"प्रसिद्धी" ही मनुष्याची आवडती गोष्ट आहे. कारण प्रसिद्धीमुळे त्याची स्तुती होते, तो प्रकाश झोतात येतो. येन केन प्रकारेण प्रसिद्धी मिळवणे, हा मनुष्याचा स्वभावधर्म बनला आहे ! ' नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' - असे आपण म्हणतो खरे,पण अनियमितपणे पडणाऱ्या पावसालाच
जास्त प्रसिद्धी मिळत नसते काय !
प्रसिद्धी पावणार्यात प्रथम असतात ती पुढारी मंडळी ! सत्कार समारंभ, उद्घाटन समारंभ अथवा श्रद्धांजली प्रसंग वगैरे कार्यक्रमास पुढा-यांचीच प्रथम हजेरी असते. कुणालाही दु:खी, नाराज न करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते प्रसिद्ध होतात ! ते सदैव हसतमुख असतात. ' देव भावाचा जसा भुकेला ' असतो, तसाच किंबहुना थोडा जास्तच, पुढारी प्रसिद्धीचा तहानेला असतो ! आपल्या आजूबाजूला नेहमी 'ही' गर्दी-गराडा असला पाहिजे, आपल्याबद्द्ल पेपरात चार शब्द रोजच छापून आले पाहिजेत, वेळप्रसंगी (-आपल्यासारखेच) इतराना लाचार बनता आले पाहिजे, या गोष्टींवर त्यांचा कटाक्ष असतो. निवडणुकीत निवडून आले तर ते प्रसिद्धीची आशा धरतात आणि पडले तर विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रसिद्धी मिळवायला धडपडतातच !
काही सामान्य माणसे असामान्याचे शेपूट धरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. ' मी अमक्याचा हा, तमक्याचा हा ' अशी सदैव आपली टिमकी वाजवण्यात त्याना फुशारकी वाटते ! "करी लांगूलचालन जो दुजांचे, जडेल नाते प्रसिद्धीशी तयाचे"- असेच काहीसे त्याना वाटत असावे. महादेवामुळे नंदी, साहेबामुळे चपराशी, तसेच विजयी संघामुळे राखीव गडी - याना आपोआप प्रसिद्धी मिळत असते !
स्वत:च्या कार्याने प्रसिद्धी मिळणारे खरे कर्तृत्ववान ! असे लोक विरळच. गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी- असे तुरळक लोकच आढळतील, बाकी सगळे पुढारी छापच ! "गीतांजली"साठी नोबेल पारितोषिक मिळूनही प्रसिद्धी विन्मुख रहाणारे टागोरांसारखे असामी काहीही गाजावाजा न करता प्रसिद्धी पावून जनमनात मानाचे स्थान पटकावतात !
बंडू नावाचा माझा एक मित्र होता. अधून मधून त्याचे पत्र (- 'येथे मुतारीची कशी अवस्था आहे', 'येथे मुतारीची का आवश्यकता आहे', 'येथे विजेची सोय हवी' - टाईप ) स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याचे ध्येय "लेखक" म्हणून प्रसिद्ध होण्याचे होते ! काही अंशी त्याचे ध्येय साध्य झालेही ! कारण "दिल्ली"त नसला, तरी तो "गल्ली"त "पेपरात नाव छापून येणारा" म्हणून प्रसिद्ध झाला होता !
मनुष्याला प्रसिद्धी मिळवायला, तो स्वत: आणि इतर अनेक कारणे कारणीभूत होऊ शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर, लॉटरीचे देता येईल. काल "भिक्षाधीश" असलेला माणूस ह्या लॉटरीमुळे आज "लक्षाधीश" म्हणून प्रसिद्धी मिळवतो !
प्रसिद्धीमुळे माणसाला 'वर' मिळतो, तसाच 'शाप'ही मिळतो. प्रसिद्धी चिरकाल टिकते, तशीच क्षणभांगुरही दिसते. चौर्यकलेत मिळालेली कु-प्रसिद्धी चोराला चतुर्भुज करते ! काळ्याबाजारातल्या तिकीटविक्रीवरून सिनेमाला मिळालेली प्रसिद्धी काय चिरंजीव असू शकते ? नागाना खेळवण्यात प्रसिद्धी मिळवणारा गारुडी सर्पदंशामुळे मरतो. रणजीत शतक ठोकणारा किंवा दहाच्या दहा बळी मिळवणारा खेळाडू कसोटीत निष्प्राभ ठरतो, तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावरून भुईसपाट होताना बिचा-याला किती यातना होत असतील ! कालची लोकप्रिय नटी उद्या 'एक्स्ट्रा' म्हणूनही ओळखली जात नसते- हा प्रसिद्धीचा "शाप"च नाही काय ?
कपडे शिवण्याच्या खास शैलीमुळे एखादा टेलर प्रसिद्ध होतो. मुदलावर भरघोस व्याज देणारी संस्था प्रसिद्ध होते. वारंवार जाहिरातबाजीमुळे कंपन्या प्रसिद्ध होतात. प्रसिद्धी मिळवण्यास, काहीतरी अचाट कल्पना, अद्भुत नाविन्य, कल्पक चातुर्य, समयसूचक योजना मात्र आवश्यक असते !
एका तासात अमुक कप चहा पिणारा उच्चांक गाठतो, तर सतत अमुक दिवस अमुक तास सायकल चालवणाराही उच्चांक प्रस्थापित करतो. उच्चांकाबरोबर सत्कार, हारतुरे वगैरे मिळून "प्रसिद्धी" पदरात पडते !
सिनेमातल्या एखाद्या अभिनेत्याने नेहरूसदरा अथवा झब्बा घालून खाली हाफप्यांट चढवली तरी, असला मूर्खपणा फ्याशन ह्या गोंडस नावाखाली प्रसिद्धी मिळवेल ! काहीकाळ डोक्यावर केसाना तेल न लावणे, झिंज्या वाढवणे, गालावर कल्ले वाढवणे, ही फ्याशन रूढ झाली होतीच ! (ती कदाचित काटकसर म्हणून किंवा घरातील दारीद्र्यामुळे आली असावी ! )
" प्रसिद्धी मिळवण्याचे वेड " एकदा अंगात शिरले की, सगळा खेळखंडोबा झालाच म्हणून समजा ! आमच्या शेजारी एक तरूण मुलगी राहात होती. तिलाही बहुधा ही बाधा झाली असावी. सिनेमात एखादी नटी वेगळे काहीतरी करताना दिसली की, लगेच ही तरुणी अनुकरण करायची ! सायराबानूची अल्लड चाल ही मुलगी चालायला पहायची, पण शरीराचे आकारमान अस्ताव्यस्त असल्याने तिची चाल शेवटी टूणटूण ह्या नटीसमान बनली. त्यामुळे शेवटी ही मुलगी प्रति टूणटूण म्हणूनच प्रसिद्ध झाली ! लताचे एखादे नवीन गाणे रेडिओवर लागले की, ह्या मुलीचे कर्कश (-तिच्यामते सुमधुर ! ) केकाटणे सुरू होत असे !
प्रसिद्धी काही वेळा नको असतानाही चिकटतेच. मुलाखत घेणार्याला एखादी व्यक्ती बजावते- " माझे नाव कुठे प्रसिद्ध करू नका हं ! " तरीही ती व्यक्ती " प्रसिद्धीविन्मुख " म्हणून प्रसिद्ध होतेच !
प्रसिद्धी कुणालाही लाभते ! जन्मत:च दोन डोकी , तीन हात असलेले अर्भक नाही का प्रसिद्धी मिळवत ? डोके नसलेले पुढारीही असे प्रसिद्ध होतातच ना ! दहा खून पाडणारे दरोडेखोर कुप्रसिद्ध होतात तर, त्याना पकडणारे पोलीस सुप्रसिद्ध होतात !
प्रसिद्धी कोठेही मिळते. हुतात्मा बागेजवळची भेळपुरी प्रसिद्ध होते, तर सभागृहातील सदस्यांची आपापसातील मारामारी प्रसिद्धी मिळवतेच !
प्रसिद्धीवर मनुष्य जीवन जगतो ! प्रसिद्धी मिळाली, तर तो प्रगतीशील बनतो. तो आशावादी बनू शकतो. प्रसिद्धीचा कळस गाठण्यासाठी तो आयुष्यात कार्याचा पाया रचतो ! चारचौघात काहीतरी आपले वेगळेपण टिकवण्यासाठी तो जिद्दी बनतो. अंतराळविराना प्रसिद्धी मिळते, पण एखाद्या "गागारिन"ला आपले प्राण गमवावे लागतात!
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा