दोन पाखरे अजुनी का ती नयनांची तव घुटमळती --[गझल]

वृत्त-
लगावली- गालगालगा गागागागा गागागागा गागागा
मात्रा- ३०
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
दोन पाखरे अजुनी का ती नयनांची तव घुटमळती छानदारसे घरटे माझ्या बनवाया हृदयी बघती.. . केस हे तुझे विस्कटलेले करती हृदयी का गुंता प्रेमभावना होत अनावर सुटकेलाही घाबरती.. . सैरभैर झाल्या त्या नजरा झाला वेडा वाराही पदर का तुझा करतो चुळबुळ राहीना खांद्यावरती.. . आजकाल तव येणेजाणे बंद जरी येथुन झाले वळण नेहमीचे दिसता का पाय तुझे इकडे वळती.. . सात जन्म हे बंधन अपुले घालत फेरे आनंदी एक जन्मही नाही सोसत रोजच दु:खांची भरती.. .

" छान रांगोळी मनी मी वेदनांची काढतो -- "[गझल]

वृत्त- देवप्रिया 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
- - - - - - - - - -- - - -- - - -- - - - -- - - -- - - - -- -
छान रांगोळी मनी मी वेदनांची काढतो 
वेळ मिळता पाहिजे ते रंग भरुनी दंगतो..
.
ऐकवीतो तो कहाणी वाहत्या अश्रूतुनी
 पोतडीतच मी मनाच्या दु:ख माझे लपवतो ..
.
ऐकण्या मी सज्ज असतो रडकथा तुमची सदा
गाउनी माझी व्यथा मी आसवे ना ढाळतो..
.
का सुखाची दाखवावी तू मला लालूच रे
सांग उपभोगू कधी सुख दु:ख दिसता गुंततो..
.
सारखे धक्केच देशी दु:ख अन आनंदही
जीवना रे तोल हा मी सांग का सांभाळतो..
.
बाळगू मी तापलेल्या का उन्हाची त्या तमा
 प्रियतमा ही सोबतीला घेउनी मी हिंडतो ..
.
गुण कसा हा पावसाला माणसाचा लागला
का अवेळी दाखवूनी बेइमानी वागतो ..
.

जीवघेणे लाजणे ते पूर्ण गालावर पसरणे - - -[गझल]

वृत्त- व्योमगंगा 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगागा 
मात्रा- २८
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जीवघेणे लाजणे ते पूर्ण गालावर पसरणे
वाटले नाविन्य रोजच ते तुझे नवखेहि दिसणे ..
.
आपली नजरानजरही टाळण्याला पाहिली मी
कठिण झाले पण मिठीतुन सारखे ते दूर सरणे ..
.
जसजशी ती रात्र चढते पेंग येते अन अनावर
जाणवे सोपे न आहे हे तुझ्या प्रेमात पडणे ..
.
संपले संवाद सगळे सर्वही बोलून झाले
तेच ते बोलून आता राहिले नुसते बरळणे ..
.
आणभाका वचन शपथा खूप झाल्या घेउनी
वेगळे काही न उरले जीवनी आता ग घडणे ..
.

कविता

हिय्या करून 
मनाच्या जिन्यातून 
विचारांच्या पायऱ्यांवरून 

तो कवी
सरसर चढून,
आकाशाला टेकला देखील -

वरून खाली 
आकाशातून शब्दाची
एकेक चांदणी
टाकू लागला-

सुंदरशी सर
त्यातून तयार झाली -

आणि 

खालून वर बघणारे
म्हणू लागले -

वाहवा ! 
किती छान
कविता झाली !
.

कष्टकरी

सुखाच्या खरखरीत 
ठिगळाच्या चादरीवर

दु:खाच्या काट्यांची
अफलातून वेलबुट्टी

अगदी उदार मनाने 
नियतीने काढलेली -

दिवसभराच्या श्रमांनी
थकून भागून ती

अंगावर ओढून तो 
नुकताच लवंडलेला -

काही क्षणात स्वप्नराज्यात 
सम्राटपद भूषवत तो

निद्राराणीच्या कुशीत 
कधीच विरघळून गेला !
.

नामात तल्लीन होऊया ..

[चाल-  मामाच्या गावाला जाऊया ..]

रामकृष्णहरी जय रामकृष्णहरी 
मुखाने जप करू रामकृष्णहरी ,
माळ जपाची वाहूया - नामात तल्लीन होऊया .. 

नामाचा महिमा मोठा 
आनंदाचा तो साठा  
साठा लुटतच राहूया - नामात तल्लीन होऊया .. 

भक्तांची भक्ती मोठी 
देवाची मूर्ती ही छोटी  
डोळे भरून पाहूया - नामात तल्लीन होऊया .. 

नामस्मरण छान छान 
मनाला होई समाधान 
भजनी दंगून जाऊया - नामात तल्लीन होऊया .. 

मेळा भक्तांचा जमणार 
आवड भजनाची लागणार 
नामाची गोडी चाखूया - नामात तल्लीन होऊया .. 
.

चार चारोळ्या -

१.
शेंग चवळीची दिसत होतीस 
सडपातळ ग असतांना -
भोपळा कसा डिवचत असतो 
मंडईत मज फिरतांना ..
.

२.
मी शांतीचा आहे भोक्ता
तो होता सुटला सांगत-
ना ठेवला विश्वास ज्याने 
का त्याच्याशी बसला भांडत ..
.

३.
बघता फळास झाडावर 
जमतो थवा पक्ष्यांचा -
बघुनी नेत्यास खुर्चीवर 
रमतो मेळा चमच्यांचा ..
.

४.
देवाचिये द्वारी 
उभा तासभरी -
चप्पल नवी कोरी 
पळवी तो ..
.

पाच चारोळ्या

कळले तेव्हां उशीर झाला 
तुला कधी ना समजू शकलो -
स्वार्थी मी परदेशा भुललो 
आई, कसा ग कृतघ्न ठरलो ..
.

सत्तेचा लोण्याचा गोळा 
पक्षबदलूंचा त्यावर डोळा -
खोबरे तिकडे चांगभले 
नीतिमूल्यांचा चोळामोळा ..
.

भलतीच अवघड परिस्थिती 
झाली आहे कडाक्याच्या थंडीमुळे -
अखंड वळवळणारी जीभ तिची 
तोंडातच एकदम आखडल्यामुळे ..
.

शनिवार रविवार आले पटकन 
"स्वच्छता अभियान" राबवावे म्हणतो-
त्यासाठी छान फोटोग्राफर अन
स्वच्छ जागेचा शोध घ्यावा म्हणतो..
.

हसवण्याची सवय माझी 
दोष का माझा म्हणू मी -
स्मितही करू शकत नाही 
दुर्मुखलेले तुम्ही नेहमी ..
.