हे कुठवर चालणार देवा -

जगणारे जगताहेत जमिनीवर 
मस्त मजेत खुशालचेंडूसारखे 
मरणारे मरताहेत अधांतरी 
नशिबाला कोसत किड्या-मुंगीसारखे

प्रयत्न करणाऱ्याच्या भाळावर 
कायम लिहिलेले दिसते अपयश 
माशा मारणाऱ्या आळश्यामागे
नेहमी जोरात धावत येते यश

बाबा बापू रासलीलेत गुंगून 
भाविकाला झुलवत असतात 
त्यांच्या नादी सर्वस्व विकून 
भिकेचे डोहाळे हतबल जपतात

असेच रडत कुढत जगत 
दिवस ढकलतात काहीजण 
पैसा म्हणजेच आहे जीवन 
नात्याचा जीव घेतात काहीजण

पाय हलवायलाही जागा नाही 
टीचभर घरात कुण्या गरिबाला 
एका इमल्यावर आणखी किती 
विचार करत घोर पडतो रावाला

राव-रंकाची माणसा-माणसांची 
दिनचर्या बघतो 'तो' नुसती वरून 
आपल्याला काय त्याचे म्हणत 
निराकार 'तो' घेतो डोळे मिटून ... !
.
- - - - - विजयकुमार देशपांडे
[ "आम्ही मराठी" - दिपावली विशेषांक २०१७ ]

चारोळ्या बायकोच्या -

घरोघरी -

बायकोच्या त्रासाला कंटाळून  
गेलो तडक हिमालयाकडे
थक्क झालो कितीतरी मी  
बघून रांगेतल्या विवाहिताकडे !
.

चार दिवस बॉसचे -

 "बॉसगिरी" मस्तीत गाजवून
सेवानिवृत्त घरी राहू लागला -
"बायकोगिरी"ला शरण जाऊन
 वाट हुकमांची  पाहू लागला !
.

 नवस -

"हाच नवरा नशिबात मिळू दे-"
बायकोच्या नवसाला लगेच देव पावणार ..
"मलाही  सात जन्म  सुख मिळू दे-"
नवऱ्याच्या नवसाला कधी देव पावणार !
.

असून अडचण -

बडबड्या पत्नीच्या तोंडाला
निघालो कुलूप लावायला 
पण ती गप्प बसली तर
नाही लागत करमायला !
.

सी सॉ -

आई पकडते  एक कान
बायको धरते दुसरा कान
माझी डुलते मान छान
 नेहमी राखत दोघींचा मान !
.

पुरुष दीन -

आई आणि बायको यांची
खडाजंगी चालू असते 
'तुम्ही मधे पडू नका'
"महिला दिना"ची तंबी असते !
.

कुणी पाहिली का -

बायकोचे सर्व ऐकणारा नवरा 
"ताटाखालचे मांजर" असते -
नवऱ्याचे सर्व ऐकणारी बायको 
सगळीकडे "अफवा" असते ..
.

ह्याला संसार ऐसे नाव -

ऑफिसला उशीर.. ताणाताणी वाढते
नवरा उपाशी.. बायको रुसते -
नवरा आल्यावर, सुनसानी शमते
मोगऱ्याचा गजरा.. घरदार हसते ..
.

स्वातंत्र्यदिन -

बायको गर्जत नवऱ्यास म्हणे 
"आज या देशाचा स्वातंत्र्यदिन -"
नवरा स्वत:शीच पुटपुटे 
"कधी आहे.. माझा स्वातंत्र्यदिन !"
.

नरवीर -

काय करावे समजत नाही 
सभा गाजवून येतो मी -
बायको समोर दिसताक्षणी 
मान का खाली घालतो मी ..
.

हळवी बिचारी -

भलती ती हळवी मायाळू
हृदय तिचे किती दयाळू -
कांद्यालाही चिरताना हळू 
लागतसे अश्रू ती ढाळू !
.


कित्ती मज्जा -

कित्ती मज्जा मित्रहो ती 
बायको लाटणे मारत होती -
दोन तुकडे त्या लाटण्याचे 
पण पाठ माझी शाबुत होती ..
.

अबोला -

नाही मी जर ऐकले तिचे
बायको अबोला धरणार आहे -
अबोल्यातल्या 'नियम अटी'
रोज मी दिसभर ऐकणार आहे !
.


आधुनिक -

मी लिहिलेले अभंग माझ्यासमोर
बायकोने हौदात बुडव बुडव बुडवले -
झेरॉक्स कॉपीज होत्या म्हणून
मी बायकोला अजिबात नाही अडवले !
.

सारे कसे शांत शांत -

बायको म्हणाली, 
"तोंड आले हो" -
मी म्हणालो, 
"छान झाले हो" ..
.

असून अडचण -

म्हणतो लावावे कुलूप 
बायकोच्या मी तोंडाला -
पण.. बसली ती जर गप्प 
करमतही नाही जिवाला ..
.

तीन चारोळ्या -

चारच थेंब वरून खाली 
भूमीवर शिंपडले तर -
आकाशातले सगळे ढग 
गर्जले की हो जगभर ..
.

असतो प्रयत्नांती परमेश्वर 
सर्वांना ठाऊक जरी-
श्रद्धा देवाच्या नवसावर 
काही आळशांची तरी ..
.

हरखुन जाते भेटीसाठी 
मन माझे बघ तुझ्याकडे -
का धुसफुसते उदास होऊन
निरोप घेता तुझा गडे ..
.

आजकाल मी खूपच दमतो -- [हझल]

आजकाल मी खूपच दमतो  
बाड कागदी मिरवत फिरतो ..

ताठ आपली कॉलर करुनी 
काव्य आपले वाचत सुटतो ..

ज्यास ना मुळी कळली कविता 
पाठ देत मी त्यांना बसतो ..

ना मला जरी ओळखले हो 
नजर पारखी फेकत हसतो ..

मित्रमंडळी पळता बघुनी 
ना फिकीर मी करुनी खचतो ..
.