झोप

        
    मनुष्याला एक वेळ 'लॉटरी' नाही लागली तर चालेल, परंतु 'झोप' ही काही काळ तरी लागलीच पाहिजे !झोपेशिवाय मनुष्य म्हणजे लगामाशिवाय घोडा ! मनुष्ययंत्रणा व्यवस्थितरीत्या चालावयाची असल्यास त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. झोपेमुळे या आवश्यक विश्रांतीची निकड भागविली जाते.
          'झोप' ही मनुष्याला, तसेच इतर प्राणीमात्रांना आवश्यकच आहे. पाणवठ्यावर म्हशी, डोळे मिटून डुलक्या घेतात. गोठ्यामधली जनावरे कडबा खात झोपतात का झोपेतच कडबा खातात, हे आपल्याला ओळखता येत नाही. शाळेमध्ये कित्येकदा शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नास 'झोपेत' उत्तर देणारा विद्यार्थी आढळून येतो !  
          परवा मी एका मित्राकडे फिरत फिरत गेलो होतो. वेळ अर्थातच सायंकाळी सहाची ! त्याच्या घरात पाऊल टाकताच विमानाची घरघर ऐकल्यासारखी वाटले. पण नीट लक्ष देताच आढळून आले की, मित्रमहाशय घशाची विचित्र हालचाल करत तोंड 'आ' वासून निवांत घोरत झोपलेले आहेत ! त्या उघड्या पडलेल्या तोंडातून डासोबांची ये-जा बिनदिक्कतपणे चालू होती, तरी झोपी गेलेला तो मित्र जागा होत नव्हता ! काय ही झोपेची किमया !
          सर्वत्र छापून येणारा एक विनोद छान आहे.
एक साहेब एका कारकुनास विचारतात-
"काय हो गुंडोपंत, आज ऑफिसला उशीर केला ?"
त्यावर पंत उत्तरतात -
''सर, आज घरी उठायला उशीर झाला झोपेतून !"
पुन्हा साहेब 'हा हा' करून दाताड विचकून उद्गारतात -
"म्हणजे तुम्ही 'घरी'देखील झोपता वाटते !"
         
          ज्यांना घरी झोप येत नाही, असे कितीतरी लोक खास झोप घेण्यासाठी नाटक-सिनेमा पहावयास आलेले आढळतात. अलीकडील काळात काही 'संगीत नाटके' केवळ झोपेसाठी निर्माण झाल्याचा बराच बोलबाला आहे ! झोप येण्यासाठी गोळ्या गिळणाऱ्या पेशंटची कीव करावी तेवढी थोडीच ! कधीमधी गोळ्या प्रमाणाबाहेर घेतल्यास त्या अपायकारक ठरतात. त्यापेक्षा गावात होणारी संगीत नाटके, भिक्कार सिनेमा पाहणे अधिक गुणकारी ठरेल ! त्यामुळे टाईमपास होतो, करमणूक होते व शांत झोपही येते. संगीत नाटकातील गायकनटाच्या 'अsss'बरोबरच आपल्याला जांभईचा 'आsss' करण्यास परवानगी मिळते ! मला तर वाटते, झोप न येणाऱ्याना 'संगीत' नाटके ही पर्वणीच वाटत असावी ! अशा नाटकामुळे थेटर चालकांचा, नाट्यसंस्था चालकांचा व झोपेच्या गोळ्या घेणाऱ्याना संभाव्य मृत्यू टाळण्याचा फायदा- वगैरे फायदे होतात ! शिवाय थेटरमधील सर्व प्रेक्षक कंटाळून झोपले की, नाट्यसंस्था चालक (-स्वत:ही झोपले नसल्यास!) त्याच रात्री दुसऱ्या प्रयोगासाठी दुसऱ्या गावी रवाना ! पहा- झोप कुणाची फायदा कुणा !!

          'झोप' ही आवश्यक आहे , तितकीच महत्वपूर्ण आहे ! आपल्या देशाचे माजी पंतप्रधान नेहरू-शास्त्रीजी यांनी आपल्या जीवनातील कामकाजात, रोज चार तास का असेनात पण, झोपेसाठी राखून ठेवले होते. आपण तर नेहमीच झोपतो. भाषणगृहात भाषण चालू असताना श्रोते झोपतातच, पण अध्यक्षमहाशय देखील दोन चार डुलक्या घेतात ! ईश्वराने सर्व प्राणीमात्रांसाठी झोप निर्माण केलीच नसती, तर सगळीकडे हाहा:कार माजून सर्वांच्या डोळ्यावरील झोप अक्षरश: उडाली असती ! परंतु ईश्वर दयाळू (-व आपण सर्व झोपाळू!) आहे म्हणून ठीकय ! एरव्ही गोगलगाय म्हणून 'समजली' जाणारी स्त्री देखील पुरेशी झोप न मिळाल्यास 'दे माय धरणी ठाय' करून सोडते ! महात्माजी, नेपोलियन वागैर्रे व्यक्तींनी तर झोप अगदी हुकमी बनवली होती, ती उगाच का ! पुढारी लोक संधी मिळताच जशी 'इस्टेट' बनवतात, तसे ते सभागृहात चर्चेच्यावेळी , संधी मिळताच तासनतास झोप घेतात !         

          झोप आहे म्हणून जीवन आहे ! हे जीवन आपल्याला मुम्बईच्या फूटपाथवर मध्यरात्री दोन-तीन तास पसरलेल्या पथाऱ्याकडे पाहिल्यास दिसते. मनुष्य कितीही उद्योगी असला, अंतराळात जरी पोहोचला तरी, जगण्याइतकीच झोपेची काळजी त्याला घ्यावी लागते !गृहिणी पाकशास्त्रात कितीही पुढे गेली तरी तिला 'झोपेचे खोबरे' केलेले कधीच आवडणार नाही ! 'झोपेसाठी जीवन आहे का जीवनासाठी झोप आहे ?' या कूट समस्येचे उत्तर आपल्या नेत्यांकडे पाहिल्यास कळून येते. दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींबरोबरच अंतर्गत कलहांमुळे देशात पडत चाललेली फूट जाणवूनही हे नेते स्वस्थपणे 'झोपलेले' आढळतात !
          बसल्याजागीच झोप घेणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! महागाई, संप, दंगल या सर्व कटकटीपासून अलिप्त राहून दोन क्षण सुखाने जो विश्रांती  घेऊ शकतो, तोच खरा 'मानव' समजावयास पाहिजे !
          एका मोठ्या अपघाताची माहिती समजावी म्हणून, एस. टी.च्या प्रवासात मी (फुकट्या-) सहप्रवाशास माझ्या हातातील 'समाचार'पत्र घेऊ दिले . बराच वेळ झाला तरी तो सहप्रवाशी 'समाचार' परत करीना, म्हणून त्याचा यथेच्छ समाचार घेण्याचे ठरविले. पण कसचे काय नि कसचे काय ! 'समाचार'मधे तोंड खुपसून बसलेले सदर महाशय ऐकण्याच्या स्थितीत होतेच कुठे ! वृत्तपत्राची ढाल पुढे करून ते केव्हाच निद्रादेवीला शरण गेले होते !

         झोपेचे खरे महत्व जाणले एकाच बहाद्दराने ! सतत सहा महिने झोप घेणाऱ्या 'कुंभकर्णा'स कोण बरे विसरेल ? निद्रादेवीचा असा सच्चा उपासक या भूतलावर एखादाच जन्मतो !
          'झोपेसाठी जीवन' हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे ! कंटाळा आलेला 'बॉस' विरंगुळ्यासाठी लेडी-टायपिष्टबरोबर केबिनमधे बसून गप्पा मारतो, मग इतर लेखानिकानी काय फायलीशीच गप्पा मारत बसावे का ? तेही बिचारे विरंगुळा म्हणून सुखाचा 'मूलमंत्र' जपतात ! झोपेतून उठल्यावर आळस जातो, कामाला हुरूप येतो ! भगवान श्रीकृष्ण झोपेतून जागे झाल्यावर दुर्योधनास यादवसैन्य मिळाले व अर्जुनाला विजयच मिळाला !

          सर्वानी आपल्यापुढील कटकटी मिटवण्यासाठी 'झोपे'चा मार्ग अवलंबावा ! कुणालाच प्रमोशनची काळजी नको. (पडेल-)उमेदवारांना डिपॉझीट परत मिळवण्याची काळजी नको, तर विद्यार्थ्याना पास-नापासाची (व नापास झाल्यास आत्महत्येची) काळजी करावयास नको ! शिवाय झोप म्हटली की स्वप्न आलेच ! मग स्वप्नात आपल्याला कल्पवृक्ष गवसतोच  !   
         
          'झोप' हा करमणुकीचाही विषय आहे ! झोपेत चालणारी व्यक्ती, झोपेतच हातवारे करून बडबडणारी व्यक्ती- हे किस्से पाहिले की, मनोरंजन (खरोखरचे- टीव्हीवरचे नाही !) होते ! वडीलमाणसे काम सांगू लागली की, डोळे किलकिले करत झोपेचे सोंग घेणाऱ्या लहान मुलांची 'गंमत' कधी पाहिली का ? डोळे सताड उघडे ठेवून 'झोपणारी' माणसेही करमणुकीचा विषय होतात.

          मानवाच्या 'झोपे'वर इतर काही प्राणीमात्रांचे जीवनदेखील अवलंबून आहे ! आपण झोपलो की, 'उंदीर' या प्राण्याला जाग येते ! आपण 'झोपतो', म्हणून ढेकूण 'जगतो' असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती होणार नाही !    

          आपण दुपारी झोपल्यानंतर जी 'वामकुक्षी' घेतो, ती आरोग्यास आवश्यक अशीच झोप आहे ! 'झोप' हे संमोहनशास्त्र आहे. जगाच्या विनाशास्तव पुढे धावणाऱ्या अणुशास्त्रज्ञांनी याचाच उपयोग करावा ! दुसऱ्यांना जे जास्त 'झोप' घेऊ देतील, तेही निश्चित आघाडीवर जातील.

          स्वत: थोडीशीच झोप घेऊन, शत्रूला युद्धभूमीवर 'कायमची झोप' घेऊ देणाऱ्या आपल्या जवानांचे स्मरण चिरकाल राहणारच आहे ! 'झोप' या अस्त्राचा उपयोग जो अचूक करतो, तो जीवनात यशस्वी ठरतो. जो अयशस्वी ठरतो, त्याला मग काळझोपच पत्करावी लागते !

          म्हणून प्रपंचाच्या जंजाळातून मुक्त होण्यास, भरपूर आराम करण्यास, आपसातील यादवी मिटवण्यास 'झोप' हा एकच अत्युत्तम इलाज आहे ! निरनिराळ्या विद्यापीठातून, सध्या चालू असलेल्या 'प्रात्यक्षिका'व्यतिरिक्त, 'झोप का व कशी घ्यावी''झोपेचे फायदे-तोटे' वगैरे विषयांवरील अभ्यासक्रम  शिकवावेत. त्यात जे विद्यार्थी नैपुण्य दाखवतील, त्यांना 'झोपार्थी' 'प्रति कुंभकर्ण' 'झोपसम्राट' वगैरे 'पदव्या' बहाल कराव्यात ! अशाप्रकारचे अभिनव उपक्रम सुरू केल्यासच विद्यापिठाना 'जाग' येईल ! ह्या अभ्यासक्रमात पुरातन कालापासून झोपेसाठी उपयोगात आणलेली 'अंगाईगीते' ही गाईड्स म्हणून वापरण्यास हरकत नाही. ('भूपाळ्या'वर सरकारने बंदीच घालावी !)

          हल्ली तर म्हणे संशोधक 'झोपेत शिक्षण घेण्याचे शास्त्र' शोधू पहात आहेत ! म्हणजे मनुष्य एकंदरीत प्रगतीपथावरच आहे- झोपेतही ! असे असताना 'जागे व्हा ! जागे व्हा ! पुढे चला !' असे कंठरवाने ओरडून सांगणाऱ्याना काय म्हणावे !

          मी तर झोपेत 'झोपलास तर जागलास, जागलास तर मेलास !' हाच अद्वितीय संदेश पाठ करत असतो . कारण त्याशिवाय गाढ झोप येतच नाही !
        वाचकहो ! हे लिहितानाच किती झोप येऊ लागली हो ! हा लेख वाचून तुम्ही तर नक्कीच छान पेंगणार- तेवढाच तुम्हाला विश्रांतीचा चानस !      

          (ता.क.- संपादक महाशयानी आपल्या कार्यालयात दिवसा जागरण करून, अस्मादिकांचा लेख छापल्याबद्दल, आssss भार !) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा