कल्पना करा- तुम्ही एका महत्वाच्या मिटिंगमधे दहा लोक जमलेले आहात ! त्या मिटिंगमध्ये महत्वाच्या गहन प्रश्नावर चर्चा चालली आहे. वातावरण चांगलेच तंग झालेले आहे. तरीपण चहापोह्यांच्या बशांकडे मात्र कुणाचे दुर्लक्ष झालेले नाही. एखादा वक्ता अगदी तावातावाने हातवारे करीत, त्याचा मुद्दा प्रस्थापित करत आहे... अशावेळीच त्या महासिरीयस वातावरणात, एका कोपऱ्यातून " खीक खीक .." करून हास्याची एक लकेर ऐकू आली तर - !!!
सांगतो, सगळकांही आता सविस्तर सांगतो -
तो "हास्य-लकेर-कर्ता" मीच बरे का ! त्या दहाजणांत मीही होतो !
आमचे चहापान चालू असताना, सहज माझी नजर चहा पिणाऱ्या एका सभासदाकडे गेली --- अन् घोड्याने तिथेच पेंड खाल्ली म्हणा किंवा तिथेच माशी शिंकली म्हणा -
तो चहा पिणारा सभासद अंगयष्टीने तसा किरकोळच, पण त्याच्या "मिशा" मात्र मोठया रुबाबदार होत्या !चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर 'फुरर्र फुर्र 'आवाज करत तो चहा पीत होता ! सवय असेल म्हणा त्याला तशीच ! एखाद्या रंगाऱ्याने आपल्या डब्यातून बुचकळून काढलेल्या रंगातल्या ब्रशाप्रमाणे, चहाचे तुषार त्याच्या मिशाभोवती उडत होते ! ते गमतीदार दृष्य पाहूनच मला हसू आवरेनासे झाले आणि माझ्या तोंडून उपरीर्निर्दिष्ट हास्याची लकेर नकळत उमटली होती !
खरेतर मी तसे करायला नको होते, हेही मला कळत होते ..
तरीपण मी न राहवल्याने त्या व्यक्तीकडे हात दाखवून हसत सुटलो झालं ! बाकीचेही मग त्या "चहामय मिशां"कडे पहात, हसत सुटले ...
आम्ही सगळे हसताना पाहून ती किरकोळ व्यक्तीही (-कारण न कळता देखील !) आमच्या हसण्यात सामील झाली !
तर हास्याची साथ, लागण अशी असते !
हसावे किती, हसावे कुठे, हसावे कधी आणि हसावे कसे- याबद्दल सर्वसामान्य संकेत, शिष्टाचार पाळले जातातच ! पण नियम म्हटले की अपवाद आलेच ना !
निदान माझे तरी असे मत आहे की, "हास्या"ला कुणी कधी कसली बंधने ठेवूच नयेत ! अहो, "हास्याविना जीवन " म्हणजे पैशाविना बँक किंवा दौऱ्याविना नगरसेवक किंवा मंत्री ! हसताय कशाला - जुन्याच शिळ्या उपमा आहेत ह्या !
मनुष्याच्या जीवनाची बाग हास्याच्या विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेली असावी !
खुदकन हसणे, लाडीकपणे हसणे, हास्याचा धबधबा, सातमजली हास्य- हे सारे प्रकार म्हणजे जीवनाच्या सर्कशीतल्या कसरतीच होत ! मिशीतल्या मिशीत हास्य, मिस्कील हास्य, 'दया टाळी 'असे म्हणण्यापूर्वीचे हास्य- हे सारे प्रकार, म्हणजे जीवनाच्या मखमली गालीचावरून अलगदपणे टाकलेली पावले !
असेही काही प्रसंग असतात, जिथे हसणे वर्ज्यच असते ! श्रद्धांजली वाहणे- हा त्यापैकी एक प्रसंग ! पण काही महाभाग असे निघतात की, अशाही प्रसंगी ते हास्याची खसखस पिकवतातच ! ( बिचारा मृतात्मा ! आयुष्यात अशावेळी प्रथमच मन:पूर्वक तो वरती पडून रडत असेल- असली अवकाळी हास्याची खसखस पिकलेली पाहून !)
हास्याने आयुष्य वाढते, असे म्हणतात ! खरे असेलही कदाचित ते ! परंतु हसणारा मनुष्य नेहमी आरोग्याच्या बाबतीत सदासुखी नक्कीच असणार, अशी माझी खात्री आहे !
मानसिक चिंता, नसत्या काळज्या, प्रासंगिक तणाव- ह्या सर्वावर प्रभावी , हमखास, गुणकारी . रामबाण औषध म्हणजे "हास्य" ! एका हसणाऱ्यामागे दहा हसणारे येतील , पण एका चिंतातूर जन्तूबरोबर कुणीही आलेला दिसणार नाही !
" हसा नि लठ्ठ व्हा " - या म्हणण्यामागे निकोप दृष्टी नसणार ! लठ्ठ माणूस हसताना, मला कधी दिसलाच नाही आजपर्यंत ! कारण हास्य देखील त्याला बोजड वाटत असणारच ना ! एक मात्र खरे की, लठ्ठ तुन्दिलतनु माणसे इतरांना हसायला मात्र खूप संधी देत असतात ! काटकुळी माणसे अगदी जबडा आ वासून हसताना दिसतात !
एक तत्व मी नेहमीच पाळत आलो आहे- हसू आले की हसावे ! "हसावे कसे- ?" या विषयावर एखादा श्रोता मन लावून दाद देत असेल, तर मी त्याला त्या विषयावरील भाषणाची मख्खीच समजली नाही, असे समजेन ! " आपण कसे हसावे ? " - हे दुसऱ्याने कशाला सांगायला हवे हो ? साध सोप सरळ सूत्र आहे- 'जसे जमेल तसे हसा !' तेच खरे नैसर्गिक हास्य ! तेच खरे आरोग्य-लाभदायक टॉनिक !
हसण्याचे (-आणि दात दाखवण्याचे) अनेक प्रकार आहेत. 'विनोद'निर्मित हास्य- यात अनेक शब्दप्रभूंनी, शब्द्शायरांनी उलथापालथ केली आहे. त्यात आणखी मी कडमडणे अप्रस्तुत, अयोग्यच ! एक गोष्ट निश्चितच की, "हास्य आणि विनोद" नेहमी हातात हात घालून मिरवत असतात !
'विनोदी जाहिराती वाचून येणारे हसू, तथाकथित विनोदी मुखपृष्ठ पाहून 'होणारे' हासू, पाठीवर थाप मारून गडगडाट करणारे हासू - हे सगळे हसण्याचे 'नमुने' आहेत ! ' छद्मी हास्य' हा त्यावरील 'कळस' !
काही महाभागांना "नक्की कसे आणि कधी हसावे-" तेही न कळल्यामुळे देखील हसू येते ! सर्वजण हसून शांत झाले की, अचानक काहीना हसण्याचा कंठ फुटतो ! हे सारे हसण्याचे 'चमत्कारिक' प्रकार ! 'खीक खीक' करून हसणारे किंवा प्रत्येक वाक्याची सुरुवात आणि शेवट 'हा हा हा 'च्या गडगडाटाने करणारे महाभाग - हे इतरांना निष्कारण पेचात टाकतात आणि आपलेच हसू करून घेतात ! कारण ते नक्की कशासाठी हसत होते , हे तुम्ही त्यांना विचारू शकणार नाहीत आणि समजा विचारलेच तरी त्यांना ते सांगता येणार नाही - त्यामुळे पुन्हा नुसतीच 'खीक खीक' किंवा नुसताच 'हा हा हा' ऐकायला मिळणार !
खलनायकाचे "विकट हास्य" हा हास्याचा सर्वात शोककारक प्रसंग ! कारण ह्या एकमेव हास्यालाच कुठेही कसलीही कुणीही कधीही दाद देत नाही ! कदाचित 'निर्मळ' वा 'निर्भेळ' हास्याचे अजीर्ण होऊ देऊ नये, म्हणूनच खलनायकाच्या 'विकट हास्या'चा अवतार झाला असावा !
एखाद्याचे स्मित हास्य किंवा भोळेभाबडे आकृत्रीम हास्य किती मोहून टाकते ना आपल्याला - जणूकाही भर उन्हाळ्यात गारगार हवेचा अंगावर आलेला फवारा !
तात्पर्य काय - " हसावे कसे ....? "
तर जेणेकरून कपाळावरची आठी नाहीशी होईल- असे !
.
SUREKH!
उत्तर द्याहटवाजयंतराव,
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल आभार !