तीन चारोळ्या -

तुझ्या होकाराची सखे,
अजूनही आशा सोडली नाही-
मृगजळामागे धावायची 
माझी खोड मोडली नाही..
.

तू असलीस तर 
जीवन सरिता-
तू नसलीस तर 
घडा ग रिता ..
.

ठेवलेस तुझ्या मुठीत मला 
काहीच हरकत नाही माझी -
झाकली मूठ किती मोलाची 
किंमत करत राहशील माझी 
.

गजानना, वंदन करतो देवा --

श्री गजानना ,वंदन करतो तुला      
आशीर्वाद द्यावा शुभ तू मला ..

सगळ्यांना तू सुखी ठेवशी 
संकट आमचे दूरही करशी 
विध्नेश्वरा, गणाधीशा
शरण मी आलो तुला ..

सदैव आमच्या पाठी राहशी  
मनाची भीती करशी नाहीशी
विनायका, एकदंता
ध्यास तुझा लागला  ..  

चरणी मस्तक तुझ्या ठेवतो  
मनात तुलाच सदैव स्मरतो 
मोरेश्वरा, चिंतामणी 
सत्वर पाव रे मला ..

प्रदक्षिणा मी तुला घालतो 
जप नामाचा तुझ्याच करतो
लंबोदरा, श्रीगणेशा 
प्रसन्न हो तू मला  ..
.

पाच चारोळ्या -

येता जाता हळू हलवतो 
लबाड वारा का दाराला -
धडधड हृदयाची वाढवतो 
तिचीच चाहुल देत मनाला ..
.

येतेस आवेगात तू भेटायला
ठरलेल्या वेळेच्यानंतर नेहमी -
त्या झंझावातात का तुला
विसरतो रागवायचेच मी !
.

"येते" म्हणतेस.. येतच नाहीस
"येणार नाही".. म्हणतच येतेस -
लहरी झालीस पावसासारखी
कुठे कधीही.. अचानक भेटतेस ..
.


विश्वासाने कितीतरी मी 
गळ्यात गळा त्याच्या घातला - 
"माणूस" निघाला तो शेवटी
केसाने गळा त्याने कापला ..
.

व्यसन दारू सिग्रेट तंबाखूचे
नाही कुणाच्या उपयोगाचे -
व्यसन आयुष्यात असावे 
फक्त माणसे जोडायाचे ..
.

चार चारोळ्या -

            दुर्मिळच -

दुधात साखर म्हणजे काय
अचानक धोधो पाऊस यावा -
जोडप्याजवळ नसावी छत्री
असा क्षण रस्त्यातच न्हावा ..
.


      ढेकर दुष्काळाची - 

दुष्काळावर भाषण ऐकून
 श्रोते फारच गहिवरले
लांबलचक ढेकर ऐकून 
श्रोते सारे का  बावरले !
.


          ध्यान -

देवाचिये दारी
उभा क्षणभरी
ध्यान चपलेवरी
ठेवोनिया !
.


         दोघेही - ? 

देवळाबाहेर भिकारी 
माणसाला पैसे मागत असतो -
घरातला माणूस 
देवाला सुख मागत बसतो ..
.

रडण्यास खास आता गर्दीत राहतो मी -- [गझल]

रडण्यास खास आता गर्दीत राहतो मी  
अन सांगण्या व्यथांना एकांंत शोधतो मी ..

विस्फारतोच डोळे ऐकून उत्तराला       
"माणूस" जात जेव्हा कानात सांगतो मी ..

आभाळ स्वच्छ असता जमतात बेरकी ढग  
पर्जन्य घोषणांना जोरात ऐकतो मी ..

जाणून घेतले मी भिंतीस कान असती
वाटे घरात भीती बाहेर बोलतो मी ..

विसरायला तुला मी पेल्यास शरण गेलो 
पेल्यातुनी ग तुझिया प्रतिमेस पाहतो मी ..
.