महाशिवरात्रीचा महाउपवास


मित्राच्या हातात गच्च भरलेल्या दोनतीन पिशव्या दिसल्या .
सामोरा आल्यामुळे अर्थातच मी हटकले -
" बरेच ओझे वाहतोयस रे आज ? "

पिशव्या खाली टेकवत, मित्राने खिशातला रुमाल काढला .
थंडगार वारा वाहात असतानाही,
कपाळावर साठत चाललेला घाम पुसत,
तो मलाच विचारू लागला-
" अरे तुला माहीतच नाही की काय ?
उद्या महाशिवरात्र आहे ना ? "

मी उलट विचारले-
" महाशिवरात्रीचा आणि ह्या ओझ्याचा संबंध आहे का काही ? "

माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहात तो उद्गारला -
" म्हणजे, उद्या उपास नाहीत का करणार तुम्ही ?
मला तर आज बायकोने अगदी बजावून,
सफरचंद, डाळिंब, चिक्कू, द्राक्षे, अंजीर, केळी ही उपासाची फळे-
सोबत खजूर, वेफर्स, शेंगा-राजगिरा लाडू, चिक्कीही आणायला सांगितली आहे.
शिवाय- साबुदाणा, भगर, शिंगाड्याचे पीठ उपासाच्या पदार्थासाठी,
बटाटे, रताळी, काकडीपण लागणारच ना-
काहीतरी तोंडी लावणे करण्यासाठी ..! "

त्यांची "उपासाची अशी जय्यत तयारी" पाहून
"अरेच्चा ! मी विसरलोच होतो की !"
- असे म्हणत मी त्याचा " ह्यापी महाशिवरात्री " म्हणत निरोप घेतला ...

का कुणास ठाऊक,
पण माझे जेवण होण्याआधीच-
मला एक लांबलचक ढेकर आली ब्वा !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा