हे शंकरपार्वतीपुत्रा - - -








हे शंकरपार्वतीपुत्रा तुज वंदन आम्ही करतो  
जय जय श्री गिरिजात्मका एक मुखाने म्हणतो ..

संकटात धावून येई मोरेश्वर आधार 
दु:खमुक्त सगळे आम्ही होतो चिंता पार    
स्मरणी तुजला ठेवुन शरण तुला रे येतो ..

बल्लाळेश्वराच्या पुढती करतो ती आरास  
भक्त सारे येती म्हणती किती हो झकास     
आदर स्वागत आमचे तो महागणपती बघतो .. 

रूप तुझे विघ्नेश्वरा किती कितीदा पहावे 
डोळयापुढे मूर्ती येता समाधान मिळावे   
चिंतामणी तुजला आम्ही आनंदाने स्मरतो ..

मूषकासमोरी न्यारी सिद्धीविनायका स्वारी  
ताट मोदकाचे दिसता खूष होई भारी  
वरदविनायक आम्हा तो संकटहर्ता ठरतो .. 

आठ स्थाने देवा तुझी माहितही झाली
आठ तुझी नावे गणेशा प्रसिद्ध ती झाली 
यात्रा यशस्वी व्हावी प्रार्थना मनातुन करतो ..
.  

दे रे दे रे तू दर्शन विठ्ठला ---

दे रे दे रे तू दर्शन विठ्ठला
आलो सारे आम्ही पंढरीला
जीव भेटीस कासाविस झाला ..

ध्यानी रूप तुझे, मनी नाम तुझे
जप विठ्ठल विठ्ठल चालला ..
पाप घालवतो,
 पुण्य साठवतो
वारीमध्ये चालत जीव गुंतला ..

टाळ चिपळ्यासंगे, भक्तीभाव रंगे
मुखी विठ्ठल विठ्ठल दंगला ..
टाळ्यांचा हा गजर, 
मूर्तीकडे नजर
नाद विठ्ठल विठ्ठल चांगला ..

गुंग भजनात, दंग कीर्तनात
घोष नामाचा तुझ्याच घुमला ..
चंद्रभागेत स्नान, 
सोबतीला गुणगान
जीव पंढरपुरात हा रमला ..
.

जाऊ पंढरपुराला आता - -

जाऊ पंढरपुराला आता, पाहूया त्या विठूला जाता, 
विठ्ठल विठ्ठल जप करू, डोळे भरुनी तो बघू ..

वेळ भजनात या, चांगला- घालवू घालवू 
काळ कीर्तनात त्या, आपला- घालवू घालवू 
विठ्ठल विठ्ठल या म्हणू, नाम त्याचे गुणगुणू 
टाळ चिपळ्यात त्या दंगूया ..

टाळ्यांचाही गजर, सारखा- या करू या करू 
चंद्रभागेतून स्नान, सर्वजण- या करू या करू 
राम कृष्ण हरी हा, घोष मुखाने करू 
वाट थेट पंढरीची धरूया ..

विठू डोळ्यांपुढे, येइ तो- या इथे त्या तिथे 
विठूरायाला नमन, आपले- या इथे त्या तिथे 
जातीभेद विसरू, एक पंगत धरू 
होऊ तल्लीन भजने गाऊया .. 
.

जाता समोर हसून घ्यावे -- [गझल]

मात्रावृत्त 
मात्रा- ८+८ 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
जाता समोर हसून घ्यावे 
मुखवट्यातुनी रडून घ्यावे..

मरण न येते तोवर मी पण 
जमेल तितके जगून घ्यावे..

आज इथे तर उद्या मी तिथे 
एका जागी बसून घ्यावे..

बनले होते जुगार नशीब 
त्याला जिंकत छळून घ्यावे..

फसवत आलो लपून त्यांना 
समोर आता फसून घ्यावे..

सरळ चाललो नाकासमोर 
तिला भेटण्या वळून घ्यावे..

जीवनभर ती चिंता नि चिता 
सरणावर मी सजून घ्यावे.. !
.

हायकू

जीवन गाणे 
रोजचे रडगाणे 
शेवट शांत ..
.
  तो अर्धमेला 
पाऊस आला गेला 
पूर डोळ्यास ..
.

पाऊस चालू 
हिरवागार शालू 
नटली धरा ..
.

निसर्गदत्त 
सुगंधी दरवळ 
प्रसन्न चित्त ..
.

का वणवण 
बरसेल श्रावण 
आशा अधीर ..
.

मोर मनाचे
तुषार पावसाचे
हर्ष पिसारे ..
.


डोळे कोरडे 
ओल्या आभाळाकडे 
हसरे दु:ख ..
.


खड्डेच खड्डे 
कंत्राटदारी अड्डे 
पैसा हुकमी ..
.

मुक्तछंदात 
खूप मी आनंदात 
बंधनमुक्त ..
.

रोजचा नाट 
पाहू रे किती वाट 
धो धो अखेर ..
.

स्पर्श ओलेता 
अनोख्या पावसात 
चिंब मनात..
.

धरा रुसली 
पावसात हसली 
शमली तृष्णा ..

.

कधी भास ते
मृगजळ असते
जीव भ्रमिष्ट ..
.

पाच चारोळ्या -

भ्रष्टाचार-युक्ती ..
"भ्रष्टाचारातून करा मुक्ती"
 सिनेमा बघण्यासाठी गेले  
गर्दी जरा जास्तच दिसली 
म्हणून ब्ल्याकने तिकीट घेतले !
.

ज्याचे त्याचे नशीब-
'भाकर वाढ माये' आर्तस्वरात
पुकारा बाहेर होत होता -
'पुरे' म्हटले तरी पंगतीत आत
आग्रह जोरात होत होता . .
.

'संधीसाधू -'
भिंतीला "कान" असतात, 
सगळेजण ओरडून सांगतात -
डोळे "की होल"ला लावलेले 
कुणी कुणाला सांगत नसतात ..
.

'गुलाब -'
भेट आपली किती दिसांनी 
सांग विरह तू कसा साहिला -
गुलाब माझ्या हाती राहिला 
गाली फुलता तुझ्या पाहिला ..
.

'कलाटणी अचानक -'
भांडण सासू-सुनेत बहरले 
समेट अचानक.. भांडण मिटले - 
मिठीत दोघींचे प्रेम बहरले 
"झुरळ" अचानक.. समोर टपकले ..
.