पाखराला चोच देतो.. (गझल)

पाखराला चोच देतो आणि देतो तोच चारा
आज कोठे पाखराला लाभतो साधा निवारा..

पाहुनी भूमीस कसले खेळ खेळे तो विधाता
धाडतो दुष्काळ कोठे आणि कोठे तोच गारा..

काल तेथे बॉस होता आज येथे घरगडी तो
वेळ येता आवरावा लागतो घरचा पसारा..

नाव लिहितो मी तिचे का छानसे वाळूवरी त्या
लाट येते नाव पुसते बघत बसतो मी बिचारा..

आपल्या पदरास घेते ती कितीदा सावरूनी
पाहुनी का नेमका तो झोंबतो अंगास वारा..
.

हायकू ...

१.
गर्दी बेभान
कोरोनाचे थैमान
शांती उध्वस्त ..
.

२.
सगळे बंदी
दंडुक्याचे फटके
किती आनंदी ..
.

३.
जीवनगाणे
रोजचे रडगाणे
सूर बेसूर ..
.

४.
बहर खूप 
दरवळे सुवास 
फुलांना त्रास ..
.

५.
सूर्याचा ताप 
लाही लाही संताप  
जीव निर्जीव ..
.

६.
धुंद मोगरा 
कासावीस गजरा 
नजरा दंग ..  
.

लॉकडाऊन ..

घेईन तुला मिठीत सखे
ठेव मला मुठीत सखे-
शुभमंगल आपले सरताच
लॉकडाऊनचा अंतरपाट सखे..
.
मुखचंद्र तुझा बघण्यास सखे
झालो मी आतुर आहे-
लाॅकडाऊनचा दंडुका पाठीवर
पडण्या आतुर आहे..
.
घर माझे या गल्लीत सखे
राहतेस तू त्या गल्लीत सखे-
लाॅकडाऊन आले ग मधे
भेट कधी होणार सखे..
.

बरे झाले देवा लॉकडाऊन आले-

बरे झाले देवा 
लॉकडाऊन आले_
पोलिसांकडून रिकामटेकड्यांना
व्यायाम प्रकार कळाले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
माणसातले देव
माणसाला दिसले..
.
बरे झाले देवा
लॉकडाऊन आले-
नात्यातले सुसंवाद 
वाढीस लागले..
.
बरे झाले देवा 
लॉकडाऊन आले-
घरातले सगळे 
एकमेकांना माहित झाले..
.
बरे झाले देवा 
लॉकडाऊन आले-
रांधा वाढा उष्टी काढायला 
"हे" मदतनीस झाले..
.

"श्री स्वामीसमर्थ.."

श्री स्वामीसमर्थ
जय जय स्वामीसमर्थ
जगणे झाले सुसह्य
नाही नामस्मरण हे व्यर्थ..

आधार आम्हाला तुमची
नजरेसमोरची मूर्ती
संकटसमयी रक्षणकर्ता
तुमची हो कीर्ती..

शरण तुम्हाला आम्ही
नतमस्तक होऊनी
मनास लाभे शांती
दर्शन तुमचे घेऊनी..

स्वामी समर्थ स्वामी समर्थ
जपाची माळ घ्या हाती
तुमच्या मनातल्या दु:खांची
पळून जाईल भीती..

भावभक्तीने हात जोडतो
वंदन करण्या स्वामी
तुम्ही आमच्या पाठीशी
निर्धास्त जगतो आम्ही.. !
.

नवीन म्हणी..


१. फॉरवर्डची पोस्ट वाचली तर वाचली, नाहीतर डिलीट केली..

२. असतील फॉरवर्डकर्ते तर, जमतील डिलीटकर्ते..

३. फॉरवर्ड करून हसला, डिलीट बघून रुसला..

४. फॉरवर्ड पहावे करून, डिलीट करावे पाहून..

५. चार तास फॉरवर्डचे, चार तासडिलीटचे..

६. लिहिणे जमेना, फॉरवर्डशिवाय करमेना..

७. व्हाट्सअप पोस्टला फॉरवर्डचा आधार..

८. आधी केली फॉरवर्ड, मग झाली रडारड..

९. व्हाट्सपचे फॉरवर्ड वाचायचे कशाला..

१०. फॉरवर्ड करायला नि डिलीट व्हायला..

११. आपलेच व्हाट्सप, आपलेच फॉरवर्ड..

१२. फॉरवर्डचा गोंधळ डिलीटचा सुकाळ..

१३. फॉरवर्डशिवाय डिलीट दिसत नाही..

१४. फॉरवर्ड करीन पण वाचणार नाही..

१५. फॉरवर्ड करील तो डिलीट पाहील..

१६. दिसलं व्हाट्सप की केलं फॉरवर्ड..

१७. फॉरवर्ड जिथे, वाचनाची रड तिथे..

१८. उथळ व्हाट्सपला फॉरवर्ड फार..

१९. व्हाट्सपवरी फॉरवर्डच्याच पोस्टी..

२०. उचलले बोट लावले फॉरवर्डला..

२१. इकडे फॉरवर्ड, तिकडे डिलीट..

२२. फॉरवर्ड पाहून डिलीट करावे..

२३. उठता फॉरवर्ड, बसता डिलीट..

२४. एक ना धड भाराभर फॉरवर्ड..

२५. नावडत्याचे फॉरवर्ड डिलीट..

२६. सगळच फॉरवर्ड डिलीटात..

२७. फॉरवर्डपुरते व्हाट्सप..

२८. फ्रेंड तिथे फॉरवर्ड..
 
- - विजयकुमार देशपांडे

(सूचना..
ही पोस्ट आवडली व फॉरवर्ड किंवा शेअर करावीशी वाटली तर, कृपया ती माझ्या नावासह करावी. धन्यवाद.)

फॉरवर्ड तुझे ..डिलीट माझे ..


बसल्या बसल्या
घरातून मित्राशी 

सुरू झाली मोबैलवर
एकमेकात चौकशी

काय झाले रे बोटाला
पट्टी का बांधलीस अशी 

रोज चोवीस तास
मोबैल असतो हाताशी

व्हाट्सअपवर करतो मी
पोस्ट "फॉरवर्ड"तुजशी

त्यामुळे सुजली तर्जनी
पट्टी बांधली आहे अशी

पण.. तुझ्याही बोटाला
पट्टी बांधलेली कशी

चोवीस तास माझाही
असतो मोबैल हाताशी

"फॉरवर्डेड"वाचायला
तू मला सतत पाठवशी

ते सगळे वाचायला
वेळ कुठे माझ्यापाशी ?

"डिलिट" करतो प्रत्येक
व्हिडिओ/पोस्ट कशीबशी

झाली माझ्या बोटाची बघ
शेवटी दुर्दशा ही अशी !
.

अफाट गर्दी हरवले किती.. गझल

अफाट गर्दी हरवले किती
स्पर्श हवेसे वरमले किती..

सूर्य दिसेना ढगात गडगड
लगेच जमले बरसले किती..

पाळ कायदा घरात थांबा 
तरी शहाणे हटकले किती..

नवीन नवरी सासुरवाशी
फोनवर सदा करपले किती..

संपर्क नको नकोच गर्दी
सांगितले पण सरकले किती..

शिकले होते काही थोडे
देत अंगठा शरमले किती..

दार मागचे दिसता उघडे 
बार पाहता हरखले किती..
.

न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला .. गझल

कलिंदनंदिनी वृत्त..
लगावली.. लगालगा×४
मात्रा.. २४ , अलामत.. अ
काफिया.. बोलला, जाहला, दंगला
गैरमुरद्दफ.
________________________________

न नोकरीत चांगला कुणीच शब्द बोलला 
अखेरच्या दिनी किती स्तुतीस पात्र जाहला..

हसून लोळवी किती जनांस तो सहजपणे
व्यथा मनात दडवुनी खुषीत तोच दंगला..

समोर ती न भेटली कधी न बोललो तिला
मनी जपून ठेवली छबीत जीव गुंतला..

कटीस हात लावुनी निवांत तो उभा पहा
मनात प्रश्न नेहमी कधी कुणास पावला..

कुणी जिवास त्या कधी न एक फूलही दिले
कितीक हार शेवटी कसा सजून चालला..
.

का झिडकारत संस्कारांना .. गझल

का झिडकारत संस्कारांना बेशिस्त वागतो मी
टाळून सरळ वाटेला पळवाट शोधतो मी..

मी सांगतो खास लाभाचा व्यायाम हो सकाळी
डोक्यावर येतो रविराजा गादीत लोळतो मी..

रस्त्यावर दिसताना खड्डा डोळ्यासमोर माझ्या  
सावध मीही होता होता दुसऱ्यास पाडतो मी..

शांतीस जपावे सर्वांनी उपदेश नेहमीचा
का इतरांची भांडाभांडी बिनधास्त लावतो मी.. 

म्हणतो आहे जेव्हा सगळी दुनिया सत्याची ही 
मुलाम्यात छान असत्याच्या सत्यास गाडतो मी..
.

थाळीत टाकले मी साधेच एक नाणे- गझल

थाळीत टाकले मी साधेच एक नाणे
डोळे तरी चमकले त्याचे उदासवाणे..

खिडकीत आज थोडी डोकावली मनाच्या
मन गात काय बसले अजुनी तिचेच गाणे..

आहे जगायचे जर दु:खात रोज मजला
घेऊ उगाच का मी हसुनी सुखी उखाणे..

जातो बुडून जेव्हा मी आसवात माझ्या
असते हवे तिच्या मज का आठवात जाणे..

धुंदीत भांडला तो पत्नीसवे कितीदा
गातो पुन्हा कशाला दु:खातले तराणे..
.