स्नेह फेसबुकातला -

Pradnya Karandikar

ही रचना श्री विजयकुमार देशपांडे यांना समर्पित -
काकांचा हा छंद किंवा कवितेची विलक्षण ओढ,त्यातील शब्द सामर्थ्य प्रचंड आहे .रसिकांना दर दहा बारा मिनीटे अर्धातासानी काहीतरी छान हसवणारं , आनंद देणारं वाचायला आपण देत असता आपली प्रगल्भता शब्द रचना अफाट आहे .आपला उत्साह ,मिश्किलपणा, रसिकता आपल्या रचनांमधे दिसतो आणि आम्हाला भावतोही . प्रत्यक्षात आपली भेट झाली नाही . फेसबुकच्या माध्यमातून आपल्याशी ओळख झाली तरी पण आपल्या कवितांमधून चारोळ्यांमधून आणि मधूनमधून करणाऱ्या फटकेबाजीतून आमच्यापर्यंत जसे पोहचला आहात त्यावरुन आपल्या ह्या रसिकतेला कवितेतूनच दाद द्यावी वाटलीम्हणून केलेला हा प्रयत्न -
उठताबसता,खातापीता
दिवसारात्री असतो तुझ्याच सहवासात
रात्री बायको जवळ तरी
विसावतो तुझ्याच सान्निध्यात
स्विकारलयं तिनेही तुला आनंदानं
मान्य केलयं तुझ्यात मी अन् माझ्यात तू रमून जाणं……
श्वास असेपर्यंत तू असशीलच
नव्हे तुझ्यामुळेच माझा श्वास आहे
पत्नी एवढीच हृदयाजवळ तुझी जागा आहे
तुझ्यापासून वेगळे होणे
जगण्यापासून दूर जाणे
चंद्राविना रात्र,बासरीविना कृष्ण असणे……
तुझ्यामुळे माझ नांव आहे
रसिकांचे प्रेम आहे
जगण्याला अर्थ आहे
तुझ्याशिवाय सारे व्यर्थ आहे……
माझ्यात तू अन् तुझ्यात मी रुजलो आहे
सुख दु:खापलिकडे तुझं माझ जग आहे
माझ्यानंतरही तुझ्यामुळे मी उरणार आहे
रसिकांमध्ये तुझ्यासह मी भरभरुन जगणार आहे
रचना-सौ प्रज्ञा नरेंद्र करंदिकर
बंगलोर
2015.09.26 - 23:56

स्नेह फेसबुकातला -...

२५-९-२०१८ 

.

चांदोबाचा दिवा
( बाल -कविता संग्रह )

लेखक: विजयकुमार देशपांडे, सोलापूर ( फोन नं 9011667127)
कुजबुज प्रकाशन लातूर


बालकविता असं म्हणलं की कुणालाही आठवतात

 ठराविक कविता/ गाणी उदा चॉकलेटचा बंगला, सांग सांग भोलानाथ, मामाच्या गावाला जाऊ या इ इ.

पण या ही पलीकडे जाऊन बाल कवितांचा एक मोठा खजिना मिळाला तर? 

सोलापूरचे प्रसिद्ध लेखक श्री विजयकुमार देशपांडे यांनी 

तमाम बालगोपाळांसाठी आणि मोठ्यांसाठी ही असा खजीनाच सादर केला आहे

 तो त्यांच्या नव्या ' चांदोबाचा दिवा या पुस्तकाच्या रूपाने.

तब्ब्ल ४० बालकविता यात आहेत. या संग्रहातील आपला मानस नातू

 ' बंडू ला घेऊन ' ते आपल्याला लहान मुलाच्या भावनाविश्वात अलगद नेऊन आणतात.

 मुलाना प्रिय असणारे पक्षी, प्राणी, परी, जादूगार , निसर्गयातून उलगडत जाणा-या 

प्रत्येक कवितेत आपण अगदी लहान होऊन रमत जातो..

'शेपटीवाल्या प्राण्याची सभा' आपणास माहीत आहे अशी च

 एक प्राण्याची सभा ते कवितेतून वर्णन करतात .

लहान मुलाच्या गोष्टीत , "ससा कासव " ही गोष्ट बहुतेक जणांना माहीत असते.

 पण ससा कासव याची एक छान कविता तुम्हाला या पुस्तकात वाचाव्याला मिळेल

कुणा ही छोट्या मुलाला वाढदिवसाला, कुठल्याही स्पर्धेत बक्षीस द्यायला हे पुस्तक छानच .

पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे प्रत्येक कवितेला लाभलेले एक छान चित्र. 

मात्र पुस्तकाचे मुखपृष्ठ मात्र अधिक आकर्षक करता येऊ शकले असते 

असे राहून राहून वाटते. बाकीची प्रत्येक पानावरची सजावट मस्तच

अगदी थोडक्यात या पुस्तकाबद्दल सांगायचे झाल्यास

विजयकाकांचा

चंदोबाचा दिवा

बाळ गोपाळांसाठी

अनमोल ठेवा .

अमोल केळकर

a.kelkar9@gmail.com

स्नेह फेसबुकातला -...

१-१०-२०१५ ....

"पुस्तकविक्री"च्या निमित्ताने गाठीभेटी घेतांना ,

फेसबुकफ्रेंडस मनोज देवकर आणि रवी गुब्याडकर यांची गाठ पडली.

मनोज देवकर म्हणाले - "बरे झाले काका.. तुमची भेट झाली.

आज "ज्येष्ठ नागरीक दिन" आहे. आपल्याला एका छानशा कार्यक्रमाला जायचे आहे."

मुकाट्याने त्यांच्याबरोबर जावे लागले .

सोरेगावच्या अलीकडे पण सैफुलच्या पलीकडे-

एका बालकाश्रमात आम्ही दाखल झालो.

तेथील बेले मॅडमनी आमचे स्वागत केले.

५ ते १८ वर्षे वयोगटातील निराधार बालकांसाठी हा बालकाश्रम,

सुमारे १५ वर्षाखाली हबीबा मॅडम मुळे अस्तित्वात आला.

आज रेल्वेतले एक अधिकारी श्री.डेगिणाळ..

त्यांच्या अर्धांगी सौ. उमा डेगिणाळ यांच्या वाढदिवसानिमित्त,

 त्यांच्याकडूनच बालकाश्रमात मिठाईवाटपाचा कार्यक्रम होता.

त्या कार्यक्रमासाठी- मी "प्रमुख पाहुणा" म्हणून तिथे दाखल झालो !

तीन मुले आणि आम्ही ..

असे त्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात सहभागी झालो.

बालकाश्रमातल्या सर्वच्या सर्व सुमारे चाळीस मुलांनी

 "ह्यापी बर्थ डे टू यू" एका सुरात तालात म्हटले. 

फटाफट फोटो काढण्यात आले. गुलाबजामून आणि वडापावचे वाटप झाले.

सवयीने आम्ही तिघांनी हातात आलेली डिश हादडायला सुरुवात केली.

आणि -

समोरच्या मुलांनी हात जोडून, प्रार्थना म्हणायला सुरुवात केली..

आम्ही मोठे असूनही त्या लहानांपुढे लहान ठरलो ! असो.

निरोप घेतांना, बेले म्याडमच्या हाती त्या बालकाश्रमाच्या वाचनालयासाठी-

माझ्या "चांदोबाचा दिवा" ह्या बालकवितासंग्रहाची एक प्रत मी सप्रेम भेट दिली,

आणि डेगिणाळ दांपत्यास "चांदोबाचा दिवा" बालकवितासंग्रह 

आणि "सखे तुझ्यासाठी" चारोळीसंग्रह सप्रेम भेट दिला.

आजच्या "ज्येष्ठ नागरीक दिना"निमित्त एका छानशा कार्यक्रमात उपस्थित राहता आले,

हा आनंद जीवनात काही वेगळाच होता !

.

स्नेह फेसबुकातला

माझे मित्र श्री. विजयकुमार देशपांडे यांचा आज वाढदिवस आहे.

त्यांना या शुभदिनी उत्तम आयुरारोग्य चिंतीतो व 

असे अनेक वाढदिवस साजरे करण्याची संधी आम्हाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

----------@@@@@@--------


श्री.देशपांडे एक उत्तम कवी आहेत हे आपणा सर्वांना विदीत आहेच. 

त्यांच्या कवितातून विशेषतः चारोळयातून हमखास. भेटणारी सखी

 आपल्याला आता चांगलीच परिचीत झाली आहे.

काही दिवसापूर्वी त्यांनी 'सखे तुझ्यासाठी...'माझ्याकडे पाठवली.

उघडून वाचायला सुरूवातही केली व पूर्ण वाचूनच टाकली.

बागेत उमलणा-या फुलांचे कौतुक

सखे,माझ्या समोर करू नकोस-

तुझ्या चाहुलीनेच लागलेली असते

माझ्या मनाची बाग बहरायला..

अशा अनेक चारोळया या संग्रहात आहेत.अर्थात ही सखी कवीचा 

सतत पिच्छा पुरवत असते.'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'या चालीवर

 कवीला सखीचे प्रसंग अनुभवाला येतात.

तुझ्या लग्नाची पत्रिका घाईघाईत

आनंदाने दिलीस सखे,हातात

मोकळा झालो मी एकदाचा

मनातली व्यथा कायमची लपवण्यात..

सखीच्या लग्नाची पत्रिका मिळाली म्हणून कवी उगाचच 

प्रेमभंगाच्या दु:खाचा देखावा करीत नाही.उलट व्यथा लपवण्याची त्याची तयारी आहे.

आवेश झाशीच्या राणीचा

मला दाखवत सखे,छळतेस

समोर एक झुरळ बघून

अशी सैरावैरा पळतेस....

अशा काही नर्म विनोदी चारोळयाही आहेतच.तिची विविधांगी रुपांची वर्णने करतांना

 कवी खूपच खुलतो.सखी व निसर्गातील विविध घटकांचा मेळ 

अनेक ठिकाणी उत्तम साधला आहे.पाने,फुले,झाडे,बागांपासून चंद्र ढग चांदण्या आकाश 

यांची उपस्थिती कवीचे निसर्गप्रेम दर्शवतो.

बंद दारासमोरुन सखे

चाहूल न लागता जातेस दिमाखात

तुझ्या सुगंधी पदराची सळसळ

फितूर वारा आधीच पोचवतो घरात

या व अशा अनेक चारोळ्यातून ही सखी आपल्याला भेटते.कवीला अहर्निश सतावणारी (?) 

ही सखी तुम्हालाही आवडेल अशी खात्री आहे.

श्री.देशपांडे यांना पुढील लिखाणास शुभेच्छा !

.

- - - Ramchandra Rashinkar

06/10/2015

खाटेवर देईल हरी मज -- [गझल]

मात्रा वृत्त -
[१६+१४ मात्रा ]
......................................................................
खाटेवर देईल हरी मज जीवन अर्धे फसलो मी 
ठेवत माझी मूठ झाकली अर्धे जीवन हसलो मी
.
गंडेदोरे नवस तोडगे धडपड करती काहीजण 
असेल नशिबी घडेल ते ते म्हणून निवांत बसलो मी
.
कष्टातूनच ईश्वर मिळतो कळूनही त्याला मुकलो 
प्रयत्न नाही केले काही आळसात समरसलो मी
.
कुण्या मुखी जर निंदा आली माझ्या कानावर ऐकू 
उभारून या जिभेचा फणा तिथल्या तिथेच डसलो मी
.
तू तू मी मी झाले असता काम टाकुनी का पळती 
पोटासाठी उरती काही कधीच ना हिरमुसलो मी .. 
.

नाही कुणीच श्रोता - - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
-------------------------------------------------------
नाही कुणीच श्रोता जेव्हा बघून आलो 
भिंतीस दोन गाणी मी ऐकवून आलो ..
.
कट्टे भरात आले जाणून मी कवींचे 
का पाडण्यास कविता थोडे शिकून आलो ..
.
जी जिंकण्यात शर्यत नाही कमाल काही 
जाणूनिया मनी मी तीही हरून आलो ..
.
होते स्मशान गेलो गर्दीत सांत्वनाला 
होतो अनोळखी का थोडा रडून आलो ..
.
ठाऊक ना मलाही जो मामला जरासा   
जाणून मीच आहे दावा करून आलो ..
.

आज उदास भकास उरले ..!

बघता बघता बाप्पा आले 
हां हां म्हणता निघून गेले

गोंधळ गोंगाट नकोच होता 
बाप्पाही कंटाळला होता

सुरेल सनई कुठेच नव्हती 
पण डॉल्बीची ढणढण होती

मंजुळ स्वर ना मंडपी होते 
कर्कश सूरच भरले होते

कुठे उपयोगी भाषण होते 
कुठे पुस्तक प्रकाशन होते

बाप्पा काही ठिकाणी हसला 
पाऊस नसता उगाच रुसला

'मोरया मोरया' गर्जत हसलो 
'लवकर या' ओरडत बसलो

जो जे वांछील ते ते होते 
गर्दीत काही, रिकामे होते

मंडप होते दारी भरले
आज उदास भकास उरले ..!
.

स्नेह फेसबुकातला -

माझे फेसबुक स्नेही । श्री विजयकुमार देशपांडे सर
लेखक । बालकवी । दोनोळीकार । चारोळीकार । विडंबनकार । ब्लॉगर

शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. शब्दांच्या सामर्थ्याबरोबरच शब्दांचं सौंदर्य आणि त्यामधला गर्भित मार्मिक अर्थ... या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे कविता आणि चारोळ्या... ! कमीतकमी शब्दात नेमकं आणि खूप काही सांगण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र म्हणजे दोनोळी (दोन ओळी) व चारोळी (चार ओळी).

आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला, ज्यांची झोळी पुरेपूर भरलेली आहे शब्दसुमनांनी आणि दरवळतो आहे त्या सुमनांचा सुगंध दाहीदिशांनी... ! भारतीय स्टेट बँकेच्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले बँक अधिकारी, प्रसिद्ध कवी, लेखक आणि चारोळीकार श्री विजयकुमार देशपांडे, हे त्यांचं नाव. ६ ऑक्टोबर १९४६ साली जन्मलेले श्री देशपांडे यांनी सोलापूरच्या हरिभाई देवकरण आणि संगमेश्वर महाविद्यालय येथे आपलं शिक्षण पूर्ण करून १९७० मध्ये भारतीय स्टेट बँकेत रुजू झाले. १९७० ते २००६ हा त्यांचा बँकेतला मोठा कार्यकाल. 'ग्राहक हेच इश्वर' या भावनेतून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची मनोभावे सेवा केली. श्री देशपांडे सरांनी पदवी घेतली विज्ञान शाखेची, नोकरी केली वाणिज्य शाखेची आणि छंद जोपासला कला शाखेची. तीन वेगळ्या शाखांचा हा त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल.

यांच्या फेवरेट कोटमध्ये "मी चांगला तर जग चांगले" असं लिहिलेलं आहे. या पाच शब्दांमध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे, हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. संपूर्ण जीवनाचं सार त्यांनी या मोजक्या शब्दात सांगितलेलं आहे. यालाच म्हणतात... शब्दसामर्थ्य, शब्दसौंदर्य !

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. अनेक प्रसंग समोरून जातात. या गोष्टींकडे, या घटनांकडे डोळसपणे पाहण्याची अनेकांना सवय असते. विजयकुमार देशपांडे हे यापैकीच. व्यक्त होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्री देशपांडे यांनी त्यांच्या नजरेला पडलेल्या अनेक गोष्टींवर योग्य विचार करून शब्दांच्या माध्यमातून वेळोवेळी 'व्यक्त' होत राहिले आणि यातूनच त्यांच्या साहित्याची निर्मिती होत गेली. प्रिंट मेडिया सोबतच त्यांचं 'फेसबुक' वर 'व्यक्त' होणं जास्ती भावतं, कारण अशाप्रकारचं साहित्य, लिखाण ज्यामुळं लाखोंच्या संख्येनी असलेल्या 'फेसबुककरांना' जीवनाची दिशा मिळून जाते. फेसबुकवरचं लेखन पाहून आकाशवाणीचे तत्कालीन नैमित्तिक निवेदक ज्यांना आम्ही 'आवाजाचे जादूगार' असं म्हणतो ते विद्यमान नगरसेवक, पर्यावरणप्रेमी श्री गुरूशांत धुत्तरगावकर सरांनी आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वप्रथम दाद दिली. फेसबुकवरच्या अमाप लेखनाचं श्रेयही ते नम्रपणे गुरुदादांना देतात.

श्री देशपांडे यांच्या आईसाहेबांनी नुकतंच ९२ व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. त्यांना उगवत्या सूर्याबरोबर वाचायला वर्तमानपत्रे लागतात. वाचनाची ही शिदोरी, हे संस्कार आईकडूनच त्यांना मिळालेली आहे. वयाची एकाहत्तरी ओलांडलेले श्री देशपांडे आजही तरुण आहेत. वाढणाऱ्या वयावर आपला अंकुश नाही, पण आपल्या मनाचं वय मात्र आपण ठरवू शकतो, मनाला कायम तरुणावस्थेत ठेऊ शकतो, हेच खरे. अतिशय विनम्र स्वभाव, प्रचंड मितभाषी आणि 'मी कोणीही नाही', 'मी काहीच केलेलं नाही' अशाप्रकारची अत्यंत दुर्मिळ अशी भावना त्यांच्याकडे आहे. कोणी कौतुक केलेलंही त्यांना आवडत नाही.

शेतामध्ये दिवसरात्र कष्ट करून आपल्या घामाच्या धारेतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा सांगणारी त्यांची एक चारोळी.....
'पाऊस नाही शेतात
वाढते माझी हैराणी
कसे पुरावे शेताला
डोळ्यांमधले पाणी'

खूप मोठया शहरांमधे दिसणारे 'तोकडे' कपडे आपण सारेच जण पाहतो. पण हा विषय कसा मांडावा, काय लिहावे, कसे लिहावे या विचारात अनेक मोठे लेख लिहून मी माझ्या जवळच ठेवले. लिहिणे योग्य आहे का वगैरे विचार मनात आले. पण हे वास्तव नेमक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे.....
ठरते गरीब पोरगी "भिकारी"
का हो फाटक्या कपडयातली
फिरते ललना "फॅशनातली"
तोकडया फाटक्या वस्त्रातली...

हे वास्तव मांडतानाच 'गिधाड' नावाच्या त्यांच्या चारोळीतून महिलावर्गाला ते सावधही करतात ....
'ओढणीला जपून पोरी
अंगावर ठेव ग जरा -
क्षणात फिरती अवतीभवती
वखवखत्या नजरा ..'

मानवाच्या आरोग्यसाठी 'योग्य आहार' किती महत्वाचा आहे, हे सांगणाऱ्या आणि आधुनिकतेच्या आणि जिभेच्या आहारी जाऊन घरातलं पारंपारिक पौष्टिक आहाराला विसरत जाणाऱ्यांसाठी या दोनोळी....
'पिझ्झा नि बर्गराचे सारेच गान गाती
मी नेहमी भुकेला खाण्या दही धपाटे..'

जीवनामध्ये 'शिस्त' हवी. शिस्तीतल्या जीवनाचं एक वेगळंच सौंदर्य आहे. एका रेषेत जाणाऱ्या मुंग्यांकडे पाहून माणसाच्या बेशिस्तीवर प्रहार करणारी ही त्यांची चारोळी....
'न्याहाळतो मी सावकाशपणे
शिस्तीत जाणाऱ्या मुंग्यांची रांग
बघत बसतो हताशपणे
बेशिस्तीतल्या माणसांची रांग !'

आपल्या म्हणजे माणसाच्या आणखी एका स्वभावदोषावर श्री देशपांडे यांनी नेमकं बोट ठेवलंय.....
'दोषच शोधत बसाल जर
मित्रांच्याही स्वभावातला
तर लागणार नाही वेळ
शत्रूंची पैदास व्हायला ।'

श्री विजयकुमार देशपांडे यांच्या लेखणीमधे परखडत, मार्मिकता आहे. या सोबतच त्यांच्याकडे 'विनोदबुद्धी' आहे, मिश्कीलता आहे. विशेषकरून त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या अर्धांगिनीवरच्या चारोळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या पतीच्या मिश्किलतेला पूर्णपणे स्वीकारलेल्या वाहिनीसाहेब देखील तितक्याच कौतुकाला पात्र आहेत. यांच्या प्रत्येक चारोळीच्या बहुदा त्या पहिल्या 'वाचक' असतील.
बायको माहेरी गेली की,
माझ्या अंगावर काटा येतो.
सासरी असली की गुलाब बहरतो,
हे वेगळे सांगायलाच हवे काय !

व्हावे तू राधा मी कृष्ण मनी नेहमी वाटत असते
आठवता पण घरची रुक्मिणी मनोरथाला वेसण बसते..

आपल्या अर्धांगिनीसोबत प्रतिसृष्टी निर्माण करण्याची त्यांची संकल्पना....
'आण चांदणी तू तिकडून
आणतो चंद्र मी इकडून
करू निर्मिती गगनाची
स्वतंत्र आपण दोघे मिळून... '

'चांदोबाचा दिवा' या बालकविता संग्रहामधल्या एका कवितेतल्या या सुंदर ओळी .....
बागेमधली विविध फुले
रांगांमधुनी कशी बहरती
रंग लेऊनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती !

अशा असंख्य चारोळ्या, कविता, हायकू श्री देशपांडे यांनी तयार केलेली आहेत. त्यांचं हे समृध्द साहित्याचं वाचन करणं केवळ आवश्यकच नाही तर ते आपल्या साऱ्यांचं कर्तव्य आहे, असं मी समजतो. श्री देशपांडे हे 'बँक अधिकारी' म्हणून निवृत्त झाले असले तरी ते विधायक विचारातून मुक्तपणे 'शब्दघन' बरसविणारे एक 'आदर्श समाज शिक्षक'च आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.चारोळ्या, हायकू या सोबतच ते तितक्याच नावीन्याने वात्रटिका, भक्तिगीते, विडंबने, विनोदी किस्से, ललित लेख लिहिण्याचा त्यांच्या प्रपंच सुरूच आहे. त्यांचे हे वैविध्यपूर्ण साहित्य सोलापूर संचार, समाचार, विश्वसमाचार, केसरी या वर्तमानपत्रांमधून आणि अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. पुणे आकाशवाणीवरून त्यांनी बालकवितेचं वाचन केलेलं आहे. सोलापूर आकाशवाणीने त्यांच्या लेखनाची वेळोवेळी दखल घेतलेली आहे.

@ आदर्श - रसिक वाचक

@ आवड -लिखाण, वाचन, संगीत ऐकणे आणि वाजवणे, मनसोक्त चालत राहणे.
@ प्रकाशित पुस्तके - 'चांदोबाचा दिवा' - बाल कविता संग्रह - (दोन आवृत्या), 'सखे तुझ्यासाठी' - चारोळी संग्रह - (दोन आवृत्या)

@ ब्लॉग - 'लेखन प्रपंच' - https://mee-videsh.blogspot.com/

माझ्या या लेखनाला विराम देण्यापूर्वी त्यांचा हा 'मनोदीप' जो आपल्या प्रत्येकासाठी आहे.......
'नीट पेटवा दीप मनाचा
येऊ द्या शुभ्र प्रकाशाला -
साठवत राहू नका मुळीच
अविचारांच्या काजळीला ..'

स्वतःची ओळख करून देताना अतिशय नम्रपणे... "किंचित लेखक आणि थोडाफार कवी" असं म्हणणारे श्री विजयकुमार देशपांडे सरांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची सारी स्वप्ने, संकल्प लवकरच साकार होवो, याच शुभेच्छांसह .... !

- अरविंद सिद्धेश्वर म्हेत्रे
९८८१५५०२००

आदर्श बायको

जी पहाटेचा गजर लावते  
सर्वात आधी जागीही होते 
सडा रांगोळी करत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

कालचे कष्ट सहज विसरते  
समोर सकाळी हसतमुख दिसते  
चहाचा कप पुढ्यात धरते 
तिला बायको म्हणायचे असते ..

घरी पोळीवाली मावशी नसते 
कणिक तिंबूनही गोड हसते
त्रासिक चिन्ह दाखवत नसते
तिला बायको म्हणायचे असते..

कामाची कुरकुर कधी नसते 
धुणीभांडी स्वत:च करते   
पदराला तोंड पुसत हसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

वेळ मिळाल्यास टीव्ही बघते 
रिमोट दुसऱ्यासमोर धरते 
गहू तांदूळ निवडत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

सासूचा नखरा निरखत असते  
सासऱ्याचा तोरा बघत असते
नणंदेला मजेत जोखत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

जाऊबाईशी मैत्री वाढवते 
मदतीला मागेपुढेही धावते 
गप्पाटप्पा मारत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

जुनेरं  स्वतः नेसत असते 
पोरापोरींना सजवत असते
असेल त्यातच समाधानी दिसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

मुलाबाळांना रागवत असते 
मायेने पोटाशी धरत ही असते 
वेळेवर त्यांचे आवरत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

दुखणेखुपणे आपले लपवते  
दुसऱ्या कुणाला दाखवत नसते 
कायम आळसाला  दूर  झटकते      
तिला बायको म्हणायचे असते .. 

चेहरा त्रासिक दाखवत नसते 
मनातल्या मनात कुढत बसते 
हसून आगत स्वागत करते 
तिला बायको म्हणायचे असते ..

प्रासंगिक हट्टही करत असते 
हट्ट पुरवला नाही तरि हसते 
लाडात येऊन बोलत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

अवास्तव मागणी कधीच नसते  
गजऱ्यातही समाधानी असते 
काटकसरीत रमत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

भावाच्या जागी दिराला बघते 
विचारपुशीने काळजी करते
अधूनमधून रागाने दटावते 
तिला बायको म्हणायचे असते ..

भोक पडके बनियन दिसते 
स्वच्छ धुवायची हौस असते 
कोंड्याचा मांडा करत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

दमून आलेला नवरा बघते 
पाण्याचा तांब्या पुढ्यात धरते 
कुशल मंगल पुसत बसते 
तिला बायको म्हणायचे असते ..

दिवसभर कामात गुंतून घेते 
रात्री मिठीत गुपचूप घुसते 
तक्रारपाढा मनात वाचते  
तिला बायको म्हणायचे असते ..

घराचे घरपण हरवत नसते 
नात्यागोत्यात स्वागत असते 
हसरे समाधान चेहऱ्यात विलसते  
तिला बायको म्हणायचे असते ..

चार भिंतींच्या कुंपणात फिरते 
त्यालाच "घर" म्हणत बसते 
आदरातिथ्यात दमते रमते 
तिला बायको म्हणायचे असते .. 
.

तीन हायकू

मिरवणूक 
फक्त अडवणूक
त्रस्त जनता 
.

श्री गजानन 
डॉल्बीचे आगमन 
शांती खलास ..
.

कानी मोबैल 
रस्त्यामधे शहाणी 
गाडी उताणी ..
.

खड्डयात जास्त पडतो -- [गझल]


लगावली  :  गागाल गालगागा
मात्रा: १२ 
----------------------------------------------------------------
खड्ड्यात जास्त पडतो 
उपदेश तोच करतो ..
-
खाऊन लाच कोणी 
दानात खास रमतो ..
-
हाती गुलाब ज्याच्या 
काट्यास का विसरतो ..
-
गाऊन गोडवे तो   
नक्की पुढ्यात हसतो ..
-
ज्याच्या मुखात निंदा 
मागेच नित्य फिरतो .. 
-
पाहून हासतो जो    
परिचीत तोच नसतो ..
-
बघताच ओळखीचा 
तोंडास का फिरवतो ..
.

कशासाठी.. फोटोसाठी !

अहो, ऐकलं का --
मी काय म्हणते, शंभर ग्राम मोदक आणता का
त्या स्वीट होम मधून ?

अग , गणपतीला शंभर ग्राम कसे पुरतील. 
घरात आपण पाचजण असतांना ?

अहो, तसं नाही हो.. 
गणपतीच्या मोदकाचं बघूया नंतर !

मग आता मधेच कशाला काढलंस हे खूळ, शंभर ग्रॅमचं ?

अहो, फेसबुकावर नाही का एकेकीचे 
तयार झालेले मोदक दिसू लागलेत फोटोत ! 
मला मेलीला कुठले जमणार हो,
एवढे छान छान जमायला मोदक करणे ..
म्हणून म्हटलं एक डिशभर आणलेत तरी पुरे ... 
तेवढीच मलाही संधी फेसबुकवर मिरवायची मिळेल ना ?

स्त्रीहट्ट डावलता येतो का कधी कुणाला.. ?

मुकाट्याने घराबाहेर पडावे लागलेच की हो - 
बशीभर रेडिमेड मोदक आणायला. .
.

सोडून जातिभेदा एकीस सावरावे - - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
-----------------------------------------------------
सोडून जातिभेदा एकीस सावरावे    
‘माणूस’ जन्म मिळता माणूसपण जपावे 
.
पाहूनिया सखीला माझ्या मिठीत आता    
रागावुनी शशीने मेघात का दडावे 
.
दु:खात वादळांना झेलून राहिलो मी 
झुळकेस का सुखाच्या आताच घाबरावे 
.
दिवसा कधी न येते भेटावयास मज ती     
रात्रीच वाटते का स्वप्नात मज छळावे 
.
जखमेवरी कुणाच्या चोळू नये मिठाला 
निंदाच नेहमी का कौतूकही करावे 
.

मत्सरग्रस्त

वेदनांचे भांडार लपवले मी अन चढवला मुखवटा सुखाचा पटकन - मस्त मजेत मी हिंडतो फिरतो जिकडे तिकडे आनंदात रमतो- दिसती समोर चेहरे मत्सरी वरवर हसरे सगळे दुखरे पण अंतरी .. ! .

देव माझा -

देव माझा आगळा वेगळा 
ना एक दागिना त्याच्या गळा

जाणतो फक्त मनातला भाव 
असू दे आपला कोणताही गाव

राव असो वा कुणी रंक असू दे 
भक्ती मनातली त्यास दिसू दे

सत्वर प्रार्थनेस नक्की पावे 
भाव हृदयीचा जाणवता धावे

भजन नको नकोच कीर्तन 
होतो नामस्मरणी तल्लीन

ना पैसाअडका दक्षिणा नको 
तासनतास ती रांगही नको

मनापासुनी त्यास मी भजतो 
या भक्ताला दर्शन तो देतो

देवळात ना कधीच जातो 
घरात बसुनी नित्य पाहतो

भावभक्तीने नाम मी जपतो 
माझा देव मी मनी पूजतो ..!
.