी
नाचू रंगूया कीर्तनी
म्हणू सगळे वारीतुनी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||

...

निघाली खाशी हो स्वारी ...निघाली खाशी हो स्वारी
दुष्काळी त्या दौऱ्यावरी
संगे घेउनिया  लवाजमा
 फौजफाटाही  तो भारी  -

तिकडे नाही की पाणी
कोरड्याच साऱ्या  विहिरी
संगे घेउनिया  बिस्लेरी 
ट्रकमधे भारी भारी  -

 खाण्याला नाही बाजरी  
ना दाणा ना भाकरी
संगे घेउनिया  कारभारी
कुशल सैपाकी आचारी -

डोईवर छत्री ती धरी
सोबतचा  चमचा कुणीतरी
संगे घेउनिया गालीचा
पायघडी ती कुणी अंथरी -

निघाली खाशी ती  स्वारी
पहा हो विमाने ती वरी
संगे घेउनिया सामग्री
दुष्काळी त्या दौऱ्यावरी !
 
.

अक्का, ताई, बाई, माई, बुवा, महाराज, बाबा, मांत्रिक, तांत्रिक आणि तत्सम अवतारी महोदय -


सर्व अक्का, ताई, बाई, माई, बुवा, महाराज, बाबा, मांत्रिक, तांत्रिक -
 आणि तत्सम अवतारी महोदय -

ह्यांना नम्र विनंती ....

काही तरी खराखुरा चमत्कार घडवा हो आतातरी -
आणि दुष्काळी वातावरणात पाण्याची सोय करा !

तुमच्या चमत्कारावाचून,
खेड्यातली नव्हे तर शहरातली जनतादेखील-

 सध्या केवळ डोळ्यातल्या पाण्यावरच तग धरून आहे .

फक्त भक्तमंडळीतच रमून जनतेचे दुर्दैव संपेल,
या भ्रमातून आता बाहेर पडा !

ह्यात काही कमीजास्त, काही उणेदुणे, काही चुकीचे चुकून लिहिले गेले असल्यास-

 उदार अंत:करणाने
क्षमस्व !

सर्व श्रद्धाळू, अंध श्रद्धाळू, आस्तिक ,नास्तिक जनतेने आपापल्या दैवताला
स्मरण करून "पाणी आहे तर जीवन आहे " असे म्हणून साकडे घालावे !

सर्व भक्तांनीच अपापल्या वर उल्लेखलेल्या महोदयांची "परीक्षा " घेण्याची,

 आता दुर्दैवाने वेळ आलेली आहे, हे ध्यानात ठेवावे !

|| शुभं भवतु || 

.

" मराठी दीन - "


आपला तो "मराठी दीन " जवळ आला म्हणे .

वा वा !  व्हेरी गूड हं !

आता एखादी इंग्रजी नॉव्हेल सर्च करतो.

मस्तपैकी त्यातले कोटेशन्स उतरवून काढतो,
आणि भाषांतर करून मराठीत खरडून टाकतो झालं .

नाईस ! खूप मजा येईल. मराठीला काही प्रोब्लेम नाहीच.
काही कळल नाही तरी नुसत पहायचं, आणि लाईक करून टाकायचं !

पण एकदम सर्प्राईजीन्ग वाटते हं !
हे लेकाचे एकेक दिवसात चारपाच स्टेटस कसे काय अपडेट करत असतील हो ?
आम्हाला मराठीतून चार दिवसात चार ओळी लिहायला टेन्शन येत !
एकोळी- दोनोळी- तीनोळी- चारोळी- पाचोळी- सतराशेसाठ ओळी......

 कशा काय जमत असतील,  त्या मराठी पोएट आणि रायटरना कुणास ठाऊक !

जाऊ द्या .

आधीच सर्दीने बेजार झालोय ... शिंक आलीच की .. !

कुणी ऐकणारे नसले तरीही "सॉरी " म्हणायलाच हव ना ! 
नाहीतर हे मराठी लोक टपलेलेच मला "म्यानरलेस" म्हणायला !

एक्स्क्यूज मी हं .... फार वेळ घेतला तुमचा .
बेग यौर पार्डन !
बाय !

.

" शिवबा, नकोस जन्म कधी तू इथे पुन्हा घेऊ -- "

शिवबा, नकोस जन्म कधी तू इथे पुन्हा घेऊ
राजकारणी पक्के आम्ही जयघोषात रमत जाऊ ..


कर्तव्याची जाणिव नाही, हक्कासाठी मरू आम्ही
कृती न करता बडबड करणे- ध्येय ठेवले हे आम्ही  .. 


एकीचे बळ सर्व जाणती, होण्यासाठी आनंदी
फाटाफुटीत रमून बघती, स्वार्थ साधण्याची संधी .. 


शिवबा, तू जन्मलास ह्या पवित्र मातीवरी जरी
राजा होणे पुन्हा न नशिबी, धूर्तमंडळी सारी ..  


शिवबा, तुजसाठी मरणारे उरले ना मावळे
संधीसाधू लुच्चे आता सगळे डोमकावळे ..


नावाचा जयघोष तुझ्या तो चालू सांजसकाळी
"तुझ्यासवे फ्लेक्सावर झळकू" ऐकू ये डरकाळी ..


म्हणतो आहे स्वत:स जो तो, "शिवबाचा अनुयायी"
सत्ता खुर्ची पदाचसाठी करतो रोज लढाई ..


हद्दपार झालास कधीच- तू त्यांच्या मनातुनी
"माझा शिवबा" दिखावाच तो दिसतो
क्षणोक्षणी ..

वेगवेगळे मोर्चे, जयंत्या- फुकाचाच तो नारा
गेलो कंटाळून बघूनी त्यांचा नाटक नखरा ..


धडपडताना दिसतो जो तो, मिरवत आपला तोरा
शिवबा, करतो मनापासुनी मी मानाचा मुजरा .. !
.

लहानपणातला आनंद -


थंडीचा दिवस
भर दुपारची वेळ
कामानिमित्त पायपीट चालू
सायकलवरून घंटी वाजवत येणारा तो "बाम-गोळा" वाला
सायकलच्या क्यारीअरला लाकडी खोक्यात
 हा एवढा मोठ्ठा बर्फाचा चौकोन
बाजूला बर्फावर घासायचा तो लाकडी रंधा

वयाचा विचार बाजूला ठेवला

शर्टच्या एका बाहीने सर्दीमुळे गळणारे नाक पुसले
बामगोळेवाल्याला थांबवले

"एक बामगोळा दे..."

चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पहात
त्याने बर्फावर रंधा मारला

घास्सक घिस्सक
घास्सक घिस्सक

कानाला मोहून टाकत होता तो आवाज ..
त्या क्षणी तरी माझ्यापुढे
शिवकुमार हरिप्रसाद इनोक द्यनिअल अजय अतुल
हे कुणीच नव्हते

हातावर बर्फाच्या लगद्याचा मस्त पांढराशुभ्र गोळा धरून
त्यावर महामुलखाचे महागडे अत्तर शिंपडावे तसे
बाटलीतले ते लालभडक पाणी मस्तपैकी शिंपडले
अलगद हातातल्या गोळ्यात काडी खुपसल्यावर
तो लालभडक गोळा माझ्या हातात एकदाचा आला

सगळे जग आता आपल्या हातातल्या त्या लालभडक गोळ्यापुढे
किती तुच्छ आहे
अशा आविर्भावात मी तो गोळा चाखत राहिलो

जीवनातला लहानपणातला आनंद पुन्हा एकवार चाखत राहिलो

ए क टा च !
.


तीन चारोळ्या -

'खोड-'

खोड तुझी जाणार कधी 
स्वप्नात मला भेटायाची -
हातातली मी कामं सोडून 
लवकर घाई निजायाची ..
.

'सखे, तुझा हेवा -'

खुणावती त्या नभी चांदण्या 
बघुनी जणू एकमेकीकडे -
'आमच्यापेक्षा चमचमणारी'
पाहुनी म्हणती धरतीकडे ..
.

'निर्धन श्रीमंत -'

खिसा कापता पाकीट गेले
नोटा सगळ्या गायब झाल्या -
फोटो खिशात शाबूत तुझा
आठवणी मोलाच्या उरल्या ..
.
.

तो क्षण -चप्पल तुटलेली
छत्री विसरलेली
टोपी हरवलेली
खरडत खुरडत
मी चालत आहे ...

डांबरी रस्ता पाघळलेला
उन्हाचा कडाका वाढलेला
कपाळावरून घाम कोसळलेला
शिव्या हासडत स्वत:ला
चेहऱ्यावरचा दिमाख उतरलेला
असा मी चालतच आहे ..

अचानक तू समोर आलेली ! ! !

मी भांबावलेला
उन्हात आंबलेला
रस्त्यात थांबलेला
डोळे मिटून घेतलेला

अंतर्मनावर
गुलाबपाण्याचा
सुगंधी फवारा
जणू मी घेत उभाच .. क्षणभर !

साऱ्या जगातला आनंद
तुझ्या रूपात
त्या क्षणी दिसलेला
सुखाची सावली
भर उन्हात
देऊन गेलेला

तोच क्षण

मी अजून जपून ठेवलेला !

तीन चारोळ्या -


'सारे कसे शांत शांत -'

बायको म्हणाली, 
"तोंड आले हो" -
मी म्हणालो, 
"छान झाले हो" ..
..................................................


'शब्दपाखरे-'

उघडले अलगद मी 
माझ्या मनाचे कपाट -
शब्दपाखरे झटपटली 
बाहेर पडण्यास सुसाट ..
..................................................


'नसीब अपना अपना-'

त्याच्या हाती नशीबनाडी
वरून ठरवी "तो" वधुवर जोडी -
नशिबी कुणाच्या तडजोडी 
नशिबी कुणाच्या लाडीगोडी ..
...................................................
.

वर्तमानपत्र             बर्‍याच वर्षानी, परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. सकाळची वेळ असल्याने, नित्रमहाशय देवपूजेत मग्न होते. मी दिवाणखान्यात स्थानापन्न झालो. सहज मेजाकडे नजर टाकली. म्हटल, एखादा पेपर वाचायला मिळतो का ते पहावे. आश्चर्य म्हणजे, एक नव्हे तर दहाबारा वृत्तपत्रे (-आणि तीही ताजी !) तेथे विराजमान झालेली दिसली ! मी चाट पडून खाली पडणार होतो, पण वेळीच सावरून बसलो ! 
          
             माझ्या मित्राबद्दल आदर द्विगुणीत झाला होता. पण नंतर त्याच्याकडूनच कळले की, ही सगळी हपीसातली वृत्तपत्रे आहेत म्हणून ! तो म्हणाला- "पेपरवाला आधी ती सगळी माझ्या घरी टाकतो व ती सर्व वाचून मी हपीसात नेतो ! " पण काहीही असो- त्याला वृत्तपत्र वाचण्याची जबरदस्त आवड आहे, एवढे मात्र खरे. वृत्तपत्र वाचणे, ही माणसाची दैनिक भूक आहे ! ती भागल्याखेरीज त्याला चैन पडत नसते. झोपेतून सकाळी उठल्याबरोबर, सर्व विधी आटोपल्यावर, एका हातातल्या चहाच्या कपाबरोबर त्याला दुसऱ्या हातात पाहिजे असते ते "वर्तमानपत्र"- बिस्कीट नसले तरी चालते ! 

            आमच्या शेजारच्या बंडोपंताना वर्तमानपत्राचे आणि झोपेचे फार वेड आहे. त्याना झोपेतून उठवलेले अजिबात चालत नाही, तसे झाले तर ते रौद्र रूप धारण करतात ! अशावेळी सौ. बंडोपंत एक नामी शक्कल लढवतात. बंडोपंतांची झोपमोड झाली, तर लगेच त्या मुकाट्याने बंडोपंतांच्या समोर "दैनिक माशामार"चा अंक धरून उभ्या रहातात ! खलास- बंडोपंत सौ.ला कौतुकाने शाबासकी देत, सुहास्यमुद्रेने तो दिवस हसतमुखाने पार पाडतात ! 

           वृत्तपत्राची किमयाच न्यारी आहे ! प्रत्येक घरात एखादे "वर्तमानपत्र" असणे, हे त्या घराची प्रतिष्ठेची बाब बनली आहे ! ते त्या घराबद्दलचे आदराचे लक्षण होते !  भले मग ते कुणी वाचत असो, वा नसो ! गमभन शिकणार्‍या शेंबडया बालकापासून  ते (-वेळप्रसंगी दुसर्‍याची चाळशी घेऊन वाचणा-या) म्हाताऱ्यापर्यंत सर्वाना आवडत असते- ते "वर्तमानपत्र" ! 

         वर्तमानपत्र म्हणजे एकप्रकारचे "शोभादर्शक"आहे ! त्याच्या प्रत्येक पानगाणिक प्रत्येकाची आवड फिरू लागते ! एखाद्याला चित्रपटाच्या जाहिरातीचे पान आवडते, तर एखाद्याला नुसत्या जाहिराती वाचण्याची आवड असते. मनोरंजन-पुरवणी एखाद्याला आवडते, तर एखाद्याला व्यंगचित्राचे पान आवडते. काही शौकिन "शुभराशी"चे आकडे पहात रहातात, तर काही आपले भविष्य काय आहे, ते कुतूहलाने चाळतात ! 

           काहीजणांचे वर्तमानपत्र-वाचन म्हणजे भराभर ठळक मथळे वाचत सुटणे. या शहाण्यांचा पाच मिनिटात पाच पानांचा फडशा पाडून होतो. पण दोन तासानी, आपण एखाद्या ताज्या बातमीची चर्चा केली, तर "अरेच्चा, ती बातमी कशी काय वाचली नाही बुवा मी !" असे आपल्यालाच हे शहाणे उलट विचारतात ! 

          काही महाभाग पेपरवरच्या उजव्या-डाव्या चौकटीपासून, ते पार शेवटच्या पानावर खाली असलेल्या प्रकाशन स्थळापर्यंत- डोके खूपसून बसतात ! या व्यक्ती दोनचार तास खपून "एक रूपया-एक अंक टाईप मोबदला" मिळण्यासाठी मुद्राराक्षसाचे विनोद/उपसंपदकांच्या डुलक्या शोधत बसतात ! पण त्या निमित्ताने, त्यांच्या "कौन बनेगा करोडपती"विषयक ज्ञानात भर पडत असते खरी ! केव्हाही काहीही विचारा- उत्तर पटकन तयारच असते ! 

          "वर्तमानपत्र" काढणारा खराच धाडसी असतो ! आपल्या पेपरच्या कीर्तीचे शिखर आणि अपकीर्तीची दरी- यामधला तोल त्याला डोंबा-यापेक्षा जास्त कुशलतेने संभाळायचा असतो ! कधी तोट्यात, तर कधी फायद्यात, असा 'कभी खुशी कभी गम'चा त्याचा व्यवहार चालू असतो! बहुधा खुशीत हा धंदा चालत असावा ! 

          गल्लोगल्लीत  आपापल्या व्यथा चव्हाट्यावर मांडणारी पत्रलेखकाची एक वेगळीच जात असते. गावातला व्यापार वाढवू इच्छीणारी जाहिरातदार व्यापारीमंडळी असतात. डोक्याला खुराक देणारी कोडी बनवणारी मंडळी असतात. आपला वर्तमानकाळ भूतकाळात दडवून, दुसऱ्यासाठी "साप्ताहिक" "मासिक" रेडीमेड भविष्य तयार करणारे ज्योतिषी असतात ! आकडेमोड करून उजळणीत पारंगत होणारे 'मटका-राजे' असतात !  

        स्त्रीला "चालतेबोलते वर्तमानपत्र" समजले जाते ! ह्या स्त्रीलादेखील वर्तमानपत्रातला 'महिला विभाग' डोळ्याखालून घातल्याशिवाय (आजचा नवीन पदार्थ- पाकक्रिया) तोंडातला घास घशाखाली उतरत नसतो !  

          वर्तमानपत्राचा उपयोग म्हणजे "वाचन" इतकाच नसतो ! ते अष्टपैलू असते. किराणा दुकानातली रद्दी म्हणून आपण पैसे मिळवतो. तर किराणादुकानदार माल  देण्यासाठी याच्याच कागदांचा उपयोग करतो. प्लास्टिकवर बंदी असल्याने वर्तमानपत्राच्या पाकिटाना मागणी आहे !  बागेजवळ भेळपुडा म्हणून याचे तुकडे वापरतात. वेण्या,गजरे,फुले-विक्रेते वर्तमानपत्राचे तुकडे गुंडाळून, ते सुवासिक बनवून देतात. विशिष्ट ऋतूत डास,माशा,चिलटे मारण्यासाठी याचा उपयोग होतो ! काहीतरी चाळा म्हणूनही आपण बसल्याबसल्या त्याच्या घड्या घालतो, पुन्हा उलगडतोच- असे हे 'करमणुकीचे साधन' बनते ! काम न करता दमल्यामुळे येणारा घाम घालवण्यासाठी, वारा घेण्यासाठी आपण  वर्तमानपत्राचीच घडी- 'पंखा' म्हणून- वापरतो ना ? हॉटेलात बसून, 'पन्नास पैशाचा चहा आणि जोडीला फुकटात वाचायला पेपर' असा दुहेरी फायदा करून घेणारे चेंगट दिसतात. सहलीत आणि प्रवासात खाद्यपदार्थाना आधार वर्तमानपत्रच देत नाही काय ?  

          दूरच्या प्रवासात, एकमेकांचा परिचय करून घेण्याचे "वर्तमानपत्र" हे एक उत्तम साधन आहे, हे अनुभवाने कळते ! आपण यष्टीत आणि रेल्वेमधे आरक्षण त्याच्या मदतीने करू शकतो- वर्तमानपत्र ठेवून जागा पकडून ! बऱ्याचवेळेला आपल्या ध्यानात तारीख,वार,महिना रहात नाही. अशावेळी वर्तमानपत्र आपल्या मदतीस धावते !           

          वर्तमानपत्र आणि वाचक यांचे अतूट नाते आहे. ते परस्परावलंबी आहेत. वाचकावर त्याचे जीवन अवलंबून आहे, तर त्याचा उपयोग केल्याखेरीज वाचकाला चैन पडत नाही ! अडल्या-नडल्या वाचकाला त्यातूनच एखादी वहिनी "फुकटचा सल्ला" देत असते. काही विवाहित जोडप्यांना त्यात घटस्फोटाची 'जाहीर नोटीस' देऊन आपले भावी जीवन  सुखी बनवता येते ! बेरोजगाराना "पाहिजेत"च्या जाहिराती आशेचे किरण दाखवतात. जुन्यापुराण्या वस्तूना "जाहीर लिलावाच्या" जाहिरातीतून दाद मिळते. नवोदित वकिलाना 'जाहीर नोटीस' हा आधारस्तंभ असतो ! "बाजार भावा"वर नजर फिरवताच कुणाला किती भाव आहे, ते समजते ! वर्तमानपत्र जाहिरातीवर जगते, तर जाहिरातदार जाहिरातीवर जगतात !  

          "वर्तमानपत्र" हे एक प्रकारचे मधमाशाचे पोळ आहे. वाचकरूपी मधमाशा त्यातील मधावर सदैव टपलेल्या असतात ! ज्याला हवा तो अन् हवा तेवढा मध वाचक चाखू शकतो ! वर्तमानपत्र वाचकाला जिवंत ठेवते. दैनंदिन ताज्या बातम्या पुरवून, त्याचे ज्ञान वाढवते ! "सुविचार" वाचायला लावून- त्याचे मन सुसंस्कारित, शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करते ! 

         जीवन जिवंत ठेवणारे माध्यम म्हणजे "वर्तमानपत्र"! एकाचे विचार दुसऱ्याला, तर दुसर्‍याचे विचार जगाला पोचवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. 

         जीवनात सोबतीला कुत्र, संसारात कलत्र, शपथेला तुळशीपत्र आणि वाचकाला "वर्तमानपत्र" हवेच ! 
.   


आळस- जिवलग सखा !          संस्कृतमधे  "आळस माणसाचा शत्रू आहे !" अशा अर्थाचे एक सुभाषित आहे.  पण मला तरी ते अजिबात पाटलेले नाही ! इतर काही न करता, केवळ एका जागी बसल्यानेच वाल्याचा वाल्मिकी झाला ना ?त्याच्या आळसामुळेच आज आपण  रामायण  शिरोधार्य मानत आहोत !  

          सर्वांना  स्वर्गसुख मिळते ते रविवारी- म्हणजे सुट्टीच्या  दिवशी ! रविवार हा तर आळश्यांचा वार ! अतिउत्साही लोकही याची मौज लुटतात.  सरकार-दरबारलाही आळस येत असतो, म्हणून खास आळसाला प्रोत्साहन  देण्यासाठी हा सुट्टीचा वार !  शाळेला, न्यायालयाला, कचेरीला, आणि कामाला सुट्टी ! 

          ठराविक वेळेस ठराविक काम करणर्‍यास "आळस" म्हणजे एक पर्वणी ! कचेरीतला कर्मचारीवर्ग आठवडाभर काम न केल्यामुळे दमलेला असतो. त्या कामाचा शीण  ते रविवारी आळसात घालवतात. आळसामुळे सकाळची झोप जास्त मिळते. पुरुषवर्गाचा दाढीवरून हात फिरवायचा वाचतो ! तर गृहिणीना स्वैपाक  उशीरा केला तर चालतो. मुलाना तर अभ्यासात आळस , कामात आळस, त्यामुळे खेळायला  उत्तम संधी ! 

          आम्ही भारतीय लोक आदरातिथ्याबद्द्ल भलतेच प्रसिद्ध ! या आदरातिथ्याला  आमच्या आळसाची जोड मिळते.  मग आम्ही सासुरवाडीला पळतो. पाहुणचार झोडतो. सुस्तावतो आणि आळसावतो ! त्या आळसामुळे आमची  नेहमीची ठरलेली गाडी हमखास चुकवतो.  आणि मग पुन्हा सासुरवाडीतच मुक्काम ठोकून आठवडाभर  पाहुणचार झोडतो ! 

          माझा एक तर्क  आहे- आळसामुळे अपघात कमी होतात ! धांदरट, उत्साही लोकाना अपघाताला सामोर जास्त वेळा जावे लागते ! आळसामुळे मेंदूला कुठल्याच गोष्टीची चिंता नसते, काळजी नसते, विवंचना नसते ! शरीराला कष्ट पडत नाहीत किंवा शरीरही झिजत नाही. पहा बरे- किती फायदे आहेत "आळसा"चे ! 

          पोलिस  चोराला पकडण्याचा आळस करतो. चोराला त्यामुळे उपजीविकेचे साधन मिळते.    ते दोघेही अशारीतीने  परस्परावलंबी बनतात ! आळस सर्व  प्राणीमात्रास आवश्यक आहे. तुम्ही काम करतानाही आळस येईल आणि काम न करता तर त्याच्याशी अधिकच जवळीक साधता ! तो तुमच्या अंगात भिनलाच म्हणून समजा !  

         आळसामुळे तर माझे  नेहमी फायदे होतात. रेल्वेगाडी फलाटावर येऊ लागताच, सगळे पुढच्याच   डब्याकडे पळतात, तर मी आळस करून निवांत शेवटचा डबा पहातो - जो  बहुधा रिकामा असतो.  

          एक दिवस काय झाले - बायकोला  आळसामुळे झोपेतून सकाळी उठायला उशीर झाला. "लौकर निजे लौकर उठे" -  हे सुभाषित पार चुलीत घालून टाकले तिने !  ही उशीरा उठल्याने साहजिकच पुढील सगळे कार्यक्रम उशीरा होत गेले.  माझी कचेरी दहाला उघडते. स्वयंपाक तर झाला नव्हता. वेळेवर स्वयंपाक न झाल्याने, मी फार चिडलो होतो. मी पटकन कचेरीला जाताजाता खाणावळीतून डबा घेऊन गेलो ! मधल्या सुट्टीत डबा उघडला आणि पहातो तो काय - तोंडाला चक्क पाणी सुटले हो ! पूर्ण शिजलेला भात, लिंबाची रसरशीत फोड, नीट शिजलेल्या दाळीची आमटी, घट्ट दही, छानशी कोशिंबीर, चटणी, मस्त वांग्याची स्वादिष्ट भाजी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोलगरगरीत वर्तुळाकार नजरेत भरणार्‍या- व्यवस्थित भाजलेल्या चपात्या ! अहाहा- लग्न झाल्यानंतर मी प्रथमच असे हे "पूर्णान्न" पहात होतो !  कारण जन्मदात्रीपासून वेगळे राहिल्यापासून,  मला  जेवताना दिसणारे पदार्थ म्हणजे- खडेदार तांदळाचा भात, आमटी  नावाचा पाणीदार द्रवपदार्थ, चपात्या नामक कणकीचे विविध आकाराचे पापुद्रे  किंवा जाड  भाकरीसारखे दिसणारे प्रकार ! आमचा प्रेमविवाह असल्याने,  मला नुसते पाहूनच  तिचे पोट भरत असते, त्या नादात मला  पोट आहे, ते नेमके ती  विसरते ! लाडाची कन्या असल्याने "संस्कार, स्वयंपाक आणि संसार" याकडे लक्ष देण्यास शिकवण्यात माहेराकडून थोडासा आळस झाला असावा, असे वाटते !

           तर सांगायचा मुद्दा हा की, तिच्या त्या दिवशीच्या आळसामुळेच  मला असे रुचकर चवदार अन्न पहायला आणि खायला मिळू शकले ! हल्ली मी आठवड्यातले काही दिवस कचेरी सुटल्यावर घरी जेवायचा आळस करून, चक्क त्या माझ्या आवडत्या खाणावळीत जाऊन जेवत  असतो ! ( कृपया तिला जाऊन सांगू नका हं  कुणी ! )  माझे वजन  आता चारशेवीस ग्रामने वाढले देखील आहे !                    
    
          आळसामुळे आपल्यामागे कसली कटकट रहात नाही. कारण  आपणच सर्वात मागे  असतो ना ! आळसामुळे मी शाळेत कधी अभ्यासच केला नाही. मग शिक्षा मिळायची ती  मागे उभे राहायचीच ! मग मी आपला मागे एकटाच उभा राहून निवांतपणे  डुलकी घेत असे ! नाहीतरी कुणीतरी (बहुतेक मीच-) म्हटले आहेच की- " आज करे सो कल कर, कल  करेसो परसो ! " 

          आळस नसणारी माणसे किडमिडीत असतात, शांती म्हणजे काय ते त्याना ठाऊकच नसते ! सदा पहावे तेव्हा- काम काम आणि काम ! त्याना कामाचे वेडच लागलेले असते ! आळशी माणसाचे त्या उलट- चांगली अगडबंब, स्थूल, गुबगुबीत बनतात ती ! त्याना एकच काम पुरत- चुटक्या वाजवत जांभया देणे ! 

          पूर्वी म्हणे एका मंत्र्याने कर चुकवण्याचा आळस केला - तो मंत्री लगेच पीएमच्या गळ्यातला ताईत बनला की हो !  आम्ही आपले पाणी पट्टी, घर पट्टी, असल्या पट्ट्याकडे लक्ष देत बसतो, त्यामुळे नगरपालिकेचे अधिकारी आमच्याकडे बघण्याचा लगेच आळस करतत ! 

          मतदारानी योग्य उमेदवाराना मत टाकण्याचा आळस केला, म्हणून तर आज अनेक आळशी नेतेच मंत्री झालेले दिसतात ! ह्या आळसाचे महत्व जाणूनच की काय, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण  गेल्याकाही  वर्षात "आळसा"मधे खूपच प्रगती केलेली दिसतेय-  पंचवार्षिक योजनाना आपण  सप्तवार्षिक योजना बनवल्या ! विकास योजना झकास होत्या, त्या सगळ्याचे  तीन तेरा करून भकास केल्या ! 

           परमेश्वाराने तर वरताण  केली. पाऊस पाडण्यात त्याने केलेल्या  आळसामुळे तर एका गावांत मारुतीने डोळ्यातून पाणी काढले म्हणे ! पाऊस नसला तरी,  आमचे पुढारी आश्वासनांचे भरघोस पीक काढतात ! आम्ही त्या आश्वासनावर विश्वास ठेवून, शेतीत आळस करून स्वस्थ झोपत बसतो.  

           लक्षात आले ना, कसा आहे  "आळस- जिवलग मित्र !"  तो आपल्याजवळ  असेपर्यंत आपण  असेच निवांत बसू शकतो. ना कामाचा व्याप, ना डोक्याला ताप ! 

          आमच्या घरी सिनेमाला जायची टूम कुणी काढली की, मी लगेच "आळशी अजगर" बनतो ! सर्वजण तयारी करतात- बाहेर पडण्याची- पण तयार व्हयायला मी बराच  आळस करतो. माझ्या आळसामुळे मग बस चुकते.  पण त्यामुळे फायदे किती होतात ?  बसचा खर्च, सिनेमाचा खर्च, मध्यांतरातला खाण्याचा खर्च, सिनेमा सुटल्यावर भेळपुरी-आईस्क्रीमचा खर्च ! अबब ! हा सगळा खर्च केवळ माझ्यामुळे वाचतो.  घरात काटकसर होते. बरीच शिल्लक  पडते आणि ती  महिना अखेरीला उपयोगी येते. ह्या सगळ्या  चांगल्या गोष्टीला जबाबदार कोण ? 

" आळस- जिवलग सखा ! "
.      

माझ्या खोपटाभोवती ..माझ्या खोपटाभोवती..
असतात दोन कोंबडे
चार कोंबड्या.. 
अन् त्यांचे खुराडे -

शेणा-मातीने 
सारवलेल्या अंगणात 
माझी म्हातारी माय 
चार-दोन दाणे 
पाखरांना टाकत 
न्याहाळत आहे ----
ती जमीन 
त्यावर टाकलेले दाणे 
ते टिपणाऱ्या चिमण्या !

निवांत बसलेल
एक काळ-पांढर कुत्र 
...मधेच आपल्या जखमेवर 
बसू पाहणा-या माशांना 
हाकलू पहाणारे त्याचे 
थरथरणारे अंग...

समोर गोठ्यातली म्हैस 
तिच्याभवती 
घुटमळणारे रेडकू....

बाजेवर पडून
सुरकुतलेला एक हात 
कपाळावर आडवा टेकवून 
बाप पडला आहे -

भूतकाळाचा ढीगभर आनंद 
वर्तमानातले न पेलणारे दु:ख 
भविष्याची असीम चिंता ....
दुष्काळी हवेतला 
गारवा अंगावर घेत !

आहे हे असे आहे .....
झाली माझी कविता !
शोधू नका ....
तिच्यामध्ये - 
कुणी आता --

.... एसीचा गारवा ,
बेडरूमचे भिंतींचे रंग ,
सिलिंग फ्यानच गरगरण , 
झुळझुळीत पडद्याच वर्णन ,
खुल्लमखुल्ले 
ओष्ठशलाकेत भिजलेले प्रेम !
.

प्रसिद्धी


          "प्रसिद्धी" ही मनुष्याची आवडती गोष्ट आहे. कारण प्रसिद्धीमुळे त्याची स्तुती होते, तो प्रकाश झोतात येतो. येन केन प्रकारेण प्रसिद्धी मिळवणे, हा मनुष्याचा स्वभावधर्म बनला आहे ! ' नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण  बाळा ' - असे आपण म्हणतो खरे,पण अनियमितपणे पडणाऱ्या  पावसालाच
 जास्त प्रसिद्धी मिळत नसते  काय ! 

          प्रसिद्धी पावणार्‍यात प्रथम असतात ती  पुढारी मंडळी !  सत्कार समारंभ, उद्घाटन समारंभ अथवा श्रद्धांजली प्रसंग वगैरे कार्यक्रमास पुढा-यांचीच  प्रथम हजेरी असते.  कुणालाही दु:खी, नाराज न करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते प्रसिद्ध होतात ! ते सदैव हसतमुख असतात. ' देव भावाचा जसा भुकेला ' असतो, तसाच किंबहुना थोडा जास्तच,  पुढारी प्रसिद्धीचा तहानेला असतो ! आपल्या आजूबाजूला नेहमी 'ही' गर्दी-गराडा  असला पाहिजे,  आपल्याबद्द्ल पेपरात चार शब्द  रोजच छापून आले पाहिजेत, वेळप्रसंगी (-आपल्यासारखेच) इतराना  लाचार बनता  आले पाहिजे,  या गोष्टींवर त्यांचा कटाक्ष असतो. निवडणुकीत  निवडून आले तर ते प्रसिद्धीची आशा धरतात आणि पडले तर  विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रसिद्धी मिळवायला धडपडतातच !

          काही सामान्य माणसे असामान्याचे शेपूट धरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात.  ' मी अमक्याचा हा, तमक्याचा हा ' अशी सदैव आपली टिमकी वाजवण्यात त्याना फुशारकी  वाटते !  "करी लांगूलचालन जो दुजांचे, जडेल नाते प्रसिद्धीशी तयाचे"- असेच काहीसे त्याना वाटत  असावे.  महादेवामुळे नंदी, साहेबामुळे चपराशी,  तसेच  विजयी संघामुळे राखीव गडी - याना आपोआप प्रसिद्धी मिळत असते !

           स्वत:च्या कार्याने प्रसिद्धी मिळणारे खरे कर्तृत्ववान ! असे लोक विरळच. गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा फुले, महात्मा गांधी- असे तुरळक लोकच आढळतील, बाकी सगळे पुढारी छापच ! "गीतांजली"साठी  नोबेल पारितोषिक मिळूनही  प्रसिद्धी विन्मुख रहाणारे टागोरांसारखे असामी काहीही गाजावाजा न करता  प्रसिद्धी  पावून  जनमनात मानाचे स्थान पटकावतात !

          बंडू नावाचा माझा एक मित्र होता. अधून मधून त्याचे पत्र (- 'येथे मुतारीची कशी अवस्था आहे',  'येथे मुतारीची का आवश्यकता आहे', 'येथे विजेची सोय हवी' - टाईप ) स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याचे ध्येय "लेखक" म्हणून प्रसिद्ध होण्याचे होते !  काही अंशी त्याचे ध्येय साध्य झालेही ! कारण "दिल्ली"त नसला, तरी तो "गल्ली"त "पेपरात नाव छापून येणारा" म्हणून प्रसिद्ध  झाला होता  !

          मनुष्याला प्रसिद्धी मिळवायला, तो स्वत: आणि इतर अनेक कारणे कारणीभूत होऊ शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर, लॉटरीचे देता येईल. काल "भिक्षाधीश" असलेला माणूस ह्या लॉटरीमुळे आज "लक्षाधीश" म्हणून प्रसिद्धी मिळवतो !
     
          प्रसिद्धीमुळे माणसाला 'वर' मिळतो,  तसाच 'शाप'ही मिळतो.  प्रसिद्धी चिरकाल टिकते, तशीच  क्षणभांगुरही दिसते. चौर्यकलेत  मिळालेली कु-प्रसिद्धी चोराला चतुर्भुज करते ! काळ्याबाजारातल्या तिकीटविक्रीवरून सिनेमाला  मिळालेली प्रसिद्धी काय चिरंजीव असू शकते ?  नागाना  खेळवण्यात प्रसिद्धी मिळवणारा गारुडी सर्पदंशामुळे मरतो. रणजीत शतक ठोकणारा किंवा दहाच्या दहा  बळी मिळवणारा खेळाडू कसोटीत निष्प्राभ ठरतो, तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावरून भुईसपाट होताना बिचा-याला किती यातना होत असतील ! कालची लोकप्रिय नटी  उद्या 'एक्स्ट्रा' म्हणूनही ओळखली जात नसते-  हा प्रसिद्धीचा "शाप"च नाही काय ?       
    
          कपडे शिवण्याच्या खास शैलीमुळे एखादा टेलर प्रसिद्ध होतो. मुदलावर भरघोस व्याज देणारी संस्था प्रसिद्ध होते. वारंवार जाहिरातबाजीमुळे कंपन्या प्रसिद्ध होतात. प्रसिद्धी  मिळवण्यास, काहीतरी  अचाट कल्पना, अद्भुत नाविन्य, कल्पक चातुर्य, समयसूचक योजना मात्र आवश्यक असते !

          एका तासात अमुक कप चहा पिणारा उच्चांक गाठतो, तर सतत अमुक दिवस अमुक तास सायकल  चालवणाराही उच्चांक प्रस्थापित करतो.  उच्चांकाबरोबर सत्कार, हारतुरे वगैरे मिळून "प्रसिद्धी" पदरात पडते !
          सिनेमातल्या एखाद्या अभिनेत्याने नेहरूसदरा अथवा झब्बा घालून खाली  हाफप्यांट  चढवली  तरी, असला मूर्खपणा फ्याशन  ह्या गोंडस नावाखाली प्रसिद्धी मिळवेल ! काहीकाळ डोक्यावर केसाना तेल न लावणे, झिंज्या वाढवणे, गालावर कल्ले वाढवणे, ही फ्याशन  रूढ झाली होतीच ! (ती कदाचित काटकसर म्हणून किंवा घरातील दारीद्र्यामुळे  आली असावी ! )

          " प्रसिद्धी मिळवण्याचे वेड " एकदा अंगात शिरले की, सगळा  खेळखंडोबा झालाच म्हणून समजा ! आमच्या शेजारी एक तरूण मुलगी राहात होती. तिलाही बहुधा ही बाधा झाली असावी. सिनेमात एखादी नटी  वेगळे काहीतरी करताना दिसली की, लगेच ही  तरुणी अनुकरण करायची ! सायराबानूची अल्लड  चाल ही  मुलगी चालायला पहायची, पण शरीराचे आकारमान अस्ताव्यस्त  असल्याने तिची चाल शेवटी टूणटूण   ह्या नटीसमान बनली. त्यामुळे शेवटी ही  मुलगी प्रति टूणटूण म्हणूनच प्रसिद्ध झाली ! लताचे एखादे नवीन गाणे रेडिओवर लागले की, ह्या मुलीचे कर्कश (-तिच्यामते सुमधुर ! ) केकाटणे  सुरू होत असे !

          प्रसिद्धी काही वेळा नको असतानाही  चिकटतेच.  मुलाखत घेणार्‍याला एखादी व्यक्ती बजावते- " माझे नाव कुठे प्रसिद्ध करू नका हं ! "  तरीही ती  व्यक्ती  " प्रसिद्धीविन्मुख " म्हणून प्रसिद्ध होतेच !

          प्रसिद्धी कुणालाही लाभते ! जन्मत:च दोन डोकी , तीन हात असलेले अर्भक नाही का प्रसिद्धी मिळवत ? डोके नसलेले  पुढारीही असे प्रसिद्ध होतातच  ना !  दहा खून पाडणारे दरोडेखोर कुप्रसिद्ध होतात तर, त्याना पकडणारे पोलीस सुप्रसिद्ध होतात !

           प्रसिद्धी  कोठेही मिळते.  हुतात्मा बागेजवळची भेळपुरी प्रसिद्ध होते, तर सभागृहातील सदस्यांची आपापसातील  मारामारी  प्रसिद्धी मिळवतेच !

          प्रसिद्धीवर मनुष्य जीवन जगतो ! प्रसिद्धी मिळाली, तर तो प्रगतीशील बनतो. तो आशावादी बनू शकतो. प्रसिद्धीचा कळस गाठण्यासाठी तो आयुष्यात कार्याचा पाया रचतो ! चारचौघात काहीतरी आपले वेगळेपण टिकवण्यासाठी तो जिद्दी बनतो.  अंतराळविराना प्रसिद्धी मिळते, पण एखाद्या "गागारिन"ला आपले प्राण गमवावे लागतात!         
.

हसावे कसे !


  
          कल्पना करा- तुम्ही एका महत्वाच्या मिटिंगमधे दहा लोक जमलेले आहात ! त्या मिटिंगमध्ये महत्वाच्या गहन प्रश्नावर चर्चा चालली आहे. वातावरण चांगलेच तंग झालेले आहे.  तरीपण चहापोह्यांच्या बशांकडे मात्र   कुणाचे दुर्लक्ष झालेले नाही. एखादा वक्ता अगदी तावातावाने हातवारे करीत, त्याचा मुद्दा प्रस्थापित करत आहे... अशावेळीच  त्या महासिरीयस वातावरणात, एका कोपऱ्यातून  " खीक खीक .." करून हास्याची एक लकेर ऐकू आली तर - !!!

 सांगतो, सगळकांही  आता सविस्तर सांगतो -
  तो "हास्य-लकेर-कर्ता" मीच बरे का ! त्या दहाजणांत मीही होतो !
आमचे चहापान चालू असताना, सहज माझी नजर चहा पिणाऱ्या एका सभासदाकडे गेली ---   अन् घोड्याने तिथेच पेंड खाल्ली म्हणा किंवा तिथेच माशी शिंकली म्हणा -
     तो चहा पिणारा सभासद अंगयष्टीने तसा किरकोळच, पण त्याच्या "मिशा" मात्र मोठया रुबाबदार होत्या !चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर 'फुरर्र फुर्र 'आवाज करत तो चहा पीत होता !  सवय असेल म्हणा त्याला तशीच ! एखाद्या रंगाऱ्याने आपल्या डब्यातून बुचकळून काढलेल्या रंगातल्या ब्रशाप्रमाणे,  चहाचे तुषार त्याच्या मिशाभोवती उडत होते ! ते गमतीदार दृष्य पाहूनच मला हसू आवरेनासे झाले आणि माझ्या तोंडून उपरीर्निर्दिष्ट हास्याची लकेर नकळत उमटली होती !
खरेतर मी तसे करायला  नको होते,  हेही मला कळत होते .. 
तरीपण मी न राहवल्याने त्या व्यक्तीकडे हात दाखवून हसत सुटलो झालं !  बाकीचेही मग त्या "चहामय मिशां"कडे पहात, हसत सुटले ... 
आम्ही सगळे हसताना पाहून ती किरकोळ व्यक्तीही (-कारण न कळता देखील !) आमच्या हसण्यात सामील झाली !

           तर हास्याची साथ, लागण  अशी असते ! 

          हसावे किती, हसावे कुठे, हसावे कधी आणि हसावे कसे-  याबद्दल सर्वसामान्य संकेत, शिष्टाचार पाळले जातातच ! पण नियम म्हटले की अपवाद आलेच ना ! 

          निदान माझे तरी असे मत आहे की, "हास्या"ला कुणी कधी कसली बंधने ठेवूच नयेत ! अहो, "हास्याविना जीवन " म्हणजे पैशाविना बँक किंवा दौऱ्याविना नगरसेवक किंवा मंत्री !  हसताय कशाला - जुन्याच शिळ्या उपमा आहेत ह्या !

          मनुष्याच्या जीवनाची बाग हास्याच्या विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेली असावी ! 
     खुदकन हसणे, लाडीकपणे हसणे, हास्याचा धबधबा, सातमजली हास्य-  हे सारे प्रकार म्हणजे जीवनाच्या सर्कशीतल्या कसरतीच होत ! मिशीतल्या मिशीत हास्य, मिस्कील हास्य, 'दया टाळी 'असे म्हणण्यापूर्वीचे हास्य-  हे सारे प्रकार, म्हणजे जीवनाच्या मखमली गालीचावरून अलगदपणे टाकलेली पावले !

          असेही काही प्रसंग असतात, जिथे हसणे वर्ज्यच असते !  श्रद्धांजली वाहणे- हा त्यापैकी एक प्रसंग !  पण काही महाभाग असे निघतात की, अशाही प्रसंगी ते हास्याची खसखस पिकवतातच ! ( बिचारा मृतात्मा ! आयुष्यात अशावेळी प्रथमच मन:पूर्वक तो वरती पडून रडत असेल- असली अवकाळी हास्याची खसखस पिकलेली पाहून !)  

          हास्याने आयुष्य वाढते,  असे म्हणतात !  खरे असेलही कदाचित ते !  परंतु हसणारा मनुष्य नेहमी आरोग्याच्या बाबतीत सदासुखी नक्कीच असणार, अशी माझी खात्री आहे !

          मानसिक चिंता, नसत्या काळज्या, प्रासंगिक तणाव-  ह्या सर्वावर प्रभावी , हमखास, गुणकारी . रामबाण औषध म्हणजे "हास्य" !  एका हसणाऱ्यामागे दहा हसणारे येतील , पण एका चिंतातूर जन्तूबरोबर  कुणीही आलेला दिसणार नाही !

          " हसा नि लठ्ठ व्हा " - या म्हणण्यामागे निकोप दृष्टी नसणार !  लठ्ठ माणूस हसताना, मला कधी दिसलाच नाही आजपर्यंत ! कारण हास्य देखील त्याला बोजड  वाटत असणारच  ना !  एक मात्र खरे की, लठ्ठ  तुन्दिलतनु  माणसे इतरांना हसायला मात्र खूप संधी देत असतात !  काटकुळी माणसे अगदी जबडा आ वासून हसताना दिसतात !  

          एक तत्व मी नेहमीच पाळत आलो आहे-  हसू आले  की हसावे ! "हसावे कसे- ?"  या विषयावर एखादा श्रोता मन लावून दाद देत असेल, तर मी त्याला त्या विषयावरील भाषणाची मख्खीच समजली नाही, असे समजेन !  " आपण कसे हसावे ? " - हे दुसऱ्याने कशाला सांगायला हवे हो ?  साध सोप सरळ सूत्र आहे- 'जसे जमेल तसे हसा !'  तेच खरे नैसर्गिक हास्य ! तेच खरे आरोग्य-लाभदायक टॉनिक !

           हसण्याचे (-आणि दात दाखवण्याचे) अनेक प्रकार आहेत. 'विनोद'निर्मित हास्य- यात  अनेक शब्दप्रभूंनी, शब्द्शायरांनी उलथापालथ केली आहे. त्यात आणखी मी कडमडणे अप्रस्तुत, अयोग्यच ! एक गोष्ट निश्चितच की, "हास्य आणि विनोद" नेहमी हातात हात घालून मिरवत असतात !

           'विनोदी जाहिराती वाचून येणारे हसू, तथाकथित विनोदी मुखपृष्ठ पाहून 'होणारे' हासू, पाठीवर थाप मारून गडगडाट करणारे हासू -  हे सगळे हसण्याचे 'नमुने' आहेत ! ' छद्मी हास्य' हा त्यावरील 'कळस' !

          काही महाभागांना "नक्की कसे आणि कधी  हसावे-"  तेही न कळल्यामुळे देखील हसू येते ! सर्वजण हसून शांत झाले की, अचानक काहीना हसण्याचा कंठ फुटतो ! हे सारे हसण्याचे 'चमत्कारिक' प्रकार !  'खीक खीक' करून हसणारे किंवा प्रत्येक वाक्याची सुरुवात आणि शेवट 'हा हा हा 'च्या गडगडाटाने करणारे महाभाग - हे इतरांना निष्कारण पेचात टाकतात आणि आपलेच हसू करून घेतात ! कारण ते नक्की कशासाठी हसत होते , हे तुम्ही त्यांना विचारू शकणार  नाहीत आणि समजा विचारलेच तरी त्यांना ते सांगता येणार नाही - त्यामुळे पुन्हा नुसतीच 'खीक खीक' किंवा नुसताच 'हा हा हा' ऐकायला मिळणार !
           खलनायकाचे "विकट हास्य" हा हास्याचा सर्वात शोककारक प्रसंग ! कारण ह्या एकमेव हास्यालाच कुठेही कसलीही कुणीही कधीही दाद देत नाही ! कदाचित 'निर्मळ' वा 'निर्भेळ' हास्याचे अजीर्ण होऊ देऊ नये, म्हणूनच खलनायकाच्या  'विकट  हास्या'चा अवतार झाला  असावा ! 

          एखाद्याचे स्मित हास्य किंवा भोळेभाबडे आकृत्रीम हास्य किती मोहून टाकते ना आपल्याला - जणूकाही भर उन्हाळ्यात   गारगार हवेचा अंगावर आलेला फवारा !   

तात्पर्य काय - " हसावे कसे ....? "
तर जेणेकरून कपाळावरची आठी नाहीशी होईल- असे !
.
                

असेही शेजारी असतात !


          शेजारधर्म म्हणून म्हणा, किंवा  परोपकार करण्याचा दृष्टिकोन बाळगून म्हणा, आपल्या आयुष्यात काहीकाही शेजा-यांचा सहवास चांगलाच अविस्मरणीय ठरतो.  'दृष्टी तैसी सृष्टी ' या न्यायाने आपली  बाजू सत्याची पाहिजे. प्रथमत: आपली परोपकार दाखवण्याची दृष्टी पाहिजे. शेजारधर्म  काय तो आपणच  आधी पाळला पाहिजे.  तर आपण चांगले खरे "शेजारी" होऊ शकू.  आपले पाहून दुसरेही आदर्श शेजारी बनण्याचा प्रयत्न करतील..... 
हे सगळे नुसते आपल्याला 'वाटणे'च झाले !

          आमचे आयुष्यच असे विचित्र की, आम्ही शेजारधर्माचा वृक्ष लावून उपकार करावयास गेलो, पण त्याला फळे मात्र नेहमी अपकाराचीच आली ! कुठून असले शेजारी भेटतात कुणास ठाऊक ! आम्हाला हा शेजारधर्म चांगलाच भोवतो.

          घराशेजारीच एक श्रीमंत कुटुंब रहात होते.  पैसा कधी खर्च करीत नाहीत, म्हणून श्रीमंत म्हणायचे.  दुसरे काही नाही ! अगदी मीठ मागण्यापासून ते ग्याससिलिंडर मागण्यापर्यंत त्यांची तयारी असायची !  एके सायंकाळी,  बायको देवघरात देवापुढे दिवा लावत असतांनाच,  शेजारीण भराभरा आली आणि म्हणाली-
     "अहो वैनी,  मला जरा काडेपेटी  देता का ?  मी सकाळीच आणणार होते, पण  कामाच्या नादात विसरूनच  गेले बघा, दोन मिनिटात परत आणून देते हो. पुन्हा कध्धीम्हणून  त्रास देणार नाही असला ! !"
     " अहो, असू द्या हो, शेजारधर्म म्हटला की हे चालायचंच  ना ! " - म्हणत बायको अर्धी  भरलेली काडेपेटी  तिच्या हाती देऊन मोकळी झाली सुद्धा !  ती आमची  काडेपेटी  दोन मिनिटानीच नाही तर,  दोन वर्षात कधीच  परत मिळाली नाही,  हे वेगळे  सांगायला नको !  आठवड्यात कमीतकमी  आमच्या घरातून, दोन जिनसा उसन्या म्हणून नेल्याशिवाय, त्यांना चैनच पडत नसावी !

          दिवाळीत माझे काही मित्र फराळासाठी घरी येणार होते. आमच्या घरचे टेबल जरा जुनाट आहे, म्हणून मी शेजारीण बाईच्या घरी टेबलक्लॉथ  आणायला गेलो.
     " दोन तासापुरता तुमच्याकडचा टेबलक्लॉथ द्या !" - असे मी त्याना म्हणालो.  तर त्या बाई म्हणतात कशा:
 " अहो भावजी, दिलाही असता मी आमच्याकडचा टेबलक्लॉथ, पण आमच्या ह्याना असल्या भारी वस्तु  दुसऱ्याना वापरण्यास दिलेल्या मुळीच आवडत नाहीत हो ! मी तसा तो गुपचुप, तुम्हाला म्हणून- नेऊ दिलाही असता, पण आता हे यायची वेळ झाली आहे ना आत्ता ऑफिसातून !"
   बाईंचे 'हे' पाचच  मिनिटे माझ्या आधी ऑफिसला गेलेले मी पाहिले होते.  आणखी सहा तास तरी ते नक्कीच येणार नव्हते ! पण  जाऊ  द्या, असतो असा एकेकचा स्वभाव ! 
ऐनवेळेला उपयोगी पडेल तो खरा शेजारी एखादाच ना ? 
उशीर होत असल्याने,  मी मागच्या पावलीच धूम ठोकून, दुस-या शेजा-याकडून टेबलक्लॉथ घेऊन आलो. 

          माझ्या धाकटया भावाने तो  प्रसंग चांगलाच लक्षात ठेवला होता.  पुढे एकदा, त्या शेजारीण बाईनी माझ्या धाकटया भावाला बोलावले आणि सांगितले- 
" अरे राजू, जरा दुकानात जाऊन पाच रुपयांचे वेलडोडे आणून दे रे.  मला इथे  खूप कामाचा ढीग पडला आहे,  देतोस ना आणून, बाळा ! "
           राजूने त्याना फटकारले- " काकू, मी आणूनही दिले असते तुम्हाला, पण मला बाबानी चांगले बजावून ठेवले आहे की, लोकांची हलकीसालकी कामे कधीही कारू नयेत म्हणून ! तसे  मी तुम्हाला गुपचुप वेलडोडे आणून दिले असते, पण बाबा दारातच उभे आहेत ना, काय करू मग ? "
           बाबा बाईंच्या समोरूनच बाहेर गेले होते. पण भावाचे ऐकायला बाईसाहेब समोर कुठे होत्या ! दाणदाण  पदन्यास  करत केव्हाच निघून गेल्या होत्या. 
जशास तसे-

 हे  त्यांच्या चाणाक्ष डोक्यात शिरले असावे, यात शंकाच नाही !

लहानपणची आणखी एक गोष्ट-
          दुसरे एक शेजारी -  त्याना दुस-यांच्या वस्तू न्यायला आणि नादुरुस्त करायला फारफार आवडत ! नेताना भरदिवसा सर्वांच्यासमोर एखादी चांगली वस्तू तात्पुरती वापरायला म्हणून नेत, परत करताना मात्र हमखास सायंकाळची किंवा रात्रीचीच वेळ गाठून येत !  असेच ते एकदा सकाळी  दहा  वाजता आले आणि वडिलाना म्हणाले- 
     "हॅरक्युलसच्या सायकली रनिंगला एकदम फस्कलास बघा ! ( मी मनातून ओळखलेच की, आता ही धाड आपल्या नव्या को-या  सायकलवर पडणार आहे ! ) सकाळी  तिच्यावर बसून मुंबईहून निघालो की, संध्याकाळपर्यंत थेट पुणे आलेच समजायचे !"  ( मी मनात  म्हटले-  रात्रीपर्यंत स्वर्गातच थेट ! ) वडलानी आपणहोऊन आमची नवी सायकल केव्हा, कधी, कुठे, कशी घेतली ते सांगायला सुरूवात केली., ते गृहस्थ शेवटी लपवलेले ताकाचे भांडे उघडे करून म्हणाले-
      " अप्पासाहेब, उद्या मी आळंदीला जावे म्हणतोय !"
साध्या सरळ स्वभावाचे वडील त्याला उत्साहाने म्हणून गेलेच - 
     " अरे वा ! आमच्या नव्या को-या सायकलचे उद्घाटन होऊन जाऊ  द्याना  तुमच्या हस्तेच !" 
 बोक्यासारख्या टपलेल्या त्या गृहस्थाने  टांग मारून सायकल नेली आणि तिस-या दिवशी संध्याकाळी ती  परत आणून, बाहेर भिंतीला व्यवस्थित टेकवून ठेवली. 
परत जाता जाता ते "गोडबोले" (-आडनाव नसलेले ) शेजारी आभाराचे आणि सायकलच्या कौतुकाचे शब्द वडलाना ऐकवायला अजिबात विसरले नाहीत ! 
 दुसरे दिवशी, सकाळी मी शिकवणीला निघालो. सायकल घराबाहेर नेली आणि टांग मारून निघालो खरा ...
पण आहे तेथेच मुकाटयाने सायकलवरून  खाली उतरलो !  चेन कव्हरमधून लोंबकळणारी तुटकी चेन माझ्याकडे पाहून वाकुल्या दाखवत होती !
          
मी रोज परमेश्वराची प्रार्थना करत असतो-
" हे परमेश्वरा, जगात सर्व प्रकारच्या जाती, धर्म, संस्था उत्पन्न कर ,
 पण ही 'शेजारी' नावाची गोष्ट अगदी समूळ नष्ट कर !"

           पण तो परमेश्वर बेटा माझे काही  ऐकतच नाही !  कसे ऐकणार म्हणा तो -  तोही दुसऱ्या कुठल्यातरी देवाच्या "शेजारी"च आहे ना !
.

वेडी आशा अनुदानाची -
आशा मोठी वाईट असते 
कुणालाच ती सोडत नसते -
पाऊसधार भुलवुन जाते  
धरा कोरडी पहात असते...

गोठ्यामधली वैरण संपुन 
गुरेढोरे विकून झाली -
डोळ्यामधल्या पाण्यामध्ये 
शिळीच भाकर भिजून गेली...

दुष्काळाचे पडता सावट 
शासन सारे झोपी जाते - 
बळीराजाची वेडी आशा 
अनुदानाची वाट पहाते !

.

निकाल          जगात जन्मलेल्या प्रत्येक वस्तूला एका परिणामाचे फळस्वरूप प्राप्त होत असते. तो परिणाम म्हणजे "निकाल" !  तो अनुकूल असू शकतो अथवा प्रतिकूलही  असू शकतो. जन्माचे शेपूट धरूनच मृत्यू जन्माला आलेला असतो-  मृत्यु हाच शेवटचा निकाल !

          'निकाल' हे प्रत्येक गोष्टीचा शेवट,  असे त्रिकालाबाधित सत्य आहे. परमेश्वराने स्त्री जात निर्माण केली आणि तेथूनच सर्वांच्या 'निकालास' सुरूवात झाली.  स्त्री अर्भाकास जन्म देते, तेव्हाच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात ! मुलगा का  मुलगी होणार-  या प्रश्नाकडे आशेने पहाणारा 'भावी' बाप 'तिळे'  जन्मल्याचा 'निकाल' ऐकतो, तेव्हा तर बिचा-याचा पार निकालच  लागलेला असतो !


          'निकाल' मनुष्याला आशावर्धक बनवतो,  त्याचप्रमाणे तो निराशेच्या खोल दरीत ढकलूनही देऊ शकतो. निकालापोटी मनुष्याच्या अंगी विस्मय,  नैराश्य,  उत्साह,  चैतन्य, वार्धक्य, शैशव, आळस वगैरे वगैरे अगणित भानगडी येतात.


        बालकाचा जन्म होतो, तो 'निकाल' आणतो की पृथ्वीवर आणखी एकाची लोकसंख्येत भर पडली म्हणून ! आईला मुलगी हवी असते, तर बापाला हवा असतो मुलगा.  दोघांच्याही मनाला अनुकूल लागेल तो 'निकाल' कसला ?  परमेश्वर बिचारा दोघांच्याही आशेचा पार निक्काल  लावतो !  तो अर्भकास जन्म देण्याआधीच त्या कोवळ्या जिवाला 'कायमचाच निकाल' देऊन टाकतो. निकालापासून चार हात दूर असलेला परमेश्वर हाच एक महाभाग आहे- त्याला कशाची काळजी, चिंता, पर्वा नसते. तो अगदी 'निकालप्रुफ' असतो !
      

          आम्ही लोक कर्मदरिद्री !  हरघडीला आमच्यासमोर निकालाच्या नागाचा फणा वर काढलेला आहेच ! शाळेत शिरल्यापासून निकाल जो आपल्यापाठीशी लागतो, तो थेट मृत्यूने आपला निकाल  लावल्यावरच पाठ सोडतो.


         हल्ली बालकाची मुलाखत बालवार्गासाठी घेतली जाते.  त्या मुलाखतीच्या 'निकाला'नंतर शाळेतल्या प्रवेशाच्या निकालाने बालकाच्या आयुष्याची  सुरूवात होते.  आणि त्या  मुलाखतीच्या निकालावर त्याला वर्गात हजर होण्याचा कॉल मिळतो !  एकदा ते प्रवेशाचे किचकट काम झाले की-  तिमाही,चौमाही, सहामाही, वार्षिक परीक्षा आल्याच. परीक्षा आणि तिचा निकाल, ह्यांची नेहमी हातमिळवणी असतेच ! ही जोडी सर्वांचाच पिच्छा  पुरवते ! त्याचप्रमाणे निकाल आणि निराशा यांचे बरेच जवळचे नाते आहे, हेही अनुभवाने समजते !

          वशिला नसेल तर, मुलाखतीच्या आधीच आपल्याला निकाल माहित होतो. पैसा नसेल तर, मेडिकल- इंजिनीअरींगच्या लायनीतला निकाल आधीच समजला जातो !  'निवडणुकीचा निकाल' ही सर्वात सनसनाटीची बातमी असते. या निकालावर सारे जग इकडची उलथापालथ तिकडे करीत असते !  निवडणुकीचा निकाल हे जगातले कितवे आश्चर्य आहे, ते तुम्हीच ठरावा !  निवडणुकीच्या निकालाआधी अनेक निकालांची साखळी तयार झालेली असते !  वेळ,पैसा,कागद, धीर,उत्साह वगैरे या निकालामागे धावतात.  निकालानंतर कुणाची पोळी भाजते तर  कुणाला टाळी वाजवत बसावे लागते.  असा हा निकाल दुतोंडी  प्राणी आहे !

          लॉटरीचा निकाल कुणाला फायदा वा कुणाला नुकसान देईल, हे सांगता येत नाही. आमच्या शेजारच्या  काकाच्या मावसभावाच्या मामेचुलत्याच्या भाच्याला  लॉटरीचा निकाल फायदेशीर ठरल्यापासून, माझा जबरदस्त ओढा त्या लॉटरीच्या मागे आहे.  त्या ओढ्यामागे, पैशाचा ओढा वाहतो आहे- पण निराशेचे माप पदरात पडेपर्यंत आशेचे पाप 'निकालातूर'च रहाणारच आहे!

          'निकाल' हा एकप्रकारचा लोहाचुंबक आहे ! लाचेचे लोखंड व निकाल या दोघात आकर्षण फार आहे. कोर्टात निकालात निघालेल्या फायली लाच दिली की, निकालात निघतात म्हणे. उद्योगविनीमय केंद्रात लाच दिली की, निकाल आपलाच नंबर बरोब्बर वर सरकवतो, म्हणे. लाच दिली की,  दलालाकडून घरपोच कुठलाही परवाना  मिळू शकतो. 'आधारा'ला दलालाचा 'आधार' असतो. पैसे दिले की तो बरोबर 'आधरा'चा निकाल लावून आधार देतो ! लाच दिली की,  मध्यस्थ दलाल त्रयस्थाकडून आपल्याला हवा तो 'निकाल' लावतो !

          भूत आणि वर्तमान यांच्यामधील फरक म्हणजे- निकाल !  निकाल एकेकाला  होत्याचा नव्हता करतो ! पावसाची वाट उत्कंठतेने पहाणार्‍या चातकासारखी सवय माणसाला लागली आहे, निकाल ह्या गोष्टीमुळे ! प्रत्येक गोष्टीचा निकाल तो पहात बसतो ! उद्याचा निकाल आज पहाण्याच्या निष्फळ  प्रयत्नात माणूस ज्योतिषाला  आपला 'हात' दाखवतो, पण निकाल हा देवाचा संकेत असतो, हे जाणून असणारा ज्योतिषी त्याला चांगलाच 'हात दाखवतो'!

     'मा फलेशु  कदाचन !' असे पुराणात सांगितले गेले असतानाही, मनुष्य निकालाचीच अपेक्षा धरत असतो ! "पुढे काय, पुढे काय ?"-  हाच प्रश्न विचारत निकालाची वाट तो चालत  रहातो.  मग त्याला कधी वाळवंट , कधी काटेरी मार्ग, तर कधी हिरवळ पायदळी तुडवावी लागते!
    
           जगात एकमेकाना निकाल दाखवण्यात, एकमेकांचा निकाल लावण्यात, निकालात निघण्यात ही आपली चराचर सृष्टी गजबजलेली आहे ! पण अजूनही आपल्या लक्षात येत नाही की, निकाल हा पूर्वनियोजितच असतो-  तो द्यावा घ्यावा लागत नसतो.  'परमेश्वरी संकेत म्हणजेच निकाल !'

          आपली धावपळ ही नेहमी व्यर्थच असते. उद्या पेपरात छापून येणारा निकाल, आजच  वाचण्याचा प्रयत्न हास्यास्पद असतो ! लग्न झाल्यावर प्रपंचाचा भार आपल्यालाच वहावा लागणार आहे, हे माहित असणारा माणूस विनकारणच  आपला संसार कसा होईल- या प्रश्नाच्या निकालाची वाट पहात रहातो.  'संसार होईल तसा होईल ' असे मानणारा माणूस विरळच !

          आहे त्या स्थितीत तडजोडीने का  होईना- पण हसतमुख राहाणारा, आशावादी माणूसच जगण्यास लायक वाटतो. इतरांचा तर, निकाल पाहण्यातच आयुष्याचा पार निकाल लागलेला असतो !
 "निकालासाठी जगलास तर निकालात निघालास, निकालावाचून राहिलास तरच खरा जगलास" असे आवर्जून म्हणावेसे वाटते!

          वाचकहो ! हे लांबत चाललेले   'निकाल-पुराण', पेपर  वाचून लगेच निकालात काढू  नका बरे का ! नाही तर रद्दीच्या दुकानात  भेटलात तर, एकेकाचा चांगलाच 'निकाल लावीन' हं !

.     

"इषारा" - एक देणे !               सध्या घराघरातून, वर्तमानपत्रातून , नजर टाकाल तिकडे एकच चर्चा आढळेल -' कित्ती  कित्ती  महागाई ही ! '  या चर्चेला लगेच जुन्या, अनुभवी, तज्ञ, जाणकार मंडळीकडून लगेच उत्तर येते - ' आमच्या वेळी नव्हती हो अशी म्हागाई ! आमच्या वेळी पैशाला पासरीभर वस्तू मिळायच्या ! ' (पण अजूनही ते लेकाचे चिक्कू आहेत तसेच आहेत !)  ह्यावर 'जुन्या---वगैरे' मंडळीकडे उत्सुकतेने नजर टाकली जाते. त्यांच्याभोवती कोंडाळे जमते आणि मग त्या वयस्कर मंडळींच्या' गप्पा उर्फ थापा' अशा काही रंगतात की, बस्स !
     
              या जुन्या मंडळींचा आजच्या पिढीला एक फार मोठा फायदा झालाय. त्यांच्याकाळी अस्तित्वात नसणारी टंचाई, महागाई हल्ली अस्तित्वात आल्यामुळे, साहजिकच तुलनेचा प्रश्न आला. पूर्वीची स्वस्ताई गडप झाली.  व्यापार करणार्‍याना एक सुसंधी प्राप्त झाली. जुलूम करणार्‍याना  आणि जनतेला नाना प्रकारे पिळून काढणार्‍याना, रान अगदी मोकळे झाले आणि या चिखलरूपी पार्श्वभूमीवर मराठी साहित्यात एक शब्दरूपी  कमळ उगवते झाले. त्याचे नाव 'इषारा'.

             येता-जाता- उठता-बसता देता येण्यासारखी गोष्ट, घ्यायला कठीण पण द्यायला सहज सुलभ गोष्ट, काळ-वेळ-स्थळ न जुमानता ऐकवण्यासारखी गोष्ट-  म्हणजे  'इषारा' !

            या इषाऱ्याचा भरपूर उपयोग हल्ली होत असल्याने, सर्वानाच त्याचे महत्व समजले आहे. या वापारावर कुणीही कसलीही- अगदी वटहुकूमानेही - बंदी आणू शकत नाही ! इतके ह्या इषाऱ्याचे महत्व !

           प्राथमिक शाळा सुरू होतात.  विद्यार्थी कुरकुर  न करता शाळेत हजर होतात. बाजारात क्रमिक पुस्तके आली नसल्याचे पालाकाना  माहीत असल्याने, तमाम शिक्षकवर्ग विद्यार्थ्याना मुद्दामच कडक इषारा देतात- "उद्या सर्वानी पुस्तके आणली नाहीत- तर वर्गात बसू दिले जाणार नाही !"  शाळेपासूनच हे इषाऱ्याचे  बाळकडू असे पाजले जाते !

          महानगरपालिकेचे रस्ते खडबडीत असतात. अशा रस्त्यामुळे चक्क रोड रोलरही बंद पडून, धूळ खात पडलेला असतो. अशा रस्त्यामुळे शेकडो अपघात होतात.  हजारो मृत पावतात ! आपल्या या रस्त्यांचा 'पराक्रमी प्रताप, संबंधित खात्याला समजून,  त्या खत्याकडून मग आमजनतेला एक 'इषारा' दिला जातो-       " सर्वानी आमच्या नादुरस्त आणि कुचकामी रस्त्यावरूनही,  आपली चांगली वाहने व्यवस्थित चालवून, आम्हाला सकार्य देऊन, वाहनकर त्वरित भरण्याची व्यवस्था करावी- अन्यथा वाहने जप्त केली जातील  ! "

          प्राप्तीकर खात्याकडून 'इषारा' दिला जातो- ज्या कारकुनानी(-च) अद्याप आयकर भरला नाही, (कर रुपये ४ पैसे २० फक्त भरलेला नसतो बरे का !) त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल! ते बिचारे सामान्य कारकून असल्यामुळे (-मंत्री किंवा अभिनेते नसल्यामुळे !) त्यांची मालमत्ता जप्त होऊन, सरकारला योग्य ते सहकार्य प्राप्त होते !

         कारखान्यांचे व्यवस्थापक कामगाराना 'इषारा' देतात- ' संपावर जाल, तर कामावरून काढले जाईल !' तरी पण 'इषारा' हा नुसता देण्यासाठीच असतो- ह्या कानाने तो ऐकून त्या कानाने सोडून द्यायचा असतो-     हे अनुभवाने माहित झालेले कामगार संप करतातच आणि उलट सर्व  फायदे पदरात पाडून घेतात !

            वरील सर्व प्रकारावरून, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की, 'इषाऱ्या'चे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे ! तो कुणालाही आणि कुणीही 'देऊ' शकतो.  तो कुणी घेवो अथवा न घेवो ! देवघेवीच्या व्यवहारावर जगत असलेल्या जगात हा एकमेव अपवाद आहे !
   
           दान दिल्याने वाढात असते, त्याप्रमाणे  इषारा  दिल्याने त्याचे महत्व वाढत असते. पहिला इषारा देऊन तो कुणी जुमानला नाही,  तर दुसरा द्यायची सोय असते .  समजा, तोही कुणी ऐकणार नसेल तर, तिसरा...... ह्या प्रमाणे संख्या वाढवता येते आणि आपली विसरत चाललेली उजळाणी पक्की होत जाते ! (क्लासेसवाले, प्लीज नोट धिस !).
          
          इषारा संख्येत  मोजता येतो,  त्याचप्रमाणे तो निरनिराळ्या स्वरूपात पहाताही येतो. उदाहरणार्थ, ज्यांच्यावर कसल्यातरी कारवाईचे 'नाटक' करायचे असते,  त्याला 'सौम्य' इशारा देता येतो, तर ज्यांचा वशिला, दबाव नसतो-  त्याना कडक असा इषार देता येतो ! "  लाईट चहा, कडक चहा, पेशल चहाप्रमाणेच सौम्य,कडक, त्याहून कडक इषारा- असे इषाऱ्याचे  प्रकार, स्वरूप असू शकते !

         एक गोष्ट ध्यानात घ्यायची- म्हणजे आपण  सारखासारखा नमस्कार केल्यामुळे, आपले पुण्य वाढत असते, त्याप्रमाणे ज्याला सारखासारखा इषारा (- मराठीत आपण ज्याला   "मेमो" असे म्हणतो !) मिळतो, त्याला सर्वाधीक  महत्व प्राप्त होते.  उदाहरणार्थ- आपले सरकार भाववाढीबद्दल व्यापारवर्गाला "सौम्य पासून ते अतिशय प्रचंड, महाभयंकर, तीव्र इषारे" देत असते, तरीही भाववाढ होतच रहाते आणि व्यापाऱ्यांना  त्यामुळे अतिशय  जास्त  महत्व येतच रहाते !

         'इषारा' माणसाच्या जीवनात  वैविध्य आणतो.  'केला इषारा जाता जाता ' या मराठी चित्रपटाच्या, तर 'इषारा' या हिंदी चित्रपटाच्या शीर्षकातही  हा शब्द मानाचे स्थान पटकवलेला दिसतो ना ?  'नुसत्या बोटाच्या इषाऱ्यावर  नाचवणे' हा वाक्प्रचार मराठीत गाजतो.  तर 'समझदारको इषार काफी' हा वाक्प्रचार हिंदीत गाजतो !  अशा रीतीने 'इषारा' हा शब्द  'भाषावादाला' मुळीच स्थान देत नाही ! तो सर्वाबद्दल  आपुलकीच  दाखवतो. 

          धोका, फर्मान, खून, नजर, सूचना या सहकारी शब्दांशी 'इषारा' जवळचे नाते ठेऊन आहे ! समुद्रकिनाऱ्यावर  स्मगलर लोक 'इषारा' देऊन 'माला'ची देवघेव करतात. तर 'लालदिवा भागात'ल्या ललना 'इषारा' देऊनच सडकसख्याहरीशी संधान साधून, जवळीकही साधत असतात !  श्रीमंत-गरीबीच्या भेदापासून इषारा दूर असतो. सरकार जनतेला इषारा देते, तर जनताही सरकारला इषारा देऊ शकते ! इषाऱ्याचा  वावर असा जनताजनार्दनात  असतो, तसाच तो सरकारदरबारीही आपल्याला दिसून येतो ! हिंदी चित्रपटसृष्टीत तर एका सुप्रसिद्ध व्यक्तीचे आडनावही चक्क 'इषारा' आहे.. आता बोला !
     
    वाचकहो ! आत्ताच स्वयंपाकघरातून लाटण्याच्या आवाजाने 'इषारा दिला' आहे ! इतका वेळ सांगितल्याप्रमाणे इषारा हा ऐकण्यासाठी नसतो, हे जरी खरे असले तरी- अपवादानेच नियम सिद्ध होत असतो ना ? लाटण्याच्या  इषाऱ्याचे महत्व सर्व विवाहिताना समजत असेलच ! आपल्या पाठीची कणीक नंतर तिंबून निघण्यापेक्षा, आपणच बायकोला ती  तिंबण्यात मदत केलेली काय वाईट !  काय हो, पटतय ना.... 

           अहो, पटणारच !  कारण  "समझदारको इषारा ...." ?           
.

" नको ते तारुण्य ! "


            जिकडे तिकडे संप, बंद, घेराव, मोर्चा, चळवळ- कसली ना कसली तरी घडामोड चालूच असते ! एखादा दिवस येतो आणि शांतता देऊन जातो, असे आढळेल तर  शपथ !  ह्या सगळ्या घडामोडी,  हे सारे उपद्व्याप कुणामुळे होत असतील, तर ते बहुतेक गद्धेपंचविशीच्या आसपासच्या तरुणांमुळे !
          

            लहान पोराना काही काळात नसते.  आपण सांगू तशी ती  वागतात.  ' चल बैठ जा' ' चल झूम जा 'च्या तालावर सांगू तशी नाचतात. त्यान्च्या  पाठीशी कुणीतरी करता करविता असतो, त्यामुळे ती  पोर बिचारी सुखी असतात. कशाचा व्याप नाही, काळजी नाही की कसली चिंता नाही ! ' भोपळ्यात बी खुशाल ' असतात.
म्हाता-या लोकांचे तर मन मेलेलेच असते. काहीच न करता आल्यामुळे त्याना म्हातारपणामुळे सेवा-निवृत्त व्हावे लागते.  आता 'आमच्या वेळी असे नव्हते'  किंवा  'आमच्याइतके  तुम्ही काय करता-खाता-पिता, शिंच्यानो ! ' यासारखे उद्गार काढण्याखेरीज, त्याना आता दुसरा काही उद्योगच नसतो !


          लहान पोरांचे तसे, तर म्हाता-यांचे हे असे ! एकंदरीत दोन्ही पिढ्या निष्काळजीच असतात !  उरली मग मधली 'तरुण' म्हणजेच 'कर्तबगार' 'उद्याचे भावी आधारस्तंभ'  'उसळते रक्त '... वगैरे वगैरे असलेली 'तरूण' पिढी ! कुठलीही गोष्ट घडली - ती चांगली असो वा वाईट असो- तिचे खापर फुटणार  ह्याच मधल्या तरुण पिढीवर ! अशा वेळेस कधी कधी जीव जाम वैतागून जातो, 

आणि  म्हणतोच - " नको ते तारुण्य ! "

           लहान शेंबड्या पोरीपासून ते म्हाताऱ्या  आजीबाईपर्यंत सा-यांचा डोळा या 'तारुण्या'वरच ! यात (- म्हणजे तारुण्यात !)  तरुण स्त्री-पुरुष दोन्ही आले.  नाहीतर लगेच 'तरुण स्त्रिया' (बहुधा स्त्रिया नसणारच! कारण  त्या स्वत:ला 'मुली'च समजत असणार !) मोर्चा काढायच्या लगेच !  तर सांगायचा मुद्दा असा की, सर्व तरुणाना आज 'स्वतंत्र' जिणे असे उरलेलेच  नाही !
         लहान पोराने सांगावे- 'दादा, मला एक वहिनी आण ',  तर म्हाता-याने सांगावे- ' अरे बाळ, जरा गाय छाप  आणून दे ना जरा !'  एकूण काय की, तरुण पिढी कामाच्या रगाड्यात चांगलीच पिळून निघते आहे !
           

         अठरा वर्षाच्या आतील पिढीला ती  नोकरीस 'ना-लायक' असतात, म्हणून 'आराम',  तर साठ वर्षावरील म्हातारे नोकरीला 'ना-लायक' असतात, म्हणून जुलमाचा 'रामराम' ! मधल्या मधे मरते ती  मधली ही तरुण पिढीच !

            नोकरी करावी ती  ह्या तरुण पिढीनेच !  सारे कुटुंब पोसावे, ते ह्या तरुण पिढीनेच !  लग्न करून कुटुंब वाढवावे, तेही या तरुण पिढीनेच- तर कुटुंब नियोजन करावे, तेही ह्याच तरुण पिढीने ! यापेक्षा दुसरा विनोदी "विरोधाभास" जगात  दुसरीकडे कुठे आढळेल काय ?
 

             आता "लाईन"चे युग सुरू झालेले आहे. म्हाताऱ्यांना  'रांग धरा' म्हटले, तर त्यांचे पाय दुखतात, कंबर धरते, डोळे जळजळतात- ह्या तक्रारी सुरूच !  ( ह्याच म्हाता-यांचे डोळे एखाद्या कट्ट्यावर बसून, एखादी 'गुलछडी' रस्त्यांतून जाताना- ह्या टोकापासून ते पार त्या टोकापर्यंत बघताना-  मात्र कसे त्रास देत नाहीत , हा डोळ्याच्या डॉक्टरला संशोधनाचा विषय ठरावा !)  हे म्हातारे स्वत: लाईन कुठलीच धरत नाहीत, पण  त्या तरुणानी  एखादी 'लाईन धरली' की,  लगेच यांचा तांबडा सिग्नल तिथे टपकलाच म्हणून समजा !
तरुण करीत असलेली 'थेरं' पाहून,  स्वत:चा 'म्हातारचळ' विसरून;  हे बेटे'  (खरे म्हणजे 'थेरडे' म्हणावयास हवे, पण पुन्हा त्यांच्या मोर्च्याची भिती आहेच ना ! )


           लहान पोरावर रेशन, रॉकेल इ.ही लाईन धरावयास लागते, ती पाहून जीव खालीवर होतो. कारण त्यांच्या धांदरटपणामुळे पैसे हरवणे, माल कमी येणे, उशीर लागणे-  या गैरसोयी वाढतात. त्यामुळे 'लाईन' मारायची ( सॉरी !)- धरायची जबाबदारी तरुणावरच येते ना !
                 

          ऐन तारुण्याचे दिवसही 'तारुण्यपिटीका'मुळे  नकोसे वाटतात. ते नोकरी धरणे, ते ऱ्यागिंग, ते बॉसिंग,  तो प्रपंच,  ती  खदरावळ संभाळणे, पाहुण्या-रावळयांची सरबराई, त्यांचे मानापमान संभाळणे, त्यातून होणारे संशयकल्लोळ ! छे छे, सार्‍या जीवनाचाच  तरुणाना उबग यायला लागतो. ' हे परमेश्वरा, लहान ठेव किंवा एकदम म्हातारे कर !  पण  "नको ते तारुण्य !"- ह्या  असेच तरुणाना म्हणावे वाटत असेल !

                   'जवानी दिवानी' ही रूपेरी पडद्यावरच पाहायला बरी वाटते.  'तरुण तुर्क-म्हातारे अर्क' मधील आपल्याला 'अर्क'च किती 'हा' वाटतो !  'लहानपण देगा देवा -' म्हणण्यातली गोडी  अवीट- फक्त  म्हणण्यापुरतीच !  'हे करा- ते करा आणि करता करता मरा-'  हेच तरुण पिढीचे जीवन-सूत्र बनले आहे. ह्या पिढीला स्वास्थ्य, समाधान, विरंगुळा काही आहे का हो ?  कोणत्याही गोष्टीतून, कामातून त्याला अंग झटकून, मोकळे असे होता येतच नाही !  कारण 'तरुण' हा नेहमी 'उत्साही'च कार्यकर्ता असतो म्हणे !
                 

                   थोडक्यात सांगायचे तर, लहान पिढी ही 'दही', तर म्हातारी पिढी ही 'लोणी' असते ! माझा म्हणण्याचा मुद्दा लक्षात आला असेलच ! मधली म्हणजेच 'तरुण पिढी' ही "ताक" असते-  कुणीही यावे आणि कुठेही कितीही  घुसळून जावे ! पटते ना मी दिलेली उपमा ?  पटली तर व्हय म्हणा की मग !
 

                अरेच्चा ! एक गोष्ट विसरलोच मी !  आता ही तरुण पिढी हे सगळे वाचून, स्वस्थ  थोडीच बसणार आहे ! बघा- निघाला त्या पिढीचा एक मोर्चा, घोषणा देतच -  " नको ते तारुण्य ! "  
.