हायकू -



आकाशी भिन्न   
उडतात पाखरे 
शिकारी खिन्न 


            हाती लपली
            चार फुले चाफ्याची    
            शीळ वाऱ्याची


निजरूपाचे    
कुतूहल बाळाचे
आरसा खूष


            पुढे दगड 
            पडलेले रग्गड 
            मी का शहाणा


उत्सुक डोळे 
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

गाढवदादा गाढवदादा -



गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ?  |१|

               मासेभाऊ मासेभाऊ -
               नापास झाला का हो ?
               रडून रडून सगळा
               टँक भरला की हो !  |२|

पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो 
एकदा तरी वळून बघाव ?  |३|

               कासवपंत कासवपंत -
               लढायला किती हळू जाता ?
               ढाल पाठीवरती घेता
               तलवार कुठे विसरता ?  |४|

भोलानाथ भोलानाथ -
गुब्बू गुब्बू गुब्बू
पैशाचं मी पेरलं झाड
पैसे येतिल का रे ढब्बू ?  |५|

संथ पाडते गझला बाई ....

(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....)

संथ पाडते गझला बाई -
गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही..

कधी न आटपे काम सहज ती 
कूर्मगतीने सदा करी ती
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी ..

कुणी पुरे ना म्हणती गझला 
कुणी वर्णिती उच्च गेयता 
गण मात्रांची करून जंत्री मोजत कुणी राही ..

सतत चालते गझल-टंकणी 
निरोपातुनी न बाई शहाणी
वाचकास का व्हावी शिक्षा सांगा दुखदायी ..
.

डोळ्यांत आसवांचा का पूर आटलेला - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
-----------------------------------------------
डोळ्यांत आसवांचा का पूर आटलेला
प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला 
   
आकाश भार पेले लाखो पतंग भारी      
माझा पतंग का हा हातात फाटलेला 

लाभात खूप आता व्यापार येथ झाले
व्यापार नेमका का माझाच घाटलेला   

झेलून खूप झाले ते वार पापण्यांचे
घायाळ मी तरीही आनंद वाटलेला 

झालोच सज्ज जेव्हां घेण्यास मी भरारी  
का पाहिला न आधी मी पंख छाटलेला  

माझ्यासमोर रस्ते ओसाड खूपसारे  
वाट्यास मात्र येतो गर्दीत थाटलेला ..  
.

साहित्याशी जवळिक साधत -

साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार ,
गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार !

भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला
भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला !

बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी
वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ;

शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे !

कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला
दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला !

साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले !

दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना -
हर्ष होतसे मलाच , माझा 'रद्दी डेपो' बघताना !!

तीन चारोळ्या ---

'विश्वासघात -'

ऐकतो मी कानात प्राण आणून 
तू कविता वाचत असतांना -
खुशाल तू देतेस घोरत ताणून 
मी कविता वाचत असताना ..
.


'एक तारीख -'

एक तारखेची गंमत असते
आमच्या प्रेमाला भरती असते -
पत्नी माझ्या नयनीं असते 
पाकिट तिचिया नयनीं असते ..
.


सरीवर सरी -

एकटाच मी घेऊन छत्री
होतो भटकत कुठेतरी -
आलीस अचानक तू सामोरी
कोसळल्या आठवांच्या सरी . .
.

दोन चारोळ्या

मोरपीस -

बसल्या बसल्या मोरपीस मी 
गालावर फिरवले 
मन हे माझे का तुलाच पण 
आठवता दचकले ..
.


साकडे -

आयुष्याची नाव निघाली 
धापा टाकत किनाऱ्यावरी 
'उरला प्रवास नीट घडू दे' 
नियतीला साकडे अंतरी !
.