हायकू

१.

शब्द पाखरु
मनाच्या घरट्यात
फिरे वाह्यात ..
.

२.

मन तुरुंग
कल्पनेची भरारी
शब्द फरारी ..
.

आशावादावर पाणी

छे छे छे ..

दुपारच्या जमेल त्या कुक्षीतल्या स्वप्नांनी,

 मला भलतेच हैराण केलेय ब्वा !

काय तर म्हणे ...

आपले सगळे लोकप्रतिनिधी,
एकमताने वाढवून घेतलेले व यापुढेही मिळणारे,

 आपले सर्वच्यासर्व मानधन।वेतन,
आपल्या देशाची मान उंचावणा-या,
ऑलिंपिक पदक जिंकणा-या विजेत्यांना दान करणार !

... पण..
नतद्रष्ट बायकोने,
माझ्या स्वप्नातल्या खुळ्यासारख्या वाटणाऱ्या भोळ्या आशावादावर,
मला गदागदा हलवून जागे करत,
चक्क ग्लासातले पाणी पाडले की हो !
.

जेव्हा मनी सखीचा - [गझल]

जेव्हा मनी सखीचा माझ्या विचार करतो 
प्राजक्त अंगणी का तिकडे उगा हुरळतो

प्रेमास ऊत येता सगळेच गोड वाटे 
हसतेस गोड तूही मिरची जरी भरवतो

न्याहाळता न तुजला क्षण एक थांबुनीया 
शोधात चांदणीच्या वेड्यासमान फिरतो

सत्यातला भिकारी मी दास लक्षुमीचा
स्वामी तिन्ही जगाचा स्वप्नात होत रमतो

सुख देउनी चिमुटभर दु:खात बुडवशी तू 
आम्हास न्याय देवा ना तव अजब उमजतो ..
.

स्वातंत्र्यदिन

स्वैपाकघरातून खणखणीत आवाजात बायकोचा प्रश्न कानावर आदळला-
"अहो, ऐकलंत का ?"

मीही हॉलमधून ओरडूनच दणदणीत आवाजात प्रत्युत्तर देण्यासाठी, 
तोंड उघडणार होतो, पण "काही कारणा"ने तसे करणे अशक्यच होते. 
[ते कारण, सूज्ञ अनुभवी नवरेमंडळीच सहजपणे ओळखू शकतील !]

स्वैपाकघराच्या दारापर्यंत गेलो.
तिचे लाटण्याने कणिक तिंबणे चालू होते.

पुरेशा अंतरावरून उभ्याउभ्याच मी विचारले,
"काय ग, मला काही म्हणालीस काय ?"

बायको दाणकन लाटणे कणकीच्या गोळ्यावर आपटत उत्तरली,
"दुसरे कुणी आहे का आता घरात [-वस्सकन ओरडण्यासारखे ?] !
अहो, आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ना ?"

[मी मनात म्हटले- 'माझा कधी आहे कुणास ठाऊक, 
तुझ्या तावडीतून सुटण्याचा स्वातंत्र्यदिन ?' ]

तिला उत्तरादाखल नंदीबैलासारखी नुसतीच मान हलवली मी !

ती पुढे म्हणाली-
" आज काहीतरी गोड पक्वान्न नको का करायला मग ?"

[मी मनात म्हटले- 'तू नुसते गोड बोललीस तरी, 
मला एखादे पक्वान्न गिळल्याचा आनंद होतो ग माझे आई !']

"मग श्रीखंड जामून जिलेबी लाडू.... 
काय घेऊन येता ?" 
- तिने मला विचारले.

लग्नाच्या बेडीमुळे गेली ४३ वर्षे पारतंत्र्यात अडकून वावरणारा मी---
काय उत्तर देणार होतो हो बापुडा !

मी विचारले- "श्रीखंड जामून जिलेबी लाडू, काहीही आवडते मला. 
यातले तुला काय आवडते ते आणतो !"

त्यावर ती उत्तरली- " आज एवढा स्वातंत्र्यदिनाचा महत्वाचा दिवस. 
बासुंदीच आणावी म्हणते मी !"

देशात सर्वत्र साजरा होणाऱ्या या महत्वाच्या दिनी,
माझ्यातला बिच्चारा नवरा काय उलट बोलणार यावर ?

मुकाट्याने बाहेर पडलो---
माझा सर्वात जास्त नावडता पदार्थ आणायला !
.

चांगले तू वाग.. [गझल]


'चांगले तू वाग..' त्याला नेहमी उपदेशले
घर कितीदा मीच माझे लडखडत पण शोधले ..

पूर येता लेखणीला शब्दही आनंदले
हायकू गझला नि कविता लोक वाचू लागले ..

लहर आली पावसाला अन तरू सजले पहा
कैक पानांवरच त्याने छान मोती ठेवले ..

दु:ख माझे दडवुनीया वाटला आनंद मी
विदुषकाचे वेड माझे ना कुणाला समजले ..

माणसांना जोडले मी छंद माझा आगळा
छंद त्यांचाही अनोखा माणसांना तोडले ..
.

नाव माझ्या मी सखीचे ..[गझल]

नाव माझ्या मी सखीचे जे किनारी कोरले 
लाट आली मत्सरी का धावुनी ते खोडले ..
.
बाग होती भेळ होती बाकडेही शोधलेे
आठवाने पण सखीच्या दु:ख माझे वाढले ..
.
वादळेही वेदनांची झेलली मी लीलया
ना सखीच्या आसवांना त्या कधी मी पेलले ..
.
बोल म्हणता दोन शब्दां 'बरय येते' बोलली
वाकडे हे बोलणे ना साजणीला शोभले ..
.
सवय इतकी बडबडीला ऐकण्याची जाहली
मौन पण ते ऐकुनीया कान माझे त्रासले ..
.
नाव डोले बघ सखे ही कागदी पण छानशी
आठवण डोकावली अन बालपणही डोलले ..
.

मग सुखास जागा कुठली .. [गझल]

दु;खांची गर्दी जमली
मग जागा सुखास कुठली

का भाव सुखाचा पडता
बाजारी दु:खे हसली

दु:खांचा उजेड आला
सावली सुखाची सरली

दु:खांची करता विक्री
का पांगापांगच दिसली

हा कोलाहल दु:खांचा
आनंद भावना बुजली ..
.

खोट्यास भाव आहे ..[गझल]

 खोट्यास भाव आहे
पाठीस नाव आहे..

भवनात झोपला जरि
चर्चेत ताव आहे..

संधीच साधतो तो
त्याला सराव आहे..

कर घोषणा कितीही
सत्तेत वाव आहे..

सोबत नसेल चटणी
खाण्यास पाव आहे..

सात्वीक चेहरा पण
भलतीच हाव आहे ..

.

टु गो... ऑर... नॉट टु गो --- ?

कुठे जायचं
चालायचं म्हटलं तर,
फारच जिवावर येऊ लागलंय ब्वा !

त्यातही 
पुलाशी संबंध येणार असेल, 
तर जास्तच धडकी भरतेय ---

कधी आपल्या जिवावर बेतेल -
सांगताच येत नाही कुणाला !

पुलावरून चालावं म्हटलं तर,
आपल्यामुळे
पूल कोसळायची भीती ---

आणि..

पुलाखालून चाललो तर ,
वरून अचानक
धाडकन आपणहून
पूलच अंगावर पडायची भीती !!
.

भेट घडता दो जिवांची बांध झाले पापण्यांचे ..[गझल]

भेट घडता दो जिवांची बांध झाले पापण्याचे
पूर त्यांनी थोपवीले भावनेतुन वाहण्याचे

मी तुझा अन तूच माझी एक दोघे जाहलो की
या जगाला काय कारण मग मिठीतुन जाणण्याचे

दूर असता आपल्याला आणले ना जवळ कोणी
वेड होते एकमेका भरुन डोळे पाहण्याचे

दोन होते ध्रुव तेव्हा एकवटले आज बघ हे
गोल पृथ्वी हीच नक्की योग कुठले हरवण्याचे

वर गगन ते जमिन खाली क्षितिज आहे संगतीला
फक्त दोघे ठेव ध्यानी विश्व आता विसरण्याचे ..
.