अभिप्राय


          " हं ! काय म्हणतोय यंदाचा दिवाळी अंक ?"
          "हे काय विचारणे झाले ? अहो नुसता बेष्ट नाही, अगदी 'दी बेष्ट' आहे म्हटल !"
- आणि वाचकहो ! इथच फसलात तुम्ही ! याला कारण म्हणजे तुम्ही दिलेला 'दी बेष्ट' हा अभिप्राय ! खरोखरच जर तुमच्या हातातील अंक वाचनीय असेल तर तुम्ही मुद्दामच 'टाकाऊ' या शब्दात त्याचे वर्णन करा. म्हणजे तुमचा सहवाचक तुमच्या 'अंका'ला हातही लावणार नाही ! नाहीतर सहवाचकाची पुढीलप्रमाणे मागणी तुमच्याजवळ ठरलेली आहेच -
" अरे वा ! बेष्ट आहे म्हणता ? मग बघूच पाच मिनिटे जरा इकडे तो ! थोडा चाळून देतो !" आणि मग त्या "चाळण्या"ला पाच तास तरी कमीत कमी लागणारच !

        आजचा जमाना निव्वळ अभिप्रायावरच जगात आहे, असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ति होणार नाही ! 'उठता बसता कार्य करता' अभिप्रायाशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही . दैनिक घ्या अगर साप्ताहिक घ्या, पाक्षिक घ्या किंवा वार्षिक घेऊन पहा. त्यात कुणीतरी कशावरतरी अभिप्राय दिलेला न आढळेल तरच आश्चर्य !

        मनुष्य जन्माला येतो तो, अभिप्रायासहच ! पुढील जीवन उकडा तांदूळ , कडू साखर नि पाणीदार घासलेट यांच्याबरोबरच कंठावे लागणार आहे, हे जन्मत:च मानवाला ज्ञात झाल्याने की काय, तो भावी आयुष्याबद्दलचा आपला अभिप्राय जोरदार शंखध्वनी करून मातेजवळ सादर करतो.

        एखादा वक्ता भाषण करत असल्यास त्यावरील प्रतिक्रिया दोन प्रकारच्या अभिप्रायांनी व्यक्त झालेली दिसते. प्रकार दोन असले तरी साधन एकच ! टाळी ! भाषण खरेच चांगले असेल तर, भाषण पूर्ण होईपर्यंत श्रोते चूप असतात. भाषण संपल्यावर त्यांना उमजते की, 'आपण या भाषणाला अभिप्रायच दिले ला नाही !' - दुसऱ्याच क्षणी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने वक्त्याला पावती दिली जाते. तर दुसऱ्या प्रकारात वक्त्याचे भाषण जसजसे कंटाळवाणे होत जाते, तसतसा टाळ्यांचा गजर वारंवार होऊ लागतो ! हा वक्रोक्तिपूर्ण अभिप्राय !

        अभिप्राय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले मत, आपला कल ! गवैय्यासमोर आपली मान हलवली की, त्याला 'दाद' मिळते ! खेळांमध्ये खेळाडूना वरचेवर दिले जाणारे प्रोत्साहन म्हणजे त्यांच्या खेळाची पसंती        !

        कित्येकांना उठसूट कशावरही, कधीही व कुणाजवळही आपले मत प्रदर्शित करण्याची खोड लागून राहिलेली असते ! तुम्ही नाटकाला जा, ते सिनेमाबद्दलचे अभिप्राय तुम्हाला ऐकवतील- मग ते त्यांनी स्वत: पाहिलेले असो वा नसो ! तुमचा नवा शिवलेला शर्ट त्यांना दाखवा की, त्यांचा उद्गार ठरलेला -
" वा ! शर्ट मस्त जमलाय, पण शिलाईच जरा मार खातीय बघा ! " आपल्यालाच त्यामुळे अकारण ओशाळल्यासारखे होते !

          कधीही अभिप्राय देणारे महाभाग विलक्षणच ! गौरवसमारंभात ते एखाद्याबद्दलची स्तुती आवेशाने करतील ! तर एखाद्या प्रेतयात्रेबरोबर जात असतानाही, ते चंद्रावरून परतलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर जाण्याऐवजी, मंगळावर जाणेच का योग्य होते ? याबद्दल जोरजोराने आपला अभिप्राय पटवून देतील !

        एकाची निंदा दुसऱ्याजवळ, दुसऱ्याचे मत तिसऱ्याजवळ- अशा पळवापळवीत हे महाभाग सदैव पुढे असतात. अभिप्राय देण्यात आपले काही चुकते वा नाही याचे तारतम्य त्यांच्या गावीही नसते. त्यातल्यात्यात दोषयुक्त अभिप्राय बिनबुडाचे असतात, हे वेगळे सांगावयास हवेच का ? टीकेमधे सूर्याचे माध्यान्हीचे ऊन, तर अभिप्रायामधे पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल किरण आढळतात . टीका म्हणजे जहाल शब्दात दिला गेलेला अभिप्राय असे समजण्यास काहीच हरकत नाही.

        'नाटकातील अमुक एका व्यक्तीचा अभिनय चांगला होता'- हा झाला योग्य अभिप्राय . पण टीका करताना हेच असे सांगितले जाईल की, 'नाटकातील अमुक एका व्यक्तीच्या हालचालीत अभिनयाचा खराखुरा अकृत्रिम आविष्कार होत असल्याचा वारंवार आभास होत होता.' पतंग उंच उडत असला तरी पुन्हा त्याला उंच उडविण्यास शेपूट लावण्याची कामगिरी टीकाकार करतो !
   
    चेंडूफळीच्या खेळात टाकल्या जाणाऱ्या फसव्या चेंडूप्रमाणे अनेक फसवे अभिप्राय आजच्या भेसळ युगात आढळतात. चित्रपरीक्षण, नाट्यपरीक्षण वाचून, चित्रनाट्यशौकीनाना अनेकदा वाचलेल्या व प्रत्यक्ष अनुभवलेल्या अभिप्रायात तफावत पडलेली जाणवते.

        भरपूर जेवल्यानंतरची ढेकर, पूर्वी नभोवाणीवरील 'आपली आवड' ऐकताना न आवरणारी  जांभई किंवा झोपेतील घोरणे हे काही उत्कृष्ट अभिप्रायाचे नमुने ! सिनेमाच्या पडद्यावर ओळखीच्या  अभिनेत्याचे दर्शन घडताच, लहान पण सुजाण मुले टाळ्या पिटतात. या त्यांच्या अभिप्रायात अभिनेत्याबद्दलचे अपार प्रेम आढळते. तर सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत सुरू होते न होते तोच काही टवाळखोरांचे चुळबुळदर्शक व थेटराबाहेर पडण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांचे  अपार राष्ट्रप्रेम (?) दाखवणारे अभिप्रायच नाहीत काय !

        ग्रंथाची प्रस्तावना हा ग्रंथावरील अभिप्राय असतो. सभागृहात आढळणारे खुर्च्यांचे तुटके हात व मोडके पाय असलेली टेबले हे सभागृहात झालेल्या चर्चेवरील अभिप्रायांचे द्योतक होय ! तर साभार परत हा लेखकूला संपादकाचा अभिप्राय ! ठराव आला तर चर्चा आणि पडला तर मोर्चा - हे ठरावावरील ठराविक अभिप्राय आहेत !

        अभिप्रायाची सत्यासत्यता पटणे फार कठीण. एक प्रसंग सांगतो:
श्री. घारूअण्णा जेवावयास बसलेले आहेत. सौ.घारूअण्णा एकेक पक्वान्नाची चव कशी आहे ते विचारत आहेत. दुसरीकडे त्या एका हातात लाटणे घेऊन मांजराला दूर सारत आहेत. अशावेळेस एक विशिष्ट पक्वान्न श्री.घारूअण्णांना पसंत पडल्याने त्यांच्या तोंडून "वा वा !" हा उद्गार सहजच बाहेर पडतो. सौ.घारूअण्णांचे लक्ष तिकडे जाताच, चुकून (!) त्यांच्या हातातले लाटणे, नेमके घारूअण्णांच्या तुळतुळीत टकलावरच आदळून तेथे  एका टेंगळाचा जन्म झाला ! वाचकहो, एक गुपित म्हणजे नेमके ते पक्वान्न सौ.घारूअण्णांच्या एका शेजारणीकडून वानवळा म्हणून आलेले होते. आता सांगा की, 'खरा अभिप्राय' कुठे आढळतो !

        हे सांगणे जरा कठीणच आहे. कारण असे की, उस्फूर्तपणे तोंडून बाहेर पडलेला उद्गार हा पुष्कळदा सत्याभिप्राय शकतो, हे जितके खरे - तितकेच स्त्रीच्या हालचालीतून आढळणारा अभिप्रायही कितीकदा असत्य नसतो हे खरे ! म्हणून घारूअण्णांचा 'वा वा' हा उद्गार व त्यामुळेच (नकळत) घडून आलेली शेजारणीच्याच पक्वान्नाची स्तुती, यांचा परिणाम म्हणून त्यांच्या हातून 'लाटण्याचे निसटणे' हाही घारूअण्णावरील प्रतिक्रियात्मक नैसर्गिक अभिप्रायच म्हणावा लागेल !

        आपण रहस्यकथा वाचत असताना नायकाशी समरस होऊन ठोशास ठोसा देण्याचा पवित्रा धारण करतो. विनोदी कथा वाचताना गडबडा लोळण्याच्या बेतात येतो. एखादी रद्दी कथा वाचताना भिकार वाटली की, आपण ती दूर फेकण्याच्या बेतात येतो. हे आपल्या हालचालीतून व्यक्त होणारे 'अभिप्राय'च होत !

        'अरेरे' किंवा 'अहाहा' हे उद्गार आपण पाहिलेल्या दृश्यावरील अभिप्राय रोजच्याच जीवनात वापरावे लागणारे आहेत . आजच्या जमान्यात 'च्यायला !' हा विस्मयतादर्शक अभिप्राय आणि 'हात्तेरेकी !' हा तुच्छतादर्शक अभिप्राय खूपच रूढ झालेले आहेत.

        शरीराच्या प्रत्येक अवयवाबरोबर एकेक अभिप्राय निगडीत असतो ! त्यामुळेच मनुष्याला चैतन्य प्राप्त होते . त्याचा आळस दूर झाडण्यास मदत होते. रसिक वाचकांचा अभिप्राय न मिळता, तर तमाम लेखकांचा मुडदाच पडता !

        आता हेच पहा ना- हा सबंध लेख तुम्ही न कंटाळता वाचून काढलात . काढलात तो काढलात नि तुम्ही नाही फाडलात, आणि फाडला नाहीत- यातच अस्मादिकांना "अभिप्राय" गवसला !

.            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा