चिमणी पाखरे

चिमणीपाखरे व्याकूळ होती
पंखांना हलवत भिरभिरती 
दाही दिशा पाण्यास्तव फिरती
जीव बिचारे किती हिरमुसती..

कुठे रोपटी कुठे फुले ती
झाडे नाहीत अवतीभवती
खांब नि सळया उंच इमारती
शोधत दमती हिरवाई ती.. 

हौद नि पाईप नजरेपुढती
नळातून जलथेंब न पडती
पाणवठे कोरडेच दिसती
गाणी कुठली मोटेवरती..

इकडेतिकडे जरी धावती
फेऱ्यातूनच ती तडफडती
चिऊ काऊ गोष्टीतच उरती
गोडगोड गाणी चित्रापुरती..

डोंगर फोडून झाडे तोडती
निराधार पाखरे बनवती
झाडे जगवा झाडे भवती 
फतवा नुसता कागदावरती..

चिमणी पाखरे उदास होती
आश्रयास आधार शोधती 
का माणसे जिवावर उठती
माणुसकीस काळिमा फासती..

मुर्दाड मनाची माणसे किती
पाखरांची मुळी कोणा न क्षिती
होणार कधी मानवी जागृती-
 वाढेल का प्रेम निसर्गाप्रती ?
.

जादूची छडी..(बालकविता)

आई ग आई, मला झोप आली
परीला भेटायची आता वेळ झाली

थापट हळूहळू माझ्या ग डोक्यावर
स्वप्नाची चादर मी घेईन अंगावर

परीशी स्वप्नात होईल माझी भेट 
मागेन मी तिला जादूची छडी थेट

सर्वांसाठी किती ग घरात राबतेस
थकवा मनातल्या मनात लपवतेस

जादूची छडी सर्वच करील काम
आई, तू घे विश्रांती कर आराम

दाखवीन जादूच्या छडीची कमाल
संपवीन आई, तुझे नक्की मी हाल

आई ग आई, मला झोप आली
बघ ना परी मला भेटायला आली !
.

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे.. (गझल)

पैसाअडका नसता जगणे कसरत आहे
सख्खा भाऊ पक्का वैरी बनवत आहे

बघून वावर माझ्या घरात दु:खाचाही 
घरात आता शिरण्याला सुख कचरत आहे

दिली सोडुनी चिंता करणे मरणाची मी 
यमराजाला आता बसली दहशत आहे

आहे शोधत आता उन्हात का तो छाया 
झाडे तोडुन हाती ज्याच्या करवत आहे

मैत्री जडली दु:खांशीही इतकी माझी
संधी सुखात लोळायाची दवडत आहे
.

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर.. (गझल)

अनलज्वाला मात्रावृत्त -
८+८+८=२४
................................................

कसे पसरते लख्ख चांदणे तू आल्यावर
गेल्यावर का वेळ वाटते आहे कातर..

विरहानंतर तिला पाहुनी धावत सुटलो
मिठीत होती छान तरी पण नवथर थरथर..

मीही माझी जपली होती नातीगोती
खिसे रिकामे दिसले माझे पडले अंतर..

संवादाची तार आपली जुळली होती 
का मौनाचा आणलास तू मधेच अडसर ..

अनुभव सगळे पाठीशी मी घेतच थकलो
उरले नाही त्राण जीवनी खाण्या ठोकर..
.

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही .. गझल

वृत्त- आनंदकंद
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा
काफिया- खंत अंत वसंत...
रदीफ- नाही
अलामत- अं
....................................................

पुतळ्यात दंग नेते कोणास खंत नाही 
जे जे जिवंत त्यांच्या हालास अंत नाही..

दुष्काळ खूप पडला ना ज्ञात पाखरांना- 
शोधात ती फळांच्या कोठे वसंत नाही..

कर्जास हात पुढती कित्येक रोज येती
फेडीस मात्र सौदा त्यांना पसंत नाही..

खड्ड्यात रोज कोणी पडतो नि जीव देतो
मुर्दाड शासनाचे का मन जिवंत नाही..

कुरवाळती स्वत:च्या सगळे सुखास आता
दु:खात कोण रडतो बघण्या उसंत नाही..

इतरांस खास तत्पर उपदेश डोस देण्या
सन्मार्ग चालणारा कोणीच संत नाही..

आहोत आज आम्ही जनता सुखात आहे
हे ऐकणे कुणाला आता पसंत नाही..
.

अंगभर लेउनी शरमली ती ..(गझल)

वृत्त लज्जिता-
(गालगा गालगा लगागागा)
........................................

अंगभर लेउनी शरमली ती
नेसुनी फाटके मिरवली ती

पोरगी पोटुशी जरी होती
भीक मागायला फिरवली ती

लागली लॉटरी हजाराची
दानपेटी बघुन दचकली ती

वाढवू मी कशी स्मरणशक्ती
पुस्तके वाचुनी विसरली ती

भाकरी कालची करपलेली
आसवांच्यासवे पचवली ती
.

सुखशांतीचे तोरण -

करून गजाननाला वंदन
काढू ऋण थोडेसे आपण
चिंता नकोच महागाईची
दसरा दिवाळी आनंदी सण..

परंपरागत चालत आले
सणासुदीचे चार सुखी क्षण
आदरातिथ्यही एकमेकांचे
घरात गोडधोडाचे जेवण..

स्नेहभाव वृद्धिंगत होता
आनंदावर कुठले विरजण
उत्सवप्रिय माणूस असतो
उजळते घरदार नि अंगण..

हेवेदावे द्वेष विसरुनी
एकी होते मिटते भांडण
आबालवृद्ध स्त्रीपुरुषांचे
मनातले सरते दडपण..

समानतेचे विश्व वाढवू
जातपातीचे तोडू रिंगण
बंधुभाव जाणून बांधू
सुखशांतीचे दारी तोरण.. !
.

तोंड चुकवूनिया कुठे जाशी.. गझल

लज्जिता वृत्त..
(गालगा गालगा लगागागा)

तोंड चुकवूनिया कुठे जाशी
का उगा पावसा शिव्या खाशी.. 
.
पावसाची कशी अजब खेळी
त्यामुळे जातसे बळी फाशी..
.
साव तो नेहमी दरिद्री का
खेळतो चोरटाच पैशाशी..
.
हिंडते छान घार आकाशी
लक्ष ठेवून पण पिलापाशी..
.
पाहतो गाठण्यास आघाडी
ऐनवेळीच शिंकते माशी..
.

पाहताना तुजकडे मज - [गझल]

पाहताना तुजकडे मज घाबरावे लागते भावनांना मग मनीच्या आवरावे लागते.. चारचौघे थबकुनीया पाहती जेव्हा तिला नीट करुनी ओढणीला बावरावे लागते.. चाल तिरकी वृद्ध करुनी चालतो मुद्दाम जर वाट सोडा म्हणत तिजला खाकरावे लागते.. लाजलज्जा शरम आता राहिली आहे कुठे पुरुष जातीलाच धक्के.. सावरावे लागते.. खालमुंडी सरळ जाता होतसे चर्चा किती सावरूनी नजर तिजला वावरावे लागते.. . ------------------------------------------------ [hakkasathi andolan divali ank 2018]

रोज तेच रडगाणे... (गझल)

रोज तेच रडगाणे गायचे कशासाठी
प्राप्त भोगणे आहे भोग जीवनासाठी..
.
रोजचीच तारांबळ ध्येय गाठणे गाडी
घोडदौड शर्यत ही जिंकणे घरासाठी..
.
भावनाविवश झालो जोडली किती नाती
स्वार्थ साधुनी गेली जोडता क्षणासाठी..
.
मीच जन्मलो वाटे नेक आणि प्रामाणिक
भ्रष्ट लाचखोरांना खास रोखण्यासाठी..
.
जास्त हाव पैशाची जन्म याचसाठी हा
सत्य हेच जगती या ना कुणी कुणासाठी..
.

कर्जबुडव्या थोर ठरतो.. गझल

वृत्त.. राधा
अलामत.. ए
गालगागा गालगागा गालगागा गा
गैरमुरद्दफ
................................................

कर्जबुडव्या थोर ठरतो "दूर" गेल्यावर
पोलिसी बडगा इथे का गांजलेल्यावर..
.
देव कुठला रक्षणाला धावला नाही
चार पाप्यांनी तिला उचलून नेल्यावर..
.
पाहतो मुखडा तिचा पेल्यात जेव्हा मी
ओठ माझे टेकतो अलवार पेल्यावर..
.
ओसरी देऊनिया पस्तावलो आहे
त्या भटाने आपलीशी पूर्ण केल्यावर..
.
जीवनी जणु पात्र नव्हता कौतुकाला तो
गोडवे गातात आता खास मेल्यावर..
.

दोन चारोळ्या..

१.
व्यथा..

सांगत बसतो आपल्या व्यथा
कणभर दु:ख असणारा-
फेकुन देतो सगळ्या व्यथा
मणभर दु:ख सहणारा..
.....................................

२.
सहवासाचा परिणाम..

उमलतात बघ फुले कशी
सखे, इथे तू असताना -
पसरतात मग सुवासही ती
सखे, छान तू हसताना..
............................................

ती - (गझल)

वृत्त.. मनोरमा
गालगागा गालगागा
रदीफ.. नाही
अलामत.. अ
....................................

ती मला बघणार नाही
पाहुनी हसणार नाही..

रोज कोडे घालतो मी
आज सोडवणार नाही..

सहप्रवासी नेहमी ती
चिटकुनी बसणार नाही..

दोन बोटे अंतरावर
शब्द पण वदणार नाही..

दूर ती फिरण्यास राजी
हात पण धरणार नाही..

हा अबोला जीवघेणा
पण उद्या असणार नाही..

माळला जर एक गजरा
ती असे छळणार नाही..
.

तीन चारोळ्या...

१.
परोपदेशे पांडित्य..

स्वत:स ठेच लागता किती 
हुरूप चढतो त्याला-
नीट चालायचा उपदेश
करत सुटतो ज्याला त्याला..
.

२.
मनपाखरू..

पिंज-यात तुझ्या प्रेमाच्या  
अडकते मनपाखरू-
किती कितीदा सांग सख्या,
कसे त्याला आवरू..
.

३.
करायला गेलो एक..

होतो साठवत मिरवणुकीत
रूप मी डोळ्यात देवाचे-
नाही कळले कधी फाडले
पडदे डॉल्बीने कानाचे..
.

धाक कुणाचा मनास नसतो..(गझल)

पादाकुलक वृत्त-
(८+८ मात्रा....)

धाक कुणाचा मनास नसतो
खुशालचेंडू कायम फिरतो..
.
उदो उदो का स्वातंत्र्याचा
जो तो मनात दु:खी असतो..
.
जंगल उदास पावसाविना 
स्वप्नामध्ये हिरवळ बघतो..
.
नसते काही ध्येय मनाशी
मनोरथातच राजा बनतो..
.
विसरत सारे दु:ख आपले
विदूषकासम तो वावरतो..
.
गणित वेगळे आयुष्याचे
सदैव माझा हिशोब चुकतो..
.
उत्तम करतो भाटगिरी तो
कौशल्याने निंदा करतो..
.

दे रे दर्शन विठूराया आता..

(चाल- जारी ओ कारी बदरिया..)

दे रे दर्शन विठूराया आता
तुझ्या चरणी मी ठेवला माथा
संकटात माझ्या तूच त्राता.. दे रे दर्शन..

अंत माझा तू किती बघणार
विसरलो नामात घरदार
शिणली माझी काया,
तुला ना ये दया
दमलो धावा करता येता जाता.. दे रे दर्शन..

चंद्रभागेत करूनी स्नान
गातो तुझेच मी गुणगान
रूप डोळ्यासमोर,
मनी नामाचा जोर
विठूराया तुझा महिमा गाता.. दे रे दर्शन..

टाळ दोन्ही हाती वाजवूनी
विठ्ठल विठ्ठल जप मी करूनी
होतो कीर्तनी दंग,
चढतो भजनास रंग
पांडुरंगा तुझे नाव घेता.. दे रे दर्शन..
.

रेटुनी जरा खोटे बोलताच जय आहे..(गझल)

वृत्त.. रंगराग
गालगा लगागागा×२
अलामत.. अ
रदीफ.. आहे
...........................,....................................

रेटुनी जरा खोटे बोलता विजय आहे
गुळमुळीत सत्याला सांगण्यात भय आहे..
.
हालचाल मोहकशी का तिचीच बघतो मी 
डौलदार कायाही पाहण्यात लय आहे..
.
पोर दूर शिकते ती ओल आज डोळ्यांना
दोन घास गिळताना पापण्यात सय आहे..
.
बेत आज भेटीचा, भेटलीच ती नाही
वायदा विसरण्याची का तिची सवय आहे..
.
पाहतो मला जो तो आजकाल का वळुनी
वाटते प्रसिद्धीचे वाढते वलय आहे..
.
चारही दिशांना तो नाव आज गाजवतो- 
गायनात साथीला सूर ताल लय आहे..
.

स्वामी समर्था स्वामी समर्था...

स्वामी समर्था, स्वामी समर्था
तुझिया चरणी माझा माथा..

नाम तुझे मुखात असते
पाठीराखा तूच त्राता..

डोळ्यासमोर तुझीच मूर्ती
मनात असशी स्वामी समर्था..

काम क्रोध मत्सर नाही
द्वेष नसे तू समोर दिसता..

जगतो आहे तुझ्या कृपेने
सहज वाहते जीवन सरिता.. !
.

पहाटेच्या समयी आनंदतो मी मनी -

[ चाल- जनी नामयाची रंगली कीर्तनी  ..]

दर्शनाच्या समयी आनंदतो मी मनी 
तुला रे पाहुनी देवा श्रीगणेशा ..

सुखी जीवनाच्या नौकेत बसूनी 
धन्य मी होऊनी स्मरतो तुजला ..
वक्रतुंड लंबोदर गजानन विनायक 
तू रे जगन्नायक सर्वांचा तू त्राता ..

तुझ्या दर्शनाचा लाभ घेऊनीया 
हात जोडुनीया मी करतो प्रार्थना ..
असो समाधानी जगी सारे लोक
धुंडता त्रिलोक भेटवी न दु:खा .. !
.

कवितेचे इंद्रधनुष्य

पहिली माझी कविता हो
बायकोने वाचली
कविता वाचत आनंदाने
घरभर ती नाचली..

दुसरी माझी कविता हो
मातोश्रीने वाचली
समाधानाने मान हलवत
पोथीत मान घातली..

तिसरी माझी कविता हो
पिताश्रीनी चाळली
चाळत चाळत अख्ख्या चाळीत
कौतुकाने फिरवली..

चौथी माझी कविता हो
मित्रमंडळी आनंदली
एकमेकांनाच व्हाटसपावर 
रात्रंदिवस फॉरवर्डली..

पाचवी माझी कविता हो
पोरापोरीत मिरवली
चढाओढीने सगळ्यांनी 
आपल्या वहीत खरडली..

सहावी माझी कविता हो
प्रेयसीच्या हाती पडली
अर्धीच लिहिली होती तरी
"अय्या..छान.." पुटपुटली..

सातवी माझी कविता हो
मी स्पर्धेसाठी पाठवली
परिक्षकांनाही समजली नाही
त्यामुळे "सर्वोत्तम" ठरली !
.

आदर्श खास "गुरुजी".....(गझल)

आदर्श खास "गुरुजी" संस्कार होत गेला
सन्मार्ग चालण्याला आधार होत गेला..
.
लाडात वाढला तो संस्कारशून्य ठोंब्या
जाहीर पालकांचा उद्धार होत गेला..
.
वारीत दंग झालो तालात नामघोषी
डोळ्यापुढे विठूही साकार होत गेला..
.
संवाद साधताना तडजोड मीच केली
तेव्हा जरा सुखाचा संसार होत गेला..
.
वर्षाव देणग्यांचा मोहातही पुजारी
भक्तात दर्शनाचा व्यापार होत गेला..
.
जाणून मोडणारे नियमास नित्य येथे
नियमास पाळणारा बेजार होत गेला..
.
मासा गळास बघुनी नेता मिशीत हसला 
मतदार नोट बघुनी लाचार होत गेला..
.


का दुकानी चुंबनाची.... (गझल)

का दुकानी चुंबनाची आज गोडी आठवावी
विसरुनी पेढ्यासही मी शेवचकली मागवावी..
.
संपले दु:खात जीवन भोवती काळोख आता
वाट थोडीशी सुखाच्या काजव्याने दाखवावी..
.
हालचाली मोहणा-या खास गजरा माळताना
वाटली डोळ्यात माझ्या अप्सरा ती साठवावी..
.
खास नटलेल्या सखीला पाहिले मी मंडपी त्या
वाटले सर्वांपुढे मी छान सनई वाजवावी..
.
आज बिनतारी कुठेही जातसे संदेश जगती
वाटते पण एक चिट्ठी मी सखीला पाठवावी..

चार हायकू

मुक्त छंदात 
खूप मी आनंदात 
बंधनमुक्त ..
.

रोजचा नाट 
पाहू रे किती वाट 
धो धो पाऊस..
.

स्पर्श ओलेता     
अनोख्या पावसात  
चिंब मनात..
.

धरा रुसली 
पावसाने हसली 
शमली तृष्णा ..
.

मनाला वाटते तेव्हा ... (गझल)

मनाला वाटते तेव्हा किती कामात चरतो मी
खिशाची भूक मिटवाया विनातक्रार दमतो मी..

कशाला बाळगू भीती तसा निर्लज्ज मी झालो
कुणाच्याही घरी जेव्हा मनी येताच निघतो मी..

जरी मी ठेवतो नावे कुणाच्या कर्मकांडाला
मला जमतो मुकाट्याने नवससायास करतो मी.. 

कसे मोरास वाटावे दिसावे नाचताना मी
पडेना थेंब एखादा उगा का आस धरतो मी..

किती मी धावतो आहे जिवाची लावुनी बाजी
जरी ठाऊक मृगजळ ते तरी मोहात फसतो मी..
.

वाचून मीच गीता ... (गझल)

वाचून मीच गीता ज्याच्या पुढ्यात धरली
गावातला ढ होता वार्ता तिथे पसरली.. 
.
खड्डे बघून म्हटले रस्त्यात नीट चाला
माझे मला न कळले चप्पल कशी घसरली..
.
मर्मास जाणले ना कासव ससा कथेच्या
घाईत जीवनाच्या प्रत्येक पैज हरली..
.
अंदाज पावसाचा खात्यातही न कळला
मी पावसात भिजलो छत्री घरी विसरली..
.
हे पोट एवढेसे गरिबीत भूक मोठी
दानास पात्र झोळी पण फाटकीच ठरली.. 
.

मला ठाऊक आहे जे .. (गझल)

मला ठाऊक आहे जे तुला बोलायचे आहे
अबोला सोड ना आता मला ऐकायचे आहे..
.
दुरावा संपला कोठे तुझ्या माझ्यात जो होता
उभे आयुष्य सारे हे कसे काढायचे आहे..
.
सुखाचा एक दु:खांचे दहा दाणे भरे झोळी
नकोसे जीवनी ओझे मला पेलायचे आहे..
.
जरी वाटे नकोशीही क्षणाची रंगरंगोटी
न कंटाळून पोराला पुन्हा पाजायचे आहे..
.
'मुलीचा जन्म हा माझा' मनी ना दु:ख वाटावे
मुलांना टाकुनी मागे तिला धावायचे आहे..
.

गा रवीची तुम्ही थोरवी.. (गझल)

वृत्त.. वीरलक्ष्मी
लगावली..गालगा गालगा गालगा
मात्रा..१५
अलामत... अ
गैरमुरद्दफ
.............................................

गा रवीची तुम्ही थोरवी
मार्ग मज काजवा दाखवी..
.
ऐकवी घोषणा छान तो
पण पुन्हा सारवा सारवी..
.
लागला वेदनांचा लळा
का सुखालाच सुटका हवी..
.
वाद का घालती बायका
माहिती भावही वाजवी..
.
चाललो मी कुठे एकटा
शीळ वारा सवे ऐकवी..
.

तुझी झुकती नजर बघता ... (गझल)

तुझी झुकती नजर बघता तुझ्या हृदयात मी आता
तुझ्या बघ स्वागता उत्सुक उभा दारात मी आता..
.
कधी इकडून जातो मी कधी तिकडून मी जातो
तरी पोलीस वळतो तो कळे चौकात मी आता..
.
पुरी करणार मी वचने दिलेली सर्व जनतेला
म्हणाला तो मला नेता, पहा कोमात मी आता..
.
जगाला वेड लागावे अशी ही लेखणी माझी
हिचा तोरा किती न्यारा बघा झोकात मी आता..
.
जरी गेलीस तू कोठे कितीही दूर रागाने
बनूनी छानसे गाणे तुझ्या ओठात मी आता..
.
कसा केव्हा घसा बसला न कळले आज पत्नीचा
दरारा वाढला माझा घरी जोमात मी आता..
.
कधी पेटेल तो वणवा नसे तो ज्ञात अवकाळी
न व्हावा गर्व वृक्षाला, किती बहरात मी आता..
.

विठ्ठला, दर्शन कधी देणार ...

विठ्ठला, दर्शन कधी देणार
मनापासुनी भक्ती करुनी नाम तुझे घेणार..

थकलो जरी मी वारी करतो
विठ्ठल विठ्ठल मनात स्मरतो
डोळ्यापुढती तुझीच मूर्ती सदैव रे नेणार..

पुण्य मिळवतो स्नान करुनिया
तनामनाला स्वच्छ धुवुनिया
पापभिरू मी निर्व्यसनी मी रिक्त हस्त येणार..

जातिभेद मी दूर सारतो
निंदा द्वेष मी मुळी न करतो
वारकरी मी सन्मार्गाची आस नित्य धरणार..
.

चला दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग ...

(चाल- अशी चिक मोत्याची माळ ...)

चला दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग  

दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग  
पाहू डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग 
डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग  ।।

धरी कमंडलू , त्रिशूळ उभा तो हातात ग 
छान शंख पहा, हातात चौथ्या चक्रास ग 
शोभे डमरू आणिक फूल कमळाचे दत्तास ग ।।  

त्या त्रैमूर्तीचे घेऊया दर्शन दुरून ग  
चला करूया प्रार्थना दोन्ही हातांना जोडून ग 
म्हणू दिगंबरा दिगंबरा चला समोर ग  ।। 

वेद चारही उभे भवती श्वानांच्या रूपात ग 
भूमाता उभी बाजूला गाईच्या रूपात ग 
दत्त दत्त गाऊया भजनी रंगून जाऊया ग  ।। 
.

"विठ्ठला" "विठ्ठला" घालू का साद.....

[ चाल- चांदणं चांदणं झाली रात ]
   
"विठ्ठला" "विठ्ठला" घालू का साद
तुझ्या नामाचा किती रे लागला नाद

पंढरीत सगळ्यांनी जमायचं  
विठलरुक्मिणीला पहायचं
घेऊया सारेजण टाळ हातात    
"विठ्ठल" "विठ्ठल "म्हणू तालात       
"विठ्ठला" "विठ्ठला "घालू का साद
तुझ्या नामाचा किती रे लागला नाद

या हो कीर्तन करूया हो
नाम स्मरणात दंगूया हो 
भजनी तल्लीन होऊया हो         
"विठ्ठल" "विठ्ठल" गाऊया हो  
"विठ्ठला" "विठ्ठला" घालू का साद
तुझ्या नामाचा किती रे लागला नाद 

चंद्रभागेत त्या करूया स्नान
सगळे जाऊया विसरून भान
वारकरी जमून करू गुणगान
करूया देवळाकडे प्रस्थान   
"विठ्ठला" "विठ्ठला" घालू का साद
तुझ्या नामाचा  किती रे लागला नाद 
.

सवंगड्यांनो - - [बालकविता]

सवंगड्यांनो, चला चला रे खेळू या 
घरकाम झाले.. अंगणात जाऊ या ..
बघा बघा तरी हे केवढे मोठ्ठे अंगण 
त्यात काढू आपण छान गोल रिंगण ..
सई ताई माई "लंगडी" खेळतील 
बाळू बंटी बंडू "शिवाशिवी"त पळतील ..
पोरींनो, तुम्ही आता जरा गप्प बसा 
"डबा ऐसपैस"चा खेळ रंगू द्या खासा ..
चला चला लवकर, बाळू बंटी बंडू    
अंगणाबाहेर खेळूया, "विटी नि दांडू" ..
बाळू, त्या गलीतून विटी कोल लांब 
बंटी, विटी झेलायला जरा दूर थांब ..
सई ताई माई, तुम्ही घाला "फुगड्या "
ये रे बंटी बाळू, मारू "दोरीवर उड्या" ..
"लगोरी"ची तयारी फरशीचे तुकडे सात 
चेंडूने पाडायला तयार ठेवा हात ..
थोडा वेळ खेळू "आट्यापाट्या", पोरांनो 
तोवर तुम्ही "सागरगोटे" खेळा, पोरींनो ..
कंटाळा आला.. आता ओट्यावर बसू 
चला चला सगळे आत, निवांत "पत्ते" पिसू ..
.

एक चारोळी

मतदाराला पाहुनी नेता 
विनयाने झुकला-
बघुनी सरडा प्रतिस्पर्धी  हळूच
का हसला..  !
.

"चाय लाना" सांगतो तो का बरे मेजावरी -- [गझल]

वृत्त- देवप्रिया 
लगावली- गालगागा  गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
अलामत- अ 
-----------------------------------------------------
"चाय लाना" सांगतो तो का बरे मेजावरी 
"मी मराठी" शब्द त्याचे नेहमी कानी तरी..
.
वाटते आश्चर्य कामे पूर्ण माझी जाहली 
मांजरे अन माणसेही आडवी आली जरी..
.
आसवांचे थेंब ह्याच्या भाकरीसंगे इथे 
प्यायला नेत्यास तेथे लागते का बिस्लरी..
.
गातसे कोणी अभंगा गात कोणी लावणी 
मायच्या ओवीस नाही तोड का जात्यावरी..
.
मी उगा का "आपले" होते म्हणूनी वागलो 
काम होता दूर गेले सोडुनीया ओसरी..
.

किती गारठा हा असा झोंबणारा.. [गझल]

वृत्त- भुजंगप्रयात 
मात्रा- २० 
लगावली- लगागा लगागा लगागा लगागा 
अलामत- आ 
------------------------------------------

किती गारठा हा असा झोंबणारा 
तुझी ती मिठी हाच त्याला उतारा..
.
नसे मेघ काळा न पाऊस कोठे   
न मोरास वाटे फुलावा पिसारा..  
.
व्यथा तो न सांगे मनाची कुणाला  
सुखी ना दिसे त्यास कोणी सहारा..
.
न चिंता मनाला कधी आळशाच्या 
असे घोर कर्त्या मनालाच सारा..
.
सुखाचे घडावे कधी त्यास दर्शन 
व्यथेचा शिरी नित्य पाटीत भारा..
.
कशी धावते लाट बेभान मागे 
पळे घाबरूनी पुढे तो किनारा..
.

दत्त दिगंबर, दत्त दिगंबर -- [भक्तीगीत]

[चाल- भातुकलीच्या खेळामधली...]

दत्त दिगंबर, दत्त दिगंबर नाम स्मरूया सारे 
स्मरून अपुल्या जन्माचे ह्या सार्थक करूया सारे ..

सुंदर मूर्ती डोळ्यापुढती उभी किती ही छान 
दत्त दिगंबर दत्त दिगंबर म्हणत करू गुणगान 
दत्तात्रयास बघताना भवसागर तरूया सारे ..

हात जोडता भाव अनामिक आनंदही हृदयाला 
भजनी तल्लीन होता वाटे संतोषही मनाला 
दत्त दिगंबर म्हणता म्हणता माळ जपूया सारे ..

चार श्वान हे वेद भोवती वसुधा ही गोमाता 
शंख चक्र अन त्रिशूल डमरू उभा घेउनी त्राता 
शरणागत नतमस्तक होऊन त्यास बघूया सारे ..

सहा हात अन तीन मस्तके देव अलौकिक आहे
भक्ताची आळवणी आणिक भाव मनीचा पाहे 
ब्रह्मा विष्णू आणि महेशा वंदन करूया सारे ..
.

" का मी प्रयत्न केला नात्यास जोडण्याचा. . " [गझल]

[वृत्त- आनंदकंद , मात्रा- २४ , अलामत- अ,
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा, 
गैरमुरद्दफ]

का मी प्रयत्न केला नात्यास जोडण्याचा
होता प्रयत्न त्यांचा गोत्यात आणण्याचा ..
.
पाहूनिया सदोदित पळतो पुढेच जो तो 
बघतो सुवर्णक्षण मी ते पाय ओढण्याचा ..
.
का साठवील कोणी अळवावरील पाणी 
ठाऊक ज्यास त्याचा गुणधर्म वाहण्याचा ..
.
सुविचार फलक दिसती रस्त्यात येथ तेथे
करतो विचार त्यांना दुरुनीच खोडण्याचा ..
.
आधार तोच बनतो तो नेक एक सच्चा 
संकल्प सोडतो जो स्वार्थास त्यागण्याचा ..
.
निष्ठेतलेच नेते खुर्चीस भाळणारे
घेती अचूक निर्णय पक्षास सोडण्याचा ..
.

गादीवर तो भर दिवसाही जरी लोळतो .. [गझल]

वृत्त- मात्रावृत्त, अनलज्वाला 
मात्रा- ८+८+८ ,   अलामत- अ 
---------------------------------------------
गादीवर तो भर दिवसाही जरी लोळतो 
पहाटस्वप्ने त्यावेळी तो गोड पाहतो..
.
कर्तव्याचे पालन करतो ठरे "मूर्ख" पण  
बदलीसाठी सर्वाआधी पात्रच दिसतो..
.
तिळगुळ घेतो गोड बोलतो कामापुरता 
काम संपता ना चुकता तो शिव्या घालतो..
.
पत्नी समोर दिसता का तो कापे थरथर 
ती नसता जग माझ्या मुठीत ठेविन म्हणतो..
.
जाते भांडत दूर कुठे ती सोडुन मजला 
का उचक्यांची बेजारी मी सोसत हसतो..
.

टाळू तिला किती मी संधी न फार आता- [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
अलामत- आ  ,   रदीफ- आता 
-------------------------------------------------

टाळू तिला किती मी संधी न फार आता 
या सावजास टिपण्या ती सज्ज घार आता..
.
हातास स्पर्श होता सांभाळतो मनाला 
परक्या घरातली ती शालीन नार आता..
.
डोळ्यात काय जादू आहे तिच्या कळेना 
थांबून झेलतो मी हृदयात वार आता..
.
घेणार शस्त्र ना मी जखमा करावयाला   
या लेखणीतल्याही शब्दांस धार आता.. 
.
आई नि बाप सोबत थाटात जन्म गेला  
पत्नीसमोर वाटे त्यांचाच भार आता.. 
.

हायकू.. संक्रांतीचा !

तीळ बोलाचे 
गूळ त्यात मैत्रीचा 
स्नेह वाढीचा..
.

जरी आडवे काही त्यांना तुडवत गेलो ,, [गझल]

वृत्त- अनलज्वाला ,   रदीफ- गेलो 
मात्रा - ८+८+८ ,  अलामत- अ ,
-------------------------------------------
जरी आडवे काही त्यांना तुडवत गेलो 
त्यासाठीही अनुयायी मी निवडत गेलो..
.
येता जाता करू लागले उपदेशच ते
समोरून मग खुशाल त्यांना टाळत गेलो..
.
आवश्यकता होती थोडी मज पैशांची
पेरणीस मी साखर तोंडी ठेवत गेलो..
.
वेळ दिलेली त्यांनी मजला ठीक सातची 
वेळ आठची प्रमाण मानुन पाळत गेलो..
.
मज आवडते जमेल त्याचे कौतुक करणे 
निंदातुर का चेहऱ्यास मी पाडत गेलो..
.

तीन सुधाकरी -

१.
वळू लागे पाय 
देवळाचा रस्ता 
खात आहे खस्ता 
सांगण्यासी..
.
२.
प्रेम स्वत:वर 
अती जे करावे 
फक्त ते सांगावे 
आरशाला..
.
३.
फार प्रदूषण 
उपदेश झाला 
घरात का भ्याला 
उंदरास.. 
.

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलनाम घेऊ मोठ्याने ..

[चाल- बाकड बम बम बम बाजे डमरू..]

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलनाम घेऊ मोठ्याने 
विठ्ठल नामाचे स्मरण करू आनंदाने..

हळू हळू ती पंढरीची वाट चालूया 
चालत चालत मुखात विठ्ठलनाम गर्जूया 
गजर टाळांचा टाळ्यांचा करूया हर्षाने ..

चंद्रभागी स्नान करुनी पुण्य साठवू 
स्नान करता करता त्या विठूला आठवू 
पुण्य गाठीशी पाठीशी बांधू नामाने ..

विठ्ठल विठ्ठल स्मरण करण्या त्रास कसला हो 
रूप डोळ्यापुढती बघण्या कष्ट कसले हो 
वाळवंटी भजन कीर्तन होईल जोमाने ..

सावळ्या विठ्ठला डोळे भरून पाहूया 
विटेवरच्या त्याच्या चरणी माथा ठेवूया 
जाऊ रंगुन दंगुन त्या विठ्ठलनामाने ..
.

रात्रीत वाटपाची ज्याची चुणूक आहे.. [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
अलामत- ऊ ,    रदीफ - आहे 
-------------------------------------------------
रात्रीत वाटपाची ज्याची चुणूक आहे 
खुर्चीत "तो"च नेता होरा अचूक आहे 
.
दुष्काळ रोज आहे चारा न द्यावयाला 
दणक्यात नांगरावे जित्राब मूक आहे ..

मागीतली जरी मी ना वाढते कुणी ती  
नित्कोर भाकरीची मज फक्त भूक आहे..

दाता न ओळखीचा त्राता न पाळखीचा  
वर्दीतलाच टपला मज धाकधूक आहे ..
.
शेतात थेंब नाही घामास दाम नाही   
मरणे पसंत करतो जगणेच चूक आहे ..
.

गर्दीमध्ये बोलायाला वेळच नसतो.. [गझल]

मात्रावृत्त- अनलज्वाला 
मात्रा- ८+८+८ ,   अलामत - अ  
----------------------------------------------
गर्दीमध्ये बोलायाला वेळच नसतो 
एकांती मग माझ्याशी मी बोलत बसतो..

येता जाता निरखत असते आरशात ती 
वेडी समजत तिला आरसा पाहत हसतो..

सदैव करतो भरल्या पोटी भाषण नेता 
पोट भुकेले असून "राजा" ऐकत फसतो..

वाट पाहुनी यमराजाची जगून झाले 
का घाबरलो मी जगण्याला विचार डसतो..

वाचत होता रोजच गीता उत्साहाने 
नक्की आहे का फलदायी शोधत असतो..
.