जगात सगळ्यात सुखी प्राणी कोणता असेल, तर तो म्हणजे बोकड ! कारण त्याला दाढी असून ती 'करावी' लागत नाही!' 'दाढी का केली नाही' असे विचारणारा त्याचा कुणी वरिष्ठ अधिकारी नाही. सकाळ झाल्याबरोबर गूळझोपेतून त्याला उठवून 'दाढी करून अंघोळ आटोपून घ्या' असा लकडा त्याच्यामागे लावणारी अर्धांगी नाही. किंवा 'आज दाढी नीट झाली नाही, तेव्हा 'ती' काय म्हणेल?' असा विचार मनात येऊन आपल्या प्रेयसीबद्दल भीती वाटण्याचीही बोकडाला काळजी नसते ! एकंदरीत दाढी असूनही तिची निगा राखावी न लागणारा बोकड हा प्राणी सुखीच नाही काय ?
'दाढी' हा खर म्हटल तर आजच्या युगातील संशोधनाचा ज्वलंत विषय आहे. दाढी हनुवटीलाच का येते, ती कानावर किंवा मानेवर का येत नाही? ती जन्मत:च किंवा एकदम वृद्धापकाळात का येत नाही? एकाचे हृदय दुसऱ्याला कलम करून बसवता येते, त्याप्रमाणे माणसाची वाढलेली दाढी बैलाला किंवा पुरुषाची दाढी वाढवून ती बाईला बसवता येईल का? बोकड आणि मानव ह्या दोघांनाच दाढी का यावी? इतर प्राण्यांनी कुणाचे काय घोडे मारले आहे ! एखाद्या पुरुषाने 'छटाक' दाढी राखल्यावर आपण त्याला 'बोकड' म्हणून संबोधतो, मग बोकडालाही 'माणूस' का म्हणता येत नाही? असे एक ना अनेक प्रश्न ह्या दाढीबद्दल मनात येतात. आजचा तरुण पुरुषवर्ग भरपूर अर्धा-पाऊण तास या दाढीपायी खर्च करतो, किती हा वेळेचा अपव्यय ! याकरता सरकारने एक 'राष्ट्रीय दाढी संशोधन कमिटी' नेमली पाहिजे. या कमिटीच्या सभासदांनी दाढी वाढवलीच पाहिजे, अन्यथा ते बिचारे एकमेकांचीच दाढी करत बसून संशोधन टाळतील. असं नाही होऊ !
'दाढी' या विषयावर आजतागायत भरपूर लेखन झालेले आहे. 'मला जेव्हा दाढी येते-' ह्या पाच अंकी नाटकापासून ते 'दाढीवाला बोवा' या बालगीतापर्यंत ह्या दाढीने साहित्य व्यापलेले आहे. म्हणून आता दाढीबद्दल लेखन कमी व संशोधन फार झाले पाहिजे, असे मी आग्रहाने मत प्रतिपादन करत आहे.
परवा एकदा एका भगिनी मंडळात एक पुरुषवक्ता माsरे तावातावाने 'केशभूषा व केसांची निगा' यावर भाषण देत होता. भाषण रंगात आले असतानाच, एका भगिनीचा उद्गार हॉलमधे खसखस पिकवण्यास समर्थ ठरला. उद्गार असा होता- " इश्श्य ! त्याला दाढी तरी नीट करता येते का ? " म्हणजे बघा, दाढी हा पुरुषांचा विषय ! त्याला हात लावायचे काही कारण आहे का?... "नाही!"असे मला वाचकांकडून उत्तर अपेक्षित होतेच ! पण ते उत्तर चूक आहे. कारण आजचे समान हक्काचे युग ! एखादा डॉक्टर 'स्त्रीरोग-तज्ञ' असू शकतो, एखादी स्त्री मग 'पुरुष-दाढी तज्ञ' का असू शकणार नाही? असूच शकेल ! या विषयात पुरुष-स्त्रिया दोघांनीही अभ्यास करायला काय हरकत आहे ? कारण हा विषय महत्वाचा आहे. यावर संशोधन करणे का आवश्यक आहे, ते मी आधीच सांगितले आहे. शिवाय.....
नाडीवरून रोग्याची परीक्षा करता येते, काडीवरून डबड्याची किंमत कळते, तशीच दाढीवरून मानवी स्वभावाची परख होऊ शकते ! छत्रपती शिवाजी महाराजांचा (दाढीसह-)चेहरा डोळ्यांपुढे आणा. त्यांच्या दाढीमुळेच तर चेहऱ्यावर पराक्रमाचे आगळे तेज आपणाला दिसू शकते ना ! दाढीमुळेच त्यांच्या चेहऱ्याला एकप्रकारचा करारीपणा आलेला आहे ना ! तीच जर दाढी वाढवलेली नसती तर ?... खांद्यावर झोळी, हातात मण्यांची माळ, पायात खडावा व काळ्याभोर दाढीमिशांमुळे चेहऱ्यावर आलेला धीर-गंभीरपणा - अशी ही मूर्ती रामदास स्वामींचीच असू शकेल, हे दाढी न फुटलेले बालकही सांगू शकेल ! दाढीमुळे 'गीतांजली'कारांचे स्थान आहे, हे सर्वांना माहित आहे. दाढीमुळे दिसणारा चेहऱ्यावरचा प्रौढ व भारदस्तपणा ह्या नोबेल-पारितोषिक-विजेत्याचे महत्व पटवतो. शेर-शायरी-कव्वाली गाणारे त्यांच्या झुलत्या दाढीनेच आपल्यावर व्यक्तीमत्वाची छाप पाडून जातात. मधूनच दाढी कुरवाळण्याची त्यांची ढब आकर्षक असते.
दाढी वाढलेल्या माणसाचा नैसर्गिक स्वभाव जसा जाणता येतो, तसाच कृत्रिम दाढीने तो लपवताही येतो. सिनेमातील नायकच आणीबाणीच्या प्रसंगी खलनायकासमोर , खोटी दाढीमिशी लावून नायिकेला पळवून नेतो. हे, शेवटी मारामारी करताना खलनायकाहाती जेव्हा नायकाची दाढी येते, तेव्हा खलनायकाला समजते. तर दाढीचे फायदे-तोटे, तिचे महत्व सर्वानी ओळखले पाहिजे. दाढीच्या आकारावरून मनुष्यातील प्रकार समजतात. इंच इंच(च) दाढी वाढवून एखादी व्यक्ती शून्यात बघत रस्त्यावरून भटकू लागली की, ओळखावयाचे- स्वारी 'नवकवी' दिसत्येय बरे का! सकाळच्या प्रहरी हातात चोपडी घेऊन, गालावरून पुन्हापुन्हा हात फिरवून 'दाढी गुळगुळीत झाली की नाही!' हे पहात सायकलवरून जाणारा 'कॉलेज प्रेमवीर'च असणार ! दाढीच्या इवल्याशा खुंटांचे अधूनमधून दर्शन देणारा कारकून नाहीतर अपयशी प्रेमवीर असतो. तर घाईघाईने चालत मधेच न्हाव्याच्या दुकानात शिरून दाढीवरून एखादा वस्तरा मारून घेणारा एन.सी.सी.चा इन्स्ट्रक्टर अथवा पोलीस असतो !
तसेच दाढीच्या रंगावरून मनुष्याची मनोभूमिका ओळखता येते. काळीभोर लांब दाढी मनुष्याचा उमदा स्वभाव दर्शवते. काळी आखूड दाढी मनुष्याचे खलनायकत्व, आखडू स्वभाव दाखवते. पांढरीशुभ्र दाढी वैराग्याचे प्रतीक आहे. अशी दाढी असणारे हिमालयावर धाव घेण्यास उत्सुक असतात. 'जग हे असार आहे, मिथ्या आहे' अशीच त्यांची विचारसरणी असते. करड्या रंगाची दाढी वाढवणारे करारी, उग्र व तापट स्वभावाचे भासतात. काळी वस्त्रे परिधान करणारा काळापहाड चिमूटभर काळी वाढवून हिंडू लागला तर, त्याचे इम्प्रेशन आणखीनच वाढेल !
मिशावर ताव देऊन बोलणारा आगाऊ मग्रूर गर्विष्ठ वाटतो. तर दाढीवर हात फिरवत किंवा दाढी कुरवाळत बोलणारा विचारपूर्वक व शक्कल लढवून वागणारा असतो. दाढीमुळे शीख व शेख लोक चटकन ओळखता येतात. कारण त्यांची दाढी वाढवण्याची विशिष्ट पद्धत! पैलवानांनी मात्र शक्यतो दाढी ठेवण्याचा प्रयत्न करू नये, विशेषत: फ्रीस्टाईल स्पेशालीस्टानी !कारण उघडच आहे.
दाढी करावी का करू नये- हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण कुणाला दाढी वाढवावी वाटते. कुणाला आपण स्मार्ट दिसावे म्हणून (स्वत:ची) दाढी (स्वत:च) करावी वाटते. तर दुसऱ्याची दाढी करण्यात धन्यता मानणारेही आहेतच ! दाढी वाढवली तरी तिची निगा ठेवावी लागते व करायची (काढावयाची) म्हटली तरी, यथासांग विधी योग्य
हत्यारानीच पार पाडावा लागतो !
दाढी वाढवली तर होणारा एक फायदा सांगतो. प्रेयसी प्रियकराला 'आपल्या गळ्याची शप्पत' त्याच्यावर जिवापाड प्रेम असल्याची बतावणी करते. तसेच (दाढी वाढलेला) प्रियकर प्रेयसीला समजावू शकतो-"लाडके, खरच माझंही तुझ्यावर या दाढीशप्पत फार फार प्रेम आहे." शिवाय नुसत्या ओक्याबोक्या गळ्यापेक्षा वाढलेल्या दाढीची शप्पत हातालाही चांगलीच जाणवते. तिथे अभिनयाचा खराखुरा आविष्कार दर्शवता येतो !
दाढी वाढवली नाही तरी, होणारा एक (विनोदीच हं !) फायदा सांगतो. वधुपरिक्षेप्रमाणे वरपरीक्षेत वधु वराची परीक्षा घेऊ शकते. वधू सांगते- " हं ! आता घड्याळाचा गजर होण्याच्याआत तुम्ही चांगली दाढी करून दाखवू शकाल का? " चपळ असेल तर, वर चांगली दाढी करून दाखवू शकेल, पण आळशी वराची मात्र सर्वांच्यासमोर 'बिनपाण्याने' चांगलीच होईल!
एका गोष्टीचे मात्र मला फार आश्चर्य वाटते. सध्या 'फुकटे युग' चालू आहे ना! अमुक घेतल्यावर, तमुक फुकट मिळते- होय ना ? मग तुम्ही असा बोर्ड कुठल्या न्हाव्याच्या दुकानावर पहिला आहे का हो- "आमच्या दुकानात शंभरवेळा कटिंग करून घेणाऱ्याची, एक वेळ पूर्ण दाढी फुकट केली जाईल!" किंवा, "पंचवीसवेळा दाढी करवून घेणाऱ्याच्या एकवेळ मिशा फुकटात काढल्या जातील !" कदाचित दाढीचे महत्व (-जे तुम्हाला आत्ता समजत आहे !) त्यांना आधीपासून माहित असेल !
दाढी न वाढवण्याचा दुसरा फायदा पहा. दात तोंडात लपवता येतात, पण दाढी कशी लपवता येईल? म्हणून दाढी वाढवलीच नाही तर, 'दात उपटून हातात देईन'च्या चालीवर, 'दाढी उपटून हातात देईन' अशी धमकी तरी कुणाची ऐकून घ्यावी लागणार नाही !
दाढीचे महत्व जाणून मी संशोधन करत आहे. एक महत्वाचा शोध (वाचक हो! फक्त तुम्हालाच-) सांगतो. जरा तुमची दाढी- सॉरी हं !- तुमचे कान इकडे करा. 'जे दाढी वाढवतात ते आळशी असतात !' उदाहरणार्थ, पूर्वीचे ऋषी-मुनी यज्ञ व अध्यापन ही कामे एकाच जागेवर बसून करत. तपश्चर्या करत असत, तीही एकाच जागेत ! इतर काही अॅक्टिविटीज त्यांनी केल्याचे तुम्ही कधी ऐकले, वाचले, पाहिले आहे काय? म्हणजेच ते आळशी होते व त्यामुळे त्यांची दाढी वाढलेली असे. दशरथ राजा फक्त शिकारीत निपुण होता. म्हणून त्याची दाढी वाढलेली दिसते. उलटपक्षी दशरथपुत्र राम पहा ! आयुष्यभर त्याने कष्ट केले, राक्षसांचा संहार केला, वनवास भोगला, सीतेचा त्यागही केला! म्हणूनच त्याने दाढी वाढवली नाही. कारण तो 'अॅक्टिव्ह' होता, 'अलर्ट' होता! तसेच भगवान विष्णूचे उदाहरण घ्या- त्याचे हजारो वर्षांचे आयुष्य असंख्य घडामोडींनी भरलेले आहे. नाना अवतार घेऊन, हरतऱ्हेच्या राक्षसांना त्याने ठणाणा करायला लावले! त्याला दाढी वाढवण्यास वेळच कुठून मिळणार हो ? नारदांचा जन्म कळ लावण्यात गेला, त्यांना आपल्या हनुवटीला आलेली कळ कशी सहन करणार ? ह्यावरून माझ्या वरील शोधाचा व्यत्यासही - "जे आळशी असतात, ते दाढी वाढवतात !" आपोआप सिद्ध होतो.
म्हणूनच आजचा मानव शक्यतो कटाक्षाने दाढी काढतो, ती वाढवण्याच्या फंदात तो पडत नाही. निदान 'आज मी दाढी केली', एवढे सत्कृत्य तो फुशारकीने सांगू शकतो. काही गृहिणींना पतीराजाचे एवढेसे दाढीचे खुंटही खपत नाहीत, त्या आपल्या पतीराजावर चाल करून येतात आणि ओरडतात- "अहो, उठा ! बसलात काय आळशासारखे ? घ्या हे तुमचे दाढीचे सामान आणि करून टाका ती दाढी". आळशी पतिराज कोणत्या गृहिणीला आवडतील बरे?
एक अपवाद असल्यामुळे, माझा आधी सांगितलेला 'शोध' सिद्ध होतो. तो अपवाद म्हणजे संशोधक ! संशोधक आळशी कधीच नसतात. कितीतरी विषयांवर कितीतरी संशोधकांची कितीतरी संशोधने सतत चालू असतात. मग त्यांना (य:कश्चित अशी ती -) दाढी करण्यास वेळ कोठून मिळणार ? म्हणून बहुतेक संशोधकांची दाढी वाढलेली असते.
मीही 'दाढी' या विषयावर (हे थोडेफार) संशोधन केलेले आहेच, त्यामुळे मी (स्वत:ची) दाढी करायची विसरलोच होतो बघा! नाहीतर माझी 'छोटीशी दाढी' पाहून मला आळशी कारकून किंवा आळशी प्रेमवीर समजाल ! या दाढी-शपथ मी तसा नाही हो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा