रणरागिणी चंडिका -


तासभर तणतण करत ,

मोठ्ठ्या आवाजात ,

लाटणे हातात परजत ,

माझ्याशी भांडणारी बायको -


तासाभरानंतर ,

भांडण मिटवलयावर ,


हळूच कुजबुजत्या आवाजात मला म्हणाली-

" अहो, सगळा कचरा काढून झाला,

तेवढ ते झुरळ मेलं काही जाता जात नाही तिथून -

त्याsssssss तिकडच्या कोप-यातून..


हाकलता ना तेवढं ? " 

.

सच्चे प्रेमवीर ....!

बिल्डर

नकोच सांगू सखे कुणाला 
इमले प्रेमाचे बांधले मनी - 
घेऊ आईबाबांचा परवाना 
वैध प्रेम हो मंगलसूत्रातुनी ! 
.बँकर

तुझ्या प्रेमाची मुदतठेव 
सखे, आजन्म मनी ठेवली -
एकच शाखा आहे अपुली 
जाणीव लग्नानंतरही जपली !
.
डॉक्टर

हात तुझा मी हाती घेतला 
किती प्रेमाने तो कुरवाळला -
सखे, तेव्हांच मला जाणवला 
तुला एकशेदोन ताप चढलेला !

.


वकील


ज्याअर्थी सखे ग तुझा हात 
आलेला आहे माझ्या हातात -
त्याअर्थी तुझ्या गळयाशपथ 
जन्मठेप भोगीन सातही जन्मात !
.कवी

त्यांनी बेंबीच्या देठातुन जरी ठोकल्या आरोळ्या 
सखे, तुझ्यावर कितीक मी ओवाळल्या ग चारोळ्या -
प्रेमाने जाहलो भणंग जमवली ना कधि कवडीदमडी 
शब्दाशब्दांतूनच जपल्या अपुल्या साऱ्या आवडीनिवडी !
.


टीकाकार

कशास करशी तोंड सखे, तू मजसम ग वाकडे

का लिहिती कविलेखक सारे लक्ष न द्यावे त्याकडे -
वाईटाला वाईट, चांग्ल्यालाही वाईट- नित्य म्हणावे गडे 
आपल्या प्रेमाचेही कोडे कधी न उकलू द्यावे पुढे !
.

सख्ख्या शेजारणी


समोरासमोरच्या दोन घरांच्या दारात 
जेमतेम दहा फुटांचे अंतर - 

रोज सकाळचाच घडणारा प्रसंग !

समोरची शेजारीण तिच्या दारात उभी -

आमच्या घरच्या दारात माझी बायको उभी !!

साधारण एक-दीड तासानंतर ....

घराच्या आत आल्यावर 
बायको वस्सकन माझ्यावर 
जोराने डाफरते -

" दोन मिनिटेच मेलं 
शेजारणीशी कधी नव्हे ती
मी बोलत उभी असलेलीही
बघवत नाही का हो तुम्हाला ? 
लगेच मागून
'पुरे पुरे'च्या खाणाखुणा 
सुरूच तुमच्या तासभर !!! "
.

बायकोपेक्षा मेहुणी -ऑफिसातून घरी येऊन जरा हाश्शहुश्श करीपर्यंत ,
बायकोने त्या मलिंगासारखा प्रश्नाचा एक तिरकस चेंडू
माझ्या दिशेने फेकलाच -

"अहो ! आज तुम्ही ऑफिसातून येताना,
छानसा गजरा घेऊन येणार होता ना माझ्यासाठी ? 
मग काय झालं ! "

मी चाचरत उत्तरलो -
" अग, मी तुला सकाळी म्हणालो होतो खरच ,
आज 'जगातल्या सगळ्यात सुंदर तरुणी'साठी -
मी मस्तपैकी एक गजरा आणणार आहे म्हणून.....
पण, 
ऑफिसातून येताना मी गजरा घेतलाही होता ग ..."

माझे वाक्य उत्साहाने तोडत तिने विचारले -
" अहो द्या ना पट्कन मला तो ! "

मी उत्तर देऊन मोकळा झालो -
" तुझी धाकटी बहीण रस्त्यात भेटली येताना...... ! "
.

अस्से माहेर -माहेरचे ते अंगण 
आणि सडा सारवण 

काळी कपिला हंबरता 
हात शेणाचे सावरता 

अंगणातील ती रांगोळी 
का आठवावी सकाळी

कावळा कडुनिंबावरी 
काव काव का पुकारी 

आईबाबाची चाहूल 
देतो नुसतीच हूल 

नित्य दाराकडे डोळे 
शहरातले मन भोळे 

खेडे आठवते अजुनी 
माहेराचे वेड मनी !
.

खट्याळ काळजात घुसली -कपाळावरच्या अवखळ बटा
हलकेच  मागे सारताना -

पापण्या फडफडशी नवलाईने
मजकडे कौतुके बघताना
 
 गालावरच्या  नाजूक खळीने  
पोटात खड्डा पाडताना ,
 
निजहनुवटीवर बोट टेकवशी  
 आरामात कुजबुज ऐकताना -

जरी न घडले काहीतरी
मान मनोरम वेळावताना ,

कुशल अभिनेत्रीच्यावर
भाव चेहऱ्यावर आणताना -
 
भोळीभाबडी होउनिया ग  ... 
कितीदा जखमी करशील तू !

.

जा ना गडे एकदा तरी जेलमधे ...


आज सकाळी सकाळी.....
 बायकोला काय आकाबाई आठवली कोण जाणे -

ती मला म्हणाली-
"अहो, तुम्ही पण जा ना एकदा जेलमधे !"

केवढ्याने किंचाळलो मी ..!
पण ती ढिम्म !

पुढे ती बोलली-
"खरेच , कित्ती मज्जा येईल ना मग ?
मी रोज तुम्हाला तुमच्या आवडीचा डब्बा आणून देईन ;
रोज रोज नवनवीन पदार्थ बनवीन ;

आपल्या घरांत साठलेले...
आणि आपण दोघांनी कधीच न वाचलेले-
हे सगळे जाडजूड ग्रंथ...

 मी जेलमधे तुमच्या अवतीभवती पसरीन -

सगळीकडे आपले फोटो येतील !
 

आपल्याला कधी न भेटलेले,
 नातेवाईक भेटायला येतील .....
आणि नेहमी नको असणारे,

 अनायासे तोंड चुकवायला बघतील !

जा ना गडे एकदा तरी तुम्ही ...!
.

नव्हतीस घरी तू जेव्हां !


बऱ्याच वर्षांनी-
'माहेरपणा'साठी म्हणून बायको माहेरी गेली ;

तो नेपोलिअन का हिटलर का चर्चिल सांगून गेला होता -
'जगात अशक्य नावाची गोष्ट कुठेच नाही....!'
- अशा अर्थाचे काहीतरी,

 त्याने ते 'इंग्रजी'तच सांगितले असणार !
त्याला कुठले आपल्या 'माय मराठी'चे वेड असणार ?

मनांत म्हटलं -
चला, अशक्य ते आपणही आज करून टाकावे -
स्वहस्ते घरीच जेवण बनवावे !
( स्वैपाक करावा -असे म्हणणे कसे तरीच वाटते ना ? )

कुकर शोधला
त्यातले तीन डबडे शोधले
एकात वरणासाठी डाळ पाणी
दुसऱ्यात भातासाठी तांदूळ पाणी
तिसऱ्यात भाजीसाठी बटाटे पाणी
ओतले -

मनांत म्हटले - स्वैपाक स्वैपाक म्हणजे आता रोज
आपल्या दोन्ही हातची गोष्ट !
हाय काय अन् नाय काय ......

तिन्ही डबडे एकात एक वेवस्थित कुकरमध्ये झाकण फिरवून-
ग्यासच्या शेगडीवर कुकर ठेवला.....
आणि मी माझ्या नेहमीच्या लेखनकर्तव्याकडे वळलो .

कुकरच्या तीन शिट्ट्या ऐकू येईपर्यंत निवांत ...........!

अहो, एक तास होऊन गेला तरी-
बायकांना आपल्याकडे खेचणारा,
तो रंगीला कुकर शिट्टी मारतच नव्हता .
 

म्हटलं,
बायकोच्या कधीतरी अंगात येत असते,
तसे आज ह्या बेट्याच्या अंगात आलेले दिसते !

शेवटी मीच स्वत:शी शिट्टी वाजवत,
कुकरजवळ गेलो.......
आणि लक्षात आले -

लेखनकर्तव्याच्या गडबडीत,
मी ग्यास पेटवलाच नव्हता ना !

बायकोच्या आठवणीने . .

 दोन टिपे गळली राव डोळ्यांतून . .
 आपोआपच  !
.

३६ गुण -


आळस झटकण्याचा दिवस..
रविवारचा दिवस...
प्रसन्न दिवस...!


कपाटाची साफसफाई करायची ठरवली..
कपाटातून दोन कागद खाली पडलेले दिसले...
 

बायकोची आणि माझी कुंडली -
 

तेव्हां,
आमच्या दोघात तब्बल ३६ गुण जमले होते म्हणे !
प्रत्यक्षात,

 ३६ चा आकडा अजूनही डोकावत आहेच !

मला चहा,

 तर तिला कॉफी-
मला भजी,

 तर तिला शिरा-
मला गरम,

 तर तिला थंडगार-
मला तिची सासू,

 तर तिला माझी सासू-
मला जागणे,

 तर तिला घोरणे-

एक गोष्ट ...

 दोघांची जमत असेल,
 तर शपथ !

मी तर या निष्कर्षाला आलो आहे की,
पत्रिकेतले छत्तीस गुण जमवण्यापेक्षा,
 वधूवरांच्या

 छत्तीस आवडीनिवडीच्या गोष्टी 
तपासल्या तर,
जगातली ९९ टक्के लग्ने,
 शंभर टक्के यशस्वी होतील !
 

.

निद्रानाशासाठी जालीम उपाय ..


रात्रीचे अकरा वाजत आले होते. 
शेजारच्या वैनी बारीक आवाजात,
 बायकोशी काहीतरी खुसुफुसू करून गेल्या. 

त्या  गेल्यावर,
 मी बायकोला विचारले -
"काय ग ,
शेजारच्या वैनी कशाला आल्या होत्या ? "

उत्साहाने बायको उत्तरली -
" अहो, झोपेच्या गोळ्या संपल्याची आठवण,
अचानक आत्ता झाली त्यांना ! "

मी विचारले -
" अग पण....आपल्याकडे कुठे आहेत गोळ्या ? "

बायको सांगू लागली -
" आपल्याकडे नाहीतच हो  ...,
म्हणून तर मी त्यांना,
तुमची ती चारोळ्या/कवितांची वही दिलीय ! "


.

दोनच मिनिट हं -


घरोघरी ---------

स्वैपाकघरातून बायको जवळ जवळ ओरडतच आली -
" बाई बाई बाई !
अहो, दोन तास होऊन गेले ना ?
तुम्ही तर दोनच मिनिटात बंद करतो म्हणाला होतात..
तो मेला संगणक !
कम्माल झाली आता मात्र तुमची ..!
चहाचा कप गार पडलाय ...
अजूनही तसाच भरलेला आहे !
आंघोळीची बादली गारढोण होऊन गेलीय -
त्या गरम उपीटाची वाट लागलीय.
आटपा जरा लौकर -
आता तासाभरात जेवणाची वेळ होत आलीय ...!"

संगणकाकडे नजर ठेवतच,
मी शांतपणे उत्तरलो-
" दोनच मिनिट हं .. .. झाल माझ ! "
.

लक्ष्य.. लक्ष्य... लक्ष्य !

परवा आमच्या सोलापूरच्या गड्ड्याच्या जत्रेत
बायकोबरोबर हिंडत असतांना,
समोर एका पडद्यावर,
तीसचाळीस रंगीबेरंगी फुगे 

आकर्षकरीत्या लटकवलेले दिसले .....

बायकोने कधी नव्हे ते- हट्टाने,
बंदुकीने फुगे फोडायचे ठरवले.

मला '"स्त्रीहट्ट'" पुरवणे भागच !

बायको बंदूक हातात घेऊन सज्ज झाली !

पण, बायकोचा नेम एकदा..दोनदा..नाही, तर -
तब्बल बारा..तेरा वेळाही चुकलाच !

बायको हिरमुसली ना ! मला तिचा चेहरा पाहवेना ...

मी तिच्या कानात एक गंमत सांगितली -

बायको जरा लाजली, हसली..
पण पुन्हा उत्साहाने तयार झाली .

[मी बायकोला सांगितले होते -
" तो फुगा म्हणजे माझी पाठ आहे असे समज -
आणि बंदुकीची गोळी.... म्हणजे तुझ्या हातातले लाटणे !
.... हं ...मार आता गोळ्या ! "]

अहो आश्चर्यम् ! 

बायकोने ओळीने...
अठरा-एकोणीस फुगे एकापाठोपाठ एक,
फटाफट फोडले की हो !
.

आम्ही हे असेच राहू...!


स्तुती करणे जमणार नाही ,
यथेच्छ टवाळी करीत राहू ..

मदत कुणाला करणार नाही ,
करणाऱ्याला आडवे जाऊ ..

पुढे जाणारा बघवणार नाही ,
त्याला मागे ओढत राहू..

चांगला शेजारी होणार नाही ,
निंदक म्हणून आघाडीवर राहू...

कौतुक कधी न करणार कुणाचे ,
सदैव द्वेष करत राहू....
 
आमचा असा मराठी बाणा
नेहमी नुसता गर्जत राहू...!
 
.

नाचते नार तोऱ्यात -


नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा      
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा

ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते  
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते

हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी

चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या   
मेखला खास झुलवून हात अदबीन हाति ये त्यांच्या

भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी 

पापी  ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची 
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची  
.