असेही शेजारी असतात !


          शेजारधर्म म्हणून म्हणा, किंवा  परोपकार करण्याचा दृष्टिकोन बाळगून म्हणा, आपल्या आयुष्यात काहीकाही शेजा-यांचा सहवास चांगलाच अविस्मरणीय ठरतो.  'दृष्टी तैसी सृष्टी ' या न्यायाने आपली  बाजू सत्याची पाहिजे. प्रथमत: आपली परोपकार दाखवण्याची दृष्टी पाहिजे. शेजारधर्म  काय तो आपणच  आधी पाळला पाहिजे.  तर आपण चांगले खरे "शेजारी" होऊ शकू.  आपले पाहून दुसरेही आदर्श शेजारी बनण्याचा प्रयत्न करतील..... 
हे सगळे नुसते आपल्याला 'वाटणे'च झाले !

          आमचे आयुष्यच असे विचित्र की, आम्ही शेजारधर्माचा वृक्ष लावून उपकार करावयास गेलो, पण त्याला फळे मात्र नेहमी अपकाराचीच आली ! कुठून असले शेजारी भेटतात कुणास ठाऊक ! आम्हाला हा शेजारधर्म चांगलाच भोवतो.

          घराशेजारीच एक श्रीमंत कुटुंब रहात होते.  पैसा कधी खर्च करीत नाहीत, म्हणून श्रीमंत म्हणायचे.  दुसरे काही नाही ! अगदी मीठ मागण्यापासून ते ग्याससिलिंडर मागण्यापर्यंत त्यांची तयारी असायची !  एके सायंकाळी,  बायको देवघरात देवापुढे दिवा लावत असतांनाच,  शेजारीण भराभरा आली आणि म्हणाली-
     "अहो वैनी,  मला जरा काडेपेटी  देता का ?  मी सकाळीच आणणार होते, पण  कामाच्या नादात विसरूनच  गेले बघा, दोन मिनिटात परत आणून देते हो. पुन्हा कध्धीम्हणून  त्रास देणार नाही असला ! !"
     " अहो, असू द्या हो, शेजारधर्म म्हटला की हे चालायचंच  ना ! " - म्हणत बायको अर्धी  भरलेली काडेपेटी  तिच्या हाती देऊन मोकळी झाली सुद्धा !  ती आमची  काडेपेटी  दोन मिनिटानीच नाही तर,  दोन वर्षात कधीच  परत मिळाली नाही,  हे वेगळे  सांगायला नको !  आठवड्यात कमीतकमी  आमच्या घरातून, दोन जिनसा उसन्या म्हणून नेल्याशिवाय, त्यांना चैनच पडत नसावी !

          दिवाळीत माझे काही मित्र फराळासाठी घरी येणार होते. आमच्या घरचे टेबल जरा जुनाट आहे, म्हणून मी शेजारीण बाईच्या घरी टेबलक्लॉथ  आणायला गेलो.
     " दोन तासापुरता तुमच्याकडचा टेबलक्लॉथ द्या !" - असे मी त्याना म्हणालो.  तर त्या बाई म्हणतात कशा:
 " अहो भावजी, दिलाही असता मी आमच्याकडचा टेबलक्लॉथ, पण आमच्या ह्याना असल्या भारी वस्तु  दुसऱ्याना वापरण्यास दिलेल्या मुळीच आवडत नाहीत हो ! मी तसा तो गुपचुप, तुम्हाला म्हणून- नेऊ दिलाही असता, पण आता हे यायची वेळ झाली आहे ना आत्ता ऑफिसातून !"
   बाईंचे 'हे' पाचच  मिनिटे माझ्या आधी ऑफिसला गेलेले मी पाहिले होते.  आणखी सहा तास तरी ते नक्कीच येणार नव्हते ! पण  जाऊ  द्या, असतो असा एकेकचा स्वभाव ! 
ऐनवेळेला उपयोगी पडेल तो खरा शेजारी एखादाच ना ? 
उशीर होत असल्याने,  मी मागच्या पावलीच धूम ठोकून, दुस-या शेजा-याकडून टेबलक्लॉथ घेऊन आलो. 

          माझ्या धाकटया भावाने तो  प्रसंग चांगलाच लक्षात ठेवला होता.  पुढे एकदा, त्या शेजारीण बाईनी माझ्या धाकटया भावाला बोलावले आणि सांगितले- 
" अरे राजू, जरा दुकानात जाऊन पाच रुपयांचे वेलडोडे आणून दे रे.  मला इथे  खूप कामाचा ढीग पडला आहे,  देतोस ना आणून, बाळा ! "
           राजूने त्याना फटकारले- " काकू, मी आणूनही दिले असते तुम्हाला, पण मला बाबानी चांगले बजावून ठेवले आहे की, लोकांची हलकीसालकी कामे कधीही कारू नयेत म्हणून ! तसे  मी तुम्हाला गुपचुप वेलडोडे आणून दिले असते, पण बाबा दारातच उभे आहेत ना, काय करू मग ? "
           बाबा बाईंच्या समोरूनच बाहेर गेले होते. पण भावाचे ऐकायला बाईसाहेब समोर कुठे होत्या ! दाणदाण  पदन्यास  करत केव्हाच निघून गेल्या होत्या. 
जशास तसे-

 हे  त्यांच्या चाणाक्ष डोक्यात शिरले असावे, यात शंकाच नाही !

लहानपणची आणखी एक गोष्ट-
          दुसरे एक शेजारी -  त्याना दुस-यांच्या वस्तू न्यायला आणि नादुरुस्त करायला फारफार आवडत ! नेताना भरदिवसा सर्वांच्यासमोर एखादी चांगली वस्तू तात्पुरती वापरायला म्हणून नेत, परत करताना मात्र हमखास सायंकाळची किंवा रात्रीचीच वेळ गाठून येत !  असेच ते एकदा सकाळी  दहा  वाजता आले आणि वडिलाना म्हणाले- 
     "हॅरक्युलसच्या सायकली रनिंगला एकदम फस्कलास बघा ! ( मी मनातून ओळखलेच की, आता ही धाड आपल्या नव्या को-या  सायकलवर पडणार आहे ! ) सकाळी  तिच्यावर बसून मुंबईहून निघालो की, संध्याकाळपर्यंत थेट पुणे आलेच समजायचे !"  ( मी मनात  म्हटले-  रात्रीपर्यंत स्वर्गातच थेट ! ) वडलानी आपणहोऊन आमची नवी सायकल केव्हा, कधी, कुठे, कशी घेतली ते सांगायला सुरूवात केली., ते गृहस्थ शेवटी लपवलेले ताकाचे भांडे उघडे करून म्हणाले-
      " अप्पासाहेब, उद्या मी आळंदीला जावे म्हणतोय !"
साध्या सरळ स्वभावाचे वडील त्याला उत्साहाने म्हणून गेलेच - 
     " अरे वा ! आमच्या नव्या को-या सायकलचे उद्घाटन होऊन जाऊ  द्याना  तुमच्या हस्तेच !" 
 बोक्यासारख्या टपलेल्या त्या गृहस्थाने  टांग मारून सायकल नेली आणि तिस-या दिवशी संध्याकाळी ती  परत आणून, बाहेर भिंतीला व्यवस्थित टेकवून ठेवली. 
परत जाता जाता ते "गोडबोले" (-आडनाव नसलेले ) शेजारी आभाराचे आणि सायकलच्या कौतुकाचे शब्द वडलाना ऐकवायला अजिबात विसरले नाहीत ! 
 दुसरे दिवशी, सकाळी मी शिकवणीला निघालो. सायकल घराबाहेर नेली आणि टांग मारून निघालो खरा ...
पण आहे तेथेच मुकाटयाने सायकलवरून  खाली उतरलो !  चेन कव्हरमधून लोंबकळणारी तुटकी चेन माझ्याकडे पाहून वाकुल्या दाखवत होती !
          
मी रोज परमेश्वराची प्रार्थना करत असतो-
" हे परमेश्वरा, जगात सर्व प्रकारच्या जाती, धर्म, संस्था उत्पन्न कर ,
 पण ही 'शेजारी' नावाची गोष्ट अगदी समूळ नष्ट कर !"

           पण तो परमेश्वर बेटा माझे काही  ऐकतच नाही !  कसे ऐकणार म्हणा तो -  तोही दुसऱ्या कुठल्यातरी देवाच्या "शेजारी"च आहे ना !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा