उशीर होईल म्हणून रिक्षाला नको तेवढे पैसे घालवून,
घरातली काही कामं अर्धीच टाकून,
आम्ही उभयता बरोब्बर अकरा पंचेचाळीसला कार्यालयात हजर ...
दुपारचा अकरा पन्नासचा लग्नाचा "शुभमुहूर्त" गाठण्यासाठी .....!
अकरा तीसला नवरदेवाचं घोडं देवाला गेलं होतं म्हणे ----
एकदाचं परत थडकलं. पाठोपाठ वरातीमधली मंडळी-
विशेषतः पाच ते पंचावन्न वयोगटातला महिलावर्ग
अगदी बेभान आणि बेढब होऊन ब्यांडच्या तालावर
"नाचकाम नावाचा प्रकार" करून दाखवत होता.
दोनचार मिनिटे नवरदेवानेही घोड्यावरून पाय उतार होवोन,
समस्त हजर मंडळीना घेऊन,
अंगविक्षेपासह "कुंगफू ज्यूडो नागीन सैराट शांताबाई"चे जमेल तसे नाचकाम केले..
अखेरीसबारा वाजून चाळीस मिनिटांनी एकदाचे
पवित्र मंगलाष्टक नावाचे गायन सुरू झाले !
एक हौशी गायिका "स्वयंवर नवरीचे झाले..."
असे ट ला ट जुळवलेले मंगलाष्टक,
मोठ्या उत्साहात म्हणून एकदाची मोकळी झाली...
आणि आम्हीही सुटलो !
[स्वयंवर न होता, रीतसर "दाखवून"
होत असलेला नवरा बिचारा कदाचित मनात ओशाळला असणार !]
"शुभमुहूर्ता"वर म्हणून जमलेल्या वेळेवर,
लोक कंटाळून टाळ्या वाजवते झाले !
नंतर नवीन प्रथेप्रमाणे फोटोसाठी "नवरानवरी ओळखपरेड" सुरू झाली.
पोटात कावळेच नाही तर वाघ, सिँह, हत्तीही ओरडू लागल्याने,
आम्ही भोजनपंगतीकडे वळलो.
.....लग्नपत्रिकेत यापुढे लग्नमुहूर्त लिहितांना-
कृपया नाचकाम वेळ, फोटो शुटिँग वेळ, मंगलाष्टकांची वेळ
आणि अक्षता टाकण्याचा " खरा शुभमुहूर्त "वेळ------
इ. वेळापत्रक देण्याचीही सर्व संबंधितांना विनंती करावी म्हणतो !
.