' दिवास्वप्न 'उजाडावा एकतरी सुट्टीचा वार
हुकमाचा नसावा कानीं भडीमार

जाणून मनीचे, हो नवरा हुशार
सकाळचा चहा नाश्ताही तयार

नवऱ्याचा कामाला लागो हातभार
आयते मिळावे मज जेवण तयार

लोळत रहावीशी असावी दुपार
चारचा गरम चहा हातात तयार

सांजेला गजऱ्याने सजावा केशभार
बागेमधे मनसोक्त करावा विहार

हाय दैवा, भलते दिवास्वप्न पडणार
चार पाहुणे सत्यात आजच येणार

नवरा हॉलमध्ये गप्पा ठोकणार
स्त्रीमुक्तीवरची चर्चा तिथेच रंगणार

कामवाल्या बाया आज दांडी मारणार
खरकटीधुणीभांडी यात मी रमणार . .

.

महाशिवरात्रीचा महाउपवास


मित्राच्या हातात गच्च भरलेल्या दोनतीन पिशव्या दिसल्या .
सामोरा आल्यामुळे अर्थातच मी हटकले -
" बरेच ओझे वाहतोयस रे आज ? "

पिशव्या खाली टेकवत, मित्राने खिशातला रुमाल काढला .
थंडगार वारा वाहात असतानाही,
कपाळावर साठत चाललेला घाम पुसत,
तो मलाच विचारू लागला-
" अरे तुला माहीतच नाही की काय ?
उद्या महाशिवरात्र आहे ना ? "

मी उलट विचारले-
" महाशिवरात्रीचा आणि ह्या ओझ्याचा संबंध आहे का काही ? "

माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहात तो उद्गारला -
" म्हणजे, उद्या उपास नाहीत का करणार तुम्ही ?
मला तर आज बायकोने अगदी बजावून,
सफरचंद, डाळिंब, चिक्कू, द्राक्षे, अंजीर, केळी ही उपासाची फळे-
सोबत खजूर, वेफर्स, शेंगा-राजगिरा लाडू, चिक्कीही आणायला सांगितली आहे.
शिवाय- साबुदाणा, भगर, शिंगाड्याचे पीठ उपासाच्या पदार्थासाठी,
बटाटे, रताळी, काकडीपण लागणारच ना-
काहीतरी तोंडी लावणे करण्यासाठी ..! "

त्यांची "उपासाची अशी जय्यत तयारी" पाहून
"अरेच्चा ! मी विसरलोच होतो की !"
- असे म्हणत मी त्याचा " ह्यापी महाशिवरात्री " म्हणत निरोप घेतला ...

का कुणास ठाऊक,
पण माझे जेवण होण्याआधीच-
मला एक लांबलचक ढेकर आली ब्वा !
.

माणूसकी मनाची तेथून दूर टळते .. [गझल]


दु:खात त्यास पाहुन काळीज आत जळते
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते

ती मेनका न येथे ना मी कुणी ऋषीही
भीती मनास माझ्या का नेहमीच छळते

समजावतो मनाला अपुले न येथ कोणी
आशा परी मनाची सगळीकडेच पळते

 झाकावयास अंगा घे आवरून पदरा
जाईल तोल माझा मन त्याकडेच वळते

दंगे समोर होता बघती निवांत सारे
माणूसकी मनाची तेथून दूर टळते


.

आली लहर


ती बिचारी सारखी ह्या कुशीवरून त्या कुशीवर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होती.


पण छे !
निद्रादेवी प्रसन्न होण्याचे काही नावच घेत नव्हती .

अंथरुणावर पडल्या पडल्याच तिने आवाज दिला -
"अहो, तुमची ती कवितांची वही देता का मला जरा इकडे.
मला मेलीला झोपच येईना किती वेळ झालं ! "

तो खूष झाला आणि स्वत:शीच पुटपुटला -
"
नशीब उजाडलेलं दिसतय आपल्या वहीच रात्रीच्या भलत्याचवेळी ! चला, आपली कवितेची वही सत्कारणी लागणार तर आता एकदाची !"

त्याने आपले लेखन मधेच थांबवून,
कवितेची वही तिच्या हातात दिली.

त्याने हळुवारपणे विचारले-
"एकदम कशी काय लहर आली ग अशी रात्रीच,
माझ्या कविता वाचनाची ? "

ती उत्तरली-
"कविता वाचता वाचता तरी,
 मेली झोप येतेय का नाही, बघतेचना आता-
शेवटचा उपाय म्हणून ! "
.

लघुतमकथातो बाहेर घाईघाईत निघाला होता.


आपल्या दारासमोरच,

 "डावीकडच्या शेजाऱ्या"चा केरकचरा

फिरतफिरत आलेला पाहून,

त्याचेही डोके फिरले.तो पुटपुटला - 

"किती निगरगट्टआणि निर्लज्ज लोक आहेत हे !

आपल्या 

घरातला केरकचरा दुसऱ्याच्या दारात ढकलताना,

काहीच कसे वाटत नाही ह्यांना !"आधीच उशीर झालेला..

रागारागाने इकडेतिकडे पहात-

त्याने तो केरकचरा...


"उजवीकडच्या शेजाऱ्या"च्या दारात ढकलला.

.

' लोका सांगे ..! '


कायदा तोडणाऱ्यांचे नेहमी वाभाडे मी काढत असतो
तंबाखूच्या तोबऱ्याची रस्त्यात पिचकारी मारत हसतो ..

घरासमोरची घाण काढायला मी कधी तयार नसतो
देशात होणाऱ्या कचऱ्याची आधीच उठाठेव करत बसतो ..

शेजाऱ्याचे क्षेमकुशल चुकूनही मी विचारत नसतो
पाक-इंडिया प्रेसिडेंटच्या भेटीची काळजी करत बसतो ..

देवळातल्या देवदर्शनाचे कष्ट कधीच घेत नसतो
देव जगात आहे सांगत तावातावाने गर्जत बसतो ..

उघड्यानागड्या नट्यांची चित्रे गुपचूप निरखत बसतो
अश्लीलतेविरुद्ध सोसायटीत जोरदार व्याख्यान देत असतो  ..

पाच मिनिटांच्या अंतरावरही बाईकशिवाय जात नाही
पेट्रोलवाढीवरच्या चर्चेत भाग घेतल्याशिवाय रहात नाही ..

भ्रष्टाचाराविरुद्ध सभेत नेहमीच जोरात कोकलत असतो
शंभर रुपये एजंटला देऊन घरपोच लायसन मागवत असतो ..

माझ्यामधलेच दोष जाणून मी कधीच सुधारणार नाही
तुमच्यामधले दोष जगजाहीर केल्याशिवाय राहणार नाही ..
.

.

आधी वंदू फेसबुका


सकाळी सकाळीच बायकोला विचारले-
" कुठे निघालीस इतक्या सक्काळीच ?
काही आणायचे आहे का ?
मी आणून देतो ना ! "

एखाद्या अडाणी माणसाकडे पहावे,
तसे माझ्याकडे पहात पहात,

 ती उत्तरली-
" अहो, आज अंगारकी चतुर्थी नाही का ?
स्नान झाल्याबरोबर, 

आधी फेस्बुकात सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देऊन झाल्यायत !
निवांतपणे आता निघालेय ,

गणपतीच्या देवळात दर्शनाला. ."
.

पाहू रे किती वाट -


तुझ्या अस्तित्वासाठी,
मी मागे राहून
तुला मोठे केले-
मला काही त्याचे श्रेय नकोच आहे ..

वेळात वेळ काढून
तुझ्या मोठेपणासाठी
माझ्या हाडाची काडे केली पोरा,

माझी तहानभूक विसरून
तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था
करण्यात जगात राहिलो
जगतही राहिलो की रे ..

आज त्या दूर देशात
तुला इथूनच पाहताना
डोळ्यातला आनंदाश्रू
आवरू शकत नाहीच -

तिकडे गेल्यावर नुसतीच
"येतो येतो"ची हूल देतोस -
आता आमच्याशी
दोन शब्द बोलायला
तुला वेळ मिळत नाही
फुरसत होत नाही.. समजले बरे !

दोनाचे चार तिकडे केलेस
चाराचे सहा पण झाले -
आता इकडे डोकावायला
वेळ तुला कसा मिळेल पोरा..

जगाची रीतच आहे
भुतानी शिते
असेतोवारच जमायचे.....

तूही त्याला अपवाद ठरला नाहीस -
जमलेच तर
अखेरचे भेटून जा !

नाहीतर आहेच,
शेवटी
तो दर्भाचा कावळा तयार
मला शिवायला !!!
.

मनाच्या गावात -


मनाच्या गावात
गेलो मी फिरत
गाठीभेटीसाठी
होतो मी झुरत ..

दु:खाचे ते चौक
ओळखीचे हसले
सुखाचे ते रस्ते 
विचित्र भासले ..

काही नातेवाईक
 अनोळखी झाले 
थोड्या ओळखीचे
आपलेसे झाले ..


जुन्या आठवणी
किती आनंदल्या
काही स्वत:शीच
 जरा फुरंगटल्या ..

वेदनांचा होता
भोवताली पिंगा
मोह द्वेष वदले
दाखवू का इंगा ..

- का नाही वाटत  
पुन्हा गावी जावे
मनाच्या गावात 
स्वच्छंद फिरावे . . .

.

' लहरी पावसा- '


असा कसा लहरी तू पावसा
अगदी लहरी तिच्यासारखा
कधीही येशी जाशी कधीही
सहवासाला मधेच पारखा ..

येशील वाटत असतो तेव्हा
दांडी मारशी कशी अचानक
थांबशील वाटते मला जर
कोसळशी तू किती भयानक ..

भिजून जाईन म्हणतो जेव्हा
मिठीत घेण्या तिजला आतुर
थेंब थेंब तू कसा टपकशी
थाप मारतो थातूर मातुर ..

वाट पाहतो तुझीच तेव्हा
सोबत असते सखी ती माझी
नसते जेव्हा ती मम सोबत
दाणादाण उडवशी माझी ..

ध्यानी ठेव तू बरे पावसा
ती येताना तू ये बरसत
ती भिजता क्षणभरही येथे
नकोस राहू तू रेंगाळत . .

.

महाराज..महाराज....महाराज ....


मला स्वत:ला देव आहे की नाही, ते अजूनपर्यंततरी माहित झाले नाही !

पण पेपर, मासिके, नियतकालिके, विशेषांक वगैरेंचे वाचन केल्यावर असे दिसून आले की-
देशात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात किंवा गल्लीत आणि घरात देवाच्या "अवतारात"ल्या एखाद्या "महाराजा"चा फोटो किंवा वावर आहेच !

कुठल्याही "महाराजा"बद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा आकर्षण नाही. आवर्जून पाया पडायला जावे, असे कुठल्याही महाराजाविषयी आजपर्यंत वाटलेले नाही.

त्या राष्ट्रसंतांबद्दल मात्र अतीव आदर वाटतो. ज्यांनी हातात झाडू घेऊन, रस्त्यावरच्या गोरगरीब जनतेत मिसळून, मनापासून सुधारणा करायचा प्रयत्न केला. माणसा-माणसातच देव कसा दडला आहे, हे तळमळीने सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्या कर्तव्यातच कसा देव आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला.... तेही उच्चासनावर गादीवर बसून नुसता मुखोपदेश न करता !

"आधी केले , मग सांगितले " ह्यामुळे त्या संतांबद्दल खूपकाही चांगलेसे मनात वाटत राहते . जे शहाणे आहेत त्यांनाच उपदेश करण्यात काय शहाणपणा ते मला कळत नाही, पण अडाण्यांना, निरक्षरांना शहाणे करण्यात खरी समाजसेवा, खरे समाजप्रबोधन नाही काय ?

जवळजवळ सर्वच तथाकथित महाराजांनी काही ना काहीतरी "चमत्कार" केलेले आहेत....वाचले आहेत. पण समाजात वावरून, मिळून मिसळून, गोरगरिबांसाठी काही केल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. गरीब भक्ताने हतबल झाल्यावर, अगतिक झाल्यावर त्याला शरण जायचे आणि मग त्याने भस्म विभूती गंडादोरा ताईत राख अंगारा असले काहीतरी देऊन भ्रमात वाटेला लावायचे ! आणि मग भक्तानेही त्याची आरती गात, त्याला ओवाळत धन्य धन्य मानून घ्यायचे ! विशेष म्हणजे कालांतराने दु:ख पुन्हा हजर आहेच घरात... ते मात्र महाराजाच्या मानसिक दडपणाने, भीतीने कुणी सांगतच नाही - हे जास्त घातक नाही का !

घरात बसूनच महाराजाची आळवणी केल्यामुळे, कुणाचा ताप उतरला एका रात्रीत, कुणाचा दुर्धर रोग ऑपरेशनआधीच गायब... असले प्रकारही वाचनात आले. महाराजावर इतका डोळे झाकून विश्वास ठेवावा म्हटले तर, ह्या विज्ञानयुगातल्या ज्ञानी आणि कार्यकुशल शल्यचिकीत्सकावर अविश्वास दाखवल्यासारखेच नाही का हो ?

महाराजापासून चार हात दूर आहे, कदाचित त्यामुळे मनात गोंधळ नाही . कठीण प्रसंगी कुणाच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायची गरजही आजवर पडलेली नाही.

घरातल्या उत्तम संस्कारामुळे चांगले बोलणे, वागणे आणि राहणे यात छान वेळ जातोय. आरोग्याविषयी तक्रार आल्यास कुठल्याही महाराजाला शरण जाण्याऐवजी, मी आवर्जून डॉक्टर कडेच आधी जातो. अडीअडचणीला मित्रांचा सल्ला, मदत घेतो आणि सुखात जगतो !

जे मनात आले, ते तुम्हाला सांगावे वाटले.
एखाद्या वेळेस- कधीतरी ,

तुमच्याही मनात असेच विचार आले असतील, कोण जाणे !

.

'दोन शब्दां'ची जादू


समोरचा रस्ता एकटा
नाकासमोर पहात मी चाललेला एकटा
मनात विचार चाललेला भलभलता..

अचानक तू समोर
मी पहातच राहिलेलो
भांबावलेलो..

कुतूहलमिश्रित माझी नजर
माझ्या मनात आत्महत्येचा विचार..

तुझी तयारीही तशीच काहीशी वाटलेली
दोन शब्द बोलावेसे वाटले-

मी उद्गारलो .. 'कशासाठी- इथे'

तू पुटपुटलीस .. 'कुणास ठाऊक !'

एकमेकांना  "दोन शब्द"  बोलून झाले,
'शेवटच्या गप्पा मारून घेऊ-' म्हटले

गप्पा मारता मारता
समोरचा रस्ता -
आपल्या दोघांचा कधी झाला..

तुलाही कळले नाही..
मला कळले तेव्हा -

आपले दोघांचे हात
एकमेकांच्या हातात गुंफून-
चालतच होतो !


.

"हग डे "

आजचा "विशेष डे" आला ध्यानी
योगायोगाने एकदम दोघांच्याहि मनी ..

तो खाली धावला सुसाट जिन्यावरुनी
ती सुटली पळतपळत वर जिन्यातुनी ..

दोघही एकमेकांच्या "मिठी"त आली
तोल जाऊन पायरीवर धडपडली -

त्याचा पाय गेला प्लास्टरच्या मिठीत
सापडले तिचे हात बँडेजच्या गाठीत . .
.

सुख


परदेशस्थित

बेचैन मुलाच्या मालकीच्या

भारतातल्या चार बेडरूमच्या

प्रशस्त "रिकाम्या" फ्ल्याटकडे

मी हळूच नजर टाकतो ....

आणि -

माझ्या पाणावलेल्या डोळ्यांपुढे

उगाचच उभा राहतो ;

तो लहानपणचा -

खेड्यामधला -

आते-मामे-चुलत-मावस भावंडानी

"गजबजलेला" माझा वाडा . .

.

तुझा नि माझा एकपणा -


तुझ्या संवादिनीत उमटती
सूर माझ्या मनातले 

तुझ्या सतारीतून निघती
स्वर माझ्या विचारांचे 

तुझ्या तबल्याच्या थापात
धडधड माझ्या हृदयाची 

तुझ्या बासरीच्याही सुरात
धून रे माझ्या जगण्याची 

तुझ्या गिटारीत लहरतात
कंपने माझी सुखदु:खाची 

मी म्हणजे तू- तू म्हणजे मी
सुरावट ना विसरायाची

जीव तुझा वाद्यात जरी रे
जरुरी माझ्या प्राणवायूची .. !
.

मुलुखमैदान तोफ


मित्राने विजापुरातले निरनिराळे प्रेक्षणीय फोटो दाखवायला सुरुवात केली होती.

बारा कमानी, उपली बुरूज, गोलघुमट वगैरे वगैरे ..

शेवटी गाडी त्या सुप्रसिद्ध मुलुखमैदान तोफेच्या फोटोपर्यंत पोहोचली.

तो फोटो कौतुकाने दाखवत मित्र म्हणाला-

 " हीच ती जगप्रसिद्ध मुलुखमैदान तोफ ! "

मी उत्तरलो -
" अरे वा ! हीच का ती 'जगप्रसिद्ध' मुलुखमैदान तोफ ?
मला इतके दिवस,
आमची 'गृहप्रसिध्द'च ठाऊक होती ! "
.

जगण्याची कला


"जगण्याची कला -"
हिचे महत्व पटवणारा एक मित्र भेटला.

त्याच्या हातात एक माहितीपत्रक होते.

माझ्यापुढे ते धरून तो म्हणाला -

 "वाच आणि हे भरून दे."

मी शीर्षक पाहिले .... "सुखाचे सर्वेक्षण " अशा अर्थाचे होते.

मी शांतपणे त्याला म्हणालो- 

" ह्यात मला काहीही स्वारस्य नाही. 
जगण्याची कला मला ज्ञात आहे.
सुखाच्या शोधात मला फिरायचे नाही. 

मला ते घरात, पै-पाहुण्यांच्या आदरातिथ्यात, 
मुलाबाळात रमण्यात, मी जपत असलेल्या छंदात,
 मित्रमंडळ जपण्यात कधीच गवसलेले आहे ! "

माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच...
त्याने माझ्या हातून ते माहितीपत्रक जवळजवळ हिसकावूनच घेतले .

तो किंचित चिडूनच मला म्हणाला - 

" तुला भरायचे नसले तर नकोस भरू ."

" जगण्याची कला" पटवणारा कार्यकर्ता -
..... एका क्षुल्लकशा गोष्टीवर चिडताना पाहून,
मी तर आणखी मोकळेपणाने हातपाय पसरून बसलो !
.

'आंदोलन-'


येत्या रविवारी

बायको घरी (म्हणे-)
आंदोलन करणार..

"काम रोको"
"ग्यास बंद"
"जेवण बंद.."

बायकोला
कळत नाही-

नुकसान कुणाचे होणार.. !

मी खुश्शाल
बाहेर जणार, चहा पिणार,
जेवणही करणार..

स्वत:च्याच घरात
आंदोलन ती करणार -

त्रास स्वत:लाच करून घेणार..

आपल्याच पायावर
आपणच धोंडा पाडणार,
देव जाणे- तिला कधी कळणार . . !

सारे काही अलगद -

बागेत
बाकड्यावर बसून..
तिचा हात त्याने
अलगद
आपल्या हातात घेतला..
प्रेमभराने कुरवाळला ,
आणि हळूच
आपल्या खिशातून
भलेमोठ्ठे चॉकलेट काढले..
शुभेच्छेसह
तिच्यापुढे धरले.....

तिने ते चॉकलेट
आपल्या नाजूक बोटात..
त्याच्या हातातून
अलगद
प्रेमभराने पकडले..

वरचा कागद काढला -
मागच्यामागे फेकला..

डोळ्यात डोळे घालून
चॉकलेटची चव -
दोघांच्या जिभेवर रेंगाळली..

मागे पडलेला कागद.......
त्या गरीब पोराने
त्यांच्या नकळत
उचलला..
अलगदच !

चॉकलेटच्या कागदाचा
मंदमधुर सुवास
नाकात दीर्घसा -
हळुवारपणे हुंगला . . .

त्यानेही
चॉकलेट डे
साजरा केला !


.

राजस्थान ट्रीप


१)   आज दुपारी राजस्थानातील दिलवाडामधील "देलवाडा जैन श्वेतांबर मंदिर" पाहिले.
"तेजोमहाला"पेक्षा अप्रतिम, मनोहारी, नेत्रसुखद, अनुपम अशी भिँतीवरची, खांबावरची आणि छतावरची संगमरवरातली अवर्णनीय कोरीव नक्षीची कारागिरी पाहून थक्क झालो !

दुर्दैवाने कॅमेरा आणि मोबाईल मंदिरात नेऊ शकलो नाही . . !
( २१-०१-२०१४ )

.


२)   राजस्थानातील चालू पर्यटन दौ-यात पुष्कर गावाजवळच तीनचारशे पाय-या चढून, अर्जुनबाबाच्या प्रसन्न समाधीदर्शनप्रसंगी...
एका बाजूला काही वाद्ये दिसली. त्यात बाजाची पेटी दिसली ! का कुणास ठाऊक, पण मनात ती वाजवण्याची प्रबळ तीव्र जबरदस्त इच्छा झाली. शेवटी पुजा-याला भीत भीत विचारून, ती पेटी हाताळण्याची परवानगी घेतलीच ! 
मग पंधरा मिनिटे माझी अशी काही वादनसमाधी लागली, की बस्स !
ओम नमः शिवाय, दरशन देरे दे रे भगवंता, पायोजी मैने रामरतन धन पायो, मला हे दत्तगुरू दिसले . . 
ब-याच कालावधीनंतर मी स्वतःशीच देवाचिये द्वारी पेटीवादनाचा आनंद मनसोक्त लुटला !

पुजारीबाबाचे मनोमन आभार मानले. त्याच्याकडून
पेरू आणि बोरांचा प्रसाद घेऊन परतलो... 

एका वेगळ्याच समाधानात !

.

३)     "उंदीर मंदीर -"

इकडून उंदीर
तिकडून उंदीर 
वरून उंदीर 
खालून उंदीर 
बघावे तिकडे
उंदीरच उंदीर 
चपळ उंदीर 
सुस्त उंदीर
तुरुतुरु धावणारे उंदीर
गलेलठ्ठ उंदीर
मरतुकडे उंदीर . .

बाप रे !

अग आई ग !

आश्चर्योदगार...
भीतीयुक्त चीत्कार...

..... माणसांच्या, पशुपक्ष्यांच्या पायावरून, पायाखालून, समोरून, सुखेनैव, बिनधास्त वावरणारे, बागडणारे-
दहावीस नाही, पाचपन्नास नाही, शेकडो नाही, तर अक्षरशः हजारो उंदीर डोळ्यांसमोर दिसताना, आपण अगदी आपल्या तोंडात उंदीर घालून... सॉरी, बोट घालून थक्क होतो, अवाक होतो हो !

राजस्थानातल्या बीकानेर शहरापासून 35किमी अंतरावर असलेल्या, देशनोक नावाच्या गावातील, करणी माता या नावाने प्रसिद्ध देवीच्या देवळात काल पाहिलेल्या उंदरांचे हे वर मी लिहिलेले वर्णन आहे . 
कुणाचीही, कसलीही भीती, तमा न बाळगता ते उंदीर हिँडताना दिसत होते. त्यांच्याऐवजी, देवळात त्यांना पहायला येणारे काही लोकच बावचळून भितीने सैरावरा धावत होते ! 
देवळात भक्तानी निरनिराळ्या ठिकाणी परातीत ओतलेले
दूध ते उंदरांचे थवे, घोळके निर्भीडपणे तोंडाने चुटूचुटू पिताना पाहून खूपच मजा वाटत होती !
अशाप्रकारचे "उंदीर मंदीर" दुसरीकडे, माझ्यातरी पाहण्यात अद्याप आलेले नाही !

.  

४)    माऊंट अबू, अजमेर, पुष्कर, जयपूर (पिंक सिटी), सारिस्का अभयारण्य, बीकानेर, जैसलमेर(यलो सिटी), जोधपूर(ब्ल्यू सिटी) अशी प्रसिध्द शहरे पालथी घालून -
आमची १५ दिवसांची राजस्थानची ट्रीप एकदाची संपली.
"पधारो हमारो देस" असे काहीसे गात गात, डोक्यावरची राजस्थानी रंगबिरंगी पगडी उतरवून, आम्ही पुन्हा पक्की पुणेरी लालभडक पगडी चढवायला सज्ज जाहलो !

डोळे भरून त्या त्या शहरातली खरेदीस्थळे, कौतुकस्थळे, किल्ले, संग्रहालये, सरोवरे, बगीचे, महाराजांचे संगमरवरी/दगडी महाल, स्मशानभूमीतल्या संगमरवरी समाध्या याची देही याची डोळा जिवंतपणी डोळे भरून पाहिल्या !

वेळीअवेळी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी, आमच्या "फोटो काढण्यालायक चेहऱ्यांच्या छब्या " जमेल तिथे जमेल तशा, मोबाईल आणि क्यामेऱ्यात बंदिस्त केल्या. 

सकाळी नऊला हॉटेलातून निघताना (आधीच पैसे दिलेला फुकटचा-) 'कॉम्पलीमेंटरी नाश्ता' यथेच्छ हादडून, तीन वाजता भरपेट जेवण करत होतो. ( राजस्थानी थाळी, दाल बाटी चुर्मा वगैरे ).

संध्याकाळी "मॉर्निंग वॉक"साठी बायकांच्या शॉपिंगच्या निमित्ताने, आम्ही "प्रेक्षणीय स्थळे" पहात पहात, रात्री नऊला हलकासा आहार घेत होतो. 

आम्हा नवरेमंडळींची पैशांची पाकिटे जसजशी रिकामी होत होती, तसतशी बायकामंडळीची खरेदीची पिशवी फुगण्याचा "चमत्कार" हताशपणे पहात रहात होतो !

गाईडकडून जोधपूरच्या महाराजा तकतसिंहाच्या तब्बल तीस राण्यांचे कौतुक ऐकले...
आणि आपापल्या एकुलत्याएका "राणी"ला सांभाळता सांभाळता, दमछाक होणाऱ्या आमच्या "हैराणी"ने आम्हा नवरेमंडळींचे डोळे पाणावले की हो !

राजस्थानात सर्वकाही मनसोक्त पाहून झाले.
"उंटावरचे शहाणे" झालो. 
उघड्या जीपमधून डेझर्ट सफारी फेरी मारली.
बायकामंडळीनी कौतुकभरल्या नजरेने 'रिफ्यूजी' सिनेमात शूट केलेली, करीना कपूरने पाणी काढलेली विहीर पाणी...सॉरी... डोळे भरून पाहिली. 

सारिस्का अभयारण्यात एकूण नऊ "वाघ" हिंडत असल्याची,
पक्की खबरबातमी आम्हाला लागलेली होती....
पण आम्ही येणार असल्याची कुणकुण-
बहुधा त्या समस्त वाघमंडळीना आधीच लागलेली असल्याने , एकही बहाद्दर वाघ आम्हाला सामोरा आला नाही !
.

दोन चारोळ्या --


सावधान -

जर दोषच शोधत बसाल 
मित्रांच्या स्वभावातला..
तर लागणार नाही वेळ
शत्रूंची पैदास व्हायला !
.

दोन ध्रुव -

जंगलात वाढलेला वटवृक्ष मी 
दिवाणखान्यातली बोन्साय तू - 
कशी जमावी आपली कुंडली 
मी वळू माजरा गरीब गाय तू ..
.

आजकाल ...


आजकाल.....

भिंतीवर घड्याळ नसते 
अचानक / कधीतरी वेळ पाहण्यासाठी

भिंतीवर क्यालेंडर नसते 
तारीख / वार / तिथी पाहण्यासाठी 

भिंतीवर आदरणीय नेता नसतो 
घरात प्रवेशल्यावर स्वागतासाठी 

भिंतीवर देवाचा / देवीचा फोटो नसतो 
मस्तक झुकवून वंदन करण्यासाठी 

भिंतीवर सुविचार टांगलेला / लिहिलेला नसतो 
गृहस्थाचे  मन वाचण्यासाठी 

खिळा ठोकलेला नसतो 
माणसापेक्षा पॉश भिंतीला जपण्यासाठी  

कोनाडा भिंतीत नसतो
सांजदिवा मिणमिणण्यासाठी ! 


 आजकाल......

घराला भिंती असतात 
कोऱ्याकरकरीत अंत:करणासाठी 

घरोघरी दिसते ती फक्त
टीव्ही / कॉम्प्युटर / फेस्बुकाचीच भिंत 

भिंत असते फक्त 
घरात डोके आपटण्यासाठी 

चार भिंतींच्या घरात 
ना कुणी बोलण्यासाठी, ना स्वागतासाठी  

भिंतीबाहेरच पाहुणा 
ताटकळणार आदरातिथ्यासाठी  .... 

.

"आभाळ फाटले ... "


"आभाळ फाटले ... "
गरीबाच्या झोपडीत 
कुणीतरी आक्रंदले -

त्या फाटलेल्या 
आभाळाला झाकण्याइतके 
कापड आणावे 
तरी कोठून -
अंगावरची लाज 
झाकण्याइतके - 
जिथे कापड नाही !

"आभाळ फाटले..."
श्रीमंताच्या बंगल्यातून
कुणीतरी रडले...

तिथे फाटक्या 
आभाळाला शिवायला,
आभाळाला पुरून उरेल... 
इतके कापड आहे !

पण -
साधा सुईदोरादेखील 
वेळेवर शोधायला... 
इतर कुणी धावणारे नाही !
.