सगळानंद

कितीतरी दिवसांनी 
आज भरपेट जेवण झाल्यावर ,
वामकुक्षीची हुक्की आली -
आणि अंमळ गारगार 
फरशीवरच अस्मादिक लवंडले !

वामकुक्षी म्हटली की, 
ती दिवास्वप्न घेऊन येतेच --

कोसळले आपले सरकार 
[- स्वप्नातलेच असल्याने
कोणत्या पक्षाचे हा प्रश्न अलाहिदा !] 
आणि त्याच्याबरोबर 
नवे सरकार स्थापनहि 
झाले की लगेच !

स्वप्नात काहीही होऊ शकते 
काहीही घडू शकतेच की हो !

हो ना ? 
जागे असलात... तर 
हो तरी म्हणा की हो !

हातात माझ्या एक पेपर आला 
"सगळानंद" नावाचा -

त्यातली बातमी वाचली,
तर अस्मादिक अगदी घामेघूम होऊन 
दचकून जागा झालेले !

बातमी होती- 

८६ रुपये लिटर दराचे पेट्रोल 
एकदम ८.६० रुपये लिटर दराने 
नव्या सरकारने 
उद्या रात्रीपासून विकायचा 
वटहुकुम काढला होता !
.

अत्र तत्र सर्वत्र एकच चित्र

व्हाटसपमधे खुपसलेले डोके बाहेर काढत,
मी रूममधून स्वैपाकघरातल्या कट्ट्याकडे पळत सुटलो ......

जे व्हायचे तेच नेमके घडून गेले होते हो -
व्हाटसपाच्या नादात !

जळकट करपट वास सगळीकडे पसरत चालला होता.
पट्कन ग्यासचे बटन बंद केले .
ग्यासवरच्या पातेल्यातले दूध काठावरून परतून
आटत आटत गेले होते. 
पातेल्याचे बूड दुधाला आवरू सावरू शकले नव्हते, 
बिचारे लाजून काळेठिक्कर पडले होते.

बायकोने मला तरी चार चार वेळा बजावून सांगितले होते-
"ग्यासवर दुध तापायला ठेवले आहे, जरा लक्ष दया तिकडे.
तुम्ही मला सांगितले म्हणून, मी तुमच्या फेस्बुकातल्या चारोळ्या 
निवांत बसून,
एकदाच्या वाचून काढते बर का !"

तेवढ्यात बायको आलीच हॉलमधून धावत पळत,
आणि डोळे विस्फारून उद्गारली-
" बै बै बै ... कधी नव्हे ते एक काम सांगीतले तर,
तेही धडपणे लक्ष देऊन लक्ष ठेवून करता आले नाहीच ना शेवटी ! 
तुमच्यावर एक साधे सोप्पे काम सोपवले होते ! 
तुम्ही सांगितले म्हणून तर मी फेस्बुकात --"

मधेच खाली मान घालत मी शरमिंदा होत पुटपुटलो -
"आणि तू सांगितले होतेस तुझ्या कविता वाचायला,
म्हणून मी व्हाटसपात !" 
.

चार चारोळ्या -

जाणवतो उन्हातून येता 
आधार सावलीचा -
थकल्या देहावर फिरता 
जणु हात माउलीचा ..
.

उंच त्या झोक्यावर जाता 
मन का झुलते आनंदाने -
सासर विसरुनीया क्षणभर 
माहेरी रमते आठवणीने ..
.

आठवणी का धावत सुटल्या 
मनात माझ्या अशा अचानक -
तू तिकडे अन मी इकडे पण 
उचक्यांचा हा मारा दाहक..
.

चिडलेला दिसतो आहे 
अनुयायी असावा -
खोटे खोटे हसतो आहे 
नेताच असावा..
.

सांगू कशी कहाणी -- गझल

सांगू कशी कहाणी ना शब्द ये मुखात 
हैराण रोज करते राणी मला मनात ..
.
स्वप्नात मीच राजा करतो किती रुबाब  
दिसता समोर पण "ती" झुकतोच वास्तवात ..
.
गातो सुरेल मीही त्या कोकिळेसमान 
मौनात कंठ माझा दिसताच ती पुढ्यात ..
.
आदेश सोडतो मी राज्यात खास रोज 
हुकुमास पाळतो मी शिरता शयनगृहात ..
.
ठाऊकही प्रजेला राजा असून दास  
राणी न ऐकते हो माझी कधीच बात ..
.

शोधत राहू या गर्दीतच - - गझल

शोधत राहू या गर्दीतच चल दोघे एकांत 
मारू चालत गप्पाटप्पा का तू चिंताक्रांत ..
.
निरोप दे तू खुशाल आता अंतिम क्षण आला ग   
मनसागरात होती बघ या लहरी हळूच शांत ..
.
मुखास पाहुन सुंदर तुझिया माझ्या करकमलात   
होत मत्सरी क्षणभर धावे ढगात रजनीकांत ..
.
विसरुन जाऊ जगास इथल्या मिठीत होउन एक  
भेटू दुसऱ्या जगात येता प्रेमावर संक्रांत ..
.
होकाराचा निरोप तुझाच मिळता अंती आज  
पिंडाला त्या काक शिवे अन शांत शांत आकांत ..
.
भरल्या पोटी उपदेशांचे डोसच मिळती फार       
जाणिव नसते कोण उपाशी कुणा उद्याची भ्रांत ..
.

तीन चारोळ्या-

प्रहार उपदेशाचे मी 
करून तुजवर हसलो
मौनाचा तव एकच मी 
घाव न पेलू शकलो ..
.

मी मार्ग शोधला होता 
वेदना सहन करण्याचा
मार्गात साधला मोका 
सुखाने मज अडवण्याचा ..
.

लोकहो करू स्तुती किती मी
तिच्याच चातुर्याची 
गुपचुप नकळे चोरी केली 
कधी कशी या हृदयाची ..
.

मरणाला मी टाळत होतो- गझल

मरणाला मी टाळत होतो 
का जगण्यावर भाळत होतो ..

नियम कायदे सगळे काही 
मीच का बरे पाळत होतो ..

लाच खाउनी ढेरी सुटली 
मनातुनी पण वाळत होतो ..

जवान शहीद वार्ता ऐकत 
मला रोज मी जाळत होतो ..

बळिराजाचे हाल पाहुनी 
अश्रू मी का ढाळत होतो ..

सोडुन गेली मला जरी ती 
मनात गजरा माळत होतो ..

अपघाताची रोज बातमी
माझा मृत्यू चाळत होतो .. 
.