नशा

सुखद दिसणे तुझे

सुखद चालणे तुझे


सुखद आगमन तुझे


सुखद हसणे तुझे


सुखद बोलणे तुझे


सुखद हावभाव तुझे


सुखद सहवास तुझे ---- !


सुखद सुखद सुखद - - -
अन-
सुखद गमन तुझे .. ?

---- उरते बेहोशीत असे
वाट्टेल ते बरळणे माझे ! 

.

डराव डराव

साचलं पावसाचं पाणी तळ्यात
धरला सूर बेडकांनी गळ्यात ..

डराव डराव डराव डराव
दुरून का असे बघता राव ..

या ना जरा जवळ आमच्या
सांगतो गंमत कानात तुमच्या

उड्या मारू पाण्यात.. डुबुक डुबुक
आवाज करू छान.. चुबुक चुबुक ..

टुणुक टुणुक आपण पळूया
बेडूकउडीचे कौतुक ऐकूया ..

पावसा रोजरोज धडपड रे
तळ्यात मळ्यात गडबड रे ..
.

मोबाईलधारी घरोघरी -

शेवटी कंटाळून 
बिचाऱ्या माऊलीने
स्वैपाकघरातून, 
इतका वेळ आपल्या हातात धरलेल्या
मोबाईलवरून मेसेज टाकून ,
पलीकडच्या खोलीतल्या
लाडक्या लेकाला विचारलेच -
"पानं कधीची वाढून ठेवलीत,
जेवायला येताय ना ?"
लेकानेही तिच्या त्या मेसेजला
मेसेजनेच तत्परतेने उत्तर दिले -
"आलोच,
अग पण थांब हं एक मिनिट ..
बाबा हॉलमधे आहेत,
किती वेळ लागणार आहे..
त्यांनाही मेसेज टाकून विचारतो !"
.

शोकांतिका

आजकाल आजोबांना काही निमित्ताने
भारी किंमतीचा टचस्क्रीन मोबाईल 
भेट म्हणून मिळत असतो.

काळाची गरज असतानाही
पण -केवळ तंत्रज्ञानाबद्दलच्या अनामिक भीतीपोटीच-
तो मोबाईल हाताळण्याची उत्सुकता 
त्यांच्या मनात का नसते
हे त्यांनाच ठाऊक !

..... त्यांच्या हातातून 
वय वर्षे ५ते८ गटातला त्यांचा नातू 
तो मोबाईल हिसकावून घेतो
आणि 
आपल्या आजोबांना
त्यातल्या तांत्रिक बाबी 
अगदी सहजपणे दाखवत सुटतो .

.... तरीही आजोबा ढिम्म बसूनच !

आजच्या काळात संगणक घरात असूनही
त्याच्याकडे न फिरकणारे आजोबा 
कित्येक घरात सापडतील !

इतरांच्या निष्क्रीय स्वभावाबद्दल 
आरडाओरडा करण्यात 
हीच आजोबामंडळी 
आघाडीवर असतात, हे विशेष !
.

पैशास मी उधळता उचले हजार होते ..[गझल]

पैशास मी उधळता उचले हजार होते 
उचलावयास अंती मोजून चार होते

भावूक फार बनते देशास सोडताना 
निर्दय कितीहि माता काळीज घार होते

कंटाळतो कुठेही गर्दीत देह फिरण्या 
"त्या" चेहऱ्यास बघण्या मन का पसार होते

काही जरी न मिळते नवसात बोललेले
देवास दूर करण्या मन ना तयार होते

ओठात एक असते पोटात एक असते 
नोटांत जीवनाचे त्याचेच सार होते ..
.

प्रवास

एसटीतून प्रवास करत होतो. 

फुल्ल गर्दी झालेली.

एकदा या पायावर, तर एकदा त्या पायावर-

अशी सर्कस करत, मी उभाच होतो.


काही काळाने एका थांब्यावर,

एका जख्खड म्हातारीजवळची जागा रिकामी झाली.

कसाबसा तिथपर्यंत शिरकाव करून, 

मी तिथे सीटापन्न झालो एकदाचा.


पुढच्या थांब्यावर इकडे तिकडे पाहत,

आणखी एक म्हातारी [आधीच्यापेक्षा जास्त हो..] एसटीत अवतीर्ण झाली.

हळूहळू ती आमच्या सीटजवळ उभी राहिली.

माझ्या मनात तिला, 'मी स्वत: उभा राहून जागा द्यायचा' विचार आला, 

पण मीही तसा म्हाताराचअसल्याने, तो विचार दुर्लक्षित केला.


...... शेजारच्या त्या २ म्हातार्यांची असह्य बडबड ऐकत वेळ चालला होता.

"येळ ना वखुत..कवा बगाव तवा, कुटं तडफडाया ह्ये समदे हिंडत 

असतेत की !"

स्वत: त्या दोघी मात्र जे करत होत्या, 

ते कसे सोयीस्कररित्या विसरून गेल्या होत्या !


- पुढच्या थांब्यावर समोरच्या सीटवर जागा रिकामी झालेली बघून,

मी टुन्नकन उडी मारतच ती पटकावली.


... तेवढ्यात मागच्या सीटवरून नंतर आलेल्या म्हातारीचा आवाज,

पहिल्या म्हातारीशी बोलतांना माझ्या कानावर आला -

" कुटं गेलं ते तुझ्या शेजारचं मघाच म्हातारं ..? "


मनातल्या मनात मी हसत म्हटलं - 

" जगी आम्हा म्हाताऱ्यांचा, पसारा माजला सारा ! "
.

ग्रुप बत्तिशी :

१. ग्रुप पहावा काढून
२. ग्रुपात हुरूप कंपूला
३. पाच मेंबर ग्रुप शंभर
४. ग्रुप सुटेना मेंबर भेटेना
५. इकडे फ्रेंड तिकडे ग्रुप
६. ग्रुप पाहून पोस्ट टाकावी
७. एक ना धड भारंभार ग्रुप
८. ग्रुप पाहून मेंबरशिप घ्यावी
९. पाचही ग्रुप सारखे नसतात
१०. मेंबरात असे ते ग्रुपात दिसे
११. ग्रुपात एक अन पोटात एक
१२. मेंबरचे पाय ग्रुपात दिसतात
१३. ग्रुप सलामत तो मेंबर पचास
१४. ग्रुप हजार लाईकविना बेजार
१५. अडमीनवरून ग्रुपची परीक्षा
१६. उचलला फ्रेंड टाकला ग्रुपात
१७. मेंबरात नाही तर ग्रुपात कुठून
१८. जोडल्या ग्रुपाशी असावे सादर
१९. गेला ग्रुपात नि बसला कुलपात
२०. आपलाच मेंबर नि आपलाच ग्रुप
२१. एकट्याला करमेना ग्रुपात रमेना
२२. कुणाला कशाच तर ग्रुपला मेंबराचं
२३. मेंबर झाल्याशिवाय ग्रुप दिसत नाही
२४. अरे अरे ग्रुपा नको मेंबरशिपची कृपा
२५. साठा ग्रुपची कहाणी पाच मेंबरी संपूर्ण
२६. तुझ माझ जमेना अन ग्रुपशिवाय करमेना
२७. ज्याला धार्जिणा ग्रुप त्याने का बसावे गुपचूप
२८. आले अॅडमीनच्या मना तेथे कोणाचे चालेना
२९. ग्रुपात रहायचे अडमीनशी वैर काय कामाचे
३०. ग्रुप काढले भराभरा कॉपीपेस्टचाच झाला मारा
३१. लिहिली चारोळी/कविता/गझल/पोस्ट, टाकली ग्रुपात
३२. आपल्या ग्रुपातले भांडण दिसत नाही पण दुसऱ्याच्या 
       ग्रुपातली धुसफुस दिसते
.

तो -

तो 

फेसबुकाच्या बाजारात

आपल्या पोस्टी मांडून बसतो---

येणाऱ्या जाणाऱ्या
आपल्या हजारो मित्रांकडे
आशाळभूतपणे पाहतो...

मिळतो का एखादा लाईक देणारा---

भेटतो का कुणी कॉमेंट देणारा...

येतो का कोण पुढे शेअर करणारा---

दिसतो का एखादी स्माईली टाकणारा...

..... बाजार उठण्याची वेळ होते !

तो -

पोटापुरता अपेक्षित गल्ला तरी,
गेलाबाजार जमला की नाही,
याची चाचपणी करतो---

निराशेने स्वतःशीच मुंडी हलवतो .....

पुढल्या बाजारात ठेवायच्या पोस्टची आखणी करत,
निद्रादेवीची आराधना करायला लागतो ...
.

माझी सासु का धावली ..


[चाल- माझी रेणुका माउली ...]

माझी सासु का धावली
टीव्हीपुढती ती बैसली ,
जैसी मुंगी साखरेस
तैसी धरी रिमोटास ||

सिरियल पाहण्याची घाई
दूध उतू जरी जाई ,
टीव्ही दिवाणखान्यात
राही सिरियल मनात ||

सोडुन बैसे कामधाम
चेहऱ्यावरती निश्चय ठाम ,
सासुरवास आनंदाने
टीव्हीत पाही कौतुकाने ||

.

माझे मन

अशा अचानक आलेल्या
पावसाच्या आगमनात
माझे मन चिंब भिजते ..

गरमागरम आईस्क्रीम
मस्त गारेगार थंड चहा
नाही नाही ते विचार करते ..

छत्री हातात मिटलेली
एक वहाण निसटलेली
पाऊसधार हातात धरते ..

गरमागरम भजांची प्लेट
डोळ्यांसमोर भेटते थेट
उभ्याउभ्याच फस्त करते ..

इथ इथ पाणी गोल गोल राणी
थरथरते वय एकदम आठवते 
सखीच्या आठवणी स्वत:शीच पुटपुटते ..
.

मिसकॉल तुझा एक -

प्रवासात मिसकॉल तुझा एक दिसतो
मोबाईलवर तुला मी कॉल लावतो -

'आऊट ऑफ कवरेज एरिया' ऐकतो
कुठे कशी असशील, विचाराधीन होतो ..

अस्वस्थ अगतिक असा कसा मी
चुळबुळ करीत बेचैनसा बनतो -

. . पुन्हा पुन्हा मी कॉल लावतो
"आऊट ऑफ.."चाच मेसेज रिपीट होतो..

धडधड मनात वाढत असते
जीव जास्त कासावीस होतो . .

अखेर, एकाक्षणी "ओळखटोन" पडता कानी
हिरमुसलेला जीव किती सुखावतो -

"झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.."
 गुणगुणत प्रवास पुढचा पारही पडतो ..
.

समाधान

     बायकोबरोबर मंडईत गेलो की, 
खरेदीची सर्व सूत्रे ती पुढे होऊन (-मला घासाघीस जमतच नाही, या भ्रामक गैरसमजातून !) 
आपल्या हाती घेते आणि मी फक्त पैशाचे पाकिट माझ्या खिशातून माझ्या हाती !

     भाजीवाली मेथीच्या पेंढीचा भाव पंधरा रुपये सांगते, आणि बायको अथक घासाघिशीनंतर- तीच पेंढी बारा रुपयाला खरेदी करून, हातातल्या पिशवीत घालत असते...
त्यावेळचा तिच्या चेह-यावरचा विजयी भाव अगदी पाहण्यासारखा असतो !
केवळ ती असते, म्हणूनच जणू काही आमच्या संसाराच्या इतिहासात,

आजही तब्बल तीन रुपयांची बचत झालेली !

    खरे तर मागच्याच आठवड्यात या भाजीवालीकडून, 

मी मेथीची पेंढी ऑफिसातून येताना , पंधराची दहा करून, आणलेली असते..., 
हे मी तिच्या विजयी पराक्रमावर पाणी पडू नये, 
यासाठीच केवळ सांगितलेले नसते !

कारण तिने संसारात मिळवलेले असे छानसे समाधान,
हेच तर आमच्या प्रपंचाचा गाडा सुरळीत चालण्याचे एकमेव साधन !
.

शुभकार्यासी आरंभ करता....

(चाल- मेरा जूता है जापानी..)

शुभकार्यासी आरंभ करता
वंदन करतो मी गुरुदत्ता
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..

समाधान अति मनास होता
शांती लाभते चित्ता
मूर्ती डोळ्यासमोर असता
संसारी ना चिंता..
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
त्रैमूर्तीला बघता बघता
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..

संकट येता तुज आळवता
पाठीशी तू त्राता
नामस्मरणी चित्त गुंतता
विसरून जातो जगता..
हृदयी आनंदाला नसतो
जीवनभरात आमच्या तोटा
गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..
.