जावई

        
            माझे मित्र जर तुम्हाला कधी भेटलेच व माझा विषय निघाला, तर ते माझ्याविषयीची एक आख्यायिका जरूर सुनावतील. ती अशी:
          एकदा बंडूचे (-म्हणजेच अस्मादिकांचे!)मामा बंडूघरी (बंडूच्या घरी = षष्ठी तत्पुरुष ) आले होते. त्यावेळी बंडू सात वर्षांचा होता. मामा बंडूच्या वडिलांबरोबर गप्पा मारत बसले होते. एका खुर्चीवर बसून बंडू 'या बाई या' या कवितेचा अभ्यास करीत होता. एकाग्रचित्त झालेल्या अशा आपल्या भाच्याचे कौतुक वाटून, मामाने बंडूला विचारले-
"काय पंत ? मोठेपणी कोण होणार तुम्ही ? "
"जावई !!" एका क्षणाचाही विलंब न लावता 'पंता'नी आपल्या उत्तराने मामासाहेबांच्या प्रश्नाला पार सीमापार टोलाविले . भाच्याच्या 'विनोदी' उत्तराने खूष झालेले मामा इतके हसू लागले की, त्यानी अडकित्त्याने कातरत असलेल्या सुपारीऐवजी जेव्हा बोटाचा तुकडा पडून रक्त पाहिले, तेव्हा कुठे ते शुद्धीवर आले !

          आता ही आख्यायिकाच असल्याकारणाने तीमधील खरेखोटेपणा सांगणारे व ऐकणारेच जाणोत ! परंतु माझ्या उत्तराबद्दल मला काहीच हास्यास्पद वाटत नाही. अहो, प्रत्येक जन्मलेले मूळ हे भावी सासऱ्यासाठीच जन्मलेले असते. प्रत्येक मूळ हे जन्मत:च 'जावई' म्हणून अस्तित्वात येते. एवढेच की, त्याला जावयाचे 'सर्टिफिकेट' मात्र काही ठराविक काळानंतर मिळू शकते.

          'जावई' या शब्दाने हसू येणाऱ्या मामासाहेबांना जर एखादी कुरूप मुलगी असती, तर मग त्या शब्दाने आपले सामर्थ्य व्यक्त करून चांगलेच रडविले असते ! एवढा मोठा 'मोगले-आझम' अकबर बादशहा सर्व जावयांना (-जावयानाच ना नक्की ! नाही, आमचा इतिहास विषयाचा अभ्यास केव्हाच 'इतिहासजमा' झाला आहे, म्हणून विचारलं !) सुळावर द्यावयास तयार झाला होता; परंतु जेव्हा त्याला आपणही एक 'जावई'च आहोत, हे समजले - तेव्हा त्याला झालेला आनंद काय वर्णावा महाराज ! त्याने आपला हुकूम मागे घेतला; कशासाठी माहित आहे ? तर आपले 'जावईत्व' टिकवण्यासाठी !

          'जावई' या शब्दाचा महिमा फार अगाध आहे. सासऱ्याच्या घरच थोडं राहिल्यावर, जास्त करण्यासाठी घोडं धाडणारा जावईच असतो ना ! दिवाळसणाला मोठ्या निग्रहान सासऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन घड्याळ-अंगठी घेण्यासाठी त्याच्या गृहात प्रवेश करणारा जावईच असतो ना ! सतत दीड तपं डोळ्यात तेल घालून मुलीची 'राखण' करण्याच्या कामातून सासऱ्याची सुटका करणारा तरी कोण ? जावईच ना!
ज्याच्या आगमनाने सारी 'सासरनगरी' आनंदित, प्रफुल्लित होते, तो कोण ? जावई !! भरपंक्तीत आग्रह करून साजूक तुपाची धार जी सासू 'एका'च्याच पानातील भातावर सोडते, टी कुणासाठी ? तर खास जावयासाठीच ! 'जावई-पुराण' वाढवावे तितके लांबते .

          आमच्या शेजारी दोन घरे सोडून पलीकडे आबासाहेब राहतात. आबासाहेब ही मोठी विनोदी वल्ली बरं ! केव्हा काय बोलतील याचा नेम नाही. परवा मी सहज त्यांच्या घरी गेलो होतो. तर स्वारी चिंताक्रांत असल्याची दिसली. मी विचारलं - "काय आबासाहेब, कसली काळजी ? " तसे ते उत्तरले- "अरे बंडू, सरकारने मुलीच्या विवाहाची मर्यादा अठरावरून सोळावर आणली ना ! अजून दोन वर्षांनी मी 'जावई माझा भला' म्हणणार होतो,  मला आता  यंदाच 'जावई माझा आला' म्हणत बसावे लागणार, नाही का ! माझी हसून पुरेवाट झाली.

          प्रत्येकाला (मनातून-) वाटतच असते की, एकवेळ आपल्याला मुलगी नसली तर चालेल, पण चांगल्या वरिष्ठ पदावर आरूढ असलेला ऑफिसर 'जावई' पाहिजेच ! पायात पॉलिश नसलेले बूट टक टक वाजवत आपला जावई ऑफिसला निघाला की, सासूबाईला जावयावरून मीठ-मोहऱ्या उतरून टाकाव्याशा वाटतात !

          'जावाईशोध' हा प्रसंग तर कोलंबसच्या 'अमेरिका शोधा'पेक्षा अद्भुतरम्य प्रकार असतो. एखाद्या मुलीचा बाप जेव्हा काखोटीला कुंडल्या, पत्रिका, पत्ते (-स्थळांचे, खेळायचे नव्हेत !) वगैरे घेऊन हिंडतो, तेव्हा मला त्या बापाचे भारी कौतुक वाटते. तो बाप 'डिटेक्टिव्ह धनंजय'च वाटतो . जेव्हा 'जावई मोठा गुणी मिळाला हं !' असे उद्गार एखाद्या सासू-सासऱ्यापुढे आले म्हणजे त्यांना 'जावई -शोधा'चे सार्थक झाल्यासारखे वाटत अईल !

          कितीही गरीब असला तरी सासूला आपला जावई श्रीमंतच वाटतो. आमच्या समोरच्या घरात राहणाऱ्या पुष्पाबाई नेहमीच सांगतात, 'आमचे जावई अगदी हुशार डॉक्टर आहेत हं!' वास्तविक त्यांचे जावई एक कम्पौंडर आहेत ! प्रभाकरराव सर्वाना आपणहून सांगतात- "आमचे पंत (म्हणजे त्यांचे जावई- मी नव्हे हं !) लाखात एक ! माणासांची खूप कदर आहे हो त्यांना !"

          प्रभाकररावांचेच सांगणे कशाला पाहिजे ? तुम्ही सर्व सासऱ्यांची एक 'श्वशुरसभा' घ्या आणि विचारा की कुणाचा जावई वाईट आहे ? छे ! नावच नको ! तुम्ही (-तुमच्याजवळ नसलेले) एक लाख रुपये द्यायला तयार झालात तरी जावयाच्या नावाने 'ब्र'ही उच्चारणारा सासरा मिळणार नाहीच !

          जावयाची किंमत गुणांनी, पैशाने सर्व गोष्टीनी होते. जगाच्या बाजारपेठेत सोने एकवेळ फुकट वाटलेले आढळेल, साखर पुन्हा स्वस्त झालेली दिसेल, परंतु जावई असातसा मिळू शकणार नाही. अहो, भाव आहे म्हणूनच जावई काळ्या- बाजारात बसू शकतो, कारण सध्या हुंडाबंदी आहे म्हणे ! तरीही सासरेलोक गुपचूपपणे दहापाच हजार जास्त द्यावयास तयार होतातच ना जावयांना ! कारण 'जावई' ही काही वाटेवर कुठेही पडलेली वस्तू नाही , कुणीही यावे व तिला उचलून घ्यावे ! त्यासाठी स्थळ काळ वेळ इत्यादि गोष्टींचाही विचार करावा लागतो.

          जावईलोकांचे बोलणे नेहमी विनोदी असते, अशी माझी (अर्थात प्रामाणिकच) समजूत आहे. कारण माझा एक विवाहित मित्र आहे, तरी तो मला 'विनोदी' म्हणून परिचित नाही. पण तो त्याच्या सासऱ्याशी बोलू लागला, म्हणजे त्यांना तो फारच विनोदी वाटतो- मग तो काहीही बोलू दे ! मित्राच्या घरी एकदा भांडण झाले नि काहीतरी बिनसले. तो चक्क 'सासरे गाढव आहेत' असे म्हणाला. केवढे हे धाडस ! दुसरे दिवशी स्वत: सासरे एकापाशी बोलताना आढळले- "आमचे जावई फार धाडशी हं ! असे धाडस अंगी हवेच !" त्या मित्राबद्दल माझा आदर आणखीनच दुणावला.

          जावयाचा स्वभाव थोडा बालिश असतो. त्यामुळे तो प्रसंगी लहान मुलासारखा अडून बसतो, हट्टी बनतो नि मग त्याची समजूत काढता काढता, बिचारी श्वशूरमंडळी बेजार होतात. मग अशावेळी -" हे काय जावईबापू , असा त्रागा करू नका ! हवे तर घड्याळ (-अथवा इतर तत्सम वस्तू) घेऊन येतो, पण हट्ट सोडा !" अशी मनधरणी केल्यानंतर, थोडा 'खाऊ' देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जावई 'माणूस' बनतो!

          जावई मिळण्याचे भाग्य सर्वांनाच लाभते अस नाही . पण असे हतभागी फारच थोडे! तर कित्येकांना जावई-भांडारच उघडावे लागते. जावई ही आपल्या मुलीचा यथायोग्य सांभाळ करणारी सन्मान्य व्यक्ती असते, अशी सासऱ्याची भावना असते. तर सासूच्यामते 'जावईबापू ' ही व्यक्ती म्हणजे आपल्या मुलीच भाग्य थोर म्हणून मिळणारी ! एकंदरित काय, तर जावईलोकांचच नशीब थोर म्हणून त्यांना भाव येतो , त्यांच्या हौशी पूर्ण होतात, आणि त्यांना पुढे कधीतरी सासरा होण्याचेही   भाग्य प्राप्त होते !

          'जावई' ही व्यक्ती समाजात फार मोठे स्थान मिळवून, टिकवून आहे. 'हा अमक्याचा जावई ' म्हणवून घेताना आपल्या सासऱ्याचेही नाव उज्ज्वल करणारा जावई खराच थोर नाही काय ? जावयाबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेमुळेच 'जावई माझा भला' 'जावयाचे बंड' वगैरे साहित्य-नाट्य-सिनेसृष्टीत तो हिंडू शकत आहे.

          अरे हो ! जावयाच कौतुक सांगता सांगता मी एक गोष्ट विसरलोच की ! कोणती म्हणून काय विचारता ? अहो, आता काही काळानंतर आषाढ महिना सुरू होईल ना !
मग ?
अरेच्चा ! 'मग' म्हणून काय विचारता मला ?
तिकडे आमच्या सासूबाई 'आखाड' तळून ठेवतील, तो खायला मी जाणार नाही, तर कोण तुमचा जावई ?
बराय, सासुरवाडीकडे आताच निघतो तर !!
.               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा