स्नेह फेसबुकातला

माझे मित्र श्री. विजयकुमार देशपांडे यांचा आज वाढदिवस आहे.

त्यांना या शुभदिनी उत्तम आयुरारोग्य चिंतीतो व 

असे अनेक वाढदिवस साजरे करण्याची संधी आम्हाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

----------@@@@@@--------


श्री.देशपांडे एक उत्तम कवी आहेत हे आपणा सर्वांना विदीत आहेच. 

त्यांच्या कवितातून विशेषतः चारोळयातून हमखास. भेटणारी सखी

 आपल्याला आता चांगलीच परिचीत झाली आहे.

काही दिवसापूर्वी त्यांनी 'सखे तुझ्यासाठी...'माझ्याकडे पाठवली.

उघडून वाचायला सुरूवातही केली व पूर्ण वाचूनच टाकली.

बागेत उमलणा-या फुलांचे कौतुक

सखे,माझ्या समोर करू नकोस-

तुझ्या चाहुलीनेच लागलेली असते

माझ्या मनाची बाग बहरायला..

अशा अनेक चारोळया या संग्रहात आहेत.अर्थात ही सखी कवीचा 

सतत पिच्छा पुरवत असते.'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'या चालीवर

 कवीला सखीचे प्रसंग अनुभवाला येतात.

तुझ्या लग्नाची पत्रिका घाईघाईत

आनंदाने दिलीस सखे,हातात

मोकळा झालो मी एकदाचा

मनातली व्यथा कायमची लपवण्यात..

सखीच्या लग्नाची पत्रिका मिळाली म्हणून कवी उगाचच 

प्रेमभंगाच्या दु:खाचा देखावा करीत नाही.उलट व्यथा लपवण्याची त्याची तयारी आहे.

आवेश झाशीच्या राणीचा

मला दाखवत सखे,छळतेस

समोर एक झुरळ बघून

अशी सैरावैरा पळतेस....

अशा काही नर्म विनोदी चारोळयाही आहेतच.तिची विविधांगी रुपांची वर्णने करतांना

 कवी खूपच खुलतो.सखी व निसर्गातील विविध घटकांचा मेळ 

अनेक ठिकाणी उत्तम साधला आहे.पाने,फुले,झाडे,बागांपासून चंद्र ढग चांदण्या आकाश 

यांची उपस्थिती कवीचे निसर्गप्रेम दर्शवतो.

बंद दारासमोरुन सखे

चाहूल न लागता जातेस दिमाखात

तुझ्या सुगंधी पदराची सळसळ

फितूर वारा आधीच पोचवतो घरात

या व अशा अनेक चारोळ्यातून ही सखी आपल्याला भेटते.कवीला अहर्निश सतावणारी (?) 

ही सखी तुम्हालाही आवडेल अशी खात्री आहे.

श्री.देशपांडे यांना पुढील लिखाणास शुभेच्छा !

.

- - - Ramchandra Rashinkar

06/10/2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा