प्रवास

एसटीतून प्रवास करत होतो. 

फुल्ल गर्दी झालेली.

एकदा या पायावर, तर एकदा त्या पायावर-

अशी सर्कस करत, मी उभाच होतो.


काही काळाने एका थांब्यावर,

एका जख्खड म्हातारीजवळची जागा रिकामी झाली.

कसाबसा तिथपर्यंत शिरकाव करून, 

मी तिथे सीटापन्न झालो एकदाचा.


पुढच्या थांब्यावर इकडे तिकडे पाहत,

आणखी एक म्हातारी [आधीच्यापेक्षा जास्त हो..] एसटीत अवतीर्ण झाली.

हळूहळू ती आमच्या सीटजवळ उभी राहिली.

माझ्या मनात तिला, 'मी स्वत: उभा राहून जागा द्यायचा' विचार आला, 

पण मीही तसा म्हाताराचअसल्याने, तो विचार दुर्लक्षित केला.


...... शेजारच्या त्या २ म्हातार्यांची असह्य बडबड ऐकत वेळ चालला होता.

"येळ ना वखुत..कवा बगाव तवा, कुटं तडफडाया ह्ये समदे हिंडत 

असतेत की !"

स्वत: त्या दोघी मात्र जे करत होत्या, 

ते कसे सोयीस्कररित्या विसरून गेल्या होत्या !


- पुढच्या थांब्यावर समोरच्या सीटवर जागा रिकामी झालेली बघून,

मी टुन्नकन उडी मारतच ती पटकावली.


... तेवढ्यात मागच्या सीटवरून नंतर आलेल्या म्हातारीचा आवाज,

पहिल्या म्हातारीशी बोलतांना माझ्या कानावर आला -

" कुटं गेलं ते तुझ्या शेजारचं मघाच म्हातारं ..? "


मनातल्या मनात मी हसत म्हटलं - 

" जगी आम्हा म्हाताऱ्यांचा, पसारा माजला सारा ! "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा